नवीन लेखन...

हरिप्रसाद चौरसिया

फ्रान्स सरकारचा यंदाचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतीय वाद्य संगीतातील मेरुमणी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर होणे म्हणजे भारतीय संगीताचा जागतिक पातळीवर सन्मान होण्यासारखे आहे. जगातल्या सगळ्या मानवी समूहांना भारतीय संगीताबद्दल नेहमीच कुतूहल असते. हे संगीत त्यांना कळतेच असे नाही, पण त्यांना ते ऐकताना त्यांना वेगळे समाधान मिळत असले पाहिजे. मेलडी आणि हार्मनी या संगीत व्यक्त करण्याच्या दोन तऱ्हा जगातल्या, अनेक देशांमध्ये विभागल्या गेल्या आहेत..

भारताने. आणि खरे तर भारतीय उपखंडाने मेलडी म्हणजे एका स्वरावर आधारित अशी संगीताविष्कार पद्धती सिद्ध केली. निसर्गात निर्माण होणाऱ्या विविध आवाजातून स्वर शोधण्याचा मानवाने केलेल्या प्रयत्नाचे पहिले यश बासरी किंवा फ्लूट या वाद्यामध्ये दिसते. बासरी हे तर, पूर्णतः नैसर्गिक वाद्य. माणसाने आपल्या कल्पनेने त्यातून सातही स्वर व्यक्त करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करून संगीताच्या निर्मितीसाठी अनुकूल अशा वाद्याची निर्मिती केली. ज्या कृष्णाच्या हाती मुरली होती आणि ज्या मुरलीवर सगळ्या गोपी लुब्ध होत असत, ती मुरली म्हणे तीन -स्वरांचीच होती. तीन स्वरांमधून व्यक्त होणाऱ्या संगीताच्या आविष्काराला मर्यादा असल्या, तरीही ते गळ्यातून व्यक्त होणाऱ्या हरिप्रसाद संगीताशी साधर्म्य राखणारे होते.

किमान चार ते पाच हजार वर्षांत जगातल्या सगळ्या भागात या वाद्याची निर्मिती झाल्याचे पुरावे सापडतात. भारतीय अभिजात संगीतात बासरीचा प्रवेश अनिवार्य होता, कारण त्या वाद्यातून गायकी व्यक्त करण्याचे अफाट सामर्थ्य होते. हे सामर्थ्य खऱ्या अर्थाने ओळखले ते पन्नालाल घोष यांनी. आपल्या असामान्य प्रतिभेने त्यांनी या वाद्याला अशा एका उंचीवर नेऊन ठेवले, की त्या वाद्याला भारतीय संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळाले. घोष यांची ही परंपरा आजही तेवढ्याच समर्थपणे पुढे सुरू ठेवण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा आहे.

फ्रान्स सरकारचा ‘रोव्हेलियर डान्स ऑर्डर देस आर्ट्स एट डे लेटर्स’ हा पुरस्कार त्यांना मिळणे यासाठीच अतिशय समर्थनीय आहे. अगदी लहान वयात चौरसिया यांचे स्वरावर जे प्रेम बसले, ते त्यांचे सुखनिधान कधी झाले, ते त्यांच्याही लक्षात आले नाही. वडील पैलवान असले तरीही हरिप्रसाद यांना गाण्याचेच वेड होते. गाणे शिकायला त्यांनी सुरूवात केली, ती बनारसच्या पंडित राजाराम यांच्याकडे. गाणे शिकत असतानाच पंडित भोलानाथ यांचे बासरीवादन त्यांनी ऐकले आणि ते त्या वाद्याच्या प्रेमात पडले. त्यांनी बासरीवर जेवढे मनापासून प्रेम केले, तेवढेच प्रेम बासरीनेही त्यांच्यावर केले आणि त्यामुळेच गेल्या पाच दशकांतील एक अतिशय प्रतिभावान कलावंत म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. चौरसिया यांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी बासरीवादनाची आपली पद्धत स्वतः विकसित केली. बारसी वादनातील त्यांच्या शैलीचे ते स्वतः निर्माते आहेत. घराण्याचे संस्थापकच. जगातल्या कोणत्याही संगीतात सहजपणे मिसळून जाणाऱ्या या वाद्यावर त्यांची हुकुमत अशी, की रसिकांनी दिव्य आनंदाच्या लहरींवर डोलत राहावे. रागदारी संगीताबरोबरच पाश्चात्त्य संगीताशी तेवढ्याच प्रतिभेने फ्युजन करण्याची क्षमता पंडितजींनी साध्य केली आहे. सत्तरच्या दशकात त्यांनी सादर केलेला ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. त्यातील पहाडी धून तर पंडितजींची खूण होऊन बसली. शिवकुमार शर्मा (संतूर) आणि ब्रिजभूषण काब्रा (गिटार) या दोन वाद्यांच्या संगतीत त्यांनी सादर केलेल्या अल्बमला खऱ्या अर्थाने फ्यूजन म्हटले पाहिजे. पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारानी मंडित असलेल्या चौरसिया यांना फ्रान्स सरकारचा सर्वोच्च सन्मान मिळणे ही भारतीय संगीतासाठी अतिशय मंगल घटना आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..