आपण नेहमी आपल्या ज्ञानासोबत, आपल्याकडील वापरातील तंत्रज्ञान अद्यावत असावे यासाठी धडपडत असतो. नवनवीन तंत्रज्ञान वापरण्याकडे आपला कल असतो, आणि यात काहीही गैर नाहीच. परंतु ते वापरत असतांना त्याचा योग्य रखरखाव ठेवला गेला नसेल, नियमित दुरुस्ती आणि तपासणी केली जात नसेल तर महाभयंकर दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर घातक परिणाम करणाऱ्या अशा बाबी वारंवार आपल्या दृष्टीपथास पडतात.
भ्रमणध्वनी(मोबाईल), संगणक, इंटरनेट(आंतरजोडणी), टी.व्ही.(दूरदर्शन संच), फ्रीज(शीतकपाट), ए.सी.(वातानुकुलन यंत्र), एटीएम(स्वचालित रोख यंत्र) यांचे फायदे निश्चितच आहेत, परंतु निष्काळजीपणाचे दुष्परिणामही तेवढेच आहेत. एटीएम च्या अयोग्य रखराखावामुळे ‘जनतेच्या आरोग्यासाठी घातक असलेले विषाणू नोटांसह बाहेर येत असल्याचे’ नुकत्याच सर्वेक्षणात समोर आले आहे. एटीएम मधून डेंग्यू आणि मलेरियाचे लार्व्हा नोटांसोबत बाहेर येत असल्याचे, भारताच्या राजधानी दिल्ली व परिसरातील झालेल्या सर्वेक्षणात सिध्द झाले आहे.
एटीएमच्या केबिनमधील एसी मधून निघणाऱ्या पाण्यात, नियमित साफसफाई न केल्याने डासांच्या लार्व्हाची उत्पत्ती होते. दिल्ली व परिसरात “राष्ट्रीय संक्रामक रोग नियंत्रण विभागाने” ५०० एटीएम यंत्रांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर हे धक्कादायक सत्य उघडकीस आले. राजधानी दिल्लीतील एटीएमची ही स्थिती असेल तर राजधानीपासून हजारों कि.मी. दूर तालुका व मोठ्या गावातील एटीएमची काय दशा असेल ? याची कल्पना न केलेलीच बरी ! ग्रामीण भागातील बराच शिकलेला वर्ग एटीएमचा वापर करतो, पण अश्या संकटांची त्यांना पुसटशीही कल्पना नसते. या सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतो कोण ? ह्या सर्व बाबी बघता सरकारने यासंकटापासून बचावासाठी स्वतंत्रपणे कायदे आणि दिशानिर्देश जारी करणे आवश्यक आहे. सोबतच सर्व जनतेने वाचन वाढविणे आवश्यक आहे, तरच काही मार्ग निघू शकतो.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply