निवांतच्या दरवाजाची बेल वाजली आणि सदूने दार उघडले.
दोन प्रौढ गृहस्थ बाहेर उभे होते.
सदूने त्यांना विचारले, “अपोंटमेंट आहे कां तुमची ?”
सोफ्यावर बसलेले यशवंत हंसले आणि म्हणाले, “सदू पाहुण्यांच स्वागत आपण असं करतो कां ? येऊ दे त्यांना आंत.”
दोघेही आंत आले.
दोघे लांबून प्रवास करून आलेले वाटत होते.
थकलेले दिसत होते.
यशवंत त्यांना म्हणाले, “बसा जरा आराम करा.”
दोघे सोफ्यावर बसले.
यशवंत सदूला म्हणाले, “आत्याबाईंना चहा आणि कांही खायला पाठवायला सांग आणि चंदूला पाठव इथे.”
यशवंतानी दोन्ही पाहुण्यांच निरिक्षण केलंं.
तपकीरी कोट घातलेले गृहस्थ शिक्षक वा शिक्षणसंस्थाशी संबंधित असावेत.
तर दुसरे धोतर नेसलेले, पांढरा सदरा घातलेले गृहस्थ छोटे मोठे व्यावसायीक असावेत.
ह्या दोघांची समस्या व्यावसायीकाच्या मुलाशी किंवा मुलीशी संबंधित असावी.
यशवंत कोट घातलेल्या गृहस्थाला म्हणाले, “सर, आपण दोघे लांबून आलेले दिसतां आणि सचिंत दिसतां.
काय समस्या आहे मला सांगाल कां ?”
तोपर्यंत चंदूही तिथे येऊन बसला होता.
कोट घातलेले गृहस्थ म्हणाले, “आम्ही विदर्भातील xxxxxx शहरांतून आलो आहोत.
माझे नाव विनायक सातोस्कर व हे गुलाबराव वजलवार.
इथल्या युनिव्हर्सिटीच्या आवारात एक होस्टेल आहे.
१००० विद्यार्थ्यांची सोय आहे.
आमच्या होस्टेलला प्रतिष्ठा आहे पण आता ती धोक्यात येऊ घातली आहे. आमच्या होस्टेलला ड्रग्ज पेडलरनी विळखा घातला आहे.
त्यांतच गुलाबरावांचा मुलगा रोहित चार दिवसांपासून गायब आहे.”
गुलाबरावांच्या डोळ्यात पाणी आले.
ते म्हणाले, “धुरंधर साहेब, माझा मळा आहे.
भाजीपाला विकणारा छोटा माणूस मी.
आमचा रोहित अभ्यासांत खूप हुशार.
म्हटलं आमचा धंदा करण्यापरीस शिकतोय तर शिकू द्या.
होस्टेलवर अभ्यास चांगला होईल म्हणाला तर होस्टेलवर ठेवला.”
यशवंत म्हणाले, “विनायकराव, तुमच्या होस्टेलमध्ये ड्रग्जचा मोठा व्यवहार होतोय आणि रोहित वजलवार नाहीसा झालाय,
दोन्ही गोष्टींचा संबंध कसा लावतां तुम्ही ? रोहित ड्रग्ज घेत होता कां ?”
विनायकरावांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर गुलाबरावांनी दिल, “धुरंधर साहेब, तालमीत घाम गाळणारा मुलगा हाये माजा !
एकदम सुरेख तब्बेत.
दर रविवारी घरी यायचा.
मागल्याच्या मागल्या रविवारी आला, तेव्हा पण छान होता.
तो तसला न्हायी.”
विनायकरावांनी पुष्टी दिली.
रोहित हुशार आणि शिस्त पाळणारा विद्यार्थी होता.
तो ड्रग्जशी संबंधित होता, असं वाटत नाही.
दोन गोष्टी वेगळ्या वाटतात.
मागे तुम्ही ड्रग्जचा मोठा साठा शोधून काढल्याची बातमी आम्ही वाचली होती.
मग आम्ही तुमच्याकडे धांव घेतली.”
एवढा वेळ शांतपणे ऐकणाऱ्या चंदूने विचारले, “गुलाबराव, एवढा तरूण मुलगा गायब आहे तर पोलिसांत तक्रार कां केली नाहीत ?”
विनायकराव म्हणाले, “मीच त्यांना मना केलं.
रोहित चांगला मुलगा आहे पण पोलिसांनी जर त्यालाच ह्या ड्रग्ज प्रकरणात अडकवला तर दीर्घकाळाची शिक्षा व्हायची शक्यता आहे.”
गुलाबराव म्हणाले, “अहो, खरे चोर जातील सुटून आणि माझा गुणी मुलगा अडकेल.
म्हणून आम्ही एवढ्या लांबून तुमच्याकडे आलोत.
कांही करा पण माझ्या पोट्ट्याला शोधून काढा.”
यशवंत म्हणाले, “मला सांग रोहित कधीपासून नाहीसा झाला ? तुमच्या कधी लक्षांत आले?”
विनायकराव म्हणाले, “रोहित दर रविवारी घरी जात असे.
ह्यावेळी रितसर परवानगी घेऊन गुरूवारीच गेला पण घरी पोहोचलाच नाही.“
गुलाबराव म्हणाले, “आम्हाला माहितीच नव्हतं की तो गुरूवारीच घरी येणार होता ते.
रविवारी कां आला नाही म्हणून आम्ही चौकशी केली तर कळले की तो गुरूवारीच घरी यायला निघाला होता.
तेव्हांपासून रोहितच्या आईने तर अंथरूण धरलय !”
यशवंत विनायकरावांना म्हणाले, “होस्टेलवर विद्यार्थ्यांशिवाय कोण कोण असतात ?“
विनायकराव म्हणाले, “कौशलकुमार हॅास्टेलचे प्रमुख आहेत.
केअरटेकर कदम आहेत.
स्वयंपाक करणाऱ्या दोघांपैकी एक बाळूकाका तिथेच रहातात.
दुसरा दामू सकाळी सातपासून दुपारी चार पर्यंत असतो.”
विनायक म्हणाले, म्हणजे चार पांच माणसं अशी आहेत की जी ड्रग्जची आवक होस्टेल मध्ये करू शकतात.
बरं मला सांगा.
होस्टेलची खोली एकाला एक की शेअरींग आहे ?“
विनायकराव म्हणाले, “फार थोड्या खोल्या आम्ही सिंगल विद्यार्थ्याला देतो. रोहित शेअरींग करत होता.”
यशवंत म्हणाले, “मग कोण होता त्याचा पार्टनर ?”
विनायक राव म्हणाले, “त्याच्याबरोबर रमेश जायस्वाल रहातो.
अजूनही ती रूम त्या दोघांच्या नावेच आहे.
रमेश जायस्वाल ह्या वर्षापासूनच इथे आलाय.
तो दिल्लीजवळील कॅालेजमध्ये होता आधी.
अभ्यासात त्याचं लक्ष नव्हतं.
गुरूवारी रोहित इथून गेला, हे त्यानेच सांगितलं.”
ड्रग्जमध्ये तो होता की नाही माहिती नाही.
विनायकराव म्हणाले, “आम्ही तुमची रहायची उत्तम सोय करू. कधी येतां, ते सांगा.”
गुलाबराव म्हणाले, “तुम्हाला हवं तर मळ्यावर सोय करू.
तु्म्हाला कांही कमी पडू देणार नाही.”
यशवंत म्हणाले, “मी जर तुमचा पाहुणा म्हणून आलो तर कांहीच करतां येणार नाही.
सगळ्यांना आधीच कळेल की मी कशाकरता आलो आहे.
मी आणि चंदू दोन दिवसांनी तिथे येऊ.
आमची रहायची सोय आम्ही करू.
तुम्ही आम्हाला ओळखही दाखवू नका.
मात्र आम्हाला मोबाईल नंबर देऊन ठेवा.
जरूर असेल तेव्हा आम्ही कॅाल करू किंवा मेसेज पाठवू.
गुलाबराव, चिंता करू नका.
आपण रोहितला शोधून काढू.
तुम्हाला कोणी धमकावलं अथवा ब्लॅकमेल केलं तर आम्हाला लगेच कळवा.”
विनायकराव आणि गुलाबराव निरोप घेऊन निघाले.
चौथ्या दिवशी त्या शहरांतील एका दुय्यम लॅाजमध्ये दोन प्रवाशांनी बाजूबाजूच्या दोन खोल्या घेतल्या.
त्यांचा वेशही अगदी साधा होता.
त्यांच्या आगमनाची दखल घेण्यासारखं कांहीच नव्हतं.
यशवंत आणि चंदू ह्यांनी मुद्दामच अशी जागा निवडली होती.
ते शहर पूर्वी लहान होतं.
तालुक्याच ठिकाण होतं.
आता तेथील वस्ती खूप वाढली होती.
लॅाज अगदी मध्यवर्ती भागांत होता.
रिक्षा हेच वाहतुकीचं मुख्य साधन होतं.
संध्याकाळी चारच्या सुमारास रिक्षाने दोघं युनिव्हर्सिटीकडे फेरफटका मारायला गेले.
युनिव्हर्सिटीच्या गेटवर गार्ड होता.
आत जायला आयडेंटीटी कार्ड दाखवावं लागत होतं.
यशवंतानी विनायकरावांना दोघांसाठी दोन गेस्ट पास पाठवायला सांगितले.
युनिव्हर्सिटीकडे वाहतुक थोडी कमी होती.
दुसऱ्या दिवशी यशवंतानी चंदूला रमेश जायस्वालवर नजर ठेवायचे काम दिले होते.
स्वत: ते युनिव्हर्सिटीच्या गेटवर जाऊन उभे राहिले.
त्यांचा वेश अत्यंत साधा होता.
थोड्या वेळाने एक विद्यार्थी इकडे तिकडे पहात त्यांच्यापाशी आला आणि त्याने विचारले, “सध्या शहरांत कुठला चांगला सिनेमा चालू आहे ?”
यशवंताच्या लक्षांत आलं की हा परवलीचा प्रश्न आहे.
बरोबर उत्तर दिलं तरच पुढचं बोलणं होणार होतं.
अनेक चित्रपटांची नांवे त्यांच्या मनात तरळून गेली.
त्यांनी अलिकडेच रिव्ह्यू वाचलेला चित्रपट आठवला.
ते पटकन म्हणाले, “केरळा स्टोरी”.
तो मुलगा “थॅंक्स” म्हणाला आणि हंसत हंसत दूर गेला.
आपलं उत्तर चुकीचं होतं पण हा मुलगा कुणाची तरी नक्कीच वाट पहात होता.
यशवंत समोरच्या हॅाटेलमध्ये जाऊन बसले.
तिथून ते जाणाऱ्या येणाऱ्यावर लक्ष ठेवणार होते.
थोड्याच वेळाने तोच विद्यार्थी एका गृहस्थाशी बोलताना दिसला.
तो गृहस्थ आणि तो विद्यार्थी जरा बाजूला गेले.
थोड्याच वेळांत यशवंतना दिसले की मगाशी जे पाऊच त्या इसमाच्या हातात होते, ते आता त्या विद्यार्थ्याकडे होते.
त्याअर्थी मुलाने खूप किंमत दिली असावी.
मुलाचा चेहरा त्यानी लक्षांत ठेवला व ते त्या माणसाचा पाठलाग करू लागले.
तो माणूस शहराच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यावरून चालत होता.
त्याचा पाठलाग करत यशवंतही शहराची सीमा ओलांडून आले.
रस्त्याच्या पलिकडे एक कच्चा रस्ता समोरच्या गांवात जात होता.
गांवातले रस्ते बरे दिसत होते.
तो रस्ता ओलांडून गांवात शिरला.
मागोमाग यशवंतही गावांत गेले.
ते गावांत गेले पण तिथून त्या रस्त्याला जरा पुढे जातांच अनेक गल्ली बोळ फुटलेले दिसले व तो गृहस्थ कुठेच दिसेना.
ते तिथून परत निघाले.
तेवढ्यांत त्यांना हांक ऐकू आली, “मामा.”
मागून चंदू येत होता. ते थांबले.
रमेश जायस्वालचा पाठलाग करत चंदू इथे येऊन पोहोचला होता.
रमेश जायस्वालही अचानक गल्ल्यांतून कुठे तरी गेला होता आणि थोडं अंतर राखून पाठलाग करणाऱ्या चंदूच्या नजरेतून निसटला होता.
यशवंत म्हणाले, “हरकत नाही. रमेश जायस्वाल ह्यांत गुंतलेला आहे, हे तर नक्की झाले.
तो होस्टेलवर परत येईलच.
तेव्हा आपण त्याची मुलाखत घेऊ !”
त्यांनी विनायकरावांना फोन करून सांगितले, आम्हाला रमेश आणि रोहित ह्यांची खोली उघडून आंत बसायची व्यवस्था करून द्या.
बाहेरून कुलुप लावा.
रमेश कुलुप उघडून आत येईल, तेव्हा आम्ही त्याला भेटू.”
लॅाजवर परत जाऊन दोघांनी चांगले कपडे घातले व विनाकरावांनी केलेल्या सोयीप्रमाणे रमेशच्या रूमला बाहेरून लॅाक लावून आत जाऊन त्याची वाट पहात बसले.
साडेआठनंतर रमेश रूमवर परतला.
त्याने किल्लीने कुलुप उघडले.
संवयीप्रमाणे डावीकडच्या भींतीवरील बटण दाबून दिवा लावला.
त्याने दारही बंद केले.
दोन पावलं पुढे आला आणि अचानक त्याला यशवंत आणि चंदू समोर बसलेले दिसले.
त्याच्या तोंडातून विचित्र आवाज उमटला आणि तो परत फिरून दरवाजातून बाहेर जायला निघाला.
चंदूने चपळाईने त्याचा बाव्हटा धरला आणि त्याला बेडवर ढकलला.
मग रमेश गप्प झाला.
चंदूने त्याला आणून यशवंतांसमोर बसवला.
चंदू दम भरत म्हणाला, “सर्व प्रश्नांची खरी खरी उत्तरे दे, नाहीतर माझ्याशी गांठ आहे.”
यशवंत म्हणाले, “रोहित वजलवार कुठे आहे ?”
रमेश म्हणाला, “मला माहित नाही.”
चंदूने परत त्याची मान धरली.
रमेश म्हणाला, “मला जे माहिती आहे, ते सर्व सांगतो. सोडा मला.
होस्टेलमध्ये ड्रग्ज घेणारी बरीच मुलं आहेत.
मीही त्यातलाच एक.
इथे आलो आणि इतक्या सहज इथे ड्रग्ज मिळत होते की मला त्याचा नाद लागायला वेळ लागला नाही.
खरं तर आलो तेव्हां मी अगदी सरळमार्गी मुलगा होतो पण मला हळू हळू इथल्या लोकांनी जाळ्यात ओढायला सुरूवात केली.
मी ड्रग्जच्या पूर्ण आहारी जाण्याआधी रोहितच्या लक्षांत आलं.
तो चिडला.
तो तालीम करणारा.
त्याने ह्या लोकांना धडा शिकवायचं ठरवलं.
त्याने ड्रग्ज कुठून पुरवली जातात हे शोधून काढलं.
ड्रग्जचा होस्टेलला विळखा घालण्यात आघाडीवर असणाऱ्याने स्वत:ची ओळख कधी बाहेर येऊ दिली नव्हती.
रोहितने ते शोधून काढलं असावं आणि त्यामुळेच त्याला पळवून नेण्यात आलं.
कांही दिवस ते त्याला बळजबरीने इंजेक्शन्स देऊन संवय लावतील आणि मग सोडून देतील. त्याला त्या गांवात कुठे तरी बांधून ठेवलय, असा माझा अंदाज आहे.
म्हणूनच मी त्याला शोधायला तिथे गेलो होतो.
तिथून परत येतांना मला हा धमकी देणारा मेसेज आलाय, बघा.”
मेसेज होता, “परत ह्या बाजूला आलास तर तुझे जगातले दिवस संपलेच समज.”
अर्थात मोबाईल नंबरही होताच.
यशवंत नेहमी म्हणत, प्रत्येक गुन्हेगार काहीतरी चूक करतोच.
नंबरवरून मोबाईलचं लोकेशन काढण्यात चंदू हुशार होता.
त्याने लागलीच लॅपटॅाप उघडून त्या मोबाईलचं लोकेशन काढलं.
ते चक्क होस्टेलचाच ॲड्रेस दाखवत होतं.
म्हणजे त्या गांवी गेलेला गृहस्थ फक्त एक वापरला गेलेला मामुली गुन्हेगार होता.
धमक्या देणारा सूत्रधार होस्टेलमध्येच होता.
यशवंतानी तात्काळ विनायकरावांना कॅाल करून होस्टेलवर पोलिसांना बोलवायला भाग पाडले.
पोलिसांनी सर्वांची कसून झडती घेतली
कांही मुलांकडे थोडे ड्रग्जही सांपडले पण तो मोबाईल सांपडला होस्टेलप्रमुख कौशलकुमार यांच्याकडेच.
एव्हढचं नव्हे तर ड्रग्जची इंजेक्शन्स देऊन बधिर करून ठेवलेला रोहितही त्यांच्याच जागेत सांपडला.
*- अरविंद खानोलकर.
Leave a Reply