कठीण पाणी, जड पाणी असे अनेक शब्द आपल्या ऐकिवात आहेत. आज त्यांची माहिती करून घेऊ. पावसाचे पाणी जमिनीतून झिरपताना पाण्यात कॅल्शिअम, मॅन्गनीज (Ca2+, Mg2+) इत्यादी द्विभारीत धातूंचे क्लोराईड, सल्फेट, बायकार्बोनेट आदी क्षार पाण्यात विरघळतात. अशा पाण्याला क्षारयुक्त कठीण पाणी म्हणतात. ज्यात असे क्षार नगण्य प्रमाणात असतात ते मृदू पाणी. सोडिअमचे क्षार असल्यास मात्र पाण्याला कठीणपणा प्राप्त होत नाही.
वास्तविक कठीण पिण्यासाठी पाणी (निर्जंतुक असल्यास) अयोग्य मानले जात नाही. उलट कित्येक नैसर्गिक झऱ्यांचे पाणी आरोग्यास उपकारक मानले जाते. बायकार्बोनेट क्षारांमुळे पाण्याला ‘तात्पुरता कठीणपणा’ आलेला असतो. असे पाणी उकळून व गाळून पिण्यायोग्य बनते. पण त्यातले क्षार कार्बोनेट बनून तळाशी जमतात. नळावर असे थर जमा झालेले आपल्या पाहण्यात असतील. क्लोराईड, सल्फेट क्षार मात्र पाण्याला ‘कायमचा कठीणपणा’ बहाल करतात. कठीण पाण्याने आंघोळ वा कपडे धुणे जमत नाही, कारण साबणाचा फेस न होता साका तयार होतो.
हा साका सफेद कपड्यांवर जमा झाल्यास काही दिवसांनी सफेद कपडे पिवळट, मळकट दिसतात. चिलेट (chelates) युक्त डिटर्जंट वापरल्यास कठीण पाण्यातही कपडे चांगले धुता येतात. कठीण पाण्याला मृदू करण्यासाठी आयन एक्सचेंज रेझिन वापरतात. यात कॅल्शिअम, मॅन्गनीजचे आयन काढून सोडिअम आयनचे क्षार बनवले जातात आणि पाण्याला मृदुपणा प्राप्त होतो.
पाणी उकळवून आलेल्या वाफेला थंड करून वेगळे केलेल्या पाण्याला ‘ऊर्ध्वपाति पाणी’ असे पाणी म्हणतात. औषधोपचारांसाठी वापरतात.
‘जड पाणी’ हा शब्द अणुभट्टीच्या बाबतीत ऐकू येतो. नेहमीचे पाणी म्हणजे हायड्रोजन ऑक्साइड, तर जड पाणी हे ड्युटेरियमचे ऑक्साइड असते. अणुभन्जनातून निघालेले किरण, अणुकण, उष्णता शोषून घेण्यासाठी जड पाणी वापरले जाते. जड पाणी आणि साधे पाणी हे रासायनिकदृष्ट्या एकच आहेत. पिण्याच्या पाण्यात दर दशलक्ष थेंबांमध्ये अंदाजे ७५० थेंब जड पाणी असते.
डॉ. कमलेश कुशलकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply