MENU
नवीन लेखन...

हवा हवाई

दिसत नाही, मात्र जाणवते.. ती ‘हवा’! मंद हवेची लहर आली, तर तिला ‘झुळूक’ म्हटलं जातं.. तिचं जर वेगाने आली तर तो होतो, सोसाट्याचा वारा.. अशा वाऱ्यानं वेगाची परिसिमा ओलांडली की त्याचं रूपांतर वादळात होतं..

झाडाखाली सावलीत बसल्यानंतर येणारी हवेची झुळूक, ही आपल्याला सुखावून जाते.. रात्रीच्या वेळेस हीच झुळूक, बागेतील एखाद्या फुलझाडाचा सुगंध हळुवार सर्वत्र पसरवते..

पहिल्या पावसाआधी सुटणारा सोसाट्याचा वारा, झाडावरील वाळलेली पाने रस्त्यावर उधळून लावतो व घोंगावणारं एखादं छोटंसं चक्रीवादळ तोच पालापाचोळा गोलाकार फिरवत उंचावर नेतो..

याच हवेतून, मोफत प्राणवायू घेत, आपण आपलं आयुष्य घालवतो.. त्याची खरी किंमत, बेडवर पडून सिलेंडर मधून कृत्रिम प्राणवायू घेतानाच कळते.. पर्वतराजीवरचं उंच शिखर सर करताना याच हवेतील प्राणवायू, हा पुरेसा नसल्याने आपल्याला धाप लागते..

हीच हवा एकदा का डोक्यात शिरली की, त्या माणसाला जमीन दिसत नाही.. तो जमिनीपासून एक फूटावरुन चालू लागतो.. काही काळानंतर, परिस्थिती पलटली की, डोक्यातली हवा निघून जाते व तो जमिनीवर अलगद येऊन टेकतो..

काहीजण निरर्थक बोलून, हवेत बाण मारतात.. त्या बाणांना ‘लक्ष्य’ असं नसतंच.. ती निव्वळ एक फुशारकी असते..

काही माणसं थोड्याशा यशानंही हुरळून, हवेत जातात.. अशानं त्यांना यश टिकवून ठेवणं जमत नाही.. जसे काही कलाकार, एकच चित्रपट किंवा नाटक यशस्वी झालं म्हणून हवेत जातात.. त्यांना हे ‘टीमवर्क’ आहे, याचा विसर पडलेला असतो…

एका चित्रपट निर्मात्याने आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी, विशेष प्रयत्न करुन डझनाहून अधिक राज्य पुरस्कार पदरात पाडून घेतले.. त्यानंतर मात्र त्यानं नवीन निर्मिती किंवा तसा प्रयत्नही केला नाही..

काही कर्मचारी आपल्या खुर्चीचा उपयोग करुन, मोठी मजल गाठतात.. त्यांना कुठे थांबायचं हे कळत नाही.. परिणामी एक दिवस त्यांची, ही सगळी हवा निघून जाते…

माझ्या परिचयातील एक व्यक्ती, पंक्चर झालेली सायकल वापरत मोठा प्राध्यापक झाला.. पुढे नशिबाने हात दिल्यावर करोडपती झाला.. मात्र तो हवेत काही गेला नाही, जमिनीवरच राहिला..

जे आर्थिक घोटाळे करतात, गुन्हेगारी करतात, त्यांना शिक्षा म्हणून जेलची हवा, ही खावीच लागते. रोड-रोमिओंना, कस्टडीच्या हवेचं पुरेपूर सुख मिळतं..

थोडक्यात काय तर हवेचं महत्त्व काळानुरूप बदलतं असतं.. टायर मधील हवं गेली तर अवजड गाडी ढकलत न्यावी लागते.. तीच पंक्चर काढून हवा भरल्यावर फुलासारखी, हलकी होते.. फुग्यात हवा भरल्यावर तो हवेत उंचावर जातो. जसजशी त्यातील हवा कमी होईल, तसा खाली येतो..

आता लवकरच उन्हाळी हवा जाऊन, ढगाळी हवा सुरु होईल.. पाऊस सुरु झाला की, आडोसा शोधून पावसापासून वाचण्यासाठी उभं राहिल्यावर, भिजलेल्या अंगाला बोचरी हवा, जाणवू लागेल…

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२७-५-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..