दक्षिण आफ्रिकेत जेव्हा आर्थिक मंदी आली होती तेव्हाची गोष्ट आहे. गोष्ट मोठी रोचक आहे. सगळेच धंदे जेमतेम चालत होते. अशातच एका हॉटेलमध्ये एक परदेशी पाहुणा आला. त्याने हॉटेल मॅनेजरला एक हजार डॉलर्सची नोट दिली. तो म्हणाला “मला छानशी खोली पाहिजे. मात्र मी खोली बघूनच ती घ्यायची की नाही हे ठरवेन.”
मॅनेजरने वेटरला आपल्या पाहुण्याला खोली दाखवून आणायला सांगितले. वेटर अति उत्साहात पाहुण्याला बऱ्याच खोल्या दाखवू लागला. दरम्यान बँक मॅनेजरने ती हजार डॉलर्सची नोट त्यांच्या बेकरीवाल्याला दिली. त्याची बरीच बाकी थकली होती. बेकरीवाला खुश झाला.
त्याचा ही धंदा बसतच चालला होता. त्याने ती नोट किराणा दुकानदाराला दिली. त्याची बिले चुकती करुन नवीन माल घेतला व उत्साहाने आपल्या कामाला सुरुवात केली.
किराणा दुकानदाराने ती नोट त्याच्याकडे काम करणाऱ्या कामगाराला देऊन त्याचा तीन महिन्याचा पगार त्याला अदा केला व त्याला परत कामावर आणले. या कामगाराने दुकानदाराकडून पगार मिळाला नाही म्हणून त्या हॉटेल मॅनेजरकडून हजार डॉलर्स उसने घेतले होते. तो त्याचा मित्र होता. त्याने प्रथम जाऊन त्या हॉटेल मॅनेजरला ती नोट परत केली. तो म्हणाला “आता माझे कर्ज फिटले आहे. तुम्हाला धन्यवाद. तुम्ही नसता तर मी उपाशी मेलो असतो.”
हॉटेल मॅनेजर त्या नोटेकडे कौतुकाने आणि आश्चर्याने पहात होता. बेकरीवाला, किराणा दुकानदार, दुकानातला कामगार सगळ्यांची देणी फिटून ती नोट त्याच्याकडे परत आली होती. तेवढ्यात परदेशी पाहुण्याचे सगळ्या खोल्या बघण्याचे काम आटोपले होते. त्याला कुठलीच खोली पसंत पडली नाही म्हणून त्याने आपले पैसे परत मागितले. हॉटेल मॅनेजरने त्याची हजार रुपयाची नोट त्याला परत दिली. पाहुणा आला तसा निघून गेला.
कथेतल्या प्रत्येक माणसाने आपापले कर्तव्य आणि जबाबदारी चोख पार पाडली. काही वेळासाठी एक हजार डॉलर्स चलन रुपाने बाजारात फिरले जसा पैसा नेहमीच फिरत असतो. आपल्या जवळ जी संपत्ती असते त्या संपत्तीचे आपण मालक नसून विश्वस्त असतो एवढे लक्षात ठेवले तरी या गोष्टीची मजा घेता येईल.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply