नवीन लेखन...

हेच खरे प्रेम! हाच खरा विश्वास (कथा)

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये सौ.साधना झोपे  यांनी लिहिलेली ही कथा.


संज्ञा आणि सुकृत बालसोबती. दोघांची घरे शेजारी शेजारी होती. त्यामुळे दोन्ही घरात छान एकोपा होता. एकाच्या घरात शिजले तर दुसऱ्याच्या घरी द्यावे एवढेच नाहीतर एकाला वेदना झाली तर त्याची सल दुसऱ्याला जाणवायची. अशा प्रेमळ आणि सुसंस्कारित वातावरणात संज्ञा आणि सुकृत वाढत होते. सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा गुण संज्ञा आणि सुकृत यांनी घेतला. दोघेही शाळेत बरोबर जात येत असत. अभ्यासही मिळून करीत असत. एकाला अडचण आली की ती अडचण दुसरा सोडवी. दोघेही अभ्यासात हुशार होते. कायम पहिल्या पाचात असायचे. दोघेही यावर्षी दहावीला होते. त्यांचा जोमाने अभ्यास सुरू होता. कारण सुकृतला आणि संज्ञाला सायन्ससाठी चांगल्या कॉलेजचा प्रवेश घ्यायचा होता. दहावीचे बोर्डाचे पेपर दोघांनाही छान गेले. आता वेध होते फक्त निकालाचे. होता होता एक दिवस निकाल लागला. संज्ञाला ९२ ते सुकृतला ९६ टक्के मार्क मिळाले. दोन्ही घरात आनंदाचे वातावरण होते. दोघांनाही एकाच कॉलेजमध्ये सायन्ससाठी प्रवेश मिळाला. आता कॉलेज आणि क्लास यातच खूप वेळ जात असे. पण तरी सुट्टीच्या दिवशी संज्ञा आणि सुकृत एकत्र बसून अभ्यासातील अडचणी सोडवत असत. संज्ञापेक्षा सुकृतचा अभ्यास जास्त जोरात सुरू होता. कारण त्याला मेडिकलला जायचे होते. पण आता संज्ञा आणि सुकृतमध्ये मैत्रीसोबत प्रेमाचा अंकुर फुलत होता. पण आधी शिक्षण मग बाकी असा विचार करून जोमाने अभ्यास करत असत. बारावीच्या परीक्षेनंतर दोघेही आता निवांत झाले होते. मुलांना थोडे रिलॅक्स वाटावे म्हणून दोन्ही परीवारांनी काश्मीरला सहलीला जाण्याचे ठरविले. तिथेच त्या स्वर्गीय नंदनवनात सुकृतने आपल्या प्रेमाची कबुली दिली.

बारावीच्या निकालानंतर सुकृत मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी शिकायला गेला. संज्ञाने तिथे जवळच्या इंजिनीयरिंग कॉलेजला अॅडमिशन घेतली. दिवसामागून दिवस जात होते. संज्ञाचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि ती नोकरी करीत होती. सुकृतचे पण शिक्षण पूर्ण होऊन तो आता खूप मोठ्या दवाखान्यात नोकरी करीत होता. स्वत:च्या दवाखान्यासाठी त्याला स्वत: पैसा जमवायचा होता. आपल्या आईवडिलांवर दवाखाना उभारण्याचा बोजा टाकायचा नव्हता. दोन्ही घरी संज्ञा आणि सुकृतच्या प्रेमाविषयी पूर्ण कल्पना होती. आता दोन्ही घरात दोघांनीही आता लवकर लग्न करावे यासाठी मागे लागले होते. संज्ञा आणि सुकृतनेही होकार दिला.

एक दिवस अचानक काम करत असताना सुकृतला चक्कर आली आणि तो कोसळला. खरंतर त्याला कधीपासूनच थकवा जाणवत होता. कामाच्या दगदगीमुळे असेल असे समजून त्याने दुर्लक्ष केले. पण तो चक्कर येऊन पडला त्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीराची तपासणी केली त्यात निदान झाले तो एचआयव्ही या विषाणूने बाधीत झाला आहे. हे ऐकून तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. एवढा मोठा डॉक्टर असल्यावर आपल्याला एड्स झाल्याचे ऐकून सुकृत तर हतबलच झाला. त्याला काय करावे काहीच सुचत नव्हते. त्याच्यासोबतचे सहकारी आणि सर्व वरिष्ठ डॉक्टर सुकृतला चांगलेच ओळखत होते. ते त्याला विचारत होते की तू कधी कोणत्या आजारात इंजेक्शन घेतले होते का? पण सुकृतचे उत्तर नाही असे होते. तेवढ्यात त्याचा मित्र सर्वेशला आठवले की सुकृतला डेंग्यू झाला होता आणि त्यावेळी त्याला बाहेरून प्लेटलेट्स द्याव्या लागल्या होत्या. त्यामुळे सुकृतला या रोगाची लागण झालेली असेल. मोठ्या धीराने ही बातमी त्याने घरी सांगितली. संज्ञाच्या घरातही ही बातमी समजली. सुरुवातीला ते तर हतबल झाले की आता आपल्या मुलीचे कसे होणार? संज्ञाच्या आईने आडून आडून तिला तिचे आणि सुकृतचे शारीरिक संबंध आले का हे विचारले. संज्ञाच्या हे लक्षात आल्यावर तिने सांगितले की आई, आमचे प्रेम हे कधी शारीरिक नव्हते. आम्ही दोघेही सज्ञान आहोत त्यामुळे तू काही तशी काळजी करू नकोस आणि सुकृतच्या हातून बाहेरही तशी काही चूक झाली असेल हे मी कदापिही मान्य करणार नाही. संज्ञा सुकृतच्या घरी आली तेव्हा त्याच्या घरातले सगळे त्याला दोष देत होते. सारखे त्याला टोचत होते की आता आम्हाला बाहेर कुठेच तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. तो परोपरीने समजावत होता, ती समजावत होती की हा आजार दुषित रक्त, दुषित इंजेक्शन यामुळे देखील होतो. आणि तुम्हाला आठवते का मागे एकदा सुकृतला डेंग्यू झाला होता तेव्हा त्याच्या प्लेटलेट्स अतिशय कमी झाल्या होत्या म्हणून आपण बाहेरून प्लेटलेट्स दिल्या होत्या. त्यामधून त्याला या विषाणूची बाधा झाली आहे. यावर सगळ्यांनी तिला वेड्यात काढत म्हटले की, आपण चांगल्याच रक्तपेढीतून रक्त आणले होते आणि रक्तदानापूर्वी त्या रक्ताची रक्तचाचणी केली जाते. त्यावर ती म्हणाली की हो, तुमचे म्हणणे खरे आहे. पण या विषाणूची लागण झाल्यावरही सुरुवातीच्या तीन महिन्यात त्याचे विषाणू एड्स रक्तचाचणीत उमटत नाहीत. पण पीआरसी या प्रगत एड्स चाचणीने रोगाची लागण झाली असेल तर त्याचे विषाणू लगेच उमटतात. पण ती चाचणी सहज कोणी करत नाही. माझा सुकृतवर आणि त्याच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे.

इकडे संज्ञाच्या घरी तर तिला त्याच्या घरी जायला सक्त मनाई होती. पण संज्ञा हट्टाला पेटून त्याला भेटायला जात असे आणि तिने घरी सांगितले की असे भेटल्याने, बोलण्याने हा आजार पसरत नाही आणि आजच निक्षून सांगते की मी फक्त आणि फक्त सुकृतशी लग्न करणार. जर दुर्दैवाने हा आजार मला झाला असता आणि सुकृत असा वागला असता तर चालले असते का? यावर तिचे आईवडिल म्हणाले की अगं वेडी झाली का? जर त्याच्याकडून तुलाही या आजाराची लागण झाली तर नाहक आपला जीव गमावशील आणि असेही आता त्याचे आयुष्य जास्त थोडेच आहे? संज्ञा म्हणाली की, मी आणि सुकृत तेवढे सज्ञान आहोत आम्ही योग्य ती काळजी घेऊ आणि आता झीडोव्हयुडीन या औषधाने जरी हा आजार बरा होत नसला तरी या आजाराचे विषाणू शरीरभर पसरण्यापासून रोखता मात्र नक्की येतात आणि रुग्णाचे आयुष्य वाढविता येते. आणि एक सांगू का आई, बाबा लोक काय म्हणतील? आणि समाजाच्या चुकीच्या मानसिकतेमुळे रुग्ण अर्धमेला होतो हे मला सुकृतच्या बाबतीत होऊ द्यायचे नाही.

संज्ञाने कोणाचेच ऐकले नाही आणि तिने सुकृतशी लग्न केले. उगाच लोकांच्या नानाप्रकारच्या बोलण्याने आपलेच मानसिक खच्चीकरण करून मानसिक समतोल बिघडवून घेण्यापेक्षा या सगळ्यांपासून दूर जाऊन राहणे त्यांनी पसंत केले. कधी कधी सुकृत आपल्या आजाराविषयी विचार करत बसायचा त्या त्या वेळी संज्ञा त्याला धीर देत असे आणि सतत त्याचे मनोबल वाढवत असे. त्याला वेळच्या वेळी औषध देत असे. कधी कधी सुकृत औषध घ्यायला कंटाळा करीत असे. पण संज्ञा कधी त्याला प्रेमाने तर कधी प्रेमाने रागावून औषध घ्यायला लावतच असे. संज्ञाचे सुकृतवरील निस्सीम प्रेम बघून सुकृतच्या आई-बाबांना तर संज्ञाचा खूप अभिमान वाटत असे. ते नेहमी म्हणत की, आम्ही जन्मदाते असूनही त्याच्यावर विश्वास दाखवू शकलो नाही पण तू मात्र आमच्यापेक्षाही मानाने आज मोठी आहे. सुकृत आणि संज्ञा लांबच्या शहरात जेथे त्यांना कोणी ओळखत नव्हते अशा ठिकाणी जाऊन सुखाने आणि आनंदाने संसार करीत होते.

-सौ.साधना झोपे

मो. ९२२६२६८९७

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..