स्वाइन फ्लूच्या काळात आरोग्य विषयक सवयींना निदान पुण्यात तरी अतिशय महत्त्व आले होते, त्यामुळे काही प्रमाणात व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी घेण्यात आली. नंतर अ त्या चांगल्या सवयी किती टिकल्या हे सांगता येणार नाही. त्यातीलच एक सवय म्हणजे हात नेहमी लिक्विड साबणाने धुणे. त्याच काळात हँड सॅनिटायझर हा शब्द अनेकांच्या परिचयाचा झाला.
एरवी रूग्णालयांमध्ये त्याचा वापर होतो, पण सामान्य लोकांपर्यंत हा शब्द प्रथमच पोहोचला स्वाइन फ्लूच्या काळात. हँड सॅनिटायझर हे अशा प्रकारचे द्रावण आहे की, जे काही सेकंद हातावर चोळून लावल्यास सर्व प्रकारच्या जंतूंचा नाश होतो. साबणामुळेही ते काम होते पण एखाद्या ठिकाणी साबणच नसेल तर हँड सॅनिटायझर वापरणे फार सोयीचे असते.
साबण आपल्या हातावरील घाण व जीवाणू काढून टाकत असतो. हँड सॅनिटायझर हे मुख्यत्वेकरून इथिल अल्कोहोलचे बनवलेले असतात त्यात पाणी, अल्कोहोलचे इतर प्रकार व सुवासिक द्रव्येही मिसळलेली असतात. इथिल अल्कोहोल हाच त्यातला महत्त्वाचा घटक असतो. त्याच्यामुळे सर्व प्रकारचे जीवाणू व विषाणू मारले जातात. एक काळजी. मात्र यात घेणे आवश्यक असते ते म्हणजे हँड सॅनिटायझरमध्ये इथिल अल्कोहोलचे प्रमाण ६० ते ९५ टक्के असायला हवे.
हँड सॅनिटायझर विकत घेताना त्यात या अल्कोहोलचे प्रमाण साठ टक्क्यांच्या वर आहे हे बघून घ्यावे. हँड सॅनिटायझर वापरताना पुरेशा प्रमाणात ते हातावर ओतून घ्यावे, १० ते १५ सेकंदात हात कोरडा झाला तर तुम्ही पुरेसे सॅनिटायझर घेतले होते असे समजा. सॅनिटायझर हातावर घेऊन ते दोन्ही हातांनी ३० सेकंद चोळा. काही वेळ ते हातावर टिकले पाहिजे तरच जंतू मरतात. हाताच्या सर्व भागाला ते लागेल याची काळजी घ्यावी. हँड सॅनिटायझर मातीने बरबटलेल्या हातांना लावून काही उपयोग नसतो, कारण घाणीतील जंतू, रक्तातील जंतू मारू शकत नाही.
त्यामुळे हात मुळातच फार घाण नसतील तरच ते वापरणे फायद्याचे असते. हँड सॅनिटायझरमुळे हात कोरडे होतात, त्यामुळे त्यानंतर हँड लोशन लावावे. प्रगत देशात शाळकरी मुलांना हँड सॅनिटायझरचा वापर करायला सांगण्यात येते. या हँड सॅनिटायझरमुळे जीवाणू व विषाणू दोन्ही मारले जातात.
स्टॅफिलोकॉकस ऑरियस या मेथिसिलिनलाही न जुमानणाऱ्या मानवी शरीरातील मांस खाणाऱ्या जीवाणूंनाही हँड सॅनिटायझर मारून टाकते. हँड सॅनिटायझरचा व्यवस्थित वापर केला तर आजारांचे प्रमाण कमी होते. हँड सॅनिटायझरमध्ये ग्लिसरीन, इथिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल मायरिस्टेट, प्रॉपलिन ग्लायकॉल, टोकीफेरिल अॅसिटेट, अमिनोमेथिल प्रोपॅनॉल, कार्बोमर (थिकनर) वापरतात.
Leave a Reply