नवीन लेखन...

हतबल – भाग तिन

सरकारी हॉस्पिटलमधील ड्यूटी कॉन्स्टेबल पोलिस स्टेशन ला फोन करून कळवतो. “पोलिस ठाणे हद्दीतील या ठिकाणी राहणारी स्त्री नामे वय : चोवीस , आपल्या , नमूद पत्यावरील राहत्या घरी स्टोव्हवर अंगावरील कपडे पेटल्याने भाजली असून वॉर्ड क्र. xx मधे उपचारा करिता दाखल आहे ” ड्यूटी ऑफिसर पोलिस ठाणे परिसरातील एखाद्या सन्माननीय समाजसेवी महिलेला फोन करून जळीत स्त्रीचा जबाब घेताना समक्ष उपस्थित राहण्यासाठी हॉस्पिटलमधे सोबत निघण्याची विनंती करतो. महिला पोलिस अधिकारी किंवा महिला कर्मचारी सोबत घेऊन , स्टेशन डायरीमधे नोंद करून लवकरात लवकर निघतो. त्याबरोबरच पोलिस कामात सहकार्य करणाऱ्या स्त्री समाज सेविका किंवा अशाच स्वयंसेवी संघटनेच्या सदस्य स्त्रीला बरोबर घेतो. पूर्वी विशेष कार्यकारी दंडाधिकारी असलेल्या स्त्रीला , जळीत स्त्रीचा जबाब घेतना उपस्थित ठेवणे बंधनकारक होते. याचं कारण त्या स्त्रीला नवऱ्याकडून अथवा सासरी काही त्रास असेल तर तिने तिचा जबाब अधिक मोकळेपणाने द्यावा आणि बहुदा असा जबाब ” मृत्यूपूर्व जबाब ” ठरत असल्याने तो नमूद करताना एखादी सन्माननीय व्यक्ती साक्षीदार असावी .

सरकारी हॉस्पिटल मधील स्त्री जळीतांच्या उपचारांसाठी असलेला विशेष वॉर्ड इतर वॉर्ड्स पेक्षा फार वेगळा दिसतो. तो बहुदा पूर्ण भरलेला असतो. इथल्या बहुतेक जळीत स्त्रिया रुग्ण शुद्धीवर असतात. त्यांच्या शरीराचा अखंड दाह होत असल्याने त्यातील बऱ्याचजणी विव्हळत असतात. नर्स किंवा बाजूने जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे पाहून प्यायला पाणी द्या म्हणून त्या याचना करत असतात. वैद्यकीय कारणासाठी उपचाराचा भाग म्हणून असेल , त्यांना पाणी दिले जात नाही . सर्वसाधारणपणे शरीराचा ३५ % ते ४० % पेक्षा जास्त भाग भाजलेला असेल तर त्या स्त्रीची मृत्यूपासून वाचण्याची शक्यता नसते. जळीत रुग्णांना कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी अत्यावश्यक कामाशी संबंधित असलेल्या व्यक्तीव्यतिरिक्त कोणालाही वॉर्डमधे प्रवेश दिला जात नाही. अगदी घरच्यांना सुध्दा. आधीच जास्तीच्या कामाच्या दबावाखाली असलेली नर्सेस, डॉक्टर्स मंडळी तिथे आपल्या कामात अत्यंत व्यस्त असतत . रुग्ण स्त्रीचे नाव,पत्ता सांगून कॉट नंबर जाणून घेतल्यावर ऑफिसर हातातील पॅड सावरत जबाब घेण्यासाठी तिच्या जवळ पोहोचतो न पोहोचतो तोच ती जळीत रुग्ण ” साहेब मला पाणी द्यायला सांगा ना ! घरून कोणी आलेत बाहेर ? मुलाला आणलय ? त्यांना आत बोलवा ना ! पाणी द्या मला . ” अशी सरबत्ती करते.

ऑफिसर , तेथील छोट्या स्टूलावर बसून जबाब सुरू करण्या आधी कागदाना समासासाठी फोल्ड करतो. भराभर नांव,पत्ता लिहून घटना , कुठे , किती वाजता आणि कशी झाली हे विचारून तपशीलवार जबाब घेतो .त्यावर रुग्ण महिलेची स्वाक्षरी घेतो. ती जबाब देण्याच्या परिस्थितीत असल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरचे प्रमाणपत्र , निरक्षर असेल तर अंगठ्याचा ठसा . मात्र बऱ्याच वेळा भाजल्याच्या जखमांमुळे हाताचे तळवे फोडांनी भरलेले असतात. मग डॉक्टरांचे त्याबाबतसुध्दा प्रमाणपत्र प्राप्त केले जाते .जबाब घेताना सोबत असलेल्या समाजसेवी महिलेची सुध्दा जबाबाच्या कागदावर स्वाक्षरी घेऊन , आवश्यक बाबींची पूर्तता करून ऑफिसर घटनास्थळाच्या पंचनाम्यासाठी निघतो. रुग्ण स्त्री काही तासांचीच सोबती असल्याचे त्याला कळून चुकलेले असते.

वॉर्डच्या बाहेर , तिचा नवरा आणि त्याच्या बरोबर दोन ,अगदी लहान मुलं उभी असतात . नवरा पुढे होऊन ऑफिसरशी बोलतो. आपली बायको बोलण्याच्या परिस्थितीत आहे हे जाणून ती नक्की बरी होऊन घरी येणार या विचाराने त्याच्या चेहेऱ्यावर समाधान पसरते. तो मुलांना तसं समजावतो. ऑफिसर त्याच्याशी बोलत , सहानुभूती दर्शवत घटनेच्या वेळी तो कुठे होता , त्याला घटनेबद्दल कसं आणि केव्हा कळलं ही माहिती घेतो . त्याचा राहता पत्ता मिळण्यात वेळ वाचावा म्हणून ऑफिसर नवऱ्याबरोबर असलेल्या एखाद्या नातेवाईकाला आपल्या बरोबर घेतो.

जीपमधे ऑफिसर त्या नातेवाईकाला सहज म्हणून प्रश्न विचारत रुग्ण महिलेच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीविषयी नेमकी माहिती काढून घेतो.

रुग्ण महिला गावाकडच्या मानाने सधन शेतकरी घरातील. दिसायला देखणी. शेती कामात आणि अभ्यासात हुशार. बारावी झाल्यावर हीला पुढे शिकायची फार इच्छा होती परंतु तिच्या आत्याने आपल्या भावाकडे म्हणजे हीच्या वडिलांकडे , आपल्या मुलाशी तिचे लग्न लाऊन द्यावे म्हणून पहिल्यापासून लकडा लावलेला . तिला मुंबईचं बिलकुल आकर्षण नव्हतं. इतकच काय लग्नापर्यंत तिने मुंबई कधी पाहीलेलीही नव्हती . असे असताना , सहा वर्षापूर्वी आईवडिलांनी नातेवाईकांच्या आग्रहाखातर आतेभावाशी तिचे लग्न लाऊन दिलेले असते . नवऱ्याची गावी बरीच शेती , परंतु त्याला मुंबईचे फार आकर्षण . एका मिल मधून रिटायर झालेल्या आणि आता गावाला जाऊन राहिलेल्या त्याच्या काकाच्या मालकीच्या एका चाळीतील खोलीत दोघांचा संसार मांडलेला असतो. सासर , माहेरच्या गावांमधे फार लांब अंतर नसते. नवऱ्याची नोकरी बेताची . त्याबद्दल तिची तक्रार नसली तरी तिचं नवऱ्याला सांगणं असे , की तुम्ही नोकरी सोडा .आपण गावाला जाऊन शेती करू . इथल्या पेक्षा जास्त कमवाल. मलाही ग्रँजुएशन पूर्ण करता येईल . मात्र नवऱ्याला ते अजिबात मान्य नव्हते . नवराबायकोमधे विकोपाला जाणारी भांडणे कधी होत नसली तरी मुंबई सोडण्याच्या तिच्या आग्रहा वरून वाद होत असत. गावचे कोणी पै पाहुणे मुंबईत त्याच्या घरी आलेले नवऱ्याला आवडत नसे. त्यामुळे त्यांच्याकडे गावाकडच्या कोणाचे जास्त जाणे येणे नसे. नवरा हट्टी आणि संशयी वृत्तीचा आहे ही खूणगाठ ऑफिसर मनाशी बांधतो.

जळीत रुग्ण स्त्रीने जबाबात रॉकेलचा कॅन पाय लागून कसा पडला, त्याने आपला गाऊन कसा भिजला आणि स्टोव्हच्या ज्योतीला लागल्याने कसा पेटला अशी घटना सांगितलेली असते.

मात्र तिच्या डोक्यावरचे पूर्णपणे जळलेले केस , तसंच खांदे आणि पोटाच्या वरचा भाग जास्त भाजल्यामुळे तीव्र जखमांनी भरलेला असल्याची वैद्यकीय नोंद या गोष्टी दुसरेच काही सूचित करतात . जबाब घेतानाच या गोष्टी ध्यानात ठेऊन ऑफिसरने तिला शोधक प्रश्न विचारलेले असतात . परंतु ती तिच्या कथेलाच चिकटून जबाब देते. बोलताना वाक्यागणिक पाणी प्यायला मागत मुलांची आठवण काढते. मधेच ” साहेब डॉक्टर काय म्हणतात ? आग होते हो नुसती ! कधी सोडतील मला?” असेही विचारते . मधेच तिला ग्लानी येते. मधेच ती टक्क जागी होऊन बोलू लागते.

कधी डोळे घट्ट मिटून डोकं इकडून तिकडे हलवते.” केलं तो अविचार होता का?, काय करून बसले ! ” अशा विचाराने स्वत:लाच दोष तर देत नसेल ? घटनास्थळी , स्वयंपाक घरात सगळीकडे रॉकेलचा वास आणि लादी बसवलेल्या जमिनीचा बराचसा भाग सांडलेल्या रॉकेलमुळे ओलसर झालेला. तिथेच रॉकेलचा संपूर्ण रिकामा कॅन आढळतो. झाकण दूर पडलेले. म्हणजे कलंडला नसून ओतून रिकामा झालेला हे स्पष्ट होते .मदतीला धावलेल्यापैकी कुणीतरी घरात येऊन जमिनीवरील स्टोव्ह मालवून त्यावरील अर्धवट शिजलेल्या भाताचे पातेले उतरवून लादीवर ठेवलेले आढळते . म्हणजे स्टोव्हची ज्योत उघडी नव्हती. रॉकेलचे शिंतोडे भिंतीवर खालच्या कडेपासून एक दीड फुटापर्यंत उडालेले दिसतात. म्हणजे धार काही फुटांवरून जमिनीवर पडली होती . आगीचा दाह झाल्यावर तिने वेदनांमुळे किंचाळत स्वाभाविकपणे दरवाज्यातून बाहेर धाव घेतल्यावर , मदतीला धावलेल्यांनी तिच्यावर पाणी ओतून जिथे आग विझवलेली असते . दरवाजाशी गाऊनचा जळलेला एखादा तुकडा आढळतो. जमिनीवरील पाणी वाळून गेले असले तरी लादीच्या , उंबरठ्याच्या फटीतील माती ओली असते . दरवाज्या बाहेर काळे डाग पडलेली एक गोधडीही पडलेली आढळते .
ऑफिसर स्वयंपाकघराची अवस्था , मोजमापे , दरवाज्याची दिशा इ . इ. सर्व गोष्टींची तपशीलवार नोंद घेऊन , स्टोव्ह, कपड्याचा जळका तुकडा , ती गोधडी ,रॉकेलचा कॅन अशा वस्तू ताब्यात घेऊन तेथील दृष्य परिस्थितीचा तपशीलवार उल्लेख करून पंचनामा पूर्ण करतो.

पंचनाम्यावर पंच म्हणून सही करायला त्याच चाळीतील दोघे गृहस्थ पुढें होतात . त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत समजते की चाळी समोरील ओट्यावर खेळणाऱ्या मुलांच्या आरडाओरड्या मुळे अख्खी चाळ इथे धावली. बाई किंचाळत दरवाजात कोसळलेली होती . तिच्या अंगावरचा कपडा पूर्ण पेटलेला. शेजारी आपापल्या घरात धावले. पाणी भरलेले मिळेल ते भांडे घेऊन येऊन त्यांनी तिच्या अंगावर पाणी ओतले. शेजारच्याच घरातल्या एकाने गोधडी आणून राहिलेल्या ज्वाळा आणि धुमसत्या जागा झोडपून विझवल्या. हे सारे ३/४ मिनीटात झाले . एका शेजारणीने तिचे उघडे अंग एक सुती साडी टाकून झाकले आणि एकदोघांनी तिला उचलून , टॅक्सीत ठेऊन हॉस्पिटलला नेले. या घटनेपूर्वीच्या लगतच्या काळात तिच्या घरातील परिस्थिती कशी होती, ती विव्हळत असताना घटनेसंबंधी काही बोलली का हे जाणून घ्यावे म्हणून ड्यूटी ऑफिसर वेळ न दवडता शेजारी रहात असलेल्या त्या गोधडीच्या मालकाशी संपर्क साधायचा प्रयत्न करतो . मात्र या प्रकरणात पोलीस चौकशी होणारच या खात्रीने आणि आपल्याकडे चौकशीची बला यायला नको म्हणून ते शेजारी घराला कुलूप लावून आधीच निघून गेलेले असतात . बरं, बाकीच्या चाळकऱ्यांना या निघून गेलेल्या शेजाऱ्याच्या आडनावाखेरीज त्यांची काहीही माहिती नसते .

ऑफिसर पोलिस ठाण्यात परत येतो. पोलिस स्टेशन डायरी मधे रीतसर नोंद करतो. ताब्यात घेतलेल्या वस्तूंची मुद्देमाल रजिस्टर मधे नोंद करतो आणि त्या सर्व वस्तू ” मुद्देमाल कारकून ” हवालदारांकडे सूपूर्द करतो आणि त्याची वाट पाहत असलेल्या दुसऱ्या कामांकडे वळतो. असाच काहीसा वेळ जातो आणि अपेक्षेप्रमाणे हॉस्पिटल मधून , ती स्त्रीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची “डेथ इंटीमेशन ” थडकते. पाठोपाठ तिचा नवरा पोलिस ठाण्यात येतो. त्याच्या बरोबर याच शहरात राहणारे , हॉस्पिटल मधे आलेले त्या स्त्रीचे माहेरचे एक दोन नातेवाईक सुद्धा असतात. ऑफिसर नवऱ्याचा आणि त्यांचेही जबाब घेतो. घटनेबद्दल कुणाचीच काही तक्रार नसते. कोणाविरुद्ध संशय नसतो. हातातील काम बाजूला ठेवत ऑफिसर आवश्यक ते फॉर्म्स भरून , शवविच्छेदन झाल्यावर शव अंत्यसंस्कार करण्यासाठी नवऱ्याच्या ताब्यात देण्याविषयी हॉस्पिटलला कळवतो. एक शिकण्याची हौस असलेली , शेतीशी, पर्यायाने निसर्गाशी नाळ जुळलेली तरुणी दोन लहानग्यांना अनाथ करून इहलोक सोडून गेलेली असते. जीवन तिचे असले तरी तिने ते कसे जगावे याबाबतचे निर्णय घेताना तिचे मन विचारात घेण्याची गरजच काय अशा माहेरच्यांच्या मानसिकतेने , नवऱ्याच्या संशयी स्वभावामुळे अशा एकूण सगळ्या बाजूने निर्माण झालेल्या कोंडमाऱ्याने खरं तर तिची हत्या केलेली असते . आत्महत्या करणे डरपोकपणाचे लक्षण मानले जात असले तरी जीवन कायमचे संपविण्याच्या निर्णयाप्रत येऊन तो निर्णय कमालीच्या निग्रहाने अंमलात आणणारे मन दुर्बळ कसे? ऑफिसरच्या डोळ्यासमोरून घडलेल्या घटनेचे गांभीर्य कळण्याचे वय नसलेले दोन निष्पाप चेहरे हलत नाहीत. क्रियाकर्म आटोपली की तिच्या मुलांची आबाळ नको म्हणून गावची मंडळी लगेच तिच्या नवऱ्यासाठी नवी सोयरिक शोधायला लागतील. काय सांगावे ! गेलेल्या मुलीची आता लग्नाच्या वयाची झालेली धाकटी बहीण सुद्धा तिच्या आत्याच्या आग्रहावरून परस्पर मेहुण्याच्या दावणीला बांधतील. ऑफिसरला गेल्याच आठवड्यात त्याच्या ड्यूटी मधे आलेली अशीच एक बर्न केस आठवते , त्याच बरोबर गेल्या महिन्यात घडलेली एक आणि त्याही आधीच्या …… व्यथित करणाऱ्या अशा घटनांचे विचार सातत्याने मनात येत राहणे अटळ असले तरी त्यांचा काही उपयोग नसतो . उलट ऑफिसरची हतबलतेची जाणीव अधिक तीव्र होते. समाजव्यवस्थेतील दुर्बलांसाठींची बलस्थाने कमी पडत असेपर्यंत हे असेच चालू राहणार . एक बरं असतं . ऑफिसरच्या व्यथित मनावर पांघरूण घालण्यासाठी दुसरी ढीगभर कामे त्याच्यासमोर उभी असतात.
………………….
@ अजित देशमुख
(नि) अप्पर पोलीस उपायुक्त.
9892944007 /9821389877
ajitdeshmukh70@yahoo.in.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..