बंगाली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील गायक, अभिनेते संगीतकार पंकज मलिक यांचा जन्म १० मे १९०५ रोजी झाला.
पंकज मलिक ह्यांनी सुरुवातीच्या बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले. हे रवीन्द्र संगीतात विशारद होते. रवीन्द्र संगीताला शान्तिनिकेतन मधून लोकांच्या पर्यत पोहचवण्याचे श्रेय पंकज मलिक यांनाच जाते. रवीन्द्रनाथ टागोर यांचे पंकज मलिक हे लाडके होते.
रवीन्द्रनाथ टागोर यांची एक कविता दिनेर शेषे घुमेर देशे ला पंकज मलिक यांनी संगीत दिले होते. ते टागोर यांना आवडले व त्यांनी हे गाणे पंकज मलिक यांना पी सी बरुआ यांचा चित्रपट मुक्ति मध्ये वापरण्यास परवानगी दिली.
पंकज मलिक यांनी प्रथम न्यू थिएटर्ससाठी मूकपट व बोलपटात संगीत सहाय्य केले. रवींद्र संगीताचा खुबीने केलेला वापर व वाद्यवृंदाचा घसघशीत वापर हा त्यांचा विशेष होता. ते दशक म्हणजे सर्वकाही पंकज मलिक असेच होते.
हिंदी गीतांमध्ये “टांगा ऱ्हीदम‘ आणण्याचा पहिला यशस्वी प्रयोग मलिक यांनीच केला. त्यानंतर तोच धागा इतर संगीतकारांनी पकडला. त्यांच्या ‘डॉक्टर’ ह्या चित्रपटातील गाणी सुमधुर आहेत. तो चित्रपट तर स्वतः पंकज मलिक ह्यांनी आपल्या संयत सुरेख अभिनयाने सजवला होता. या सिनेमामध्ये पंकज मलिक यांनी संगीत दिलेले व गायले ‘चले पवन की चाल’ या गाण्यामध्ये घोड्यांच्या टापांचा अतिशय सुंदर उपयोग त्यांनी केला होता. व ‘आई बहार आज आई बहार’ किंवा ‘कबतक निरास की अंधियारी’ ही गीते कमालीची सुंदर आहेत.
सैगल यांची ‘सोजा राजकुमारी’ किंवा ‘मैं क्या जानू’ ही अजरामर गाणी पंकज मलिक यांनी संगीतबद्ध केलेली होती.
पंकज मलीक यांना भारत सरकारने पद्मश्री व दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केला होता. पंकज मलिक हे कलकत्ता आकाशवाणीला पहिल्या पासून जोडलेले होते.
पंकज मलिक यांचे १९ फेब्रुवारी १९७८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply