1978 साल, बँकेच्या काऊंटरवर एक नेहमी येणारा खातेदार येऊन उभा राहिला. त्यावेळी भारत-पाकिस्तान कसोटी मालिका सुरू होती. काउंटरवरील क्लार्क ट्रांझिस्टरवर कॉमेंट्री ऐकत होता. खातेदाराला त्याच्या खात्यात किती शिल्लक आहे हे कळण्यासाठी त्यांनी त्या क्लार्कला विचारले, ’आजची काय पोझिशन आहे?’ क्लार्क म्हणाला, ‘फार वाईट आहे. फक्त 150. खातेदाराला ऐकून चक्कर आली. त्याने रु. 20,000 ची अपेक्षा केली होती. तो धडक आत साहेबांच्या केबिनमध्ये गेला व सांगितले, ‘माझ्या खात्यातून कुणीतरी पैसे काढले आहेत.’ साहेब लगेच बाहेर आले व त्या क्लार्कला लेजर तपासायला सांगितले. शिल्लक रु. 20,000 होते. ‘मग तू 150 का सांगितलेस,’ असे विचारल्यावर क्लार्क माफी मागून म्हणाला, ‘सर, मला वाटले ते भारताची धावसंख्या किती झाली हे विचारत आहेत.’ मग सर्वच हसू लागले.
—-****—-
मी स्टेट बँकेच्या कल्याण शाखेत वैयक्तिक बैंकिंक विभाग प्रमुख असताना एक वृद्ध महिला बचत ठेवीचे नूतनीकरण करण्यासाठी आली. तिला या वयात पैशाची निकड असते म्हणून मी म्हटले, ‘तुम्हाला मासिक व्याज हवे आहे का?’
आजी म्हणाली, ‘नको, मी मुलाकडे राहते व जेवण मिळते.’
मी आनंदाने म्हणालो, ‘आजी तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा मुलगा तुम्हाला सांभाळतो.’
आजी रडायला लागली. मला म्हणाली, ’माझे हात पाय अजून मजबूत आहेत. मी घरचे सगळे काम, धुणीभांडी करते म्हणून जेवण मिळते. माझे हातपाय थकले की नंतर मला मासिक व्याजाची गरज पडेल?’
त्या माऊलीचे उत्तर ऐकून माझ्या डोळयात पाणी आले. नंतर माझी बदली झाली. आजही तो प्रसंग आठवला की आजींचा रडवेला चेहरा डोळ्यासमोर येतो.
-सूर्यकांत भोसले
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply