पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांना एकत्रितपणे पंचमहाभूते असे म्हणतात. संपूर्ण विश्वाची निर्मिती याच पाच तत्वांनी झाली असल्याचे आयुर्वेद मानतो. हनुमंताला ‘पवनपुत्र’ म्हटले गेले आहे. याचा अर्थ; वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे. इतका; की जन्म झाल्यावर तेज महाभूताचे मूर्तिमंत रूप असलेल्या सूर्यालाच गिळंकृत करण्यास हनुमान झेपावले!! वायू हा प्रचंड सामर्थ्य असलेला आहे. मात्र; तो आपल्या शरीरासाठी उपकारक व्हावा याकरता त्याला आटोक्यात ठेवणे हे आवश्यक असते.
शरीरातील वात नियंत्रित ठेवण्याचा साधा-सोपा मार्ग म्हणजे दररोज अंघोळीपूर्वी कोमट तेलाचा अभ्यंग करणे. त्वचा हा अवयव सर्व शरीरव्यापी आहे. तेल हे वातावरील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे नियमित अभ्यंग केल्यास वात आटोक्यात तर राहतोच; मात्र त्वचेचे रोगदेखील होत नाहीत. शिवाय शरीराला बळकटी येवून ते वज्राप्रमाणे कठीण होते. हनुमानाला शनिवारी तेल वाहण्याचा प्रघात आपल्याला अभ्यंगाचे महत्व तर शिकवत नसेल?!
हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा वापरला जातो. साधारणपणे सूंठ, पिठीसाखर आणि तीळ यांच्यापासून मिश्रणापासून हा सुंठवडा तयार केला जातो. सुंठीमुळे रुची वाढते, पचन सुधारते, सुंठ पचायला हलकी, वीर्याने उष्ण व विपाकाने मधुर असते, गुणाने स्निग्ध असते, तसेच आमवातात हितकर असते. सुंठ ही केवळ वात कमी करण्यास उपयुक्त आहे असे नसून ती ‘वृष्य’ आहे असे आयुर्वेद सांगतो. थोडक्यात काय; तर सुंठ ही पौरुषशक्ती वाढवणारी आहे. हनुमंत म्हणजे साक्षात पौरुषशक्तीच नव्हेत काय?
आणखी एक महत्वाची गोष्ट; हनुमान लंकेला जात असताना त्यांचा स्वेद हा समुद्रातील एका मगरीने प्राशन केला अशी कथा आहे. त्यापासून जन्माला आलेल्या हनुमंताच्या मुलाचे नाव ‘मकरध्वज’ असे असून तो एक अतुल्य सेनानी होता. अहिरावण-महिरावण यांसारख्या राक्षसांना त्याने पराजित केले होते. आयुर्वेदीय रसशास्त्रात ‘मकरध्वज’ नावाचे औषध असून; वैवाहिक सौख्यासाठी ते एक उत्तम औषध आहे. (अर्थात; या औषधांचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करण्याचा विचारदेखील करू नये!). पौरुषाची ही परंपराच या कथेतून मांडली जात नाही काय?
आयुर्वेदाने उत्तम आचार हे यशाचे साधन मानले आहे. बलवान आणि बुद्धिमान असूनदेखील प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनम्र भाव ठेवणारे हनुमान आपल्याला उत्तम आचार कसे असावे याचीच शिकवण देत नाहीत काय?
आपले शास्त्र-परंपरा यातून काहीतरी आरोग्यसंदेश दडलेला आहे हे निश्चित. गरज आहे ती; त्याला डोळसपणे- श्रद्धेने नीट अभ्यासण्याची!! ‘नाही रे’ असे म्हणणे खूप सोपे असते. ‘आहे रे’ असे म्हणून ते सिद्ध करण्यातच खरी मजा आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपले शास्त्र आणि आपली संस्कृती यांप्रती सकारात्मक वृत्ती जोपासण्याची प्रतिज्ञा करूया.
© वैद्य परीक्षित स. शेवडे.
‘श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद चिकित्सालय-औषधालय’; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply