नवीन लेखन...

ही आवडते मज…..

hi Avadte Maja

एप्रिल-मे हे सर्वांचे आवडते महिने! मुलांना शाळेला सुट्टी म्हणून-तर आई-बाबांना मुलांना सुट्टी म्हणून. खरंतर सगळेच रिलॅक्स! मौजमजा, सहली, मामाचागाव इत्यादीमध्ये सुट्टी कधी संपते ते कळतही नाही. मे संपून जून सुरू झाला की मंडळी भानावर येतात. चिमणीपाखरं आपापल्या घरट्याकडे परततात. नकळत शाळेची घंटा साद घालू लागते, मुलांना आणि पालकांनाही! हल्ली तर बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याची शाळा ठरते. शाळेचे तास जेवढे अधिक, डोनेशन जेवढे जास्त तेवढी शाळा दर्जेदार हे समीकरण पक्के होत आहे. आपल्या स्टेटसनुसार जास्तीत जास्त चांगली शाळा निवडली जाते. त्यामुळेच तर दोन वर्षाचे बोबडे बोल ‘ए फॉर अॅपल’ने सुरू होतात आणि ट्विंकल ट्विंकलने चमकतात. ड्रॉईंग, क्राफ्ट ही तर मम्मीची आर्ट असते. अपटूडेट युनिफॉर्म, नेकटाय, आयकार्ड, शूज सगळे कसे टापटीप असते. त्या निष्पाप चेहऱ्यावर उत्सुकता असो वा नसो, मात्र सारे घरदार त्याच्या शाळेची पूर्वतयारी एन्जॉय करीत असते. आईबाबा आपल्या लाडक्यासोबत मनाने पुन्हा एकदा शाळेत प्रवेश घेत असतात. खरच त्यांनाही प्रवेश परीक्षा द्यावीच लागते. त्यांच्या ज्ञानाबरोबर तिजोरीचा अंदाज घेऊनच अॅडमिशनचे मिशन पूर्ण होते. युनिफॉर्मच्या दुकानासमोरची रांग पाहून लक्षात येते नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात होत आहे. लग्नसराईत जसे वधुवरांपेक्षा यजमानांची धावपळ अधिक तशीच धावपळ आणि टेन्शन आता सुध्दा आईबाबांना असते. नवी कोरी वह्यापुस्तके, पाठीवरच्या ओझ्याचा भाग बनतात. पाटी अाण श्रीगणेशा दोन्ही आऊटडेटेड झाले असल्याने वह्या पुस्तकांनाच यथासांग कव्हरचा युनिफॉर्म आणि नामदर्शक लेबल लावले जातात. मात्र शाळेच्या गेटमध्ये मम्मीचा हात घट्ट धरून भोकाड पसरण्याची परंपरा आजही नकळत जपली जाते. तिचाही जीव क्षणभर गलबलतो. मात्र काही दिवसातच चित्र पालटते. स्वत:च्या हाताने खाणे, शर्टला लटकवलेल्या रुमालाने नाक- तोंड पुसणे, स्वत:च्या वस्तू सांभाळणे या सगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण शिशू वर्गात पूर्ण होते. खरंतर बाललीलांनी भरलेले बालपण शिस्तीच्या कोंदणात बसविण्याचे कामच या बालवर्गांमधून केले जाते. नंतरच्या काळात हीच पाखरे एकमेकांच्या संगतीत इतकी रमतात की शाळा आणि घर यातले अंतर मिटून जाते. मग मात्र दरवर्षी एप्रिलमध्येही मनातल्या शाळेला सुट्टी नसते. भातुकलीच्या खेळातही शाळेचा वर्ग भरतो. जूनमध्ये शाळा सुरू होण्याआधीच मन शाळेकडे धाव घेते. सगळ्या नव्या कोऱ्या वस्तू घेऊन पहिल्या दिवशी शाळेत पोहोचणे यात खूप मोठे सुख असते. तर नवा वर्ग, नवी जागा, नव्या बाई यांची अनामिक ओढ लागते. नव्या वह्या-पुस्तकांचा सुवास सुखावत असतो. त्याच मित्रमैत्रिणींना पुन्हा नव्याने भेटण्याची उत्सुकता असते. सुट्टीतल्या गमती जमती मनात साठलेल्या असतात. खरंतर हा रेशीमकिडा घराच्या रेशमी कोशातून सुरवंट हेाऊन बाहेर पडत असतो. पुढे या सुरवंटाच्या पंखात बळ येते आणि ते फुलपाखरू स्वच्छंद विहार करू लागते. पण हा सगळा प्रवास मात्र जून ते एप्रिल या शैक्षणिक वर्षाच्या मार्गावरून होत असतो. शाळा आणि बालपण हातात हात घालून फुलपाखराच्या पंखात रंग भरतात. त्याला उडण्याची उर्मी देतात. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न देतात. सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्याच्या इमारतीचा पाया मजबूत करतात. आत्मविश्वास, माणुसपणा, संस्कार, जीवनावरची निष्ठा या सगळ्यांची रुजवण करतात. म्हणूनच तर जीवनाच्या दगदगीत ‘माझी शाळा ‘कधीही विसरली जात नाही. हृदयाच्या कप्प्यात ती अत्तराच्या कुपीसारखी जपली जाते. नकळत कधी उघडली जाते, तेव्हा शाळेच्या आपारातल्या आठवणींचा सुगंध मनाला सुखावतो. हल्ली 25-30 वर्षामागचे वर्गमित्र-मैत्रिणी एकत्र येऊन आपल्या जीवनातील ती सोनेरी पाने पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न करतात. एकपकारे यामध्ये शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि पुन्हा एकदा मन उड्या मारीत शाळेत जाऊन पोहोचते. तो वर्ग, तो बेंच, तो फळा, ती खिडकी सगळे बोलू लागतात आणि नकळत हसता हसता डोळ्यांच्या कडा पाणावतात. अशावेळी त्या शाळेलाही कृतकृत्य वाटत असेल ना? ‘बालपणाचा काळ सुखाचा’ ही उक्ती शालेय जीवनाशिवाय पूर्ण होत नाही. जसे कॉलेज म्हणजे तारुण्य तसे शाळा म्हणजे बालपण. बोबडे बोल ते अस्खलित वक्तृत्व, वेड्यावाकड्या रेघोट्या, ते डौलदार लेखन, आईचा हात सोडून शाळेतला प्रवेश, ते आयुष्याच्या खुल्या प्रांगणात दमदार प्रवेश करणारी पावले. हा सारा प्रवास म्हणजे ‘माझी शाळा’ असते. कदाचित त्यामुळेच तर सुट्टी इतकीच दरवर्षी शाळा सुरू होण्याची वाट पाहिली जाते. खूप अभ्यास करण्याचा संकल्पकरूनही दरवर्षी शाळा आणि विद्यार्थी यांची पुनर्भेट होत असते. दरवर्षी तोच नवा उत्साह शाळेला चिरतरुण करीत असतो. तेच नवचैतन्याचे दिवस कालपरवापासून सुरू झाले आहेत. तुमच्या आमच्या मनातली ‘आपली शाळा’ आपल्याला आजही खुणावतेय ना? म्हणूनच नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा

(“ठाणे वैभव” च्या सौजन्याने)

— नूतन बांदेकर

Avatar
About नूतन बांदेकर 4 Articles
लेखिका नूतन बांदेकर ह्या अध्यापन व्यवसायात एक विद्यार्थी व पालकप्रिय अध्यापिका आहेत. समाजाशी सहज संवाद साधीत मनामनांना आकार देणं हा त्यांचा ध्यास आहे. त्या विविध वृत्तपत्रांसाठी लेखन करत असतात.

2 Comments on ही आवडते मज…..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..