तुम्ही शेवटचे मनमुराद,खळखळून ,मोठ्याने कधी हसलाय ?गेल्या आठवड्यात ? गेल्या महिन्यात ? आठवतंय ?
मी काल रात्रीच हसलो. निमित्त होते “शहेनशहा ” सिनेमाचे. सवयीने चॅनल सर्फिंग करता करता अचानक, जगदीप मिनाक्षी शेषाद्रीच्या मसाज पार्लरमध्ये गेल्याचा प्रसंग सुरु असल्याचे माझ्या नकळत माझ्या डोळ्यांनी माझ्या बोटांना सांगितले आणि ते बेटे पुढे सर्फिंग करायचंच विसरले. ” टू ब्युटी…. बोथ आर ऑन ड्युटी ” आणि ” नारीयल का तेल और जवानी का मेल ” पासुन सुरु झालेला आणि अमिताभच्या पोलीस स्टेशनमध्ये संपणारा ( अरे… यहा क्या बैठे हो मिटटी के मानव की तरह ? ) तो पाच मिनिटांचा प्रसंग मी किमान ५० वेळा तरी पाहिला असेन आणि काल रात्रीही तितकाच खळखळून हसलो जितका आधी ४९ वेळा हसलो असेन.
आम्ही दीक्षित-घोरी जोडीचा विनोद पडद्यावर पाहिला नाही.पण आम्ही जॉनी वॉकर ते जॉनी लिव्हर ( व्हाया मेहमूद ) या हास्यकालखंडाचे हसतेखेळते साक्षीदार आहोत.
तुम्ही ” प्यार किये जा ” पाहिलाय की नाही ? आणि त्यातील मेहमूद आणि ओमप्रकाशचा ” तो ” प्रसंग ? आठवला ना ? बघा….. तुमच्याही चेहऱ्यावर हसू आले ना ? ( इतनी बडी बडी बुंदे….. पॉक…… पॉक…..) हा ४ मिनिटे १९ सेकंदांचा प्रसंग हिंदी रजतपटावर चित्रित झालेला आजवरचा सर्वात स्फोटक हास्यकारी प्रसंग आहे हे मी कपिल सिब्बल व अभिषेक मनु सिंघवीसमोर, सुब्रमण्यम स्वामींची शपथ घेऊन ठासून सांगेन. विनोदाच्या या प्रकाराला काय म्हणतात ते मला माहीत नाही आणि जाणून घ्यायची माझी फारशी इच्छाही नाही. हा प्रसंग पाहिला की माझ्या मनाला लागलेली गांभीर्याची कोळीष्टके हास्यफवाऱ्याने साफ धुवून निघतात आणि तितके मला पुरेसे आहे.( सहज आठवले म्हणून….. याच सिनेमाची अत्यंत अस्पष्ट अशी कार्बन कॉपी असलेल्या ‘ धुमधडाका ‘ या मराठी सिनेमात महेश कोठारेच्या थिटया व सरधोपट कामचलाऊ दिग्दर्शनामुळे शरद तळवलकर व लक्ष्मीकांत बेर्डे या गुणी कलाकारांनी या सोन्यासारख्या प्रसंगाची निव्वळ माती केली आहे.) तुम्ही ” प्यार ही प्यार ” पाहिलाय ? त्यात धर्मेंद्र, वैजयंतीमाला, राज मेहरा आणि मनमोहनही होते म्हणतात. पण तो सिनेमा फक्त आणि फक्त मेहमूद, हेलन आणि धुमाळसाठीच पहावा. नायक आणि नायिके इतकाच ( किंबहुना त्याहून जास्त ) विनोदी सहनायक आणि सहनायिकेला वाव देणारा हा पडोसन व अंगुर सारखाच दुर्मिळ सिनेमा आहे.त्यात ड्रायव्हर असणाऱ्या मेहमूदला आपल्या होणाऱ्या सासऱ्यासमोर ( धुमाळ ) भाव खायला मिळावा म्हणून त्याला बंगल्याचा मालक दाखविणारा एक प्रसंग आहे.मेहमूद, हेलन,धुमाळ व चुलबुली हेलन पाहिल्यावर तिच्याशी सलगी करु पहाणाऱ्या ,मेहमूदच्या वडिलांचे बेअरींग वारंवार सोडणाऱ्या धर्मेंद्रचा हा खदाखदा हसवणारा अफलातून प्रसंग माझ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गुरुदत्तचा ” मि. अँड मिसेस ५५ ” मी मधुबालासाठी ( परत ) एकदा पाहिला, ओपीच्या सदाबहार संगीतासाठी एकदा पाहिला आणि जॉनी वॉकर ,टुणटुण आणि ललिता पवारच्या नर्मविनोदी भूमिकांसाठी सुद्धा पुन्हा एकदा पाहिला. टुणटुणची ही पडद्यावरची सर्वोत्कृष्ट भूमिका ठरावी. आणि ” तुम लडकी के लिये पोपटलाल बने और मै नगदनारायण के लिये ,सेक्रेटरी बोलो हाँ……सेक्रेटरी बोला हाँ ” हा संवाद आचरटोत्तमशिरोमणी राजेंद्रनाथच्या तोंडून ऐकण्यासाठी ” जब प्यार किसीसे होता है ” च्या मी किमान दोन वाऱ्या तरी जास्त केल्या.
आणि माझी शेवटची टाळी “अशी ही बनवाबनवी ” मधल्या ‘ त्या ‘ प्रसंगाला आहे. लक्ष्मीकांत बेर्डेने ” धनंजय माने आहेत का ?…धनंजय माने ” असे दरवाजाच्या आडून बाहेर येत विचारल्यावर कमालीच्या टायमिंगने ” अरे ये…ये… ये परशुराम ” म्हणणारा अशोक सराफ आत्ताही माझ्या डोळ्यासमोर आहे. ( सहज जाता जाता….. गुरुदत्तमधल्या दिग्दर्शकानं त्याच्यातील अभिनेत्यावर नेहमीच मात केली असे म्हंटले जाते, पण माझ्या मते दिग्दर्शक सचिनला तर ते शंभर टक्के लागू आहे.)
ओमप्रकाश, आगा, किशोरकुमार व मेहेमुद ( आणि देवेन वर्मा ) यांना मी निव्वळ विनोदवीर मानत नाही. त्यांचा जास्त कल दर्जेदार विनोदी भूमिकांकडे असला तरी त्यांनी गंभीर बाजाच्या व्यक्तिरेखाही तितक्याच ताकदीने सादर केल्या आहेत.( तसे तर आपणही प्रेक्षकांना रडवू शकतो हे जॉनी वॉकरने आनंदमधल्या एकाच प्रसंगात दाखवून दिले आहे .)
एक सिगारेट ओढल्यावर माणसाचे आयुष्य ५ सेकंदांनी कमी होते असा एक धुरकट शोध मध्यंतरी माझ्या वाचनात आला होता .परंतु चेहेऱ्याच्या २६ स्नायूंना एकसाथ व्यायाम देणारा ५ मिनिटांचा पडद्यावरचा एक विनोदी प्रसंग मानवाचे आयुष्य किती वाढवितो यावर अजून संशोधन झालेले नसावे.
जोपर्यंत प्यार किये जा, पडोसन, चलती का नाम गाडी ( ” मन्नू , तुने अबतक दुनिया नही देखी है “….. अशोककुमार आपला लहान भाऊ किशोरकुमारला समजावत असतो. ” मन्नू , तुने दुनिया नही देखी है “…अनुपकुमार आपल्या मोठया भावाची री ओढतो. अशोक अनुपला विचारतो ” तुने देखी है ? “…..या प्रसंगात तिन्ही भावंडांचा मुद्राभिनय पहावा.), चुपके चुपके, गोलमाल, चष्मेबददुर व जाने भी दो यारो ( आणि अंदाज अपना अपना व हेराफेरी ) या चित्रपटांच्या प्रिंट्स जोवर पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत तोपर्यंत तुम्हाआम्हाला हसण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.
आगा, जॉनी वॉकर ,मेहमूद, राजेंद्रनाथ, जगदीप,असरानी या साऱ्याच विनोदवीरांनी आपापल्या परीने मायबाप प्रेक्षकांना हसविण्याचा प्रयत्न केला. कधी विनोदाची जाण नसणाऱ्या खुज्या निर्माता-दिग्दर्शकामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले असतील पण त्यांनी मनापासून प्रयत्न केले होते हे विसरुन चालणार नाही.
कधी तासतासभर ट्रॅफिक जॅममधे अडकला असाल, कधी कमालीच्या उकाड्याने त्रस्त झाला असाल, कधी पावसाच्या संततधारेने वैतागला असाल आणि अचानक ” न जाने कहाकहासे आ जाते है ” हा शोलेमधला जगदीपच्या तोंडी असलेला संवाद आठवून तुमच्या चेहऱ्यावर नकळत हासू येईल. अशावेळेस तुमच्या दररोजच्या तणावपूर्ण आयुष्यात चार आनंदाचे क्षण आणल्याबद्दल तुम्ही कधीकाळी तुम्हाला जीव लावलेल्या रुपेरी पडद्याचे मनोमन आभार मानाल.त्यावेळेस निदान चार अक्षता, तुम्हाला तुमच्या विवंचना किमान ५ मिनिटे तरी विसरायला लावणाऱ्या विनोदवीरांच्या डोक्यावर न टाकण्याचा कृतघ्नपणा कृपया करु नका.निदान मी तरी नक्कीच करणार नाही.
– संदीप सामंत.
८ – ३ – २०२०
Leave a Reply