नवीन लेखन...

Hot & Glamorous – नेहा पेंडसे

ग्लॅमर आणि फॅशनची उत्तम समज फार थोडय़ा कलाकारांना असते. नेहा पेंडसेचे नाव यामध्ये सर्वात वर घ्यावे लागेल.
मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमर कॅरी करता येईल अशा मोजक्या अभिनेत्री आहेत. कॉस्च्यूमचा योग्य सेन्स असणं आणि ते तितक्याच सहजपणे कॅरी करणं हे इंडस्ट्रीतल्या फार मोजक्या कलाकारांना जमलं आहे. या कलाकारांच्या यादीतलं नेहा पेंडसे हे वरच्या यादीतलं नाव. ग्लॅमरस नेहा पेंडसेचं नाव मराठीसोबतच हिंदी, तामीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा विभिन्न भाषांतून दमदार अभिनय सादर करणारी खमकी अभिनेत्री म्हणून घेतलं जातं. अभिनय क्षेत्रात यशाचा आलेख कायम चढता ठेवलेल्या नेहाने सिनेमा निर्मितीतही पदार्पण करत इंडस्ट्रीला दर्जेदार कलाकृती दिली आहे.
‘मुंबई फॅशन शो’ या व्यावसायिक इव्हेंटसाठी मला काही मॉडेल्सचे फोटोशूट करायचे होते. याच वेळी नेहाचं फोटोशूट करायची संधी मला चालून आली. व्यावसायिक आणि एडिटोरियल अशी दोन्ही कामे एकाच दिवशी करायची असल्याने स्टुडिओमध्ये साधारणपणे 18 ते 20 जणांची टीम माझ्यासोबत होती. सकाळी लवकर नेहाचं शूट तिच्याशी बोलून आम्ही प्लॅन केलं तर त्यानंतर व्यावसायिक शूट. नेहाशी फोटोशूटसंबंधित बोलणं झाल्यावर तिने सगळ्यात आधी विचारलेला प्रश्न म्हणजे ‘‘थीम काय असेल?’’ या प्रश्नातच नेहाची अभ्यासू वृत्ती दिसून आली.

यात ती कामाच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहे हे समजतं. 99 टक्के कलाकार एडिटोरियल फोटोशूटची थीम काय असेल वा त्यांना नेमकं काय करायचं आहे हे विचारत नाहीत. अनेकदा शूट हे ते सध्या करत असलेल्या शूटच्या लोकेशनवर अन्यथा त्यांच्या घरी करण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे फोटोग्राफरला हवी असलेली थीम वा मेकओव्हर करता येतोच असं नाही. त्यातही अनेकदा शूटिंगच्या कपडय़ात आणि तिथल्याच लोकेशनला शूट केल्याने फोटोशूट हे फार कृत्रिम वा कोरडे होतात. त्यात फोटोग्राफरला हवा असलेला जीव त्याला टाकता येत नाही. त्यात अनेकदा शूटसाठी म्हणजेच व्हिडीओसाठी केलेला मेकअप हा त्रासाचा ठरतो आणि मग फोटो मिळूनही त्यातला गोडवा निघून जातो. नेहाच्या बाबतीत हे सारं काही घडणार नाही हे तिच्याशी बोलताना अगदी पहिल्याच वाक्याला मला समजल्याने मी थोडा आनंदात होतो. नेहाला थीम सांगितली. नेहाचं कॉस्च्यूम काय असेल, त्यासंबंधित मेकअप काय असेल आणि हेअरस्टाईल कशी असेल या सगळ्याची माहिती माझ्या टीमने दिली होती. नेहाला कॉस्च्यूम आणि इतर माहिती दिली होती. मात्र त्यातही तिने तपशीलवार ती समजून घेऊन त्यातले बारकावे जाणून घेतले होते.

‘हॉट ऍण्ड ग्लॅमरस’ या शब्दांना साजेसं ठरेल असं नेहाचं फोटोशूट करायचं ठरलं. हे शूट प्रत्यक्षात आणण्यासाठी माझी टीम अहोरात्र झटत होती. त्यानुसार कॉस्च्यूम डिझायनर, स्टायलिस्ट, मेकअप आणि हेअर डिझायनर आणि असिस्टंट अशी तगडी ब्रिगेडच या शूटच्या कामास लागली होती. पांढऱया रंगाचा शर्ट आणि एक हॉट पॅण्ट यात तिचे एक्स्प्रेशन टिपणारं एक फोटोशूट आम्ही आधी केलं. हाय की (प्रखर प्रकाशातली) या प्रकारातलं हे शूट होत. यात नेहाचा पूर्ण फोटो (फुल फिगर फ्रेम) मला कॅमेराबद्ध करायचा होता, तर त्यानंतर लगेच लाईटिंगमध्ये बदल करत लो की (मंद प्रकाशातली) फोटोग्राफी करण्याचं ठरलं. याच कॉस्च्यूमला थोडं आणखी ग्लॅमर लूक देत तिचं बॅकलेस फोटोशूट आम्ही केलं. अर्थातच या सगळ्यात नेहाची कम्फर्ट लेव्हल लक्षात घेऊन हे शूट प्रत्यक्षात आणण्यात मला आणि माझ्या टीमला यश मिळालं.

शूट करताना आमच्यात – नेहा, मी, माझी स्टायलिस्ट दिव्या तांदळे – सतत संवाद होत होते. प्रत्येक लाईटिंगला, तिच्या बदललेल्या पोजेसला, प्रोफाईलला आणि या सगळ्याच गणित मांडत मी टिपलेल्या फोटोवर आमच्यातले संवाद व्हायचे. शूट सुरू केल्यानंतर मध्ये फार कमी वेळ आम्ही ब्रेक घेतला होता. प्रचंड इच्छाशक्ती आणि ऊर्जा असलेल्या मॉडेलसोबत काम करताना नेहमीच फोटोग्राफरला एक वेगळा आनंद होत असतो. त्यात सगळ्यात जास्त आनंद असतो तो मिळालेल्या वेळेचा अधिकाधिक उपयोग करत जास्तीत जास्त व्हेरिएशन्सवर काम करता आलं याचा.

नेहानं अभिनयाच्या क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं ते बालवयातच. ठाण्याच्या रामनाथ थळवळ यांच्या उन्हाळी शिबिरात वयाच्या सातव्या वर्षी पिटुकली नेहा दाखल झाली आणि इथेच तिच्यावर अभिनयाचे संस्कार झाले. गुरू रामनाथ यांच्याकडे शिकत असतानाच एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शनसाठी नेहा बालकलाकार म्हणून निवडण्यात आली आणि तिचा अभिनय क्षेत्रात श्रीगणेशा झाला. बालाजी प्रॉडक्शनच्या ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकेतून नेहा छोटय़ा पडद्यावरून झळकली आणि त्यानंतर तिने मागे वळून बघितलेच नाही. अनेक मालिकांतून बालकलाकाराची भूमिका साकारत असलेल्या नेहाला शिक्षण आणि अभिनय या दोन्हीपैकी नेमकं एक काय निवडायचं याचा निर्णय तिने वयाच्या तेराव्या वर्षीच घ्यावा लागला आणि अभिनय क्षेत्रातच पूर्णवेळ राहण्याचा निर्णय तिने घेतला. अर्थातच हा धाडसी निर्णय घेण्यामागे तिच्या कुटुंबीयांचा वाटा अधिक होता हे ती नमूद करते.

अनेक हिंदी मालिकांतून काम करत असलेल्या नेहाला ‘हसरते’ या मालिकेने चेहरा दिला आणि तिचं एक वेगळं अस्तित्व या क्षेत्रात निर्माण झालं. गुरू रामनाथ थळवळ यांच्यामुळेच नेहाने मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकल्याचं ती आदराने सांगते. अभिनयाचा प्रवास एका वेगळ्याच वेगाने करणाऱया नेहाचं सिनेमा निर्मितीचं स्वप्न पूर्ण झालं ते बायोस्कोप या मराठी सिनेमामुळे. या सिनेमासोबतच तिचे आणखी काही नवे प्रोजेक्टस् या वर्षी लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं ती आनंदाने सांगते.

धनेश पाटील
dhanauimages@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..