गोष्ट एका सर्व सामान्य गरीब बाईची आहे. ती इंडोनेशियामध्ये केळीच्या बागेमधून काम करायची. एकदा बागेच्या मालकाने तिला केळी चोरताना पाहिले. त्याने तिच्या विरुध्द कोर्टात दावा गुदरला.
न्यायाधिशांनी तिला विचारले “तुला तुझा गुन्हा मान्य आहे काय? ” ती बाई म्हणाली “होय महाराज. मी खूप दिवसांपासून उपाशी आहे. माझा मुलगा अत्यवस्थ आहे. माझा नातू उपासमारीमुळे मरणाच्या दारात आहे. त्यामुळे माझ्याकडून हा गुन्हा घडला. ”
न्यायाधिशांना त्या बाईचा प्रामाणिकपणा रुचला. तिची कथा ऐकून त्यांचे मन द्रवले. खूप वेळ ते विचार करीत होते. अखेर त्यांनी आपला निर्णय सुनावला. ते म्हणाले “बाई, तुझी व्यथा मी समजू शकतो. परंतु कायद्यापुढे कोणाचे काहीच चालत नाही. तुझ्या गुन्हयाबद्दल मी तुला शंभर डॉलर्सचा दंड ठोठावतो. तो न भरल्यास तुला अडीच वर्षे तुरुंगात काढावी लागतील.”
निर्णय ऐकून ती बाई ओक्साबोक्शी रडू लागली. तिच्याकडे बघून न्यायाधिशांचे मन द्रवले. त्यांनी एक हॅट मागविली. त्यांनी त्यात स्वतःच्या खिशातून काढून शंभर डॉलर्स घातले. नंतर त्यांनी कोर्टात उपस्थित असलेल्या लोकांना सांगितले की माझा रजिस्ट्रार ही टोपी तुमच्यामध्ये फिरवेल. प्रत्येकाने पन्नास डॉलर्स दंड यात टाकायचा. तुम्ही विचाराल की तुम्हाला कशाबद्दल हा दंड भरावा लागणार आहे? तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की ज्या देशात लहान मुले उपासमारीने मरतात व ज्या देशात एका आजीला अशी चोरी करावी लागते त्यासाठी या देशाचे नागरीक म्हणून आपण सगळे जबाबदार आहोत.
बघता बघता हॅटमध्ये तिनशे पन्नास डॉलर्स जमा झाले. न्यायाधिशांनी त्या बाईच्या दंडाचे शंभर डॉलर्स काढून घेतले. दंड भरुन झाल्यावर त्यांनी उरलेले पैसे तिच्या सुपूर्द केले. कोर्टातले सगळे लोक भावुक झाले. ती बाईही कृतज्ञतेने अवाक झाली.
न्यायाधिशाने आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन हे काम केले. किती न्यायव्यवस्था असा विचार करु शकतात? आपल्या देशात असे कधी घडू शकेल काय? आपल्याकडल्या तुरुंगातून असेच फुटकळ चोरी करणारे लोक भरलेले आहेत. मोठे गुन्हे करणारे मोकाट फिरत आहेत.
कुपोषणाची समस्या गंभीर आहे. एकीकडे आपण उरलेले अन्न फेकून देतो आणि दुसरीकडे असंख्य लहान मुले आणि बालके अन्नाविना प्राणत्याग करत आहेत.
आपल्याला धान्य पिकवून देणारे शेतकरी हालात दिवस काढत आहेत, आत्महत्या करीत आहेत. आपण त्यांचा माल घेताना पै पैश्यासाठी घासाघीस करत रहातो. मोठ्या मॉल्समधून मात्र कुठलीही घासाघीस न करता आपण मुकाट्याने वस्तू विकत घेतो.
सिनेमाला गेल्यावर अव्वाच्या सव्वा भावाने पाण्याची बाटली आणि पॉपकॉर्न विकत घेतो. त्यावेळी आपण कधीच वंचितांचा विचार करत नाही. हे चित्र कधी बदलणार?
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply