नवीन लेखन...

हतबल – भाग दोन

इस्पितळातून तेथील ड्यूटी कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यात फोन येतो. हवालदार मेसेज रीतसर लिहून घेऊन ड्यूटी ऑफिसरला थोडक्यात सांगतात . ” सर, xxxxxx हॉस्पिटल मधून डेथ बिफोर अँडमिशनचा मेसेज आहे .”ड्यूटी ऑफिसर मेसेज वाचतो . पोलिस स्टेशन डायरी मधे , त्याच्यासोबत जात असलेल्या हवालदारांचा बकल क्रमांक नमूद करून ” xxxx इस्पितळात रवाना ” झाल्याची नोंद करतो आणि तातडीने निघतो.घटना मृत्युसंबंधी असेल तर स्वाभाविकपणे अधिकारी वेळ दवडत नाहीत.

पोलिस अधिकारी आल्याचे पाहून डॉक्टर वॉर्ड बॉयला इशारा करतात. वॉर्ड बॉय ऑफिसरला कॅजुअल्टी विभागाच्या बाजूच्या खोलीत नेतो . तिथे एकांतात एका स्ट्रेचरवर डोक्यापर्यंत पांढऱ्या चादरीत झाकलेली डेड बॉडी असते. डॉक्टरसुद्धा हाताशी असलेला पेशंट तपासून तिथे येतात. मृत चाळीस बेचाळीस वर्षाची पुरुष व्यक्ती असते. ” मासिव अटॅक ” . डॉक्टर हलक्या आवाजात शक्यता बोलून दाखवतात. हवालदार डेड बॉडीच्या पंचनाम्यासाठी पंच म्हणून काम करण्यास तयार होणारे कोणी व्यक्ती तिथेच आढळतंत का याचा अंदाज घेत जवळच वावरत असतात. मृताचा एक शेजारी स्वतः पुढे येऊन हवालदाराना आपली ओळख करून देतो. चला ! एक पंच साक्षीदार मिळाला.

काही अंतरावर एका बाकावर ३५/३६ वर्ष वयाची , रडून रडून भग्न झालेल्या चेहेऱ्याची एक स्त्री बसलेली असते. ती मृताची पत्नी. काळोखातून एखादा मोठा दगड येऊन डोक्यावर लागावा असा अनपेक्षित आघात तासा दीड तासापूर्वी पतिच्या निधनाने तिच्यावर झालेला असतो. दु:खातिरेकाने तिचे अश्रू थिजून गेलेले असतात. एकीकडे पति वियोगाचे अनावर दु:ख आणि दुसरीकडे आयुष्याची घडी क्षणात पार विस्कटून टाकणाऱ्या या घटनेमुळे निर्माण झालेल्या भविष्यातील चिंतेचे विचार यांचे एक अभद्र मिश्रण तिच्या चेहेऱ्यावर असते. तिची नजर समोर असली तरी तिचे डोळे भविष्यातील तिला स्वतःलाच पहात असतात. इतर सर्व बाबतीत समर्थ आणि हौशी नवऱ्याची साथ असल्याने घरात आतापर्यंत गृहिणीच्या कर्तव्यापलिकडे तिच्यावर कोणतीही जबाबदारी नसते. बारा तेरा वर्षाचा एरवी वडिलांचा धाक असलेला मुलगा शाळेत जाणारा. येत्या काळात त्याचं शिक्षण , वळण , कामधंदा सगळं तिला तिच्या आवाक्या बाहेरचं वाटतं आणि त्यात ती मनाने पूर्ण खचून जाते.

एक एक करून काही शेजारी आणि मृताचे मित्र इस्पितळात जमा होऊ लागतात. कोणी शेजारी मुलाला शाळेतून घरी आणतो. तो इस्पितळात जाण्याचा हट्ट करत असताना वडील गेल्याचे त्याला कोणी सांगत नसले तरी आईला लावलेल्या फोन कॉलवर त्याचा आवाज ऐकताच तिने फोडलेल्या हंबरड्याने त्याला सर्व काही कळून चुकते.

पंचनामा पूर्ण करून ऑफिसर मृताच्या पत्नीचा जबाब घेतो. तिला काही म्हणायचे नसतेच. ऑफिसर ने विचारलेल्या आवश्यक प्रश्नांना शून्यात नजर लावून बसलेली ती पुटपुटत उत्तरे देते. पोलिस जबाब , पंचनामा अशा रुक्ष गोष्टींमुळे तिचे क्लेष आणखी वाढतात.
त्यांचे जवळचे असे कोणीही नातेवाईक आसपास नाहीत हे ऑफिसरला जाणवते. नातेवाईक आणि शेजारी यांची पुढच्या तयारी विषयीची कुजबूज तिच्या कानावर पडत असते. काही वेळापूर्वी हसत्या खेळत्या असलेल्या तिच्या जीवनसाथीचा उल्लेख आता प्रत्येकजणाकडून “बॉडी” म्हणून एखाद्या वस्तू सारखा केला जात असतो. त्याने तिच्या वेदनेत भर पडत राहते. अधिकारी जबाब पूर्ण करतो.

दुपारी जेवण झाल्यावर वामकुक्षी घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. पाठीत कळ येऊन दरदरून घाम सुटला. अचानक उलटी झाली. चक्कर आल्यासारखे वाटले म्हणून पुन्हा गादीवर आडवे झाले. चादर घामाने भिजली. शेजाऱ्यांना हाक मारून बोलावण्यात आले. त्यांनी टॅक्सी आणली आणि इस्पितळाच्या वाटेवर त्यांनी पत्नीच्या खांद्यावर मान टाकली. डॉक्टरांनी तातडीने तपासले परंतु तो पर्यन्त प्राणज्योत मालवली होती.

मृत्यूपूर्व लक्षणे हृदरोगाची असण्याची शक्यता समजून आल्याने डॉक्टर मृताच्या पत्नीकडे त्याच्या पूर्वीच्या काळातील उपचारांची फाईल मागतात. ती उपलब्ध नसते. पतीला चार पाच वर्षांपूर्वी रक्तदाबाचा त्रास झाला होता आणि त्यासाठी ते काही महिने गोळ्या घेत होते . मात्र नंतर त्यांनी गोळी घेणे सोडून दिले असल्याचे तिला आठवते.

पंचनामा पूर्ण झाल्याचे पाहून मृताचे शेजारी , बॉडी घरी नेण्यासाठी अँब्युलन्स बोलावण्याची गडबड सुरू करतात. ऑफिसर मृताचे शवविच्छेदन अजून बाकी असल्याचे त्यांना सांगतो. कायद्याने आवश्यक अशी ती प्रक्रिया अजून बाकी असल्याचे त्यांच्या गावीही नसते.
त्यांचा गोंधळ उडतो. काही आप्त तावातावाने घरच्यांची काही तक्रार नसताना , कोणावरही संशय नसताना पी. एम. ची जरूरच काय ?असा मुद्दा मांडत ऑफिसरशी वाद घालतात.

आपला चालता बोलता , एरवी कोणताही आजार नसलेला पती अचानक जग सोडून गेला आणि आता आणखी त्याच्या देहाची चिरफाड होऊन विटंबना कशाला ? या विचाराने मृताची पत्नी आणखीनच विव्हळ होते . एव्हाना इस्पितळात पोचलेले त्यांच्या कुटुंबियांचे नातेवाईक पोलिसांशी वाद घालायला सुरुवात करतात.

मृत व्यक्तीचा , मृत्यू पूर्वीचा कोणताही वैद्यकीय इतिहास उपलब्ध नसल्याने मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक याबाबत रीतसर चौकशी होणे अत्यावश्यक असते. तिचाच एक भाग म्हणून शवविच्छेदन करून मृताच्या शरीरात अंतर्गत जखमा आहेत काय हे तपासणे आणि एखाद्या विषाच्या परिणामाने मृत्यू झाला आहे काय याची शहानिशा करण्यासाठी पचन संस्थेतील शिल्लक अन्नाचे नमुने म्हणजेच व्हीसेरा ‘न्याय सहाय्यक प्रयोगशाळेत’ तपासणी साठी पाठवून देणे हे पोलिसांना कायद्याने बंधनकारक असते. त्यामुळे मृत व्यक्तिंच्या जवळच्या मंडळींनी कितीही आर्जवं किंवा त्रागा केला तरी अशा प्रसंगी शव विच्छेदन अटळ असते.

वेळ न दवडता आवश्यक ते फॉर्म्स भरून ऑफिसर प्रक्रिया पूर्ण करतो. काही वेळा मृताचे अगदी जवळचे कुणीही नातेवाईक उपस्थित नसतात. मृताचे अपत्यही अगदी कुमार वयातील असते .अशा परिस्थितीत शवविच्छेदन झाल्यावर , देह पत्नीच्या ताब्यात देण्याबद्दल लिहून देण्याखेरीज ऑफिसरला गत्यंतर नसते.

हे सर्व सोपस्कार पार पाडत असताना , आयुष्यातील तिचा सर्वात मोठा आधार ध्यानी मनी नसताना गमावल्याने आभाळ कोसळल्यासारख्या परिस्थितीत अगोदरच विदीर्ण मनस्थितीत असलेल्या मृताच्या पत्नीच्या मनाची अवस्था काय होऊ घातलेली असेल याची ऑफीसरला पूर्ण कल्पना असते. ऑफिसरच्या मनाची अशीच घालमेल , एखाद्या अपघाती निधन झालेल्या आपल्या हातातोंडाशी आलेल्या तरण्याबांड मुलाचे शव जेव्हा त्याचे वडील ताब्यात घेतात तेव्हा होते. मन सहानुभूतीने भरलेले असले तरीही हृदय हेलावून टाकणाऱ्या अशा अनेकविध घटनांचा साक्षीदार होताना ऑफिसरला आपल्या भावना व्यक्तही करता येत नाहीत. कायद्याने आखून दिलेले चाकोरीबद्ध काम करताना त्याला आपली हतबलता निर्विकारतेचा मुखवटा घालून लपवावी लागते .

अजित देशमुख ,
( नि ) अप्पर पोलीस उपायुक्त,
9892944007

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..