ये रे ये रे पोष्टमणा
माहेरच्या आण डाकें
मना लागे हुरहुर
वरण होई फिके-फिके
वाटेकडे तुझ्या डोळे लावून
लावून, मला चष्मा लागे
चित्त न लागे स्वयंपाकात
भातातही खडे लागे
पायातली काढून हाणू कारे
सुंदर तुझ्या ह्या थोबड्यावरती
लक्ष न देताच जातोस मेल्या
दारावरुन माझ्या पुढती
काय मेले लफडे तुझे
शेजारच्या टवळी संगे
रोज-रोज कार्डे द्याया
तिच्या घरी, कोण सांगे?
ये रे ये रे पोष्टमणा
खबर घेऊन गावाहून
अगोबाई, नादात तुझ्या
भाजी गेली की रे करपून
आई माझी म्हातारी
असेल वळीत वाती
किंवा आजोळी आलेल्या
असेल खेळवित नाती
बाबा माझे मोठे शास्त्री
असतील सांगत शास्तर
निरोप त्यांचा पोचव ना रे
आणून माझ्या पोत्तर
मी न शिकले तरी
भाऊ माझा शाळेत प्यूण
हुशार शिकलेला
दुजा कचेरी कारकूण
बहिणी माझ्या साळू, काळू
चमेली, ढमेली, नि मैना
असतील दमलेल्या संसारी
कळीव की रे त्यांची दैना
लगबगे पोष्टमणा
माहेरच्या आण डाके
मनात रे माझ्या कशी
पाल का रे चुकचुके?
— यतीन सामंत
ऋणानुबंध या कवितासंग्रहातून
(1976)
Leave a Reply