नवीन लेखन...

हौस – Part 1

संध्याकाळची वेळ,
बाहेर अंधारून आलेले. जोरात
पाऊस पडेल अशी हवा. अशावेळी मला
काम करायला खूप आवडते. उद्या कॉलेजमध्ये
द्यायच्या लेक्चरची तयार करत होतो.

बशी भरून चिवडा आणि चहाचा मग भरून ठेवून, आमची ही बाहेर गेली होती. चिरंजीव राहूल ऑफिसमधून यायला अजून दोन एक तासांचा वेळ होता. त्यामुळे तास दोन तास निवांतपणे मला माझ्या भाषणाची तयारी करता येणार होती. उद्याच्या लेक्चरमध्ये पोरांना काय शिकवायचे, कुठे विनोदाचा पंच टाकायचा, लेक्चर कसे खुलवायचे हसत-खेळत, हा किचकट विषय त्यांना कसा शिकवायचा याची मी उजळणी करीत होतो.

इकॉनॉमिक्स हा माझा आवडता विषय. फायदे हे माझे आडनाव. त्यामुळे इकॉनॉमिक्समधले फायदे, हा एक मोठाच विनोद असायचा. खट्याळ पोरं विचारायची, “सर काल फायदे सांगितले आज तोटे सांगणार का?” मी म्हणायचो, “अरे, तुम्हाला शिकवायला लागते हाच मोठा तोटा आहे!” वर्ग हास्यकल्लोळात बुडून जायचा. एकमेकांच्या फिरक्या घेत, लेक्चर कधी संपायचे याचा पत्ता लागायचा नाही. फायदे सरांच्या क्लासला खच्चून गर्दी ठरलेली!

तर सांगायची गोष्ट म्हणजे, मला हवा तसा निवांतपणा मिळाला आणि माझी तंद्री लागली. येवढ्यात बेल वाजली! मलाच दार उघडावे लागले!

दारात एक हसतमुख तरूण! रुबाबदार कपडे, टाय, बूट, हातात ब्रीफकेस आणि छोटीशी दाढी! दार उघडताच म्हणाला, “हॅलो! सर, ओळखलेत का मला?”

मी म्हणालो, “आत तर या, मग बोलू,”

तो आत आला, बूट बाहेर काढले, टायची गाठ ठाकठीक केली, रुमालाने तोंड पुसले. एक मंद सुगंध दरवळला. त्याच्या रुमालाच्या सेंटचा असावा. हसून म्हणाला, “सर, नाही ना ओळखलेत? आहे मी तोटे! उल्हास तोटे! आपला विद्यार्थी, फायदे-तोटे फेम!”

फायदे-तोटे फेम, म्हणताच मी ओळखले, “अरे तू? तोटे? केवढा बदलला आहेस? हा तुझा आपटुडेट पोशाख, चकाचक, गुळगुळीत दाढी रुबाब. तू तर एखादा मार्केटिंग एक्झिक्यूटीव्हच वाटतोस. वर्गातला तो शामळू तोटे पार बदलला! तू ९० च्या बॅचला होतास ना?”

“सर, कमाल आहे. त्याला सर पाच वर्षे होऊन गेली तरी अजून तुमच्या लक्षात आहे?”

“अरे, मी माझ्या क्लासमधल्या बहुतेक मुलांना ओळखतो. आता तुझा मोहराच पार बदलला, तेव्हा जरा गोंधळलो खरा. पण तुझे नाव कळले आणि माझी ट्युब पेटली! इकॉनॉमिक्समध्ये फायदे – तोटे शिकवताना हे इथे फळ्यावर शिकवताहेत ते फायदे आणि ते तिकडे शेवटच्या बाकावर झोपलेत ते तोटे! हा आपला नेहमीचा विनोद खूप पॉप्युलर होत नाही त्यावर्षी?”

“हो सर, पण खूप मजा यायची तेव्हा.”

“बरं ते सोड,हा तुझ्यात एकदम चेंज कसा झाला? काय नवीन नोकरी बिकरी लागली, का लग्नाची पत्रिका बित्रिकाद्यायला आला आहेस?”

“नाही सर. मी टी.एफ्.एल.ची एजन्सी घेतली आहे. मोबाईल, क्रेडिट कार्डचा व्यवसाय सुरु करतो आहे. तुमचे आशीर्वाद हवेत सर.”

“अरे वा! छान! माझे आशीर्वाद तर आहेत तुला. यशस्वी हो, खूप मोठा हो!”

“सर, नुसते तोंडी आशीर्वाद नकोत.

“मग? आणखी कसे असतात आशीर्वाद?”

“सर, तुम्ही माझ्याकडून एक मोबाईल आणि एक क्रेडिट कार्ड घेतलं पाहिजे, तुमच्याकडून माझ्या कामाचा मुहूर्त करायचाय सर.”

“अरे, माझ्याकडे मोबाईल आहे. आता क्रेडिट कार्ड म्हणशील तर माझ्यासारख्याला त्याचा काय रे उपयोग?”

“सर, तुम्हाला लेक्चर, कॉन्फरन्ससाठी खूप फिरावे लागते. विमानाचा प्रवास, हॉटेलमध्ये रहाणे वगैरे खर्च असतात. तेव्हा क्रेडिट कार्ड जवळ असले म्हणजे सरकाही अडचण येणार नाही.रोख पैसेजवळ ठेवायलाच नकोत.’

“अरे माझे विमान तिकीट, हॉटेलची बिलं वगैरे सर्व खर्च कॉलेज करते. माझ्या पगारातून परस्पर कापले जातात. सगळी व्यवस्था परस्पर होते. शिवाय रोजचा घरखर्च माझी बायको बघते. मी दुकानाची पायरीपण चढत नाही. शिवाय हे तुझे कार्ड काय फुकट थोडेच येणार? काही तरी कमिशन असणारच ना?”

“हो. सर, वर्षाला फक्त पाचशे रुपये. पण सर पहिल्या वर्षी काही चार्ज नाही. फुकट वापरा. नको वाटले तर पुढच्या वर्षी बंद करा. कंपनीची काही हरकत नाही.

“हे बघ तोटे, तुझ्या दृष्टीने याचे फायदे खूप असतील. पण एकदा का याची सवय आमच्या घरच्यांना लागली ना, मग मला फायदा तर सोडाच तोटाच तोटा दिसतोय.”

तेवढ्यात बेल वाजली. दार उघडले तर सौ. घाईघाईने आत आली माझ्या हातात पिशव्या दिल्या आणि म्हणाली, “या पिशव्या ठेवा. मी जरा परत जाऊन येते.”

“का ग? आलीस काय? पुन्हा चाललीस काय? काय आहे काय?”

“अहो, त्या कजरीमध्ये सेल लागलाय-विमल साड्यांचा! जाम स्वस्तात आहेत! जरा जास्तीचे पैसे लागले तर असावेत म्हणून आले घरी. आत्ता येते जाऊन. आलेच.” असे म्हणून ती आत गेली. जास्ती पैसे घेऊन आल्या पावलांनीच परत पळाली!

“या बायकांना, म्हाताऱ्या झाल्या तरी साड्यांचा सोस काही कमी होत नाही.”

“सर, बघितलेत ना? आता कशी झाली पंचाईत. आत्ता क्रेडिट कार्ड असतं तर बाईसाहेबांना अशी धावपळ नसती ना करावी लागली?”

“अरे पण असं काय नेहमी थोडंच होतं? त्यासाठी काय कायम वर्षाला पाचशे रुपये भरत बसायचे?”

“सर, एक वर्ष तर वापरून बघा. त्यात तुमचं काहीच नुकसान नाही. सर मला तुमचे आशीर्वाद हवेत. तुम्ही मला नाऊमेद करणार नाही या आशेने मी आलो. नाही म्हणून नका.”

माझ्या खनपटीस बसून त्याने माझ्या गळ्यात क्रेडिट कार्ड मारलेच एकदाचे! पोरगा चांगलाच तयार झाला होता धंद्यात. मग मी विचारले, “तोटे, आणखी किती लोकांचे आशीर्वाद घेतलेस रे चोरा? तेव्हा तो पोट धरधरून हसायला लागला. मी म्हणालो, “अरे चोराची पावले चोर ओळखतोच!” मग आम्ही जुन्या आठवणी काढत बसलो. त्या बॅचच्या इतरांच्या गोष्टी निघाल्या. किती वेळ गेला कोण जाणे. बेल वाजली तेव्हा लक्षात आलं की आठ वाजायला आलेत!

दार उघडले तशी सौ. हातात पुन्हा दोन पिशव्या घेऊन हजर!

“अहो, पाहिल्यात का या विमलच्या साड्या? निम्म्या किंमतीत मिळाल्या!” तेवढ्यात तिचे लक्ष तोटेकडे गेले. तशी ती म्हणाली, “अरे अजून हे आहेतच का? थांबा हां मी चहा आणते.”

“अग हा माझा विद्यार्थी आहे, ९८ च्या बॅचचा, त्याला अहो जाहो काय करतेस?”

“हो, बाईसाहेब, आणि आता चहा वगैरे काही आणू नका, तुम्ही बाहेरून दमून भागून आला आहात. मी येईन पुन्हा कधीतरी.”

“वा, वा, इतक्या वेळ बसला आहेस. तसा बरा जाऊ देईन मी तुला? आता पाच मिनिटात होईल चहा थांब जरा.” तिने चिवडा, जिलबी आणून दिली आणि चहा करायला आत निघाली तसा तोटे म्हणाला, “अरे वा जिलबी! मला फार आवडते. घरची वाटते?”

“नाही रे, येवला कुठला वेळ मिळायला? त्या समोरच्या सोनार, सराफ अॅन्ड हिरे ज्वेलर्सकडून आणल्यात या तुमच्या लाडक्या प्रोफेसरांनी!

“काय? ज्वेलर्सकडून? काय बोलताय काय बाईसाहेब तुम्ही?”

“मग विचार की या तुझ्या प्रोफेसरांना!”

“सर, ही काय भानगड आहे?”

मी खूप हसलो, “अरे उल्हास ती एक गंमतच झाली. आज आमच्या राहूलचा वाढदिवस तर ही म्हणाली काहीतरी स्वीटस् घेऊन या म्हणाली थोड्या जिलब्या आणा. राहूलला आवडतात. मी म्हणालो, “किती आणू?”तर म्हणाली, “आणा २००-३०० गॅम!” पिशवी घेऊन निघालो तर सोसायटीचे सेक्रेटरी भेटले, कंटक! म्हणाले, काय प्रोफेसरसाहेब, आज कॉलेज नाही वाटते? सकाळी सकाळी दहा वाजता बाहेर पडताय म्हणून विचारतो,” मी म्हणालो,”हो आज जाणार नाही कॉलेजला, जरा बाजारात निघालोय.” त्यांचे ते दहा वाजलेत दहा माझ्या डोक्यात बसले. त्याच नादात मिठाईचे दुकान गाठले आणि तिथल्या पोऱ्याला म्हणालो, “दहा ग्रॅम जिलबी दे रे बांधून!” तो गालातल्या गालात हसून म्हणाला, “साहेब, ते समोर सोनार, सराफ अँन्ड हिरे ज्वेलर्स आहेत ना, त्यांच्याकडे मिळतील दहा ग्रॅम जिलब्या!” तसे आजूबाजूचे लोक लागले हसायला!

मालकाने चमकून वर पाहिले मला पाहताच तो म्हणाला, “अरे या,या प्रोफेसर साहेब, या काय पाहिजे?” तसा तो पोऱ्या म्हणाला, “मालक यांना दहा ग्रॅम जिलब्या हव्यात!”

मालक त्याच्यावर खेकसला!”मूर्खा, यांना ओळखलं नाहीस? अरे आपल्या नवीन दुकानाचे उद्घाटन परवा यांच्याच हातून नाही का झाले?” चल पटकन दोन किलो जिलबी दे त्यांना पॅक करून, अरे येवढी मोठी आसामी येते काय चेष्टा आहे काय?”

त्याने दोन किलो जिलब्या दिल्या बांधून.

–विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..