सकाळी साडेदहाचा सुमार. या घडीला शहरातील कोणत्याही पोलिस ठाण्याचा जो ठराविक माहौल असतो तसाच इथेही. प्रत्येक जण अत्यंत व्यस्त. आधल्या दिवशी अटक आरोपींना रिमांड साठी न्यायालयात नेणारा स्टाफ lock up च्या जाळी समोरून एकेका आरोपींच्या नावाचा पुकारा करत आहे, फिंगर प्रिंट्स घेणारे हवालदार राहिलेल्या आरोपीतांचे बोटांचे ठसे घेत आहेत, पोलिस निरीक्षक ( प्रशासन ) , ” इन चार्ज हवालदाराना “, अमुक ठिकाणी बंदोबस्त अजून का रवाना झाला नाही या बद्दल विचारत आहेत तर ” पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) “, रिमांड निघायला उशीर का होतोय याची चौकशी करत आहेत. एसीपी साहेबांच्या व्हिजीटची वेळ झाली आहे . त्यांना सादर करावयाच्या कालच्या दाखल गंभीर गुन्ह्यातील केस पेपर्सची जुळवाजुळव करण्यात डीटेक्शन ऑफिसर मग्न आहे. सीनिअर पोलिस इन्स्पेक्टर साहेबांना दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ” झेड प्लस व्ही. व्ही. आय .पी . व्हीजीटच्या “, बंदोबस्ताबाबत रिजन ऑफिसमधे मीटिंग साठी निघायचे आहे. त्यासाठी बंदोबस्त पॉइंट्स आणि किती अतिरिक्त मनुष्यबळ लागेल याबाबत तक्ते करण्यात ” गोपनीय शाखेचे ” हवालदार ” पोलिस निरीक्षक ( कायदा आणि सुव्यवस्था) ” यांच्यासह सकाळपासून व्यस्त आहेत. ड्युटी ऑफिसर , सकाळच्या वेळी येतात त्या पाकीटमारी , कारची काच फोडून आतली महाग sound system ची चोरी अशा ठराविक तक्रारींची दखल घेण्यात आणि विविध कामांसाठी निघालेल्या स्टाफच्या ” रवाना ” झल्याबद्द्लच्या नोंदी पोलिस स्टेशन डायरीमधे लीहीण्यात व्यस्त . जो तो आपल्या कामात गर्क .
अशा सर्वस्वी अनाकलनीय गदारोळात एक वयस्क जोडपे भिंतीलगतच्या बाकावर आपल्याच विचारगर्तेत बराच वेळ बसले आहे. ते गृहस्थ साठीच्या घरातील आणि त्यांच्याबरोबर असलेली पत्नी पंचावन्न ते साठ मधील. त्यांच्या साठी हे वातावरण पराकोटीचे रुक्ष. दोनच दिवसापूर्वी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या सहीशिक्क्यासहीत , रीतसर जावक क्रमांक नमूद केलेले पत्र त्यांना प्राप्त झालेले असते . त्या पत्रात ” या पोलिस ठाण्यात आपल्याविरुद्ध तक्रारअर्जं दाखल असून , आपण दिनांक xxxxx रोजी सकाळी ११.०० वाजता, चौकशीकामी पोलिस ठाण्यात हजर रहावे.” असा विनंतीवजा हुकूम असतो. त्यापुढे ” आपण हजर न राहिल्यास आपणास आपल्याविरुद्ध असलेल्या सदर तक्रारींबाबत काहीएक म्हणावयाचे नाही असे गृहीत धरण्यात येईल ” अशीही पुस्ती जोडलेली असते. पोलिस स्टेशनचा मामला ! उशीर करून उगीच आणखी काही बला नको ! असा विचार करून ती दोघे अर्धा तास अगोदरच पोलिस ठाण्यात पोहोचलेली असतात .
इतके वर्ष त्या भागात राहूनही पोलिस स्टेशन कोणत्या दिशेला आहे याचाही थांगपत्ता नसलेल्या त्या बाई आणि शिस्तीने संसार , इमाने इतबारे नोकरी करून निवृत्त झाल्यावर आपल्याच वाट्याला हे भोग का यावेत ? हे स्वतःला विचारत त्या प्रश्नाचे मनाशी उत्तर शोधणारे ते गृहस्थ… दोघेही विमनस्क चेहेऱ्यांनी त्या अधिकाऱ्याची वाट पाहत बसले आहेत . ते एकमेकांशी बोलत नाहीत . जमिनीला चिकटलेली नजर भिंतीवरील घड्याळाकडे टाकणे किंवा मधेच पिशवीतील पाण्याची बाटली काढून एखादा घोट घेऊन बाटली दुसऱ्याच्या पुढे धरणे , दुसऱ्याने उपचार म्हणून एखादा घोट घेणे एवढ्याच काय त्यांच्या हालचाली .
नव्याने त्यांच्याकडे लक्ष गेलेले एखादे जाणते हवालदार त्यांना कोणाला भेटायचे आहे याची चौकशी करतात. त्यांनी अधिकाऱ्याचे नाव सांगितल्यावर , ” आलेत की ते साहेब थोड्या वेळापूर्वी. त्यांची रूम वरती आहे . जा भेटा त्यांना ” असं सांगतो . तो अधिकारी आल्या आल्या थेट पहिल्या मजल्यावरील आपल्या दालनात जाऊन , एका दुसऱ्या प्रकरणातील न्यायालयाला तातडीने पाठवावयाचा अहवाल तयार करण्याच्या. गडबडीत असतो जोडपे त्याच्यासमोर गेल्यावर त्यांना पुन्हा बसायला सांगितले जाते. अधिकारी हातातले काम पूर्ण करून ” कोर्ट कारकून ” हवालदारांकडे एकदाचा तो अहवाल देतो. नंतर आपल्या खणातील फाईलमधून कुणा वकिलाच्या लेटरहेड वर टाईप केलेला आणि आवक क्रमांकासहित सरकारी निळे शिक्के धारण केलेला एक अर्ज बाहेर काढतो. ” xxxxx xxxx xxxx कोण तुमच्या?”
” सून आमची ” ” त्यांनी तुम्हां दोघांविरुद्ध , तुमच्या मुलाविरुद्ध आणि तुमच्या मोठ्या मुलीविरुद्ध , मानसिक छळ केल्याचा आरोप केलाय . तिच्या स्त्रीधनालाही तुम्ही तिला हात लावू देत नाही आणि तुमच्या छळामुळे कंटाळून तिला सध्या माहेरी राहणे भाग पडत आहे असं तिचं म्हणणं आहे. मुलगा कुठे आहे तुमचा ? ” ” तो कंपनीच्या कामासाठी परदेशी गेलाय दोन महिने . ” ” अहो , हे सगळं खोटं लिहिलं आहे हो तिने ! ” जोडप्यातील निवृत्त शिक्षिका बाळबोधपणे त्या अधिकाऱ्याला सांगते.” तुमचे रीतसर जबाब घ्यावे लागतील मला . ” अधिकारी . वर्षापूर्वी लग्न होऊन एका हसतमुख आणि समाधानी घरात आल्यावर , काहीही कारण नसताना स्वतःचाच हेका चालवून हट्टीपणाने घरातील शांतता मोडीत काढणाऱ्या सुनेने , आपली इप्सिते सहजा सहजी साध्य होत नाहीत हे उमगल्यावर , सासर सोडून माहेरी रहायला जाऊन , कोणाच्या तरी अविचारी सल्ल्याने कोणत्यातरी वकीलामार्फत , आई वडिलांचा आदर करणारा तिचा नवरा , सरळ आयुष्य कंठलेले सासू सासरे, आणि नणदेविरुद्ध , ” विवाहितेचा छळ ” या सदराखाली येणाऱ्या कायदेशीर कलमांचा आधार घेऊन तक्रार केलेली असते.
एकदा तक्रार केलीच आहे तर ती जास्तीत जास्त ” strong ” कशी होईल याचा विचार करून , साहजिकच ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत अशाही लिहून आणि साध्या प्रसंगांना भडक आणि अतिरंजित करून तिला मिळालेल्या सल्ल्या प्रमाणेच तिने विचारपूर्वक अर्ज केलेला असतो. अधिकारी दोघांचे तपशीलवार जबाब घेतो . दोघांच्याही जबाबात समांतर बाबी असतात. त्या वयस्क जोडप्याच्या देहबोलीवरून , जबाब पूर्ण झाल्यावर अधिकाऱ्याची तक्रार अर्जातील तक्रारींच्या विश्वासार्हतेबद्दल काही ठाम धारणा बनते . परंतु त्याच्या अधिकारांनाही मर्यादा असल्याने प्रकरणाची चौकशी पुढे चालू ठेवणे त्याला भाग असते. ” ठीक आहे . या तुम्ही . मात्र मुलगा आल्या आल्या त्याला इकडे पाठवून द्या. तुमच्या मुलीला सुद्धा कॉल लेटर पाठवलं होतं मी . त्या का नाही आल्या ? पाठवून द्या त्यांनाही. ” अधिकारी सांगतो . ” परत यावं लागेल का आम्हाला? ” ते गृहस्थ निघताना विचारतात. ” हो . हे मिटलं नाही तर. ” अधिकारी सूचक बोलून जातो. दोघांच्याही मन:पटलावर गेले काही महिन्यात घरात बिघडत गेलेल्या परिस्थितीचा आलेख तरळतो. जेमतेम वर्षापूर्वी त्यांच्या मुलाचे , विवाह संस्थेमार्फत ठरलेले लग्न यथासांग पार पडलेले असते . पाहण्याचा कार्यक्रम , नंतर दोन महिन्यात साखरपुडा आणि त्यानंतर चार महिन्यात लग्न पार पडलेले असते . मुलीचा भाऊ आय . टी . क्षेत्रातील आणि आणि परदेशी स्थायिक झालेला. ही मुलगी सुद्धा शहरात वाढलेली , शिक्षित आणि चांगल्या पगारावर एका मोठ्या कंपनीत नोकरीला .
नवरामुलगा उच्चशिक्षित, इंजिनियरिंग केलेला आणि एका नामवंत कंपनीत उत्तम पगाराची नोकरी असलेला. त्याची बँकेत
नोकरीस असलेली लग्न झालेली मोठी बहीण उपनगरात राहणारी. मुलाचे लग्न पार पडल्यावर आई वडील आपल्या मुख्य जबाबदाऱ्या पडल्याच्या समाधानात असतात. नव्या नवलाईचा पहिल्या तीन चार महिन्यांचा काळ पार पडतो न पडतो तोच , घरातल्या शांत आनंदी वातावरणात शुल्लक , परंतु भविष्यातील अशांततेची नांदी ठरू पाहणाऱ्या घटनांच्या सावल्या रेंगाळू लागतात . सकाळी काहीही ठरले नसले तरी सूनबाई ऑफिसमधून परस्पर काहीतरी निमित्ताने तिच्या आईकडे जात असल्याचे फोन करून कळवते . अलीकडे नवरा सोडून इतर कुणाशी ती जास्त बोलत नाही . हल्ली तिच्या आईचा फोन आला की आपल्या खोलीचे दार लाऊन बाकीचे जेवायला ताटकळत असले तरी अर्धा पाऊण तास बोलत असते . या घराला अशा गोष्टींची सवय नसल्याने सासूबाईं समजावणीच्या सुरात तिला काही सांगण्याचा प्रयत्न करतात. तिला ते आवडत नाही. सासऱ्यांना या गोष्टी खटकल्या तरी ते त्यांकडे बायकांचा विषय म्हणून आणि आपलाच उपमर्द होईल या शंकेने जाणून बुजून दुर्लक्ष करतात . मुलाचे आणि सुनेचं काहीतरी बिनसलं आहे याची मुलाच्या आईला कल्पना येते. आपले मन मोकळे करण्याचे तिचे हक्काचे ठिकाण म्हणजे आपल्या मुलीला ती सगळी कल्पना देते. मुलाची मोठी बहीण वडीलकीच्या भावनेने भावजयीला भेटून चार शब्द सांगते. सूनेने तिचे ऐकण्याचे दूरच राहो , परंतु आपल्याला नणदेने काही उपदेश केल्याने तिचा स्वाभिमान दुखावतो . त्याबद्दल सूनेची आई , विहिणीला फोन करून तीव्र नापसंती व्यक्त करते. हिला नेमके हवंय तरी काय ? या सर्वांनाच पडलेल्या प्रश्नाचं उत्तर थोड्या दिवसातच मुलाकडून कळतं. ” आपण अमेरिकेत जाऊया आणि तोपर्यंत वेगळे राहूया ” असा हेका सुनेने मुलाकडे धरलेला असतो . या दोन्ही गोष्टींना मुलाचा ठाम विरोध असतो. अमेरिकेत असलेल्या भावाकडे तिने सगळी चौकशी केलेली असते. शैक्षणिक पात्रता पाहता अमेरिकेत नोकरी मिळणे दोघानाही अवघड नसते. तिकडे जाणे कसे चांगले ठरेल हे ती त्याच्या गळी उतरविण्याचा दररोज प्रयत्न करते. परंतु वयस्क आईवडिलांना सोडून अमेरिकेत स्थायिक व्हायला मुलाची अजिबात तयारी नसते. त्याचप्रमाणे मोठी राहती जागा असताना वेगळे बिऱ्हाड करण्याची गरजच काय ? या त्याच्या प्रश्र्नाला तिच्याकडे उत्तर नसते. पर्याय म्हणून दोघांनी तिच्या आईकडे जाऊन राहूया असेही ती सुचवते . तिच्या आईची याला सहर्ष मान्यता असली तरी तो यालाही तयार नसतो .मुलगा सुनेचे त्यावरून रात्री बेरात्री वाद होत असल्याचे त्याच्या आईवडिलांना जाणवते. ते शांतताप्रिय जोडपे मुलाला हवं तर वेगळा रहा, आमची काही हरकत असणार नाही असेही सांगतात . इतकंच नव्हे तर दोघे त्यांनी पूर्वी हौसेने पुण्याला घेतलेल्या छोटया फ्लॅट मध्ये जाऊन राहण्याचीही तयारी दाखवतात. परंतु मुलगा तसले काही करून देत नाही. इकडे सूनबाईचा स्वप्नभंग तिच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट दिसू लागतो. तिचे वागणे अगदी असह्य होऊ लागल्यावर एरवी शांत आणि समजूतदार असलेल्या मुलाची सहनशक्ती संपते आणि तोही आपल्या बायकोशी फटकून वागायला सुरुवात करतो.
असेच काही दिवस जातात आणि एक दिवस सूनबाई सुटीच्या दिवशी मोठी बॅग भरते , स्वतःच्या सर्व दागिन्यांसकट सगळ्या वस्तू बरोबर घेते आणि आईच्या घरी निघून जाते. राग जरा मावळला की दोन चार दिवसात ती परत येईल या आशेवर असलेल्या सासूबाई वाट पाहून चार आठ दिवसांनी सुनेच्या आईला फोन करून मुलीला जरा समजावण्याबाबत कळकळीची विनंती करतात . परंतु मुलीच्या आईच्या मते यात मुलीची काहीही चूक नसते. ” तुम्हीच तुमच्या मुलाला समजवा. ” , असा उलट सल्ला देऊन पुढे ” माझी मुलगी मला जड झालेली नाही ” हेही सुनावून बिघडलेली परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता अधिक स्पष्ट करते. मुलाची बहीण आईच्या विनंतीवरून अपमान बाजूला ठेवत , मुलीच्या घरी जाऊन मुलीशी सामोपचाराने घेण्याची पुन्हा विनंती करते. परंतु , ” सासू सासरे घरात नकोतच मला . वेगळे घर घेतल्या खेरीज मी परत येणार नाही ” असं तिला भावजय निक्षून सांगते . मुलगाही बायकोला अनेक वेळा बाहेर भेटून ती घरी परत यावी म्हणून समजावण्याचा प्रयत्न करतो. परंतु ती काहीही मानायला तयार नसते. काही दिवसांनी आपले मार्ग वेगळे असल्याचं मुलाला कळून चुकतं आणि कशाला भेटायचं तिला ? असं म्हणून भेटणेही बंद करतो. असेच काही दिवस जातात. नातेवाईकांची कुजबुज चालू होते. लोकांच्या प्रश्नांना काय उत्तरे द्यायची या विचाराने मुलाचे आईवडील नात्यातील समारंभांनासुद्धा जाण्याचे टाळतात . घरातील एके काळचं खेळीमेळीचं वातावरण इतिहासजमा होतं. दरवर्षी हौसेने होणारे प्रवास बंद होतात. पूर्ण कुटुंबाची मन:शांती ढळलेली असताना आईवडिलांना मुलाच्या भविष्याची विवंचना ग्रासत असते. इथपर्यंत त्या घरात सुरू असलेल्या घडामोडींचा पहीला अंक संपतो घराला घरपण आणणारा आत्मा नष्ट झालेला असतो आणि घरात ” पुढे काय ” याबाबत पूर्ण अनिश्चिततेचं वातावरण असताना पोलिस स्टेशनमधून चौकशी कामी बोलावणे येते आणि दुसऱ्या अंकाची नांदी सुरू होते . पोलिस ठाण्यात , अधिकाऱ्याने सुनेने सासरच्या मंडळींवर वकिलामार्फत केलेल्या आरोपांची जंत्री वाचून दाखवलेली असतेच. त्यात कांगावा ठासून भरलेला असला तरीही ते आरोप बिनबुडाचे आहेत हे कायद्याने जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तो पर्यंत कायद्याच्या चष्म्यातून ते खरेच असल्याचे गृहीत धरण्यात येणार याची जाणीव झाली , की या वयस्क जोडप्याची मानसिक अवस्था केविलवाणी होते . अर्थात अशा प्रकारच्या तक्रारींच्या अनुषंगाने गुन्हे तात्काळ दाखल करण्यात येत नाहीत . त्या आधी पोलिस स्टेशनशी संलग्न समुपदेशक आणि पोलिस अधिकारी , संबंधित पति पत्नी यांना प्रथम वेगवेगळ्या वेळी आणि नंतर एकत्र बोलावून त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात. त्यांना झालेलं लग्न आणि मांडलेला संसार मोडण्याचे दुष्परिणाम समजावून , विभक्त होण्यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र , त्या उभयतां पैकी कोणी एकाने जरी आडमुठेपणाने विभक्त व्हायचेच आहे असे ठरवले की त्या समुपदेशनाचा काहीही परिणाम होत नाही. इथेही सून माघार घ्यायला तयार नसते. ती तिच्या वकीलांसोबत पोलिस ठाण्यात येऊन तिच्या तक्रारीवरून ” विवाहितेचा छळ ” या सदराखाली कायदेशीर गुन्हा दाखल करून घेण्यात आग्रही असते. मुलाचा , मुलाच्या बहिणीचा जबाब घेऊन झालेले असतात. मुलगा तिने घरी परत येऊन राहण्यात घरातल्यांची कुणाचीच काही एक आडकाठी नाही . उलट सर्वाँना तेच हवंय असं सांगून मुलगी ऐकतच नसल्याची खरी परिस्थिती विदित करतो. मुलाने वेगळे बिऱ्हाड करावे याबाबत तिच्याईतकीच तिची आईही आग्रही असते. दरम्यान , मुलगी कुणाच्या तरी सल्ल्याने सासरकडच्याना नमवण्यासाठी Prevention of Domestic Violence Act ( घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा ) च्या तरतुदी खाली कोर्टात केस करते. हा अत्यंत कडक तरतुदींचा कायदा. या संस्कारी घरातील मंडळी , त्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सूनेला उपाशी ठेवणे , सतत टाकून बोलणे , हात उगारणे , तिच्या आईला भेटू न देणे अशा स्वरूपाच्या कृती कधीही करणे शक्य नाही हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत असले तरीही ते खोटे असल्याचे जेव्हा कायदेशीर पुराव्याने सिद्ध करणे भाग पडते तेव्हा वकील उभा करण्यापासून अटकपूर्व जामिनापर्यंत आणि खटल्यासाठी कोर्टाच्या वाऱ्या हे सोपस्कार मागोमाग येतात. त्यासाठी कोर्टात त्या त्या तारखेला उभे राहणे , अटकपूर्व जामीन अर्जातील आरोपी /अर्जदार म्हणून नांव पुकारल्यावर न्यायाधीश साहेबांसमोर उभे राहणे , सरकारी वकिलांनी त्यांच्या जामीनाला एक शिरस्ता म्हणून युक्तिवाद करत विरोध करणे आणि यांच्या वकिलाने प्रतिवाद करत तक्रारीतील आरोप खोटे असल्याचे सांगून जमिन अर्ज करणारे खटला संपेपर्यंत कुठेही पळून जाणार नाहीत याची ग्वाही देत अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा यासाठी याचना करणे हे सारे घडते. हे अनुभवताना त्या वयस्क जोडप्याची मने अन्यायाच्या भावनेने अक्षरशः थिजून जातात . आपली काहीही चूक नाही हे सत्य असताना , आम्ही काहीही गुन्हा केलेला नाही हे टाहो फोडून सांगायची वेळ का यावी याचे उत्तर त्यांना कोणीही देऊ शकत नाही. न्यायदेवता आंधळी असते हे खरे , पण ती इतकी आंधळी असू शकते यावर त्यांचा विश्वास बसत नाही . त्यांना अटकपूर्व जामीन मिळतो. मुलाच्या संसाराचा बट्ट्याबोळ झालेला पाहताना , अशी निर्दयी सून घरातून आपणहून दूर झाल्याबद्दल मनातल्या मनात समाधान मानून ते दोघेही एकमेकांची समजूत काढतात. कोर्टात खटला उभा राहतो आणि या घडामोडींचा तिसरा भाग चालू होतो.
तारखेला कोर्टात ११ वाजता पोहोचणे, आपल्या केसचा नंबर कधी येतोय याची कोर्टातील गर्दीत कोर्टात उभं राहून प्रतिक्षा करणे , कधी यांच्याच वकिलाला दुसऱ्या कोर्टातून यायला उशीर झाल्याने काहीही कामकाज न होता पुढची तारीख पडणे, प्रसंगी पोलिसांनी कोर्टात हजर केलेल्या सराईत गुन्हेगारांच्या रांगेत उभं राहायला लागणे किंवा त्या सर्वस्वी अनोळखी आणि नकोशा वातावरणात पूर्ण दिवस व्यतित करायला लागणे , उतरत्या वयात जेवणाच्या वेळा टळणे . या आणि अशा अनेक गोष्टींमुळे कोर्टातील तारखेचा प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी एक प्रकारची धडकी भरवणारा ठरतो.
हे सगळे सोपस्कार आणि घडामोडी घटस्फोट ही एक गोष्ट अटळ असल्याचे अधोरेखित करतात. त्या बाबतीतही वकीलामार्फत रीतसर अर्ज संबंधित न्यायालयात दाखल होतो. स्वतःच विभक्त झालेल्या त्या मुलीची घटस्फोटाला मात्र सहजासहजी मान्यता नसते. मुलगी नवऱ्याच्या वार्षिक उत्पन्नापासून त्याच्या आईवडिलांच्या मालकीच्या गोष्टींची किंमती सकट कोर्टात यादी सादर करते . घटस्फोट हवा असेल तर , तिच्या मान्यतेच्या बदल्यात ” पोटगी ” म्हणून नवऱ्याने दरमहा मोठी रक्कम द्यावी , इतकेच नव्हे तर पुण्याचा फ्लॅटही तिच्या नावावर करून द्यावा अशी मागणी सुद्धा ती करते. अर्थात त्या फ्लॅटच्या मालकीशी मुलाचा काहीही संबंध नाही हे सिद्ध केल्यावर तो प्रश्न निकाली निघतो. दिवसामागून दिवस जात असतात . मुलाचं कुटुंब,” कोर्ट प्रकरणं “या प्रकाराने जेरीला आलेले असते. मुलाला त्याच्या कर्तबगारीमुळे चालून आलेल्या परदेशी वाऱ्या करण्याच्या चांगल्या संधी हुकतात. कधी एकदा हे शुक्लकाष्ठ संपेल असं त्यांना होऊन जातं. परिस्थिती ओळखून जाणते वकील त्या कुटुंबाला वन टाईम सेटलमेंट चा पर्याय सुचवतात. मुलाकडील लोकही या दुष्टचक्रातून एकदाचं लवकर बाहेर पडावे म्हणून तो पर्याय निवडतात . दोन्हीकडील वकील दोन्ही पक्षकारांची बैठक घेऊन , एकत्र बसून , चर्चा करून मुलीला देण्याची एक ठराविक रक्कम ठरवतात. न्यायालयाच्या मान्यतेने ती रक्कम मुलीला सुपूर्द करण्यात येते. मुलगी सर्व केसेस मागे घेते. घटस्फोट मान्य करते आणि इथे कुटुंबाच्या तीन चार वर्षाच्या काळ्या पर्वाचा अंत होतो. मात्र झाल्या प्रकाराने आईवडील खचून गेलेले असतात. त्यांना कशातच स्वारस्य वाटत नाही. एकदा हात पोळल्यामुळे , स्थळं सांगून येत असली तरी मुलाची दुसऱ्या लग्नाला बिलकुल तयारी नसते. आपल्या मागे त्याचं कोण पाहणार याची आईवडील रास्त चिंता करत असतात. नातेवाईकांनीही हर तऱ्हेने सांगून पाहिले तरी त्याची पुनर्विवाह करण्याची तयारी नसते. गेलेल्या तीन चार वर्षात घरातील सगळे प्रसन्न रंग उडून गेलेले असतात . मुलगा मित्रमंडळीत पूर्वीसारखा मिसळत नाही . एक तर पार्श्वभूमी काहीही माहीत नसलेले आणि परिस्थितीचे गांभीर्य जाणण्याची कुवत नसलेले महाभाग लग्न न टिकण्यामागे त्या मुलाबद्दलच नाही नाही ती अनुमानं काढतात आणि जाण असलेले , नाही ते प्रश्न उगाळत त्याला नको करतात . वेगळी झालेली मुलगी तिकडे आईकडे मजेत असतेच असे नाही. लग्नानंतर आपले हट्ट सहजा सहजी पदरात पाडून घेता येतील हा तिचा भ्रम जोपासण्यात तिच्या आईनेच , तिच्या संसारात ढवळाढवळ करून हातभार लावलेला असतो. कोणत्याही गोष्टीला घरात नकार घेण्याची सवय नसल्यामुळे तिचा विवेक बाजूला पडतो. सर्वसामान्य मुलींपेक्षा आपण वेगळी व्यक्ती आहोत , आपल्याला आपली ” space ” मिळालीच पाहिजे हा दुराग्रह , दूरगामी परिणाम पाहणारी दूरदृष्टी बाद करतो . तिने दुसरे लग्न करावे हा तिच्या आईचा आग्रह तिला मान्य असतो. मात्र ” सेकंड मॅरेज ” या रकान्यात जाऊन पडल्यावर येणारी स्थळेही तिच्यासारखीच घटस्फोटितांची किंवा विधुर व्यक्तींची येतात तेव्हा तिचा भ्रमनिरास होऊ लागतो. मग चिडचिड आणि आईच्या घरीही खटके. बाहेरच्या जगात एकट्या स्त्रीला किंवा घटस्फोटितेला जे सहन करावं लागतं , त्याचाही अनुभव तिला येऊ लागतो. परदेशाचे कितीही आकर्षण असले तरी एकटीने तिकडे जाऊन राहण्याइतपत तिच्यात धैर्य नसते. मुलगीही लांब गेली तर उतारवयात आपल्याजवळ कोण या विचाराने तिच्या आईचे मतही तिने जाऊ नये असे असते. आपल्या मुलीने संसार मोडण्याचे कारण तिच्या नवऱ्याने आईवडिलांपासून त्यांच्या उतारवयात दूर राहण्यास नकार देणे हे होते हे तिची आई सोयीस्करपणे विसरते . मुलीच्या आईने स्वतः लग्नानंतर बरीच वर्षे एकत्र कुटुंबात काढली असली तरी , ” आपल्याला जे सोसायला लागलं ते आपल्या मुलीच्या वाटेला येऊ नये ” ही अविवेकी भूमिका तिने घेतलेली असते . तेंव्हा मुलीच्या इच्छेसाठी इतरांना दुःख सोसायला लागले तरी तिला इतरांची पर्वा नसते. एकूणच अविचाराला प्रोत्साहन मिळाल्याने दोन सक्षम जीवांची आयुष्यभराची सेहोलपट सुरू राहाते. इथे संस्कारांचे महत्व काय ते समजून येते.
आर्थिक सबलता आल्याबरोबर आपण आपल्या मनासारखे आयुष्य हट्टाने नाही तर हक्काने जगू शकू या भ्रमात बरीचशी तरुण मंडळी असतात . परिस्थितीशी जुळवून घेण्याचे अतिशय महत्वाचे संस्कार लहान वयात कमी पडले की भविष्यात हट्टीपणाला औषध मिळणे दुरापास्त होऊन जाते. ज्येष्ठ व्यक्तींचा आदर राखता आलाच पाहिजे आणि त्यांना वाकून केलेला नमस्कार हा फक्त त्या व्यक्तीला नसून त्यांनी आयुष्यभराच्या अनुभवांमधून मिळवलेली योग्य निर्णय घेण्याची क्षमता , त्यांची मानसिक परिपक्वता आणि आपली इच्छापूर्ती दुसऱ्यांसाठी जाचक ठरत असेल तर त्या इच्छेचा त्याग करण्याची भावना यांना केलेला असतो याची जाण लहान वयातच मुलांना मिळणे आवश्यक असते. पौगंडावस्थेत मित्रमंडळीत रमताना घरातील बंधने त्यांना नकोशी वाटू लागतात . आईवडिलांपेक्षा मित्रमैत्रिणींबरोबर असण्यात त्यांना जास्त स्वारस्य असते . याच काळात त्यांच्या विविध सुखांच्या व्याख्या तुलनात्मक निरीक्षणांवर बेतू लागतात. अशा काळातून जाताना संस्कारी मुलं कौटुंबिक मूल्यांपासून ढळत नाहीत . अशी मुले तुटेपर्यंत कोणत्याही गोष्टी ताणत नाहीत . त्यांचे संसार कसे छान बहरतात . या उलट लग्नापूर्वीच स्वतःच्या जाचक अटी ” हल्लीच्या आधुनिक काळात ” हे लेबल लावून आवश्यक म्हणून ठरविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा परिणाम विवाहानंतर कौटुंबिक स्वास्थ्याला ग्रहण लागण्यातच होतो हे सत्य जाणवे पर्यंत उशीर झालेला असतो. विशेष म्हणजे लग्नानंतर नवराबायको मधे सुरू झालेल्या वादाची कुणकुण लागलेल्या जवळच्या मित्रमैत्रिंणीपैकी बव्हतांशी जण तो वाद संपविण्याचे प्रयत्न न करता मुलीला कायदेशीर हककांची जाणीव करून देण्यात धन्यता मानतात . सामोपचार घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करणे दूर राहिले , पण ” या ” असल्या प्रकरणांतील निष्णात वकील शोधण्याचे प्रयत्न स्वतःहून सुरू करतात. आणि एकदा का कायदा , फौजदारी गुन्हा , अटक प्रक्रिया , कोर्ट कचेऱ्या आणि पुरावे हा काटेरी मार्ग अवलंबला की त्याला दोन पक्षातील कायदेशीर लढाईचे स्वरूप येते. त्यानंतर विभक्त झालेल्या जोडप्याची दिलजमाई होणे कधीही शक्य नसते.
अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या भोवती पाहत असतो. त्यात कायद्याचा दुरुपयोग कसा होऊ शकतो या विचाराने आपलं मन व्यापतं. अर्थात आर्थिक दृष्ट्या सबळ नसलेल्या कित्येक स्त्रियांना, त्यांचे लग्न झाल्यावर सासरकडच्या रूढी, परंपरा , सासू आणि सून यांच्या नाते संबंधाबाबतची पुरातन गृहितकं यामुळे आजही अतोनात छळ सहन करावा लागतो ही वस्तुस्थितीसुद्धा विसरून चालणार नाही. त्याला पायबंद बसवण्यासाठी आणि अशा अबलांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्माण झालेल्या अशा या कायद्यांची नितांत आवश्यकता आहे हेही निर्विवाद आहे .
मात्र अशा कायद्यांचा वापर होत असताना दबावतंत्र म्हणून सुक्या बरोबर जेंव्हा नाहक ओलंसुध्दा मुद्दाम जाळलं जातं तेव्हा तपासी अधिकाऱ्याची खरी कसोटी लागते. अशा केसेस त्याच्यासाठी एक प्रकारचं आव्हान असतं. समोर असलेल्या तक्रारींतील गोष्टी धडधडीत खोट्या आहेत हे तो ओळखून असतो. मात्र त्या तशा खोट्या असल्याचे पुरावे अभिलेखांवर आणणे ही सोपी गोष्ट नसते. बरं , ते खरे खोटे ठरवायची प्रक्रिया जेव्हा घडते तो पर्यंत खोटेपणाने अडकवल्या गेलेल्या त्या ज्येष्ठ नागरिकांना अटकपूर्व जामीन, अटक प्रक्रिया , जामीन म्हणून कुणाला तरी उभं करणे आणि तारखेला कोर्टात उपस्थित राहणे या दिव्यांतून सुटका नसते. आरोप खोटेच असल्यामुळे प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणीत ते सिद्ध होऊ शकत नाहीत हे जरी खरे असले तरी घरातील अशांतता ढळण्याबरोबरच काही वर्ष मानसिक तणावाखाली असल्यामुळे त्यांचे व्हायचे ते मानसिक आणि आर्थिक नुकसान होऊन गेलेले असतेच. तक्रार आल्यानंतर सुरवातीपासून त्याला तक्रारीतील सत्यासत्यते बद्दल अधिकाऱ्याला अंदाज आलेला असतो. मात्र नाहक भरडल्या गेलेल्या व्यक्तींना शक्य तितकी रास्त मदत करताना आपल्याही अधिकारांना असलेली मर्यादेची जाणीव त्याला हतबल करते.
-अजित देशमुख
( निवृत्त अप्पर पोलीस उपायुक्त )
9892944007
ajitdeshmukh70@Yahoo.in
Leave a Reply