शेवटी चार दिवसांपासून वाट बघत असलेला वामनरावांचा टेस्ट रिपोर्ट आल्याचे त्यांच्या चिरंजीवांनी शेखर ने संध्याकाळी कळविले. रिपोर्ट निगेटिव्ह आलेला होता. खुप हायसे वाटले. चार दिवसापासुन सुतकी झालेले चेहेरे एकदम प्रफुल्लित झाले. सौ ने लगेच चहा टाकला. दोघांनी ही चार दिवसानंतर चवीन चहा घेतला. तरतरी आली. वामनरावांसी बोलले पाहिजे होते. फोन लावला. चार दिवसांनी त्याचा खळखळून हसण्याचा आवाज कानी आला. फार फार बरे वाटले.
तसा वामन माझ्या नात्यातला नाही. रोज फिरायला जायचो तेथे तोंडओळख झाली. परिचय वाढला. विचार जुळले. अन घनिष्ट मैत्री कधी झाली कळलेच नाही. दहा दिवसांपूर्वी शेखरचा फोन आला बाबांना बरे नाही. पण भेटता येत नव्हते. कोरोनाचा विळखा वाढला होता. कोणीही घराबाहेर पडणे पसंद करत नव्हते. पुढे लक्षणे दिसू लागली होती म्हणून सहा दिवसापुर्वी वामनरावांची टेस्ट करुन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. टेस्ट करुन आल्यानंतरचे दिवस अतिशय त्रासदायक ठरत होते. पण निगेटिव्ह रिपोर्ट मुळे सारे भय पळून गेले व ‘हायसे‘ वाटले.
किती छान शब्द आहे ना हा `हायसे वाटणे’. चपलक मराठी शब्द. बरे वाटणे, आनंद,सुख, वाटणे दुखः नाहिसे होणे. फारच छान व सकारात्मक प्रतिसाद देणारा शब्द आहे हा. कुठे ही चांगली घटना घडली की हायसे वाटले की ती जीवंत मनाची पावती समजावी. आजच एसटीच्या कर्मचार्यांना त्यांचा थकित पगार मिळणार या बातमीने हायसे वाटले.
त्यांच्या आनंदात सहभागी झालो आहोत असे वाटले. धो धो कोसळणारा नकोसा असलेला पाउस थांबला ‘हायसे ‘वाटले. गेलेली विज आली हायसे वाटले. धरणे भरली पाणीपुरवठ्यांत कपात करण्यात येणार नाही हायसे वाटले. दुखः परीवर्तनाची कोणतीही घटणा घडली की ‘हायसे’ वाटणे ही फार सुंदर अनुभुती आहे. हा शब्द सुंदर त्याचा अर्थ सुंदर व अनुभव सुंदर.
मला लाईक मिळाले तर मलाही हायसे वाटेल ना. !!
— भास्कर पवार
Leave a Reply