सदाशिव पेठेतील ‘गुणगौरव’ बिल्डींगमध्ये आम्ही ८५ साली व्यवसाय सुरू केला. त्यावेळी आमच्या ऑफिसमध्ये फोन नव्हता. त्यामुळे संपर्कासाठी बाहेरील ऑफिसमधील एकतपुरे यांचा फोन नंबर सर्वांना द्यायचो. एकतपुरे यांनी दोन दुकानांच्या जागेत आठ ऑफिस केबिन काढलेल्या होत्या. काऊंटरवर एका मुलीला बसवून तिच्याकडे काॅमन फोनची जबाबदारी त्यांनी सोपवलेली होती.
आम्ही एकतपुरेंना विनंती केली की, आम्हाला कुणी फोन केला तर तुम्ही देऊ शकाल का? एकतपुरे हे मुरलेले व्यावसायिक होते. त्यांनी प्रत्येक फोनला एक रुपया या बोलीवर परवानगी दिली. नोंदीसाठी त्यांनी एक छोटीशी डायरी ठेवायला सांगितली. त्यानुसार आम्ही डायरी त्यांना आणून दिली.
त्यावेळी अण्णा देऊळगावकर, राजा गोसावी, मनोरंजन, बाळासाहेब सरपोतदार अशांचे फोन यायचे. फोन आला की, सीमा आम्हाला बोलविण्यासाठी काऊंटर सोडून आत येऊन सांगायची. बहुतेक रमेशच फोन घ्यायला जात असे. फोनवर बोलणे संपल्यावर डायरीमध्ये तारीख लिहून त्याच्याखाली एक फोन असे सीमा लिहित असे. महिनाअखेरीस एकूण फोनची संख्या मोजून तेवढे पैसे आम्ही एकतपुरेंना देत असू.
फोनसाठी जाण्या-येण्यातून सीमाशी आमचा परिचय झाला. कधी फावल्या वेळात ती ऑफिसमध्ये कोणी नसेल तर येऊन बसू लागली. सीमा रंगाने सावळी, साधारण तब्येतीची होती. नेहमी ती पंजाबी ड्रेसमध्ये असायची. सणासुदीला साडीमध्ये दिसायची. नेहमी हसतमुख असणाऱ्या सीमाच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. ती हडपसरला रहायची. रोजच बसने प्रवास करायची. घरी मोठा भाऊ व आई असे तिघेजण रहायचे.
आमच्याकडे खाडिलकर नावाच्या बाई तळेगावहून नेहमी यायच्या. त्यांचे प्रदर्शनाचे काम आम्ही करीत असू. त्यांची एक दोन भेटीतच सीमाशी छान मैत्री जडली.
एकामागून एक वर्ष जात होती. सीमाचं वय वाढत होतं. पंचविशी पार केल्यामुळे ती देखील मानसिक दृष्ट्या खचू लागली होती.
खाडिलकर बाईंनी कोथरूडला एका ज्योतिषाकडे सीमाला घेऊन जायचे ठरविले. मीही दोघींबरोबर गेलो. त्या ज्योतिषाने तिचा हात पाहून वर्षभरात लग्न होईल असे सांगितले. त्यांची दक्षिणा देऊन आम्ही परतलो. त्यानंतर काही वर्षे गेली, मात्र सीमाचं ‘सीमोल्लंघन’ काही झालं नाही.
दरम्यान तिच्या भावाने वाट पाहून थकल्यामुळे स्वतःच लग्न उरकून घेतले. काही दिवसांतच भाऊ बायकोच्या सांगण्यावरून स्वतंत्र राहू लागला. सीमा पुन्हा एकदा खचून गेली.
एकतपुरेंनी ऑफिस केबिन बंद केल्या. सीमाचं काम सुटलं. मधे बरेच महिने निघून गेले. खाडिलकर बाई आल्यावर त्यांचा पहिला प्रश्र्न सीमा विषयी असायचा. आम्ही सांगत असू, अलीकडे तिची भेट झाली नाही. काही दिवसांनंतर बाईंनीच आम्हाला सांगितले, सीमाला त्यांनी मंडईत पाहिलं होतं. ती पापड, कुरडयांची विक्री करीत होती. आता सीमा आणि तिची आई दोघी मिळून घरगुती व्यवसाय करु लागल्या होत्या. ‘लग्न’ हे आता सीमांचे ‘स्वप्न’च राहिले होते.
मध्यंतरी दहा वर्षे उलटून गेली. खाडिलकर बाई रहायला लांब गेल्या. आम्ही व्यवसायात व्यस्त राहिलो. एकदा संध्याकाळी नारायण पेठेत लोखंडे तालमी जवळ अचानक सीमा समोर येऊन उभी राहिली. ‘कसे आहात, नावडकर सर?’ या तिच्या प्रश्नावर आम्ही ‘बरे आहोत.’ असं उत्तर दिलं. ‘तुम्ही इकडे कशा ?’ असं विचारल्यावर तिने ‘इथेच एका संस्थेत काम करते.’ असं सांगितलं. इतक्या खस्ता खाऊनही ती हसतमुख होती याचं मला कौतुक वाटलं. तिला लग्नाचं काय झालं, हे विचारण्याचं धाडस मला झालं नाही. तिनं तो विषय तिच्या परीनं बंद केल्याचं जाणवलं. आम्ही तिचा निरोप घेऊन ऑफिसवर परतलो.
सीमा बद्दल एकच वाईट वाटतंय की, इतक्या वर्षात एकही योग्य असा तरुण तिला भेटू नये? लग्नाचं वय एकदा निघून गेल्यावर सीमासारख्या मुलींनी कसं जगायचं? आईनंतरचं एकाकी जीवन, ही एक प्रकारची नियतीनं तिला दिलेली शिक्षाच नाही का?
आता ‘गुणगौरव’ बिल्डींग पूर्ण बदलून गेलेली आहे. एकतपुरेंची दोन्ही दुकानं एका सिंधी व्यापाऱ्यानं विकत घेतली आहेत. पलीकडचीही दोन्ही दुकानं त्यानं विकत घेऊन तयार कपड्यांचा होलसेल व्यवसाय सुरू केलाय. आता हातात स्मार्ट फोन आल्यामुळे जुना लॅन्डलाईन फोन कालबाह्यच झालाय.
रस्त्याने फिरताना कधी एखादी सावळी मुलगी दिसली की, प्रकर्षाने सीमाची आठवण होते. आता ती कशी असेल हा प्रश्न मनात डोकावून जातो. ती कुठे का असेना, सुखी असावी एवढं मात्र मनापासून वाटतं…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३०-७-२०.
Leave a Reply