जगभरात सुमारे एक लाखापेक्षा जास्त लहान मोठी जहाजे सध्या कार्यरत आहेत. सुमारे वीस लाख सी फेरर्स म्हणजे खलाशी आणि अधिकारी मिळून ही जहाजे चालवत आहेत. आपल्या भारतातील सुमारे दोन लाख अधिकारी आणि खलाशी सध्या अशा तेलवाहू आणि मालवाहू जहाजांवर कार्यरत आहेत. खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, केमिकल, औषधे, फळे, फुले, भाजीपाला, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक, औद्योगिक अशा एक ना हजारो वस्तूंची वाहतूक या जहाजांमधून आजही सुरु आहे.
बऱ्याच जणांचे असे म्हणणे आहे की तुम्ही जहाजावर अत्यंत सुरक्षित आहात, कोणी येणार नाही आणि जाणार नाही त्यामुळे कोरोना व्हायरसची लागण व्हायची मुळीच भिती नाहीये. परंतु स्वतःच्या घरावर आणि कुटुंबावर कुठलेही संकट आले तर त्या घरातील एखादा व्यक्ती घराबाहेर राहून काय विचार करत असेल?? माझे घर, माझे कुटुंब संकटाचा सामना करतेय आणि मी इथे जहाजावर सुरक्षित राहून हताशपणे फक्त त्यांची काळजी करतोय?? कसा काय कोणी स्वतःचे घर आणि कुटुंब संकटात असताना घरात नसताना लांबूनच संकट जायची वाट बघू शकतो?? आईवडील, बायको, बहीण, भाऊ आणि मुलांपासून लांब राहून त्यांना काही होऊ नये या चिंतेत दिवस काढणे खरंच शक्य आहे का??
सध्या आम्हा सर्वांवर हेल्पलेस अशीच परिस्थिती ओढवली आहे. आमचे रिलिव्हर तयार होते, घरी परतण्याचे दिवस सुद्धा ठरले होते, पण लॉकडाउन झाले आणि सगळे जिथल्या तिथे अडकले.
माझ्या देशातील बांधवानो तुम्ही सगळे तुमच्या घरात आणि तुमच्या स्वकीयांजवळ आहात हे तुमचे भाग्य समजा.
आपले सरकार आणि प्रशासन जसे सांगतंय तसे वागून कोरोना चा प्रतिकार करण्यासाठी घरात राहून शासकीय यंत्रणेला सहकार्य करा.
काही जहाजे किनाऱ्यावर उभी असतात तर काही किनाऱ्यापासून शेकडो किलोमीटर खोल समुद्रात उभी असतात. अशा जहाजावरून घरी येण्यासाठी जहाज ज्या शहराजवळ असेल तिथंपर्यंत येण्यासाठी छोट्या बोटीने किनाऱ्यावर यावे लागते. किनाऱ्यावरून विमानतळावर येण्यासाठी तिथला स्थानिक एजंट गाडी घेऊन येतो. विमानतळावर येण्याअगोदर इमिग्रेशन आणि इतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मायदेशातील जवळच्या शहरात जाण्यासाठी विमानाचे कन्फर्म तिकीट असावे लागते.
परंतु आजच्या घडीला ज्या देशात जहाज असेल त्या देशातील परिस्थितीनुसार जिकडे तिकडे लॉकडाउन करण्यात आलेले आहे. सध्या आपल्या भारतातच तीन आठवड्याचा लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे जहाज कोणत्याही देशात असले तरी 14 एप्रिल शिवाय जहाजावरुन कोणालाच उतरता नाही येणार. ज्याचे जहाज 13 तारखेला पुढल्या बंदरात जायला रवाना झाले आणि पुढील बंदर आणखीन वीस दिवसांनी येणार असेल तर एका दिवसामुळे त्याला आणखीन वीस दिवस वाट बघावी लागेल. काही ठिकाणी ऑइल टर्मिनलने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महिन्यातून एकदाच क्रू चेंज करायची परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत भारतात येण्यासाठी विमाने उपलब्ध नसतील तर आणखीन एक महिना जहाजावर थांबावे लागेल. काही देशात रिलिव्हरला भारतातून त्यांच्या देशात आल्यापासून जहाजावर जॉईन करण्यापूर्वी 14 दिवस क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण करून आणि कोरोना चाचणी केल्यानंतरच जहाजावर पाठवले जाणार आहे.
जहाजावर येणारी व्यक्ती 14 दिवस क्वारंटाईन होऊन आणि कोरोना चाचणी केल्यावर पाठवली गेली तरी ती व्यक्ती कोरोना विषाणूची कॅरिअर म्हणजे वाहक नसेलच असे कोणी खात्रीने सांगू शकत नाहीये. काही देशात परदेशी नागरिकांना लागण झाली तर पाहिजे तसे लक्ष देतील की नाही याचे सुद्धा मोठे प्रश्नचिन्ह आहे म्हणजे एखाद्या भारतीयाला युरोप मध्ये लागण झाली तर त्याची कोण आणि कशी घेणार .
एखाद्या मालवाहू जहाजावर पंधरा पासून पन्नास पर्यंत आणि पॅसेंजर जहाजावर पाचशे पासून दोन हजार कर्मचारी असतात. हे सगळे स्वतंत्र केबिन मध्ये राहत असले तरी एकाच मेस रूम मध्ये जेवत असतात एकमेकांच्या संपर्कात असतात. जहाजावर औषधे असतात पण कोरोना साठी औषधच उपलब्ध नाहीत त्यात जहाजावर डॉक्टर्स नसतात अशा वेळी कोणाला कोरोनाची लागण झाली तर काय होईल ह्या भीतीने प्रत्येकजण हादरला आहे. जहाजावर कोणी नवीन माणूस येऊ नये असे सुद्धा प्रत्येकाला वाटत आहे. नवीन येणार असतील तर सगळ्यांनाच एकदम जाऊ द्या असेही काहीजणांना वाटते आहे. परंतु हे शक्य नाही कारण प्रत्येक जण हेल्पलेस आहे. प्रत्येक देश, प्रत्येक कंपनी, प्रत्येक जहाज आणि अशा जहाजांवर काम करणारा प्रत्येकजण.
आज, उद्या, परवा , पुढल्या आठवड्यात, पंधरवड्यात की पुढल्या महिन्यात न जाणो कोण व कधी मायदेशी स्वतःच्या घरी जाऊ शकेल हे कोणालाच माहिती नाहीये. घरी परतल्यावर परिसरातील सगळे संशयाने बघतील कारण हल्ली गावोगावी रस्ते बंद करून ठेवले आहेत. देशाबाहेरून येणारा प्रत्येक जण कोरोना रुग्ण असू शकतो असा प्रत्येकाचा समज झालेला आहे. पण आम्ही सध्या कोणत्याही देशापेक्षा किंवा शहारापेक्षा सेफ अशा खोल समुद्रात आहोत. आम्हाला आमच्या स्वतःपेक्षा आमच्या कुटुंबाचीच जास्त काळजी आहे येताना विमानप्रवास आणि पोहचे पर्यंत योग्य ती आणि जास्तीत जास्त काळजी घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. महिनाभरात किंवा जेव्हा केव्हा मायदेशी परतलल्यावर जरी सरकारने बंधन घातले नाही किंवा सांगितले नाही तरी आमच्या कुटुंबासाठी पंधरा दिवसांचे सेल्फ क्वारंटाइन केल्याशिवाय घरात जायचे नाही, मुलांना लांबूनच बघायचे आहे अशी मनाची तयारी आतापासूनच झालेली आहे.
गो कोरोना गो, वी आर रिअली हेल्पलेस.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर.
B.E.(mech )DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply