नवीन लेखन...

हेलन… नृत्य हेच तिचे व्यक्तीमत्व

‘यश हेच चलनी नाणे’ ह्या पुस्तकातील दिलीप ठाकूर ह्यांनी लिहिलेला हा लेख


ओ हसिना जुल्फोवाली जाने जहा… शम्मी कपूर संगीतकार राहुल देव बर्मनच्या युथफुल ट्यूनवर मोहम्मद रफीच्या आवाजाला नेमके पकडत अंगाला जमतील तितके आळोखे पिळोखे देत बेभान नाचतोय (त्याची ती स्टाईलच आहे) आणि अशातच… ओ अंजाना धुंडती वो परवाना धूंडती हू असे आशा भोसले यांच्या मादक आवाजाचा नेमका सूर पकडून हेलन गाण्यात एन्ट्री करते आणि संपूर्ण पडदाभर नृत्याचा वेगळा आविष्कार दिसतो. हा जणू एक प्रकारचा नृत्याचा सामना.

हू, विजय आनंद दिग्दर्शित ‘तिसरी मंझिल’मध्ये नायक आणि क्लब डान्सर अशी या गाण्यात जोडी जमली. मेहबूबा मेहबूबा ऊ ऊ दिलसे दिल मिलते है या राहुल देव बर्मनचे संगीत आणि पार्श्वगायन असलेले गाणे जलाल आगा गातोय, क्रूरकर्मा गब्बरसिंग (अमजद खान) तेथेच पहुडलाय आणि समोर हेलनचे नृत्य आहे. ती गात नाहीए, फक्त नृत्य करतेय तरी तिचे अस्तित्व जाणवतेय, प्रभाव आहे. स्वत:ला फक्त नृत्य करायचेय त्यातही स्पार्क. व्वा. कम्माल आहे.

ओ मुंगळा मुंगळा, दारुच्या गुत्त्यावर अनेक जण नशापाण्याचा आनंद घेत आहेत आणि अशातच खलनायकासमोर ( अमजद खान ) अतिशय तडफदारपणे हेलन जबरा नृत्य करतेय. संगीतकार राजेश रोशनने या स्पॉटचा मूड चांगलाच पकडला आहे आणि उषा मंगेशकर यांनीही तेवढ्याच ठसकेबाजपणे गाणे गायलयं. पडद्यावर हे गाणे पाहताना जणू खुद्द हेलनच हे गाणे गातेय असा फिल येतो आणि दिग्दर्शक राज एन. सिप्पीचा हा चित्रपट या गाण्यासाठी अनेकांनी पुन्हा पुन्हा पाहिला.

हम काले है तो क्या दिलवाले है… काळाकुट्ट मेहमूद स्वप्न पाहतोय, स्वप्नात या गाण्यावर नृत्य करताना त्याच्यासोबत हेलन आहे. खरं तर हे एकदमच अजब कॉम्बिनेशन आहे. पण हिट ठरले. गाण्याच्या शेवटी तर दोघे अशा काही जोशात नाचलेत की पाहणारा दमावा. राजा नवाथे दिग्दर्शित ‘गुमनाम’चा हा नृत्य तडका आहे. या भयपटांत हा एक छान रिलीफ आहे. महत्वाचे म्हणजे गाणे मेहमूदवर आहे, हेलनला एकही ओळ नाही. तरीही ते पडद्याभर आपला प्रभाव दाखवते.

खून झाला आहे… कधी? कुठे? कसा? चित्रपटातील रहस्यरंजकता वाजवण्यासाठी क्लबमध्ये हेलनचे नृत्य. देवदत्त दिग्दर्शित ‘शांतता! खून झाला आहे’ (१९७५) या मराठी चित्रपटातील हे नृत्य. हेलनने मराठी चित्रपटात भूमिका साकारली म्हणून त्या काळात बरेच कौतुक. आणखीन काही मराठी चित्रपटात हेलनने अशीच भूमिका साकारली.

एव्हाना हेलनची अष्टपैलू नृत्य अदाकारी आपल्या लक्षात आली असेलच. हेलनमध्येही अभिनेत्री आहे, ( महेश भट्ट दिग्दर्शित ‘लहू के दो रंग’, देश मुखर्जी दिग्दर्शित ‘इमान धरम’, संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘खामोशी द म्युझिकल’ या चित्रपटात ते पाहायला मिळाले. अभिनेत्री म्हणून हेलनची रेंज जबरदस्त. पण दिग्दर्शकांकडून त्या गुणवत्तेचा वापर अगदीच कमी) पण तिची खरी ओळख हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील ‘सर्वोत्तम नृत्य तारका’ अशी आहे. कमालीचा फिटनेस, नृत्य लयबद्धता आणि सौंदर्य यांचा उत्तम मिलाफ म्हणजे हेलन.

पूर्णपणे पाश्चात्य व्यक्तीमत्व असूनही हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या मेहनत आणि सातत्याने आपली जागा निर्माण केली. तेच तर महत्वाचे आहे ना? पण हेलनला ही ओळख आणि स्थान सहजासहजी मिळाले नाही.

हेलनचा जन्म २१ नोव्हेंबर १९३९ रोजी रंगून (ब्रह्मा पूर्वीचा ब्रह्मदेश) येथे झाला. हेलनचे पूर्ण नाव हेलन जयराग रिचर्डसन आहे व जन्माने ॲग्लो बर्मीज. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने १९४३मध्ये हेलनची आई मर्लिन रिचर्डसन रंगूनहून आपल्या या लहान मुलीला घेऊन अगोदर आसामला हे कुटुंब आले आणि त्यानंतर मुंबईत स्थलांतरित झाले.

मुंबईत वांद्रे येथे स्थायिक झाल्यावर हेलनची आई नर्स म्हणून काम करत असे पण मिळणाऱ्या पगारात कुटुंब चालवणे कठिण झाल्याने त्यांच्या व स्वत:च्या चरितार्थासाठी हेलनने शाळा सोडून देऊन रती बाबू या नृत्य दिग्दर्शकाकडे नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तेथे मणिपूरी, कथ्थक असे नृत्य प्रकार हेलन शिकली. या कुटुंबाची एक परिचित अभिनेत्री कुकू ही त्यावेळी बॉलिवूडमधली एक आघाडीची नृत्य तारका म्हणून ओळखली जायची, तिच्या ओळखीने हेलन यांना अतिशय लहान वयातच फिल्मीस्तानच्या (गोरेगाव) ‘शाबिस्तान’ (१९५९) या चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळाले. तेव्हाच राज कपूरच्या ‘आग’ (१९५१) मध्येही ग्रुपमध्ये डान्स केला.

हेलनचं अँग्लो व बर्मिस सौंदर्य हे चित्रपटातील मुख्य अभिनेत्री बनण्याच्या मार्गातला अडथळा होते. त्या काळात नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, निम्मी, कामिनी कौशल अशा पारंपारिक व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अभिनेत्रींची चलती होती. हेलनच्या एकूणच व्यक्तीमत्वाचा विचार करता त्यात तिला स्थान नव्हते. अशातच ‘शाबिस्तान’मध्ये कुकूने स्टेजवर साकारलेल्या ‘चिंचपोकली चिंचपोकली तू छोकरा, मै छोकरी’ या गाण्यात हेलन पाठीमागच्या ग्रुपमध्ये नाचली. याचे तिला मिळालेले चाळीस रुपये मानधन खूपच महत्वाचे वाटले. ( सत्तर वर्षांपूर्वी चाळीस रुपये मानधन हे खूपच आनंद देणारे होते. ) हेलनने ग्रुप डान्सर म्हणून करियर सुरु केली. त्यात काही वावगं नव्हते आणि नाही. हेलनची तेव्हाची आर्थिक परिस्थिती पाहता तिच्यासाठी ही खूपच मोठी आशा होती.

हेलनने ‘बदनाम’, ‘रंगिली’ अशा आणखीन काही चित्रपटात ग्रुप डान्सर म्हणून वाटचाल केल्यावर तिला निर्माता के अमरनाथ यांच्या ‘अलिफ लैला’ (१९५३) मध्ये ‘राते प्यार की बाते जाएंगी, ये बहारे फिर न आयेगी’ या गाण्यावर पहिल्यांदा स्वतंत्रपणे संधी मिळाली. त्याच वर्षी कामरान आणि कृष्ण कुमारी यांच्या भूमिका असलेल्या ‘मलिका सलोमी’ या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत हेलनला स्वतंत्र स्थान मिळाले. हे अतिशय आत्मविश्वास वाढवणारे असते.

हेलनला मग मयूरपंख (१९५४), हूर ए अरब (१९५५) अशा काही चित्रपटात सोलो नृत्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, ‘हूर ए अरब’चे निर्माते पी. एन. अरोरा यांच्याशी तिने काही वर्षांनी विवाह केला. तर बिमल रॉय दिग्दर्शित ‘यहूदी’ मध्ये हेलनने कुक्कूसोबत नृत्य करताना असा काही प्रभाव दाखवला की तात्कालिक समिक्षकांनी म्हटले की, कुक्कूचा काळ संपत चाललाय. हेलनने सामाजिक, ऐतिहासिक, पोशाखी, पौराणिक, रहस्यरंजक अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांत विविध प्रकारची नृत्ये अशा काही झपाटल्यागत केली की तिच्या फिटनेस आणि सातत्याची कमाल वाटावी. पण तिच्यावर हिंदी चित्रपटातील ‘कॅब्रे डान्सर’ असा शिक्का बसला, तशी तिची इमेज झाली, त्या पलीकडे जाऊन तिचे नृत्य कौशल्य निश्चित आहे आणि त्याचा तिने अगणित वेळा नृत्य प्रत्यय दिला आहे. पण तेवढा तिच्या नृत्याचा विचार झाला नाही. मेरा नाम चुन चुन चू (हावडा ब्रीज), मिस्टर जॉन बाबा खान ( बारीश) यातील रॉक अॅण्ड रोलवाले सूर हेलनच्या नृत्याने लोकप्रिय झाले होते.

अनेकदा तरी ‘एकाच नृत्यापुरती’ भूमिका साकारल्याने हेलन ‘आयटम नंबर’ साठी ओळखली जाऊ लागली. चित्रपटाचे जग हे असे विचित्र असते, ते एखाद्याच्या यशाच्या प्रतिक्षेत राहते आणि मग एखाद्या इमेजमध्येच त्या कलाकाराला कळत नकळतपणे अडकवून टाकते. त्या काळात हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर निशी, हीरा सावंत, कम्मो, शीला वाझ, मीनू मुमताज अशा नृत्य तारकांची विलक्षण चलती होती. सत्तरच्या दशकात त्यात पद्मा खन्ना, बिंदू, जयश्री टी., मीना टी., बेला बोस अशा अनेक अभिनेत्रींची भर पडली. यांना अनेकदा काही व्यक्तिरेखाही साकारता आल्या.

या स्पर्धेत आणि वातावरणात हेलनने आपले अस्तित्व टिकवून ठेवले हे महत्वाचे आहे. सिनेमा बदलला, दिग्दर्शकांची पुढची पिढी आली, पण हेलन कायम होती. हेलनच्या रुपेरी नृत्याची संख्या वाढत गेली. राजा हवेली की खिडकी जरा खोल ना रे ( वीर राजपुतानी), सुनी सुनी बहार है ( हातिमताई की बेटी), ‘मारा रे मारा रे वो मारा’ (आबे हयात), दिल का ना करना ऐतबार होई (हलाकू), असे करत करत ती शक्ती सामंता दिग्दर्शित ‘हावडा ब्रिज’ या सिनेमापासून हिंदी चित्रपटाची जणू हुकमी नृत्य तारका ठरली आणि हे गाणेच तसे होते, ‘मेरा नाम चिन चिन चू’ या गाण्याचा वेग हेलनने परफेक्ट पकडला, चित्रपटाच्या यशात तिचाही महत्वाचा वाटा ठरला, तिचा चाहता वर्ग वाढला, तिच्या नृत्याला हिंदी चित्रपटात हुकमी स्थान मिळू लागले ही तिची मोठीच मिळकत ठरली.

सत्तरच्या दशकात तर अनेक हिंदी चित्रपटात हेलनचे एखाद्या व्यक्तिरेखेसह नृत्य पाह्यला मिळाले. काही चित्रपटांची नावे सांगायची तर, बेनाम, अपराध, अनामिका, काला सोना, मदहोश, आज की ताजा खबर, खून पसीना, चला मुरारी हीरो बनने, द ग्रेट गॅम्बलर, अकेला, शरारत, फांदेबाज वगैरे वगैरे. अगदी तिने तमिळ, मल्याळम इतकेच नव्हे तर इंडोनेशियन चित्रपटातही भूमिका साकारली.

पन्नास, साठ आणि सत्तरच्या दशकात सातत्याने चित्रपटात भूमिका साकारत राहणं सोपे नसते. कालांतराने हेलनच्या कामाचा वेग कमी कमी होत जाणं स्वाभाविक होतेच. अगदी ‘हीरॉईन’ (२०१२) या चित्रपटापर्यंत तिने भूमिका साकारलीय आणि याच चित्रपटाच्या निमित्ताने हेलनच्या भेटीचा योग आला असता तिच्या काही गाजलेल्या गाण्यांवर औपचारिक गप्पा झाल्या. तेव्हा ती सविस्तर मुलाखत देण्यासाठी इच्छुक दिसली नाही. पण ‘अशी छोटीसी मुलाखत’ ही खूपच आनंददायक अनुभव ठरला.

पाश्चात्य ढंगाचे सौंदर्य, शार्प लुक्स आणि चमकणारे डोळे हे मुख्यत्वे करून चित्रपटातल्या ‘भारतीय नारी रोल’च्या विरुद्ध बऱ्याचदा ‘हायलायटींग’ म्हणून वापरले जायचे. त्यामुळे चंद्रशेखर (“चा चा चा” चित्रपट), यातील तिचे चंद्रशेखरसोबतचे चमेली के मंडवे तले गाणे लोकप्रिय झाले होते. यात तिचे पुन्हा सॉफ्ट नृत्य पाह्यला मिळते) यांसारख्या त्या काळातील आघाडीच्या नायकाबरोबर नायिका म्हणून काम करुनसुद्धा हेलनचे नाव व प्रसिद्धी ही तिच्या अनेक ‘व्हॅम्प’ व ‘निगेटिव्ह’ भूमिकांनीच दिली. या लोकप्रियतेचा सकारात्मक प्रत्यय हेलनला प्रत्यक्ष आयुष्यातही यायचा. सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावरून जाताना त्यांना कधीही उघड चेहऱ्याने बाहेर फिरता आले नाही. कायम काहीतरी मुखवटासदृश घालून वावरावे लागे.

सुबोध मुखर्जी दिग्दर्शित ‘जंगली’ (१९६१) मध्ये शम्मी कपूरसोबतच्या ‘अयय्या करु मै क्या सुकू सुकू’ या गाण्यापासून ते चंद्रा बारोट दिग्दर्शित डॉन (१९७८) मधील ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’ या वेगवान गाण्यावरील नृत्यापर्यंत हेलन यांनी चित्रपटसृष्टीवर ‘डान्स क्विन’ म्हणून अधिराज्य गाजवले.

दरम्यान, हेलनने रुपेरी पडद्यावर साकारलेली अनेक गीत नृत्ये लोकप्रिय ठरली. त्यातील काही सांगायला हवीतच. मेहमूदसोबतच ‘बदकम्मा बदकम्मा’ (शतरंज ), आ जाने जा ( इंतकाम), पिया तू अब तो आ जा (कारवा), जनाबे मन सलाम है (ऐलान), नाम मेरा निम्मो मुकाम लुधियाना (सपने सुहाने ), उई मा उई उई ये क्या हो गया (पारसमणी), मेरा मन बडा पापी सावरिया रे (आशा), घुंघरवा मोरा छम छम नाचे (उजाला). हेलनच्या करियरमधील टॉप तीन गीत नृत्ये सांगायची तर मुंगळा मुंगळा (इन्कार), मेहबूबा मेहबूबा (शोले ), मेरा नाम चिन चिन चू (हावडा ब्रीज) ही होत. हेलनशिवाय या गाण्यांसाठी अन्य कोणाचाही विचार आपण करु शकत नाही.

यात हेलनने केवढी विविधता दिली आहे बघा, फक्त क्लब डान्सच नव्हे तर मुजरा, पंजाबी लोकनृत्य वगैरे वगैरेही तिने सारख्याच सहजपणे साकारलय आणि ही विविधता हेच हेलनचे खास वैशिष्ट्य आहे.

विजय आनंद दिग्दर्शित ‘तिसरी मंझिल’ या चित्रपटात भूमिका साकारत असतानाच हेलनची ओळख सलिम यांच्याशी झाली, ओळखीचे रुपांतर प्रेमात तर झालेच. तेव्हा हेलन चित्रपट निर्माते पी. एन. अरोरा यांची पत्नी होती. (सत्तरच्या दशकात त्यानी राजेश खन्ना आणि साधना या जोडीच्या ‘दिल दौलत और दुनिया’ या चित्रपटाची निर्मिती केली ). १९५७ ते १९५४ हा संसार चालला. पण सलिम विवाहित असूनही त्यानी काही वर्षांनी म्हणजे १९८१ साली हेलनला ‘दुसरी पत्नी’ म्हणून स्वीकारले. महत्वाचे म्हणजे सलिम यांच्या पहिल्या पत्नीनेही हे नाते स्वीकारले. सलिम यांनी ‘तिसरी मंझिल’ या चित्रपटात ड्रीमर वादकाची भूमिका साकारलीय. तेव्हा ते अभिनेते म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते आणि जावेद अख्तर यांची जोडी जमली आणि सलिम जावेद हे यशस्वी पटकथा संवाद लेखक झाले. कालांतराने ही जोडी फुटली. तर सलमान खान हा या सलिम यांचा पुत्र. विशेष म्हणजे, कालांतराने संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ मध्ये हेलन आणि सलमान खान यांनी आई आणि मुलगा अशा नात्याची भूमिका साकारलीय. विशेष म्हणजे यात उतारवयातील हेलन आणि तिची काही भावनिक दृश्ये पाहायला मिळतात.

आज पाश्चात्य व्यक्तिमत्वाच्या अभिनेत्री आहेत (कैतरिना कैफ). पण प्लीज हेलनशी त्यांची तुलना अजिबात नको. खुद्द हेलनलाही ते आवडणार नाही.

हेलनच्या अनेक गोष्टींबाबत कायमच कुतूहल राहिले हे तिच्या यशाचे वेगळेपण आहे. एक म्हणजे तिचे विग! तिने हिंदी चित्रपटाच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अनेक स्टाईलचे, आकाराचे वीग वापरले आहेत. मूळ चेहरा कायम ठेवून त्यावरचा तिचा वीग ही मोठीच कमाल आहे. तसेच तिचा वॉर्डरोब ! तब्बल तीन दशके तिने अगणित प्रकारचे, फॅशनचे, स्टाईलचे देशी विदेशी आणि त्या त्या काळातील ड्रेस परिधान केले. अनेकदा शॉर्टमध्येही ती आकर्षक दिसली हे कायमच अधोरेखित होत राहिले. आणि या सगळ्यामुळेच हेलनचा आजही चित्रपटसृष्टीवर आणि तिच्या चाहत्यांवर प्रभाव आहे. भारत सरकारने हेलन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अशा उत्तम स्टॅमिना आणि यशोगाथा असलेल्या हेलनचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

-दिलीप ठाकूर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..