MENU
नवीन लेखन...

हरवलेल्या बॅगचा शोध

लेखक – जनार्दन गव्हाळे, खामगाव

आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार फेऱ्या धावतात. बरे असो.

विशेष म्हणजे, ही यात्रा स्पेशल गाडी सुरू करण्यासाठी खामगाव-जलंब येथील प्रवासी संघटनेने खूप प्रयत्न केले. तसेच बुलडाणा मतदार संघाचे तत्कालीन खासदार आनंदराव आडसूळ यांनीही आमची मागणी रेटून धरली. त्यामुळेच ही गाडी सुरू झालेली आहे. सर्वसामान्य वारकऱ्याला स्वस्तात पंढरपूर जाण्याची संधी यामुळे मिळाली. फक्त दीडशे रुपयात जत्रा असल्याने अनेकांनी पंढरीची वारी सुरू केली. मलाही वाटले चला पंढरपूरला जावे. त्यामुळे दरवर्षी रेल्वेने पंढरपूर जात होतो. तेथे गेल्यानंतर श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या भक्तनिवासात तर कधी श्री संत सोनाजी महाराज कवठा यांच्या मठात मुक्काम असायचा. कधी विठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळील एखाद्या भाड्याच्या खोलीत थांबायचो. त्यामुळे पंढरपुरातील बहुतेक रस्ते ओळखीचे वाटायचे. तसे काही नाही. आपल्या शेगावसारखेच पंढरपूर आहे. पण गर्दी लाखात असते. त्यामुळे एकदा ओळखीची व्यक्ती भेटली की, यात्रेत ती दुसऱ्यांदा भेटणे कठीणच आहे. अशा परिस्थिती जर एखाद्याची बॅग हरवली तर मग काय सोय?

त्याचे असे झाले की, माझी बदली आकोटला झाल्यामुळे मी सन २००९ मध्ये वारीला जाऊ शकलो नाही. पण परिचयातील बरीच मंडळी खामगाव रेल्वेगाडीने पंढरपूरला निघाली होती. ही गाडी खामगाववरून निघत असल्यामुळे आपल्याकडचीच मंडळी जास्त असते. खामगाव, नांदुरा, जळगाव, शेगाव, बाळापूर, तेल्हारा, अकोला तालुक्यातील वारकरी खामगावहून बसतात, ते जागा मिळण्यासाठी. असेच अकोल्यातील दोन शिक्षक मित्र एका बोगीत बसले. हातरुणचे पांडुरंग चोपडे सर आणि अकोल्यातील महादेव शेगोकार हे साेबत असल्याने त्यांनी आपआपल्या बॅग प्रवासादरम्यान कॅरिअरवर ठेवल्या. सर्व वारकरी मंडळी आणि आपल्याकडची म्हटल्यावर चोरीचा धोका नव्हताच. प्रवासादरम्यान सर्वच निश्चिंत होते. मग २० तास जर पंढरपूरला जाण्यासाठी या गाडीने लागतात, तर सुरू झाल्या गप्पा. पीक पाणी काय म्हणते पासून तुम्ही कोण्या गावचे, कुठे असता, जमीन किती आहे, शेजारच्याचे आडनाव असे झाडून पुसून विषय प्रवासात एकमेकांशी शेअर केले गेले.

नंतर प्रवास संपला, उतरण्याची सर्वांची घाई. गडबडीत यातील शिक्षक महादेव शेगोकार यांची काळ्या रंगाची वर ठेवलेली बॅग कुणीतरी उचलून उतरताना घेऊन गेला. त्याच रंगाची आणि तशीच दुसरी बॅग तेथे होती. ती आपली समजून हे शिक्षकही उतरले. आणि गेले मुक्कामाच्या ठिकाणी सोनाजी महाराजांच्या मठात. तेथे गेल्यावर आंघोळीसाठी कपडे, मोबाईलचे चार्जर काढण्यासाठी बॅग उघडली तर उघडेना. कुलप लावलेले असल्याने वांदा झाला. आता कसं? आपली बॅग कुणीतरी अनावधानाने नेली. आणि त्याची आपल्या हाती आली. बग अदलाबदल झाल्याने आता एवढ्या लाखोच्या जनसागरात ती सापडणे महाकठीण काम. मग काय करायचे तर लावा एकमेकांना फोन, पण त्या पंढरपुरात गर्दीच एवढी की मोबाईल टॉवर जाम झालेले. कुणाशीच संपर्क करता येत नव्हता.

पण इकडून त्यांना फोन लागत होते. अशातच आकोटचे श्री संत वासुदेव महाराज यांचे निधन झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्याची खात्री करण्याच्या उद्देशाने मी आमच्या नात्यातील चोपडे सरांना थेट फोन लावला. आणि माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, आमचे मित्र शेगोकार सरांची बॅग हरवली आहे. आता ४००- ५०० किमी अंतरावर मी आकोटला आणि यांच्या बॅगचे मी तरी काय करणार?

पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून मी माझ्या परीने शोध घेणे सुरू केले. त्यांना विचारले तुमच्या आजुबाजूला कोण बसलेले होते. कोणत्या गावाचे होते. त्यांच्याविषयी काही माहिती आहे का? त्यावर त्यांनी फक्त एवढेच सांगितले की, त्या माणसाच्या घरी दुकान असावे, कारण त्यांनी प्रवासादरम्यान आपल्या घरी फोन लावून चौकशी केली होती. बहुतेक नांदुरा तालुक्यातील असावे, आणि त्यांचे आडनाव घोराडे असण्याची शक्यता आहे. त्यांची बॅगही काळ्याच रंगाची होती. पण एवढे असून फायदा काय? म्हणून डोके चालवू लागलो.

आणि मला आठवले आमच्या वडी येथील वार्ताहराचे नाव. मुकुंदा घोराळे पाटील हे आता हयात नाहीत. त्यांचे अपघाती निधन झाले आहे. परंतु त्यांचा अतिरिक्त व्यवसाय मला माहीत होता. त्यांच्याकडे नांदुरा तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक्स वजन काटयांची एजन्सी होती, सर्व्हिसिंगसाठी ते ग्रामीण भागात जात होते. त्यामुळे जवळपास तालुक्यातील सर्वच दुकानदारांशी त्यांची ओळख होती. मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि घोराळे अाडनाव असलेल्या व्यक्तीचे आणखी कोण्या गावात दुकान आहे,  हे विचारून बॅग हरवल्याची माहिती दिली. त्यांनीही तत्काळ त्या दुकानदाराचा फोन नंबर दिला. मी थेट पंढरपूरला गेलेल्या त्या दुकानदाराच्या घरी लॅण्डलाइनवर संपर्क साधला. सर्व हकीकत सांगितली. त्यांनाही पंढरपूरहून फोन आला होता की, आमची बॅग हरवली आहे. त्यानुसार मोबाइल नंबर घेतला व थेट त्यांच्याशी संपर्क साधला. दोघांचेही मोबाइल नंबर माझयाकडे होते. एकमेकांना ते दिले. परंतु टॉवर जाम मुळे त्यांचा एकमेकांशी एकाच गावात संपर्क होत नव्हता. मी ४०० किमी अंतरावरून आकोटवरून लॅण्डलाईनवरून दाेघांशी संपर्क साधत होतो. त्यानुसार हरवलेली बॅग घेऊन तुम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मठाजवळ या, असे दोघांनाही सांगत गेलो, दोघेही तेथे पोहोचले. एकमेकांना ओळखले, बॅगही ओळखली. आणि सुटकेचा निश्वास सोडला.

यावर आमचे मित्र पांडुरंग चोपडे सर म्हणाले की, काय गड्या नऊ हजार लोकांच्या गर्दीत एकदा भेटलेला माणूस डबल भेटत नाही. अन‌ तू ४०० किमी अंतरावर बसून आमची बॅग एकमेकांनाा परत मिळवून दिली. हे ऐकून मी धन्य झालो. पण बॅग हरवणारे शिक्षक महादेव शेगोकार माझ्या परिचयाचे नव्हते.

दरम्यान, सन २०१३ मध्ये मी अकोला शहरात राहायला आलो. एके दिवशी लग्न संबंधाच्या ठिकाणी शेगोकार सरही आले. परंतु ओळख नव्हती. आमच्या सोबतच्या पाहुण्यांना त्यांनी घरी नेण्याचे ठरवले, मलाही चला म्हटले. मी त्यांच्या घरी गेलो. मग एकमेकांचा परिचय सुरू झाला. माझा परिचय त्यांना नव्हता. मी माझा परिचय देताना सांगितले, जनार्दन गव्हाळे. दैनिक दिव्य मराठीला असतो. नाव ऐकताच अरे बापरे तुम्ही काय ? मी म्हटले काय झाले सर ? तर ते त्यांच्या वडिलांना सांगत म्हणाले, हे गव्हाळे साहेब. यांनीच माझी हरवलेली बॅग पंढरपूरच्या गर्दीत सापडून दिली होती.  त्यावेळी मला मनात आले की, सांगा. आठवणी किती पक्क्या राहतात.

— जनार्दन गव्हाळे, खामगाव

लेखकाचे नाव :
जनार्दन गव्हाळे, खामगाव
लेखकाचा ई-मेल :
gavhalej@gmail.com

1 Comment on हरवलेल्या बॅगचा शोध

  1. लेखात एका ठिकाणी नऊ हजार लोकसंख्येचे शहर असा अनावधानाने उल्लेख झाला आहे. त्याचा अर्थ पंढरीमध्ये लाखो भाविकांची गर्दी असते असा काढावा.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..