पंढरपूरचा उल्लेख पांचव्या शतकातल्या ताम्रपटात सांपडतो. बाराव्या शतकापर्यंत पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आकाराने फार लहान होतं. तेराव्या शतकात त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. कर्नाटकातल्या विजयनगरच्या सम्राटांनी तिकडे नेलेली विठ्ठलाची मूर्ती संत एकनाथांच्या पणजोबांनी महाराष्ट्रात आणली म्हणून त्याला ‘कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू’ म्हटलं जातं.
पंढरपूरच्या वारीची परंपरा ही सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची, पण संत ज्ञानेश्वरांनी वारीला एक धार्मिक, नैतिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान दिलं आणि गुरु हैबतबाबांनी (१८३२) वारीला एक नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध रूप दिलं.
आतां आपण संतांचे सर्वसाधारण काळ पाहूं :
– भक्त पुंडलिक : सुमारे १०५० (नामदेवांच्या आधी २२० वर्ष)
– संत नामदेव : १२७० – १३५० (ज्ञानेश्वरांहून पांच वर्षांनी मोठे)
– संत ज्ञानेश्वर : १२७६ – १२९६ (नामदेवांहून पांच वर्ष लहान)
– संत एकनाथ : १५३३ – १५९९ (ज्ञानेश्वरांनंतर २५७ वर्ष)
– संत तुकाराम : १६०८ – १६५० (एकनाथां नंतर ७५ वर्ष)
– संत रामदास स्वामी : १६०८ – १६८१ (एकनाथां नंतर ७५ वर्ष)
– संत चोखोबा
– शिवाय संत सावता माळी, संत नरहरी सोनार, संत बंका, संत गोरा कुंभार, संत
शेख महम्मद, संत बहिणाबाई, संत जनाबाई, वगैरे फार मोठी संत परंपरा आहे. त्यांचे तपशील मला मिळूं शकले नाहीत.
(संत तुकाराम, संत रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज जवळजवळ समकालीन).
वारीची प्रक्रिया ज्येष्ठ वद्य सप्तमीला आळंदीत सुरूं होते. त्या दिवशी माऊली ज्यावर स्वार असते असं समजलं जातं त्या अश्वाचं आळंदीत आगमन होतं. तो अश्व माउलीच्या पादुकांचं दर्शन घेतो आणि प्रस्थान सोहोळ्याची प्रक्रिया सुरूं होते. श्री गुरु हैबतबाबांचे वंशज श्री. बाळासाहेब पवार अडफळकर, भालदार चोपदार, गांधीनगरच्या पालखी सोहोळ्याचे विश्वस्त आणि इतर मानकरी यांच्या उपस्थितीत मंदिरात अश्व आणून त्याची पूजा आणि आरती केली जाते. एक प्रकारची ती प्राणप्रतिष्ठाच असते.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या माउलींनी (आईने) ज्या पिंपळाला सव्वालाख प्रदक्षिणा घातल्या होत्या तोंच सुवर्णपिंपळ आजही तिथेच उभा आहे. आणि त्यानंतर ज्ञानेश्वराज पंढरिरायांना भेटण्यासाठी प्रस्थान ठेवतात. माऊलीच्या पादुका ठेवलेली पालखी वारकरी खांद्यावर घेऊन माऊलीच्या आजोळी गांधीनगरला घेऊन जातात आणि तिथल्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात. त्या रात्री पालख्यांचा आजोळीच मुक्काम असतो.
ज्येष्ठ वद्य नवमीला गांधीनगरहून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवलं जातं आणि एकूण २६१ किलोमीटर्स प्रवास करून सर्व संतांच्या दिंड्या आषाढी एकादशीच्या आदल्या रात्री पंढरपूरला पोंचतात.
एक हजार वर्षांपासून चालत आलेल्या या पारंपारिक वारीच्या प्रवासाचे टप्पे असे –
आळंदी ते पुणे (२९ कि.मी.)
पुणे ते सासवड (३४ कि.मी.) (सर्वात मोठा पल्ला)
सासवड ते जेजुरी (१८ कि.मी.)
जेजुरी ते वाल्हे (१६ कि.मी.)
वाल्हे ते लोणंद (१८ कि.मी.)
लोणंद ते तरडगांव (१० कि.मी.)
तरडगांव ते फलटण (२३ कि.मी.)
फलटण ते बरड (२० कि.मी.)
बरड ते नातेपुते (२१ कि.मी.)
नातेपुते ते माळशिरस (२० कि.मी.)
माळशिरस ते वेळापूर (१७ कि.मी.)
वेळापूर ते भंडीशेगांव (२० कि.मी.)
भंडीशेगांव ते वाखरी (१० कि.मी.)
वाखरी ते पंढरपूर ( ५ कि.मी.) (सर्वात लहान पल्ला)
– पंढरपूर
संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपान आणि संत मुक्ताबाई ही चार भावंड म्हणजे आपल्या मूळ वृत्तीपासून ‘निवृत्ती’घेऊन ‘ज्ञाना’च्या‘सोपाना’ने (जिन्याने) ‘मुक्ती’ कडे केली वाटचालच.
— सुभाष जोशी, ठाणे
Leave a Reply