हंसराज बेहल यांच्या घरी कोणत्याही प्रकारचे संगीताला पोषक वातावरण नसताना फक्त संगीताची ओढ होती म्हणून त्यांनी अंबाला इथे आचार्य चिरंजीवलाल यांच्याकडे संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१६ रोजी अंबाला येथे झाला. त्यानंतर काही काळ संगीत शिकवणे, स्टेज प्रोग्राम करणे, काही गाण्यांचे रेकोर्डिंग करणे यामध्ये काही काळ त्यांनी व्यतीत केला. हा सारा अनुभव गाठीशी घेऊन १९४४ साली ते मुंबईत आले. तिथे त्यांचे एक नातेवाईक चुन्नीलाल बेहल यांनी त्यांची ओळख पृथ्वीराज कपूर यांच्याशी करून दिली.
या ओळखीमुळे हंसराज बेहल यांना त्यांचा पहिला स्वतंत्र संगीत दिग्दर्शनासाठी चित्रपट मिळाला. तो होता दिग्दर्शक ए.बी. इराणी यांचा “पुजारी”. या चित्रपटात बेबी मुमताज (म्हणजेच मधुबाला) हिने गायलेले एक गाणे खूप गाजले ते म्हणजे “भगवान मेरे ग्यान का दीपक जला दे”. १९४७ साली “दुनिया इक सराय” या चित्रपटात त्यांनी मीनाकुमारी कडून सुध्दा काही गाणी गाऊन घेतली. त्यातले हे एक “सावन बीत गयो, माई री”. मा.हंसराज बेहल यांच्याकडे सुरवातीच्या काळातील काही गाणी जसे “दिल-ए-नौशादको जीने की हसरत हो गई तुमसे” गायल्यानंतर मा.हंसराज बेहल यांनी लता मंगेशकर यांना आपल्या मूळ मोकळ्या आवाजात गायचा सल्ला दिला आणि त्यांच्याकडून मेहनतीने तशी गाणी गाऊन घेतली. बॉलीवूड मध्ये मा.हंसराज बेहल हे “मास्टरजी” या टोपणनावाने प्रसिध्द होते.
मोहम्मद रफी मास्टरजींकडे गायले तेव्हा त्यांनी रफी साहेबांना मोकळ्या आवाजातच गायला लावले. मास्टरजींनी अनेक नवीन लोकांना संधी दिली. त्यात एक नाव आहे मधुबाला झवेरी. तसेच गीतकार वर्मा मलिक आणि गीतकार नक्श लायल्पुरी यांना सुध्दा मास्टरजींनी पहिली संधी दिली. पण मास्टरजींची सर्वात मोठी फाईंड म्हणजे आशा भोसले. मास्टरजींच्याच “चुनरिया” चित्रपटातील एका कोरस मध्ये गाणाऱ्या आशाजींचा आवाज मास्टरजींनी बरोबर हेरला. आणि आपल्या पुढच्या चित्रपटात मध्ये त्यांना गायची संधी दिली. त्यांचे पहिले गाणे “है मौजमें अपने बेगने, दो चार इधर दो चार उधर”. त्यानंतर आशाजींना आपल्या चित्रपटात गाऊन घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली.
हंसराज बेहल यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कलेची, संगीताची निस्सीम सेवा केली. आपल्या भावासोबत त्यांनी एन. सी. फिल्म नावाची एक कंपनी बनवून काही चित्रपटांची निर्मिती सुध्दा केली. “लाल परी”, “मस्त कलंदर”, “राजधानी”, “चंगेज खान” यासारखे काही चित्रपट त्यांनी बनवले. संगीताचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. “जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देस है मेरा” या गाण्यासाठी त्यांना सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मा.हंसराज बेहल यांनी हिंदी चित्रपटसंगीताला आपल्या पंजाबी ढंगाच्या संगीताने नुसतेच नटवले नाही तर अनेक संगीतात अलौकिक देणग्या दिल्या. मा.हंसराज बेहल यांचे २० मे १९८४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हंसराज बहेल यांच्याबद्दल आणखी एक माहिती जाता जाता……….
आपल्या कामाबद्दल आणि शांत मनमिळाऊ स्वभावाने अगदी लाखात एक असे गणले जाणारे मा.हंसराजजी आणखी एका बाबतीत लाखात एक होते. म्हणजेच त्यांचे हृद्य हे शरीराच्या उजव्या बाजूला होते. सर्वसाधारणपणे माणसाचे हृद्य हे डाव्या बाजूला असते पण उजव्या बाजूला हृद्य असणे हे लाखात एकाचेच असते. अर्थात ही गोष्ट त्यांच्या डॉ. कडून कळलेली आहे. (चेंबुरचे डॉ. रवी साठे).
संदर्भ.इंटरनेट/ misalpav.com
हंसराज बहेल यांची गाणी.
Leave a Reply