“मग काय म्हणतंय तुमचं ड्रायव्हिंग?” हा प्रश्न विचारून लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या जखमांवर का मीठ चोळतात कळत नाही. म्हणजे अशा प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हा एक प्रश्नच असतो. बर्याचदा हा प्रश्न निर्मळ मनाने विचारला जातो की उगाचच डिवचायला हे समजणे अवघड असते. बरं ड्रायव्हर लोकांना नवीन गाडी शिकणार्याची व्यथा तरी समजते पण ज्याला ड्रायव्हिंगचे ओ का ठो कळत नाही, अशा लोकांचे सल्ले म्हणजे खरा उच्छाद असतो.
चित्रकला, लेखन, वक्तृत्व किंवा पोहणे या कलांप्रमाणेच ड्रायव्हिंग ही देखील एक अद्भूत कला आहे असा एक आपल्याकडे गैरसमज आहे. पण गाडी चालवणे ही कला नसून एक महाअवघड कसरत आहे हे माझे प्रामाणिक मत आहे. स्वत:च्या खिशातले पैसे देऊन विकतचे दुखणे घ्यायचे असेल तर नवीन कार घेण्यासारखा दुसरा अनुभव नाही.
गाडीबद्दल काही गोष्टींमध्ये तथ्यं मात्र नक्की आहेत. फोर व्हीलर शिकण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सायकल शिकताना जसा बॅलन्स बिघडून आपण पडतो आणि हातपाय मोडून घेतो, तसा धोका अजिबात नाही. चार चाके असल्याने कारचा बॅलन्स बिघडून कार पडायची भानगड नसते. शिवाय रणरणत्या उन्हाळ्यात थंड एसीमध्ये बसून ड्रायव्हिंग करणे जाम भारी असते, अशी उगाचच बाहेरच्यांची समजूत असते. पण काही नतदृष्ट लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या पदरी ते सुख मात्र पडू देत नाहीत, त्याला चान्स मिळेल तिथे इरिटेट करून सोडतात.
तोटे मात्र अनेक आहेत. त्यापैकी सर्वात मोठा म्हणजे पेट्रोलचे दिवसेंदिवस वाढणारे दर. लोकांनी तर पेट्रोलवाढीचा एवढा धसका घेतला आहे की पंपावर लांब लाईन लागली असेल तर ओरडून “लवकर भर रे बाबा.” म्हणतात. न जाणो आपला नंबर यायच्या आत वाढलेल्या दराचे सर्क्युलर यायचे आणि आधिक भुर्दंड पडायचा. आजकाल फुल टाकी भरणाराकडे तर लोक आदराने पाहू लागले आहेत. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती घसरत असतानाही आपल्याकडच्याच किंमतीत वाढ कशी होते याचे उत्तर हे बारावीच्या डबल इंटीग्रेशनचे उदाहरण सोडवल्यावर प्रत्येक वेळी नवीन उत्तर कसे येते, हे जाणणाराच देऊ शकेल.
नवीन गाडी घेतल्यावर सुरवातीचे काही दिवस तर गाडी काढायची या नुसत्या विचाराने माझ्या अंगाचा थरकाप व्हायचा. गाडीची चावी हातात घेतली की पोटात भीतीने गोळा यायचा. केवळ एकट्याच्या जबाबदारीवर गाडी रस्त्यावर चालवायची ही कल्पनाच पचनी पडत नव्हती. नंतर नंतर तर ऑफिसला जायला आपली झुकूझुकू रेल्वेच बरी होती असे वाटायला लागले. त्याला अनेक कारणे होती.
त्यापैकी एक म्हणजे मी गाडी काढतोय याचा बाकीच्या लोकांना कसा सुगावा लागायचा कोण जाणे! मोर्चा असल्यासारखे लोक रस्त्यावर यायचे! मग सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ काहीही असो. ते कमी की काय म्हणून बाईकवाले रोडरॅश खेळायला आमच्याच पुढे! रिक्षावाल्यांचा सुळसुळाट बाय डिफॉल्ट आलाच! आणि केवळ आपल्या गाड्या फिरवण्यासाठीच रस्ते बनविण्यात आलेले आहेत अशी धारणा झालेले टीएमटी आणि बेस्टचे ड्रायव्हरकाका यांनी हैराण करून सोडले होते. कधीकधी बाहुबलीतल्या भल्लाळदेवासारखा हेलिकॉप्टरच्या पंख्याचा रथ घेऊन बाहेर पडावे असे वाटायचे. एवढी संकटे होती पण मी हार मानली नाही. रस्त्यावरचा हा सगळा अन्याय सहन करत चिकाटीने ड्रायव्हिंग शिकलो.
घरचे लोकही काही कमी नाहीत. नवीन ड्रायव्हरला मानसिक आधाराची खूप गरज असते हे त्यांना समजतच नाही. गाडी शिकताना रात्री साडेदहाला “चला एक राऊंड मारून येऊया.” म्हटले तरी गाडीत बसायचे नाहीत. “तुम्हीच जाऊन या.” म्हणायचे. कुठेतरी गाडी ठोकून हा बाबा ह्याच्याबरोबर आपल्यालाही मारायचा ही भीती असावी. गाडी गेली तर गेली आपला जीव तर वाचेल म्हणून ते येत नसावेत.
पुढे महिनाभराने मी बर्यापैकी गाडी चालवायला लागल्यापासून ते मागे बसायला लागले. तेही गप्प नाही. थोडा मोकळा रस्ता दिसला की मी मायकेल शुमाकर असल्यासारखा “काय हळू चालवताय, पळवा की.” म्हणायचे. इथे दुसर्या गिअरवर पळणारी गाडी आवरता आवरता तसल्या थंडीत घाम फुटायचा. पायातला बे्रक लावू की हँडबे्रक खेचू असे होऊन जायचे. त्यात मध्येच कुठल्यातरी इंडिकेशनची लाईट लागून पिप पिप असा बझरचा आवाज यायला लागला की अजून गोंधळायला व्हायचे.
गाडीच्या ड्रायव्हर सीटवर ही अवस्था तर विमानाच्या कॉकपिटमध्ये बसून पायलट असंख्य बटने, गिअर्स, लाईटी कसा काय सांभाळत असेल याचे मला अजूनही कोडे आहे. वास्तविक गाडी चालवताना मला माझे काही वाटायचे नाही पण रस्त्यावर चालणार्या बिचार्यांची काळजी वाटायची. शिवाय आपल्या ड्रायव्हिंगची कल्पना नसलेले काही भाबडे लोक आपल्यावरच्या अतूट विश्वासाने गाडीत आपल्या बाजूलाच बिनदिक्कतपणे बसतात त्यांची एक कीव वाटायची. हे असे लोक आणि स्वत:हून खाटकासोबत मजेत चाललेला बकरा या दोन्हींत मला कमालीचे साम्य वाटते.
बर्याचजणांनी नवीन कार घेतल्यावर “तुला बॉनेट उघडून आतल्या ऑईल वगैरे बेसिक गोष्टी चेक करायच्या माहित आहेत का?” अशासारख्या प्रश्नांनी भंडावून सोडले होते. मुळात बॉनेट उघडायचे बटन खेचूनही नेमका कुठे हात घातल्यावर ते उघडते याचा मला पत्ता नव्हता. इमर्जन्सीला माहित असावे म्हणून खूप प्रयत्नांती त्या छोट्या पट्टीची ओळख करून घ्यावी लागली.
बेसिकात बेसिक सिग्नल वगैरे भानगड कॉमन अंडरस्टँडिंगवर निभावून नेत होतो. लाल दिवा लागला की थांबणे, हिरवा असेल तर कशाचीही (अगदी हवालदारमामाचीही) पर्वा न करणे आणि हिरव्याचा पिवळा झाला की जीव काढून हॉर्न वगैरे दाबत गाडी पळवणे या गोष्टींचे ज्ञान मला बर्यापैकी होते. पण एकाने पिवळ्या सिग्नलबद्दल भलतेच सांगून त्या ज्ञानाला छेद द्यायचा प्रयत्न केला. पिवळा सिग्नल लागल्यावर वेग कमी करून थांबायचे असते असे त्याचे मत होते. सिग्नलवर हवालदार असतील तर ते मात्र अजूनही पाळावे लागते.
अरुंद आणि अवघड रस्त्यावर समोरून येणारी वाहने आपल्याकडे डोळे मिचकावून का पहातात (अप्पर डिप्परचा लाईट मारून) हे मला गाडी घेतल्यावरही बरेच दिवस कोडे होते. असाच एकदा अडचणीच्या रस्त्यावरून चाललो होतो. वाट बिकट होती आणि समोरच्या ट्रक ड्रायव्हरला मस्करीची हुक्की आली. मिचकावले डोळे! मग नाईलाजाने मीही त्याला डोळे मिचकावले आणि तसाच पुढे घुसलो. क्षणापूर्वी मस्करीच्या मूडमध्ये असलेला ड्रायव्हर माझ्याकडे पाहून तोंडातल्या तोंडात काय पुटपुटत होता ते समजून घ्यायला वेळ नव्हता कारण वीस फुट खोल नदीच्या पुलावर गाडी घासता घासता वाचली होती. शिवाय कशाला उगाच एवढ्या छोट्या पुलावर बॅरीकेड म्हणून सरकारने तोही खर्च वाचवला होता. यावेळी मला नाही, तर बाजूला बसलेल्या मित्राला घाम फुटलेला मी स्वत: पाहिला. मग न रहावून मीच विचारले, “का रे काय झाले? एवढा का घाबरला आहेस?”
“अरे बाबा, का घुसलास पुलावर?”
“का म्हणजे?”
“पुढच्याने सिग्नल दिला की आपण बाजूला थांबून आधी त्याला जाऊ द्यायचे असते.”
तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. नाहीतर दोन ओळखीचे लोक ज्याप्रमाणे हाय हॅलो करतात तसा काहीसा प्रकार असावा अशी माझी समजूत होती. इतके दिवस समोरच्याने सिग्नल दिला की मी ही तशाच सिग्नलने हाय हॅलो करून पुढे निघायचो.
क्लास लावून गाडी शिकलो की शंभर टक्के आपण गाडी चालवूच हा फाजील आत्मविश्वास बाळगणे किती चूकीचे आहे हे आपली स्वत:ची गाडी घेतल्यावर समजते. एकतर गाडी शिकवणारा बाजूला बसलेला नसतो. समोर माणसं आल्यावर गाडी का थांबत नाही हे आपल्यालाच कळत नाही. शिकत असताना मात्र माणूस समोर दिसला रे दिसला की गाडी थांबणार. बे्रक नाही मारला तरी! शिकवणार्याच्या पायात अजून एक बे्रक असतो हे माहित असूनदेखील त्याची कल्पणा यायची नाही. “गाडी चालवणे समजता तेवढे सोपे नाही आणि अगदीच काही अवघडही नाही. सगळा क्लच आणि बे्रकचा खेळ आहे.” हे वारंवार शिकवणीत सांगूनही डोक्यात जाते पण त्या क्लच आणि बे्रकबरोबर खेळण्यार्या पायाला कळत नाही. ऐनवेळी घोटाळा करून लेकाचा गाडी बंद पाडतो.
कुठल्याही चढावर समोरून कोण येत असेल, अगदी सायकलवाला असेल तरीही माझी गाडी बंद पडणारच. बंद पडून जागच्या जागी उभी राहील ती गाडी कसली? ती मागे सरकलीच पाहिजे हा नियम आहे. साध्या चढाची ही अवस्था, घाटाचे तर नावच घेऊ नका. हे म्हणजे पहिलीतल्या बाळाला चल गंमत आहे म्हणून शाळेत न्यायचे आणि तिथे गेल्यावर दहावीचा पेपर सोडवायला द्यायचा असा प्रकार आहे. नुकत्याच संघात घेतलेल्या तेराव्या खेळाडूने विराट किंवा धोनीकडे जेवढ्या कौतुकाने पहावे तशाच भावनेने मी घाट चढून सुखरुप वर गेलेल्या ड्रायव्हरकडे पहातो. नागमोडी वळणांचा अवघड घाट व कंटेनरसारख्या अजस्र गाड्या असूनही माझ्याप्रमाणे त्या मागे का सरकत नाहीत हा मला छळत आलेला प्रश्न आहे. बरं गाडी मागे सरकू नये म्हणून फास्ट फास्ट चालवतात असेही नाही. निवांत घाटाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत ड्रायव्हिंग चाललेले असते. मला घाट सुरू झाल्यावर जो नर्व्हसनेस येतो तो कधी एकदाचा संपतोय असे होऊन जाते आणि शेवटचे वळण घेऊन संपला एकदाचा घाट की हुश्श!
गाडी शिकवणारा माणूस क्लच आणि ब्रेकबरोबर अॅक्सलवर किती प्रमाणात पाय ठेवायचा हे आम्हांला जीव तोडून सांगायचा पण माझ्याबरोबर गाडी शिकायला असलेल्या एका काकांना ते जमतच नव्हते. समोर माणूस आला की काका जोरजोरात रेस करायचे. गाडीला हॉर्नदेखील आहे हे ते विसरूनच जायचे. मग आमचा सांदिपनी त्यांना सांगायचा, “काका, कोण पुढं आला की बे्रकवर पाय द्या. अॅक्सलवर नको. रस्त्यावरच्या लोकांना बॉनेटवर घेऊन जाल अशाने!”
पण गर्दीत किंवा सिग्नलला अॅक्सलवर पाय देण्याचे फायदे मी स्वत: अनुभवले आहेत. उगाचच गरज नसताना अॅक्सलवर पाय देऊन आवाज घुमवला की लोक ह्याला गाडी चालवता येत नाही म्हणून पटकन रस्ता देतात. त्यात गाडीच्या पुढच्या मागच्या पार्किंग लायटींचा पिवळा झगमगाट चालू केला की रिक्षावालाही आजुबाजूला फिरकत नाही. अजून कचकन बे्रक मारून टायरांचा आवाज काढल्यास पादचारीही जीवाच्या भीतीने फुटपाथ सोडत नाहीत. ह्या सगळ्या युक्त्या मला खूप उशिरा समजल्या.
या सगळ्या दिव्यपरीक्षा पास करून मी गाडी शिकलो आहे. पटकन गाडी काढ म्हणणार्यांना काय, त्यांना या यातना कधीच समजायच्या नाहीत. म्हणून नवीन गाडी शिकणारा दिसला रे दिसला की मी त्याला थम्सअप करून बेस्ट ऑफ लक देतो. त्यावेळी त्याच्या चेहर्यावरची खुशी पहाण्याचा आनंद काही औरच असतो.
© विजय माने, ठाणे
https://vijaymane.blog/
Leave a Reply