यमुनतिरी झुळझुळत्या पाण्यावर एक मंद -मंद लहर उठली.का कुणास ठाऊक ती नदीही शहारली.सरत्या वर्षाला गर्द वृक्षांच्या छायेत बसून कान्हा अलगुज वाजवण्यात तल्लीन झाला होता. पाव्यातून उठणारे स्वर गुलाबी थंडीलाही गारठवत होते. पाना -पानात दडलेले पक्षीराज तो स्वर कानात साठवण्यास अधीर झाले होते.क्षणभर,हो क्षणभरच जणू काही सारं चराचर निश्चल झालं.
पायातल्या पैंजणांची रुणझुण,बिल्वरांचा कीणकिणणारा स्वर,पायाखाली पानगळीची होणारी चुरचुर ,वाऱ्यावर लहरणाऱ्या पदराची सळसळ कुणाच्यातरी म्हणजेच राधेच्या आगमनाची वर्दी देत होते.
कान्हा आपल्या सहचारीणीशी म्हणजेच मुरलीशी एकरूप झाला होता.चौफेर गुलाबफुलांचा ताटवा बहरला होता. राधा कान्ह्याचे लक्ष विचलीत करण्यात अयशस्वी ठरते की काय असे वाटू लागले.
पण,पण राधेला साथ होती वर्षाखेर पसरलेल्या गुलाबी थंडीची,जी नववर्षाच्या स्वागतास आतुरली होती.
राधेला कान्ह्याची तर गुलाबी हवेला ओढ होती ती नववर्षाची.
परिणाम व्हायचा तोच झाला. कान्हा राधेला भुलला.गुलाबी हवेच्या मखमली तरंगावर राधा-कृष्ण रासक्रीडेचा अनोखा खेळ रंगला. तो बघण्यात काळ स्थिरावला.
ह्या सोहळ्याला हजेरी लावली ती वृंदावनातल्या सुगंधलहरींनी.तिथे पक्षी सुस्वरे आळवू लागले .
राधे -राधे ,कृष्ण-कृष्ण
हेच बोल चराचरात घुमू लागले.
ही गुलाबी हवा साक्षात चराचराला मोहजालात फसवू लागली.तिची माया प्रेमी युगलांना मोहजालात फसवूू लागली.
रजईची उब,शेकोटीची उब,मायेची उब,दोहडची उब सारं सारं फिके पडले.
सगळीकडे एकच एक नशा होती ती या ,”गुलाबी हवेची”
ही गुलाबी हवा
ये नारे मितवा
ये कीरे नाखवा
प्रीतीत मारवा
हा जीव हळवा
कान्ह्यास बोलवा
पाव्याचा गोडवा
ही गुलाबी हवा
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply