हेल्मेटसक्ती करू नये असं म्हणणारे हेल्मेट वापरू नये असं कधीच म्हणत नाहीत. त्यामुळे हेल्मेटसक्ती ह्या विषयावर विचार करताना हेल्मेटचे फायदे तोटे ह्यापेक्षा सक्ती ह्या गोष्टीवर जरा जास्त गंभीरपणे विचार व्हावा. विशेषत: कल्याणकारी लोकशाही राज्यपद्धतीमधे कशाची सक्ती असावी आणि कशाची नसावी ह्याबाबत विचार व्हावा. हेल्मेटसारख्या गोष्टीची सक्ती करणं आणि ती पोलीस यंत्रणेमार्फत राबवणं हा लोकशाही सरकारनं केलेला मर्यादाभंग आहे. लोकशाही सरकारनं लोकांचं किती कल्याण करावं ह्या प्रश्नाची हेल्मेट ही मर्यादा आहे.
दिवाकर रावते म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादकांवर / विक्रेत्यांवर प्रत्येक वाहनाबरोबर दोन हेल्मेट्स दिलीच (म्हणजे विकलीच) पाहिजेत अशी सक्ती जरूर करावी, जसे चार चाकी वाहनांमधे पट्टे असतात. कारण त्यांनी विकलेल्या वाहनामुळे ग्राहक डोके आपटून मरण्याची शक्यता आहे. म्हणजे ते दुसर्यांना धोका पोचेल अशी वस्तू विकत आहेत, म्हणून तिथे सरकारनं लक्ष घालणं आवश्यक आहे. पण ह्याच न्यायानं त्यांनी पोलिसांना मिळालेले कोणाही निरपराध व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्याचे अधिकार काढून घेतले पाहिजेत, कारण हेल्मेट न वापरल्यानं कोणतीही व्यक्ती अन्य कोणालाही काहीच धोका निर्माण करीत नसते. त्यामुळे अशा बाबतीत सरकारनं लक्ष घालण्याचं कारणच नाही. हेल्मेटसक्ती हा केंद्राचा कायदा आहे त्यात राज्य सरकार काही करू शकत नाही हे जेमतेम अर्धसत्य आहे. राज्य सरकार त्यात नक्कीच बदल करू शकतं कारण मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यांच्या आखत्यारीतच आहे. वस्तुत: केंद्राच्या कायद्यालाच कोणा प्रबळ सामाजिक संस्थेनं आव्हान दिलं पाहिजे.
सरकारी यंत्रणेला हाताशी धरून “मार्केटिंग” करणं हा प्रकार जगभर सर्रास चालू आहे. वर्ल्ड हेल्थ ऑंर्गनायाझेशनच्या मदतीनं आभासी रोगांची आवई उठवून जगभर औषधं खपवली जात आहेत. सामान्य लोकांना फारसे उपयोगाचे नसलेले प्रचंड खर्चाचे मोठमोठे प्रकल्प विविध सरकारं हाती घेतच असतात. दिल्लीत खर्च मंजूर करून घेऊन गल्लीबोळात सीमेंट रस्ते होत आहेत, हे आपण पाहतोच आहोत. नशीब अजून कुठल्या औषधाची किंवा बुलेटप्रूफ जाकिटाची सक्ती नाही. रॉय किणीकर ह्यांच “इथे जगण्याची सक्ती आहे” नावाचं पुस्तकच आहे. ते हुकूमशाहीबद्दल आहे. आता लोकशाहीतही आपण तोच अनुभव घेतो आहोत. असांजला लोकशाही देशच छळतायत.
याच विषयावर २००५ मध्ये साप्ताहिक सकाळमधे माझा एक लेख प्रसिद्ध झाला होता. तो येथे वेगळा प्रकाशित करत आहेच.
निनाद माटे
पत्ता : जे ६ हिमाली सोसायटी, दीनानाथ हॉस्पिटलजवळ, एरंडवणे, पुणे ४११००४
फोन : (०२०) २५४३६११२
ईमेल : ninadmate@gmail.com
Leave a Reply