हे रुधिर शांत का षंढ थंड हृदयात ?
— गिधाडे .
अनेक ठिकाणी बसलेली…उंच इमारतीवर.
एसी रूममध्ये .
सीमेच्या अलीकडे आणि पलीकडेही .
सगळ्या गिधाडांच्या नजरा मुंबईवर…
नजरा हातातल्या महागड्या उंची मोबाईलच्या स्क्रीनवर…
आणि समोरच्या टीव्हीच्या स्क्रीनवर सुद्धा !
काही नजरा अतिआत्मविश्वासाने भरलेल्या .
काही कृतकृत्य होण्यासाठी आतुरलेल्या .
काही साशंक तर काही धास्तावलेल्या .
काही नजरांचं कॅनव्हास, राजकारणासाठी काय काय करता येईल या दूरदृष्टीनं चित्र रंगवू लागलेलं .
तर काही जणांच्या लेखणीत पुस्तकाचे विषय , काहींच्या लेखणीत उद्याच्या बातम्यांची हेडींग्ज गर्दी करू लागलेली . काहींचे अग्रलेख कम्प्युटरवर उमटू लागलेले .
काही नजरा अलिप्त . काही नजरा अनेक ठिकाणी पेरलेल्या नोटांच्या हिशोबात गुंतलेल्या , पण सावधचित्त .
काही नजरा विमानांच्या उड्डाण वेळा शोधणाऱ्या…
नजरा गिधाडांच्या . सेटलमेंट्सच्या .
परकीय आणि एतद्देशीय सुद्धा!
सगळी गिधाडे हपापलेली …प्रत्येकाचे चित्त , मी माझे ,माझ्यासाठी एवढ्या मर्यादित स्वार्थासाठी…
सीमेच्या आर आणि पार , दोन्ही ठिकाणी !
आणि ते घडलं, २६ नोव्हेम्बर रोजी…
जे गिधाडांना , सगळ्याच गिधाडांना
अपेक्षित होते…
संहार…रक्तपात…विध्वंस …
आणि आपल्याच माणसांनी दुसऱ्यांच्या हातून पाडलेले रक्ताचे सडे…!
प्रचंड, कल्पनातीत , अविश्वसनीय !
…गिधाडांच्या नजरा आता बोलू लागलेल्या..
कुणालाच कळेना , आपल्याच आप्तेष्टांच्या रक्ताचे रंग यांना वेगवेगळे का दिसू लागले…
कुणाला हिरवा, कुणाला भगवा…
कुणाला कसला तर कुणाला कसला…
शांत धरती मुळापासून हादरून गेली ती या वृत्तीने.
शांत धरती अवाक झाली कारण तिनं पाहिलं, गिधाडं आपल्याच माणसांचं रक्त खुशाल वाहू देत होती.
सुसंस्कृत धरतीची मान शरमेने काळवंडून गेली कारण आपलीच मुलं ,गिधाडांच्या हाती ब्रश देत होती आपल्याच रक्तात बुडवायला,
आणि सगळा कॅनव्हास षंढ…थंड…
अजूनही तसाच…
स्मरणार्थ आठवणी काढणारा . मेणबत्त्या लावणारा .
आणि तोंडाला लागलेला काळा रंग पुसून , उजळ माथ्यानं मिरवणाऱ्यांकडे पाहणारा…
टीव्ही चॅनल्सवर निर्लज्जपणे बाईट्स देणारा . ते ऐकणारा . सोशल मीडियावर भ्रामक उसासे टाकणारा .
षंढ ! थंड !!
हुतात्म्यांनो !
तुमच्यासाठी माझ्याजवळ फक्त शब्द .
काळाच्या ओघात उघड होणारे पुरावे , त्यातल्या देशद्रोह्यांच्या नावांना आपणच दिलेलं मोठेपण आणि इतिहासातील चुका जाणवूनसुद्धा न आलेलं शहाणपण .
असे आम्ही सगळे हिंदुस्थानवासीय !
जमलं तर माफ करा आणि घ्या पुन्हा नव्याने जन्म , आम्हा भारतीयांच्या जिवंत प्रेतांच्या संरक्षणासाठी …!
२६ नोव्हेम्बर च्या निमित्तानं इतकंच !
— डॉ.श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
९४२३८७५८०६
Leave a Reply