नवीन लेखन...

हॅपी डायरी

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक वेळ एकदातरी येतेच ,ज्यावेळी ती पूर्णतः हतबल झालेली असते.सततच्या येणाऱ्या संकटांनी तिचे आयुष्य अंधारमय झालेले असते. जीवन निरर्थक वाटू लागते. सर्व हात सुटलेले असतात आणि खोलवर अंतहीन कोसळत असल्याचा अनुभव तिला येत असतो.

 अशा वेळी योग्य मदत मिळतेच असे नाही. बाहेरून कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नसते. तेव्हा बुद्धी  मनाला सावरण्याचे काम करू लागते. शरीराची जशी रोगप्रतिकारशक्ती  असते त्याप्रमाणे मानसिक स्थिती ठीक ठेवण्यासाठी धडपडणारी देखील यंत्रणा असावी.जी अशावेळी  कार्यरत होते त्यातून अनेक गोष्टी समजू लागतात.

माझ्या आयुष्यातील  घडलेल्या अशाच एका प्रसंगी मला गवसलेली स्वतःला आनंदी ठेवण्याची आणि नकारात्मक वातावरणात देखील मनाचा समतोल राखण्यास मदत करणारी पद्धती म्हणजे ‘हॅपी डायरी’ होय.

 ही गोष्ट साधारण दहा-अकरा वर्षापूर्वीची आहे. शालेय शिक्षण संपवून मी महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला होता.शालेय शिक्षण  संपताना आर्थिक परिस्थिती इतकी डबघाईला आली की विज्ञान शाखेला प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मला माझे पुढचे शिक्षण थांबण्याची स्थिती मला दिसू लागली.

 वडिलांची मला शिकवण्याची खूप इच्छा असली तरी परिस्थिती पुढे तेही हतबल होते.शेवटी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये रात्री ड्युटी करून दिवसा कॉलेज करायचे ठरवले.हॉस्पिटलची 24तास इमर्जन्सी सेवा होती.रात्री येणार्‍या इमर्जन्सी पेशंटना ऍडमिट करून घेण्यास नाईट ड्युटी वरील नर्सला मदत करणे हे माझे काम होते.रात्रीची ड्युटी असली तरीही रात्री दोन-तीन तासाचे काम असेल आणि नंतर झोपायला वेळ भेटेल असा माझा अंदाज होता. सुरुवातीला काही दिवस तसे झालेही, परंतु काही महिन्यानंतर रात्री-बेरात्री येणाऱ्या पेशंटची संख्या झपाट्याने वाढत गेली.कधीकधी एकाच रात्री तीन-तीन पेशंट यायचे.रात्री बारा वाजता पेशंट आला की त्याचे सोपस्कार उरकून झोपेपर्यंत रात्रीचे दोन वाजले असायचे .त्यानंतर झोप लागते न लागते तोच पाच वाजता दुसरा पेशंट हॉस्पिटलचे बेल वाजवी.

शेवटी व्हायचा तोच परिणाम होऊ लागला. झोपेचे बारा वाजू लागले. दिवसादेखील झोप होईनाशी झाली.या गोष्टीचा तब्येतीवर देखील परिणाम होऊ लागला. पुरेशी झोप होत नसल्याने कॉलेज देखील बुडू लागले. अभ्यास होईनासा झाला.  आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती कमी होत चालली. याचे कारण म्हणजे आजवर मी कधीच रात्रीचे जागरण केले नव्हते. सलग सात-आठ तास मांड ठोकून अभ्यास करणारा मी अर्ध्या एका तासातच उठू लागलो.एकाग्रता कमी होऊ लागली. परिणामी  निकाल जेव्हा हाती आला तेव्हा दरवर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारा मी गुणानुक्रम तर घालवला होताच ,टक्केवारी देखील घसरली होती. आजवरच्या सोनेरी शैक्षणिक जीवनातील तो एक काळा दिवस होता.

 मी निकाल घेऊन जड मनाने हॉस्पिटलमध्ये आलो आणि माझ्या खोलीत खिडकी शेजारी बसलो. दार आतून लावून घेतले. खिडकीबाहेर दिसणाऱ्या काळाकुट्ट अंधारलेल्या आभाळाप्रमाणेच माझं मन देखील भरून आलं होतं.काळसर विचारांचे ढग मनात तयार होत होते. बुद्धीची मनावरील पकड निसट्त होती.निकाल मनासारखा लागणार नाही, अपेक्षाभंग होणार आहे याची मला जाणीव होती. परंतु आप्पांना- वडिलांना हे कसे सांगायचे, त्यांच्या मनाला काय वाटेल याच गोष्टीचे अधिक वाईट वाटत होते .दरवर्षी एक मे ला जेव्हा निकाल लागत असे,  तेव्हा मी निकाल घेऊन घरी यायच्या आधीच ते सर्व शेजारी व मित्रांना माझ्या मुलाचा पहिला नंबर आलाय म्हणून पेढे वाटून आनंद व्यक्त करत असत. त्यांचा हा विश्वास मी गेली दहा वर्ष सतत टिकविला होता.त्यामुळे सततच्या 10 वर्षाचा प्रथम क्रमांकाचा विक्रम अकराव्या वर्षी तुटला होता आणि तेही अतिशय बेकार स्थितीत असताना.मी त्यांची शेवटची आशा होतो.मला  हरून चालणार नव्हते. त्यांना या अडचणीतून मीच बाहेर काढू शकणार होतो.

आई ,अप्पा, गाव ,लोकांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा आणि माझा निकाल यांसारख्या संमिश्र विचारांनी माझ्या मनात काहूर माजू लागलं .खूपच निराश आणि उदास वाटत होतं. यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग मला दिसत नव्हता. गावाकडे मी असतो आणि असा प्रसंग आला असता तर मी माझी सायकल काढली असती आणि गावाबाहेर उंच टेकडीवर असलेल्या गणपती मंदिराकडे निघालो असतो, डोंगरमाथ्यावरून गावाकडे पाहताना आपले गाव त्यातील आमचे घर खूप लहान दिसत असे, निसर्गाच्या विशालकाय रूपासमोर आपल्या समस्या आणि आपलं जगणं क्षुल्लक वाटत आणि मन हलक होण्यास मदत होत असे. परंतु शहरात असल्यामुळे मला तो मार्ग अवलंबता येणार नव्हता.

मी रूम मध्ये असलेल्या माझ्या कपाटाकडे वळालो. पेशंटला लागणाऱ्या बेडशीट, चादरी, उशा यांसारख्या वस्तू ठेवायच्या जागेत मी माझं सामान ठेवलं होतं. पुस्तक, वह्या, कपडे टेपरेकॉर्डर ,कॅसेट्स असं बरंच काही त्याच्यात दाटीवाटीने ठेवलं होतं. पुस्तकांच्या बाजूला तळाशी एक डायरी होती जिला मी कित्येक दिवसात हात लावला नव्हता. डायरी काढली आणि खिडकीशेजारी येऊन बसलो. ही डायरी अशा प्रकारचीं होती की त्याच्यात माझ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण आणि सुखद घटनांच्या आठवणी लिहिल्या होत्या.

दहावीत असताना निबंधलेखन करण्यास उपयुक्त ठरतील म्हणून संकलित केलेली सुभाषिते, सुवचने, अवतरणे, काही कविता चारोळ्या, शायरी ,काही महत्त्वपूर्ण वाक्ये यांच्यासोबत अधून मधून माझ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंगाच्या नोंदी मी त्या डायरीत केल्या होत्या.लहानपणापासून घडलेल्या प्रसंगाची साक्षीदार असलेल्या त्या डायरीतील एकेक पान मी वाचू लागलो. शालेय जीवनात मिळालेली  पारितोषिके, काही अभिमानास्पद प्रसंग,सुखद घटना मी त्यात नोंद करून ठेवल्या होत्या.याशिवाय हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर सुरुवातीला माझी झालेली फजिती, घडलेल्या काही विनोदी घटना, काही विनोदी प्रसंग मी लिहून ठेवले होते. या सर्व गोष्टी डायरीतून उलगडताना  नकळत मन हलकं होत असल्याचे जाणवू लागले.
शेवटचं प्रकरण ‘निलुची गोष्ट’वाचून संपेपर्यंत मी सामान्य स्थितीत आलेलो होतो.

नंतर काही दिवसानंतर या घटनेकडे जेव्हा मी त्रयस्थ दृष्टिकोनातून पाहिले तेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या, नकारात्मक घटना घडली कि मनात सर्व नकारात्मक विचारांची मालिका सुरू होते .आपल्या आयुष्यात सर्व चुकीचे घडले आहे असे वाटू लागते.स्वाभाविकपणे आपल्या आयुष्यात घडलेल्या सुखद अथवा आनंदी घटनांकडे कानाडोळा करण्याचे मनाची स्थिती असते, अशा वेळी तुमच्या आयुष्यातील आनंदी तुम्हाला सुखद अनुभूती देणाऱ्या घटना जेव्हा डायरीच्या रूपाने जिवंत होतात तेव्हा मन वस्तुनिष्ठ विचार करू लागते आणि अधिक विवेकवादी होते,सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपल्या आजवरच्या आयुष्यात अनेक चांगल्या घटना घडल्या याचा अर्थ यापुढील आयुष्यात देखील चांगल्या घटना घडतील असा आशावाद निर्माण होतो हेच या  डायरीचे उपयोजन होय, म्हणून मी या डायरीला ‘हॅपी डायरी ‘असे म्हणतो.

आज बऱ्याच वर्षानंतर या घटनेकडे जेव्हा पाहतो तेव्हा असे लक्षात येते की ती एक क्षुल्लक घटना होती परंतु त्यावेळी त्या प्रसंगाने मी खूप उदास झालो होतो. त्यावेळी माझ्या मनाला उभारी द्यायचं काम या हॅपी डायरीने केले.नंतर  नोकरीनिमित्त पुण्याला आलो.इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करत असून देखील केवळ आवडीखातर मानसशास्त्राचा अभ्यास केला.बेक,अल्बर्ट एलिस, सिग्मंड फ्राईड,कार्ल रॉजर्स यांच्या अभ्यासाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.

हॅपी डायरीतील पाने आता झपाट्याने भरू लागली लागली आहेत.डायरीतील रिकामी पाने मला खुणावून सांगत असतात
‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’

— विजयकुमार काशिनाथ पाटील 

Avatar
About विजयकुमार काशिनाथ पाटील 11 Articles
नमस्कार मित्रांनो, मी..विजयकुमार पाटील...आपणासारखाच शब्दविश्वातील एक प्रवासी. व्यवसायाने इंजिनीअर असलो तरी मन पुस्तकातच अधिक रमतं. उत्तम पुस्तके,उत्तम चित्रपट आणि उत्तम मित्र यांचा संग्रह हा माझा छंद. वाचनाची आवड लहानपणापासून असली तरी लेखनास मात्र मी नुकतीच सुरुवात केली आहे.खुप वाचन केलं की आपणही काही लिहावं असं वाटू लागतं,त्या वाटण्यातून बरेच लेखन झालं.अमेझॉनवर माझी काही ebooks प्रकाशित झाली आहेत. तंत्रज्ञानाची आवड असल्याने बदलते तंत्रज्ञान सोप्या मराठी भाषेत समजावून सांगणारे 'मराठी technical vijay' हे youtube channal देखील मी नुकतेच सुरू केले आहे. मराठीश्रुष्टीच्या या माध्यमातून विविध विषयांवरील माझे लेखन आपल्या पर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न आहे. तो कसा वाटला मला जरूर कळवा. धन्यवाद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..