प्रगत झालेल्या ऐतिहासिक कालखंडापासून ते आजमितीला एकविसाव्या शतकापर्यंत मलेरिया या विकाराने मनुष्याला सळो की पळो करून सोडले आहे. मनुष्य, डास ( मच्छर ) व मलेरिया ला कारणीभूत असलेले परोपजीवी यांची उत्क्रांती एकाच वेळी घडली असावी.
हिंदू संस्कृती मधील पुरातन मानलेल्या अथर्ववेद या वेदग्रंथात डास, माणूस व त्याला होणारे विकार यांच्या संबंधांचा उल्लेख आढळतो. इ. स. पूर्वी ६००० ते ५००० वर्षांपासून मानव चिन्हांच्या लिपीत लेखन करू लागला. इराक ( मेसोपोटेमिया ) मध्ये मलेरियाच्या तापाशी जुळणाऱ्या ज्वराचे सर्वप्रथम वर्णन सुमेरियनांनी चिन्हांच्या लिपीमध्ये केलेले आहे.प्राचीन चिनी भूर्जपत्रात (इ.स.पूर्व २७०० ) मलेरिया सदृश दोन प्रकारच्या ज्वरांची वर्णने केलेली आहेत; ज्यामध्ये
सुजलेल्या प्लीहेचा (EnlargedSpleen) उल्लेख आहे. ही एक मलेरियाची महत्त्वाची खूण आहे. कॉर्पस हिपोक्रॅटिकस नावाचा वैद्यकीय विषयासंबधीत एक ग्रंथ आहे. हा खुद्द हिपोक्रॅटिसने लिहीला आहे असे कोणतेही पुरावे नाहीत. त्यात अनेक ठिकाणी परस्पर विरोधी लेखन आहे. म्हणूनच हा ग्रंथ एकाच व्यक्तीने लिहीला नसावा. या ग्रंथात मलेरिया सदृश ज्वराची वर्णने असून त्याचा संबंध ऋतु, हवामान व स्थान यांच्याशी जोडलेला आहे. ग्रीस व रोमन साम्राज्यातील अवशेषात तीन शिरे, सहा हात आणि तीन पाय असलेल्या ज्वरदेवतेच्या पितळी मूर्तीची नोंद आहे. इ.स१०९६ मध्ये
ख्रिश्चनांनी इस्लामविरुध्द केलेल्या पहिल्या धर्मयुध्दात ( क्रुसेड ) पश्र्चिम युरोपमधून जेरुसलेमकडे निघालेल्या तीन
लक्ष सैनिकांपैकी केवळ २० हजार सैनिक प्रत्यक्ष रणभूमीवर पहोचले व बाकीचे हजारो सैनिक मलेरियाच्या साथीला बळी पडले. विसाव्या शतकाच्या आधी विल्यम ऑस्लर ने म्हटले होते. ज्वर, दुष्काळ आणि युध्द या मानवजातीवर कोसळणार्या तीन आपत्तींचा इतिहास पाहता ज्वर ही त्यामधील सर्वात मोठी व भयानक आपत्ती मानावी लागेल.
— डॉ. अविनाश केशव वैद्य
Leave a Reply