आत्ताची विभक्त कुटुंब आणि त्यांच्या संसाराची सुखाची व समाधानाची व्याख्या वेगळी आहे. बहुतेक सगळ्यांच्या घरी ठरलेले सामान म्हणजे फर्निचर. स्वयंपाक घर बेडरूम वगैरे कमी जास्त फरकाने एक सारखेच असते. पण आमच्या काळी असे नव्हते म्हणजे गावातील स्थायिक व प्रतिष्ठित घरं. मध्यम वर्गातील दोन प्रकार, नोकरदार व आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्यांची घरे असे प्रकार होते. त्यामुळे खूपच तफावत होती घराघरात. पण एक गोष्ट मात्र आठवते ती म्हणजे भांडी. पितळी डबे. भांडी. ताटवाट्या. तांबे पेले. याच गोष्टी आहेत. आणि ती भांडी मात्र स्वच्छ घासून पुसून व मांडून ठेवलेले स्वयंपाक घर पाहून गृहिणीला त्यापुढे ताजमहाल क्या चीज है असे वाटायचे. याला मी पण अपवाद नाही. मलाही असेच हंडी भांडी असलेले घर सजवायचे होते. पण आर्थिक स्थिती फारशी बरी नसल्याने हौस पूर्ण करता येत नव्हती. एक तरी मोठा हंडा किंवा मोठे भांडे घरात असावे असे राहुन राहुन वाटत होते. अशी भांडी घरात असली की मान मिळायचा आणि ही मापावर कोणत्या घरात मिळतील याची माहिती सगळ्यांना होती. उदाहरणार्थ पायलीच्या भाताचा हंडा अमूक एका घरी तर सव्वा शेराचे लाडू भाजण्याचे जाड बुडाचे पातेले अमूक एका घरात. त्यामुळे नावलौकिक होता…
आणि एका प्रसंगाने एक मोठा हंडा मला घेण्याचा दिवस आला होता. खरंतर खूप वाईट वाटते सांगायला नकोच तरी यात माझी चूक नव्हती. काय झालं बहात्तरचा दुष्काळ लोक घरातील भांडी विकून घर चालवत होते. खेडेगावात भांड्यांना मोडीत काढून फार पैसे मिळत नव्हते म्हणून ते शहरात आणून मोडित घालत.
एकदा मी रस्त्यावरुन जाताना वाटेत एका दुकानात एक मोठा हंडा म्हणजे जवळपास तीन घागरी पाणी मावेल एवढा मोडीत घालण्यासाठी आणला होता आणि घासाघीस चालली होती म्हणून मी तिथे गेले. व त्यांच्या इच्छेनुसार पैसे दिले. दुकानदार ओळखीचे होते म्हणून. पैसे जरी भरपूर मिळाले होते पण त्या माणसाच्या मनात काय चालले होते हे मी ओळखले वाईट तर मलाही वाटले होते पण मी अडवून घेतले नाही याचे समाधान आहे. घरी आणून तो हंडा चिंच लावून स्वच्छ घासून पुसून ठेवला होता. आता पूर्वीचे दिवस नव्हते म्हणून फक्त पाणी भरून ठेवण्यासाठी एखाद्या घरात मोठे कार्य असेल तर नेत असत. तेव्हा बैठकीत एक सजावटीसाठी भांडी ठेवण्याची पद्धत नव्हती. अनेक वर्ष तो हंडा होता पण गाव सोडून इथे येण्यापूर्वीच मी तो हंडा माझ्या मोठ्या मुलीला देऊन टाकला. तिच्या घरी धान्य भरुन ठेवते. पण कधी कधी आठवण झाली की मन अस्वस्थ असते. एका मालिकेत असेच हंडे एकावर एक एका हॉटेलमध्ये मांडलेले पाहून आठवण झाली. आपल्या तरुण पणी असलेल्या काही वस्तू आता अशा पहायला मिळतात तेव्हा बर वाटत एवढेच..
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply