रासायनिक गुणधर्म या दोन शब्दांबरोबर आम्लधर्मी की आम्लारिधर्मी हे गुणधर्म डोळ्यासमोर येतात. कोणत्याही पदार्थातील आम्लधर्म किंवा ओळखण्यासाठी साधी चाचणी असते. या आम्लारिधर्म चाचणीला सामू तपासणे असे म्हणतात. या चाचणीमध्ये कागदाचे खूप बारीक तुकडे करून ते शुद्ध पाण्यात उकळतात. नंतर हे द्रावण गाळतात. गाळलेल्या द्रावणात वैश्विक दर्शक हे एक विशिष्ट रसायन टाकले जाते. अनेक दर्शकांच्या एकत्रित मिश्रणाला ‘वैश्विक दर्शक’ म्हणतात. वैश्विक दर्शक गाळलेल्या पाण्यात घातल्यावर त्या पाण्याचा रंग गुलाबी झाल्यास कागद आम्लधर्मी असतो. कागद तयारकरताना वापरलेल्या सल्फेट, क्लोराइडमुळे कागद आम्लधर्मी होतो. आम्लधर्मी कागद जास्त दिवस टिकत नाही. गाळलेल्या पाण्यात वैश्विक दर्शक घातल्यानंतर निळ्या किंवा जांभळ्या रंगाची छटा दिसली तर कागद आम्लारिधर्मी असतो. कार्बोनेट किंवा हायड्रॉक्साइडमुळे कागद आम्लारिधर्मी होतो.
आम्लारिधर्मी कागद लवकर ठिसूळ होतो. द्रावणाचा रंग फिका हिरवा असेल तर कागद उदासीन असतो. चांगल्या प्रतीचा कागद थोडासा आम्लधर्मी असतो.
रासायनिक गुणधर्मामध्ये कागदामधील राखेचे प्रमाण तपासले जाते. हे तपासताना कागद जाळून कागदाची राख करतात. मूळचा कागद आणि कागदाची यांच्या राख वजनाचे गुणोत्तर हे काढतात. गुणोत्तर कागद तयार करताना वापरले गेलेले न विरघळणारे पदार्थ, विविध रंग यांवर अवलंबून असते. हे पदार्थ कमी प्रमाणात असतील तर त्या कागदाच्या राखेचे वजन कमी असते. कागदामधील हे गुणोत्तर .०.०१ असेल तर तो कागद उच्च प्रतीचा कागद समजला जातो. या कागदाला राखविरहित कागद म्हणतात. हे प्रमाण ०.१ असेल तर तो कागद विशिष्ट प्रकारच्या वैद्यकीय क्षेत्रातील किंवा प्रयोगशाळेतील काही प्रयोगांसाठी (gravimetric analysis) गाळण कागद म्हणून वापरला जातो. वह्या-पुस्तकांसाठीच्या कागदात राखेचे प्रमाण ८-१०% असते.
सुचेता भिडे, (कर्जत)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply