(गोदाकाठची लोककथा )
गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात. तेव्हा भृगु महाऋषी त्या द्वारपालाला शाप देतात, “तुम्ही तीन जन्म पृथ्वीतलावर उन्मत्त असे राक्षस होऊन पडाल तेव्हा द्वारपालांनी शरण येऊन भृगु महाऋषीस उःशाप मागितला. भृगु ऋषी म्हणाले “तुम्ही राक्षस होऊन पडल्यावर श्रीविष्णु तुमचा उद्धार करतील व तुम्ही पुन्हा द्वारपाल व्हाल तेव्हा ते पृथ्वीतलावर हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप असे दोन राक्षस होऊन पडले.
हे दोन्ही भाऊ उन्मत्त व महाअंतुरबळी युद्धिष्ठर असे बनले.
हिरण्याक्ष पृथ्वीची घडी करून आपल्या काखेत घेऊन पाताळगमन करण्यासाठी निघाला तेव्हा श्रीविष्णू नारायणास चिंता पडली. तेहतीस कोटी देव, ऋषी-महाऋषी आदी मुनीजन विष्णूस हात जोडून प्रार्थना करू लागले.
तेव्हा विष्णु भगवानाने एका डुकराचे रूप धारण करून पृथ्वीतलावर अवतार घेतला व हिरण्याक्षासोबत त्या डुकराने घनघोर युद्ध केले. अखेर विष्णुने जोराची धडक मारून हिरण्याक्षास ठार केले. ही बातमी त्याचा बंधू हिरण्यकश्यप यास कळली. हिरण्यकश्यप चिडून आपल्या भावाच्या वधाचा सूड घेण्यासाठी निघाला. तेव्हा त्याची पत्नी कयाधू हिने आपल्या पतीस (म्हणजे हिरण्यकश्यपास) सांगितले, “तुमचा भाऊ महाअंतुरबळी होता, युद्धिष्ठर होता, परंतु त्याला साध्या डुकराने मारले. ते डुक्कर नसून विष्णु भगवान होते. तुम्ही जर आता युद्धाला गेलात तर तुमचाही वध होईल.” तेव्हा हिरण्यकश्यपाने विष्णुचे जो कोणी नामस्मरण करील त्याला फाशी देण्यात येईल, असे सांगितले. राजाची राजाज्ञा झाल्यामुळे त्याच्या राज्यात कोणीही देवाचे नाव घेत नसत.
एके दिवशी हिरण्यकश्यप आपल्या कयाधू पत्नीस म्हणाला, “मी आता अरण्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी जात आहे. जोपर्यंत मला ब्रह्मदेव प्रसन्न होत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही.’ असे सांगून तो सकाळी सकाळी अरण्यामध्ये निघून गेल्यावर त्याला एक दृश्य दिसले: तो ज्या झाडाखाली तपश्चर्या करण्यासाठी बसणार होता त्या झाडावर दोन पक्षी (पोपट व मैना) मंत्र बोलत होते. “श्रीराम – नारायण, नारायण नारायण” असे मंत्राचे बोल होते.
आपला जो शत्रू आहे त्याचेच नाव आपल्या कानावर येत आहे, त्यासाठी आजचा दिवस शुभ कार्याचा नसून अपशकुनी दिवस आहे असे त्यास वाटले.
म्हणून तो परत आपल्या राज्यात आला. तेव्हा त्याची पत्नी कयाधू म्हणाली “हे पतीदेव तुम्ही म्हणाला होता की, जोपर्यंत ब्रह्मदेव माझ्यावर प्रसन्न होत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही; आणि तुम्ही तर संध्याकाळीच परत आलात.
त्यावर हिरण्यकश्यप आपल्या पत्नीस म्हणाला “कयाधू मी ज्या वृक्षाखाली तपश्चर्या करण्यासाठी बसलो त्या वृक्षावर दोन पक्षी वेद पाठांतर करीत होते.
आणि ते नारायण, नारायण, नारायण असे म्हणत होते.” कयाधूलाही एवढीच संधी सापडली होती. ती प्रत्येक पाच मिनिटाला विचारायची की, “पतीदेव ते दोन पक्षी काय म्हणत होते? तेव्हा हिरण्यकश्यप पुन्हा पुन्हा नारायण, नारायण असे सांगायचा. कयाधूने आपल्या पतीकडून म्हणजे हिरण्यकश्यपाकडून एकशे आठ वेळेस नारायण, नारायण असे नामस्तोत्र म्हणून घेतले. त्यानंतर तिला डोहाळे सुरू झाले. ती स्वत: नारायण, नारायण असे नामस्मरण करू लागली. तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर आपोआप या नामस्मरणाचा संस्कार होऊ लागला. तेव्हा हिरण्यकश्यपास फार क्रोध आला. त्याचे ब्रीद होते, “आपल्या राज्यात कोणत्याही देवाचे नाव घेऊ द्यायचे नाही; परंतु येथे स्वतः आपली धर्मपत्नीच नामस्मरण करते आहे. याबद्दल रागावून हिरण्यकश्यपाने कयाधूस महान अशा अरण्यात नेऊन सोडले. त्यावेळी सायंकाळी आकाशातून इंद्रदेव गमन करत होते. तर या जंगलात कयाधूच्या अंगाचा प्रकाश पडत होता. कयाधू इतकी सुंदर होती की तिला पाहून इंद्राच्या मनात पाप आले. तिला चोरून आपल्या राज्यात नेण्यासाठी इंद्र तिच्याजवळ आला आणि तिला हात लावणार इतक्यात, नारदमुनी तेथे आले व इंद्राला म्हणू लागले की, “पापदृष्ट्या हे दुराचार्या तुझ्यासारखा कपटी या त्रिजगात कोणीही नाही. अरे ती एक महान सत्य पतिव्रता आहे आणि तू आपल्या पोटात अभिलाषा धरून तिला चोरून नेत आहेस.” हे नारदाचे शब्द ऐकताच देव इंद्र लज्जीत होऊन तिथून निघून गेला.
नारदाने कयाधूस आपल्या आश्रमात नेले. तेव्हापासून कयाधू येथेच राहून नारदाची पूजा अर्चना करू लागली. संताच्या संगतीमुळे तिला सुंदर व दिव्य असा मुलगा झाला. मुलगा झाल्यावर कयाधू परत आपल्या राज्यात आली व पती हिरण्यकश्यपास म्हणाली, “हे पतीदेवा माणसाच्या हातून चूक होतच असते. मला क्षमा करा. मी महान अपराध केला आहे. आता जर मी देवाचे नाव घेतले तर मला वाटेल ती शिक्षा करा. ती भोगण्यास मी तयार आहे.” असे म्हटल्यावर हिरण्यकश्यपाने कयाधूस राजमहालात घेतले. त्यांचा लहान बाळ प्रल्हाद काही दिवसाने थोडा मोठा झाला. त्याला चालताबोलता येऊ लागले.
तो केव्हाही, कोठेही पद्मासन घालून ‘नारायण नारायण’ म्हणत असे.
हिरण्यकश्यपाला हे समजताच, “या पापीष्ट्याचे मला तोंड पाहायचे नाही असे म्हणाला. हिरण्यकश्यपाने प्रधानाला बोलावून भक्त प्रल्हादाला एका उन्मत्त, माजलेल्या हत्तीच्या पायाखाली चिरडण्याचे ठरविले. प्रल्हादाचे हात-पाय बांधून हत्तीच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हादाला काहीही इजा झाली नाही. हे पाहून हिरण्यकश्यपाने विषारी साप, विंचू इत्यादी विषारी प्राणी असलेल्या कोठडीत प्रल्हादाला कोंडले. तेव्हा भक्त प्रल्हाद सदैव नारायण, नारायण याच मंत्राचा जप करू लागला. तेव्हाही विष्णुदेवाने त्याचे रक्षण केले. प्रल्हादाला काहीच होत नाही असे पाहून हिरण्यकश्यपाने चिडून एका मोठ्या कढईत तेल तापविले. त्या कढईत नारळ टाकले तर ते फुटून जात होते, इतके तेल तापले होते. अशा तेलात प्रल्हादाला टाकण्याचा प्रयत्न होतो, परंतु देवकृपेने त्या कढईतल्या गरम तेलाची फुले होतात व तेल थंड होते. हे पाहून हिरण्यकश्यपाला खूप दुःख होते.
हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. भक्त प्रल्हादाला एका उंच कड्यावरून दरीत फेकले जाते. पण तिथेही भगवान विष्णू अलगद प्रल्हादाला झेलतात. हे पाहून हिरण्यकश्यपाची बहीण होलिका ही आपल्या कडक तपाच्या बळावर अग्नीदेवतेला प्रसन्न करून घेते व हिरण्यकश्यपाला म्हणते, “दादा मला अग्निदेवता प्रसन्न आहे. मी प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये प्रवेश करते. अग्नीदेव मला प्रसन्न असल्यामुळे मला काहीही होणार नाही, पण माझ्या मांडीवर असलेला प्रल्हाद जळून खाक होईल.”
ही कल्पना हिरण्यकश्यपाला चांगली वाटली. हिरण्यकश्यपाने एकावर एक गौऱ्या रचल्या. त्यात होलिका भक्त प्रल्हादासह बसली. हिरण्यकश्यपाने तिला अग्निकाष्टा दिली. काही वेळाने होलिकेला अग्नीचे चटके बसू लागले. त्यातच ती जळून नष्ट झाली व भक्त प्रल्हाद त्यातून हसत बाहेर आला. हे पाहून हिरण्यकश्यपाला खूप दुःख झाले. होलिकेने कपटाने आपल्या वरदानाचा वापर केला म्हणून ती यात नष्ट झाली. ज्या ठिकाणी होलिका नष्ट झाली होती त्याच ठिकाणी होलिका एरंडाच्या रूपाने प्रकट होते. म्हणून आजही होळी हा सण साजरा केला जातो व त्या होळीत एरंडाचे झाड किंवा फाटा ठेवला जातो.
यात कपटाचा नाश होतो, अशी समजूत आहे.
Leave a Reply