नवीन लेखन...

अजस्र पेंग्विन

पेंग्विनची निर्मिती सर्वप्रथम आजच्या न्यूझिलंडच्या परिसरात झाल्याचं मानलं जातं. न्यूझिलंडमध्ये पुरातन काळातल्या पेंग्विनच्या विविध जातींचे जीवाश्म सापडतात. डॅनिएल सेप्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासलेले जीवाश्म हे न्यूझिलंडमधील ओटॅगो येथील हॅम्पडेन समुद्रकिनाऱ्यावर सापडले. या किनाऱ्यावर दगडासारख्या घट्ट झालेल्या चिखलाचं आवरण असलेले, गोलाकार खडक आढळतात. हे खडक किमान साडेपाच कोटी वर्षांपूर्वीच्या काळातले आहेत. या अतिप्राचीन खडकांना भूशास्त्रीय भाषेत ‘मोएराकी रचना’ या नावानं ओळखलं जातं. यांतील काही खडकांवरचा घट्ट चिखल हा, त्यावर दीर्घकाळ होत असलेल्या समुद्राच्या लाटांच्या माऱ्यानं धुऊन निघाला आहे. त्यामुळे या खडकांचा आतला भाग दिसायला लागला आहे. या उघड्या पडलेल्या खडकांत, अनेक प्रकारच्या पेंग्विनच्या हाडांचे जीवाश्म दिसून येतात. डॅनिएल सेप्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन याच जीवाश्मांवर केलं गेलं आहे.

डॅनिएल सेप्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या खडकांतील, हाडांचे जीवाश्म असलेले भाग आपल्या संशोधनासाठी वेगळे करून घेतले. त्यानंतर लेझर किरणांचा स्कॅनर वापरून या नमुन्यांचं त्यांनी त्रिमितीय निरीक्षण केलं. ज्या पृष्ठभागाचं त्रिमितीय निरीक्षण करायचं असेल, त्या पृष्ठभागावर प्रथम हा स्कॅनर लेझर किरणांचा झोत सोडतो. हे लेझर किरण त्या पृष्ठभागाच्या खाच-खळग्यांच्या स्वरूपानुसार विखुरले जातात. या स्कॅनरवरचे संवेदक त्यानंतर हे किरण टिपतात. या टिपलेल्या लेझर किरणांच्या स्वरूपावरून त्या पृष्ठभागावरील खाच-खळग्यांची त्रिमितीय प्रतिमा तयार केली जाते. डॅनिएल सेप्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पद्धतीद्वारे, पेंग्विनच्या जीवाश्मांतील हाडांच्या तपशीलवार त्रिमितीय प्रतिमा मिळवल्या. या प्रतिमांत जीवाश्मांच्या स्वरूपातील हाडांचा, ०.२ मिलिमीटरपर्यंतचा तपशील दिसू शकत होता. डनिएल सेप्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लेझर स्कॅनरद्वारे मिळवलेल्या सुमारे पावणेतीनशे प्रतिमांची, आज अस्तित्वात असलेल्या, तसंच पुरातन काळातल्या ज्ञात पेंग्विनच्या हाडांच्या रचनांशी तुलना केली.

खडकांत सापडलेले पेंग्विनचे जीवाश्म शरीरातल्या अगदी मोजक्या भागातल्या हाडांचे होते. तरीही हे संशोधक या हाडांवरून, पेंग्विनच्या विविध प्रजाती-जातींचा शोध घेण्यात यशस्वी झाले. शेकडो हाडांशी केल्या गेलेल्या अशा तुलनेनंतर त्यांना, या जीवाश्मांत पेंग्विनच्या अनेक प्रजाती-जाती आढळल्या. यांमध्ये, ज्ञात प्रजाती-जातींबरोबरच, आतापर्यंत अज्ञात असणाऱ्या एकूण नऊ जातींच्या पेंग्विनचाही समावेश होता. या नव्यानं शोधल्या गेलेल्या पेंग्विनची वजनं कळण्यासाठी या संशोधकांनी, पेंग्विनच्या या अवशेषांतील पोहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवयवांतील हाडांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. या विशिष्ट हाडांच्या लांबी-रुंदीचा पेंग्विनच्या वजनाशी असलेला गणिती संंबंध दर्शवणारी सूत्रं या संशोधकांनी प्रथम विकसित केली. त्यासाठी त्यांनी आज अस्तित्वात असलेल्या पेंग्विनच्या विविध प्रजातींच्या हाडांची लांबी-रुंदी आणि पेंग्विनची वजनं यांच्यातील गणिती संबंध तपासला. यांतून तयार केलेल्या गणिती सूत्रांच्या वापराद्वारे या संशोधकांना, या अज्ञात जातींच्या पेंग्विनच्या विशिष्ट हाडांच्या लांबी-रुंदीवरून पेंग्विनची वजनं समजू शकली.

पेंग्विनच्या या नऊ जातींपैकी सर्वांत लहान असणाऱ्या दोन जाती या आजच्या एम्परर पेंग्विनपेक्षा कमी वजनाच्या असल्याचं दिसून आलं. एम्परर पेंग्विनचं वजन सुमारे चाळीस किलोग्रॅमच्या आसपास असतं. आता शोधल्या गेलेल्या दोन लहान जातींचं वजन यापेक्षा कमी, परंतु वीस किलोग्रॅमपेक्षा अधिक असावं. शोधल्या गेलेल्या इतर सात जाती या एम्परर पेंग्विनपेक्षा मोठ्या होत्या. त्यातील पाच जाती या वजनात, एम्परर पेंग्विनपेक्षा थोड्याशाच अधिक भरत होत्या. परंतु उर्वरित दोन जाती मात्र एम्परर पेंग्विनपेक्षा खूपच वजनदार होत्या. यांतल्या एका जातीचा पेंग्विन हा तर वजनानं दीडशे किलोग्रॅमहून अधिक असावा आणि त्यांची उंची सुमारे अडीच मीटर इतकी असावी. एम्परर पेंग्विनच्या तिपटीनं वजनदार असणारा हा पेंग्विन, एम्परर पेंग्विनच्या दुप्पट उंच असावा. इतक्या मोठ्या आकाराचा पुरातन पेंग्विन प्रथमच सापडला आहे. पेंग्विनच्या या अजस्र आकाराच्या नव्या जातीला, या संशोधकांनी ‘कुमिमानू फॉर्डिसाय’ हे शास्त्रीय नाव दिलं आहे.

प्रचंड आकाराचे पेंग्विन आज अस्तित्वात नसले तरी, एम्परर पेंग्विनपेक्षा आकारानं मोठे असणारे, पुरातन काळातले पेंग्विन संशोधकांना नवे नाहीत. मात्र कुमिमानू फॉर्डिसायचा आकार या सर्वांपेक्षा मोठा आहे. आतापर्यंत सापडलेला सर्वांत मोठा पेंग्विन हा कुमिमानू बायसेई या नावानं ओळखला जातो. आजच्या एम्परर पेंग्विनपेक्षा खूपच उंच असणाऱ्या या पुरातन पेंग्विनचे अवशेष न्यूझिलंडमधील साऊथ आयलंड या बेटावर २०१७ साली आढळले होते. सुमारे साडेपाच ते सहा कोटी वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या कुमिमानू बायसोईचं वजन सुमारे ११५ किलोग्रॅम असावं. त्याची उंची सव्वादोन मीटरच्या आसपास असावी. आताचा कुमिमानू फॉर्डिसाय हासुद्धा २०१७ सालच्या सुमारासच शोधला गेला आहे. हा पेंग्विनही साडेपाच ते सहा कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. मात्र या पेंग्विनचं वजन कुमिमानू बायसेई पेंग्विनच्या तुलनेत सुमारे तीस टक्क्यांनी अधिक असावं आणि उंची दहा टक्क्यांनी अधिक असावी. कुमिमानू फॉर्डिसाय हा पेंग्विन, कुमिनानू प्रजातीत गणला गेला आहे. कुमिनानू या शब्दाचा न्यूझिलंडमधील आदिवासींच्या मावरी भाषेतला अर्थ ‘राक्षसी पक्षी’ असा होतो. या पेंग्विनच्या नव्या जातीच्या शास्त्रीय नावातला फॉर्डिसाय हा शब्द, ओटॅगो विद्यापीठातील पुराजीवशास्त्रज्ञ इवान फॉर्डाइस यांच्या सन्मानार्थ वापरला गेला आहे.

कुमिमानू फॉर्डिसायसारख्या जातीचे हे प्रचंड पेंग्विन उत्क्रांतीच्या शिडीवरचा महत्त्वाचा टप्पा असू शकतात. प्राचीन पृथ्वीवरचे, टेरोसॉर हे डायनोसॉरचे उडणारे भाऊबंद, सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी नामशेष झाले. पेंग्विनची निर्मिती, टेरोसॉर नामशेष झाल्यानंतर एक कोटी वर्षांच्या आतच झाली आहे. संशोधकांच्या मते पेंग्विनना हा त्यांचा प्रचंड आकार, त्यांच्या उत्क्रांतीच्या काळातल्या सुरुवातीच्या टप्प्यात प्राप्त झाला असावा. म्हणजे पेंग्विनच्या पूर्वजांचं उडणं थांबल्यानंतर अल्प काळातच… सुमारे सहा कोटी वर्षांपूर्वी! उडणं थांबल्यामुळे पेंग्विनची वजन कमी असण्याची आवश्यकता नाहीशी झाली व त्यांचं वजन वाढू लागलं. या मोठ्या शरीराचा या पेंग्विनना फायदा झाला असावा. एक म्हणजे त्यांना इतर सजीवांपासून असणारा धोका कमी झाला. दुसरं म्हणजे, मोठ्या शरीराची उष्णता धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्यानं, ते थंड प्रदेशांसह इतर ठिकाणी पोहतपोहत स्थलांतरित होऊ शकले. स्थलांतरित झाल्यानंतर त्यांना स्थैर्य प्राप्त होऊन, मोठ्या शरीराची गरज राहिली नसावी व त्यांचा आकार घटू लागला असावा.

(छायाचित्र सौजन्य –University of Cambridge / Simone Giovanardi / Bernard Spragg. NZ / Wikimedia)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..