हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांचा अल्पपरिचय.
प्रवीण मसाले ब्रॅन्डचे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला.
पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले हुकमीचंद चोरडीया यांचा जन्म एका मारवाडी कुटुंबात झाला होता. लहानपणी त्यांची गांधीवादी म्हणून ओळख होती. गांधी विचारांचा त्यांचावर पगडा होता. आपली पत्नी कमलबाई यांच्यासोबत लग्नानंतर काही काळ ते सोलापूर जिल्ह्यातही वास्तव्याला होते. तेथे त्यांनी ‘आनंद मसाला’ हा घरगुती मसाले तयार करुन विक्री करण्याचा उद्योग केला होता. पुढे पुण्यात हडपसर परिसरात नोकरी करत असतानाच संध्याकाळी घरोघरी फिरुन मसाले विक्रीला सुरुवात केली होती. मिरची बियाणे विक्री करता करताच हुकमीचंद यांना मसाला तयार करण्याची कल्पना सुचली होती. त्यामुळे ‘गरम मसाला’ आणि सोबतच ‘कांदा-लसूण मसाला’ तयार करुन घरोघरी विक्रीला त्यांनी सुरुवात केली. १९६० मध्ये त्यांनी ‘प्रवीण मसाले’ या नावाने त्यांनी व्यवसाय सुरु केला. पहिली दहा वर्षे अत्यंत कष्ट करुन पुढे हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथेच त्यांनी मोठी जागा घेऊन १९७२ मध्ये या व्यवसायाचा विस्तार केला.१९७६ मध्ये सुमारे ५०० किलो लोणचे तयार करुन त्यांनी बाजारात ‘प्रवीण’ ची उत्पादने विक्रीसाठी आणली. त्या व्यवसायाचा विस्तार आता चौथी पिढी करत आहे. भारतभर जवळपास १० कारखाने आणि विक्री केंद्रे उभी करण्यात महत्वाचे मार्गदर्शन हुकमीचंद यांनी केले होते. गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून ते मसाले उद्योगात आपला दबदबा निर्माण केला होता घराघरात प्रवीण मसाले हा बॅन्ड पोहोचवण्यात हुकमीचंद यांचा मोठा वाटा होता. ‘प्रवीण’ सोबतच ‘सुहाना’ आणि ‘अंबारी’ हे ब्रँड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत.
अस्सल महाराष्ट्रीय तडका असलेले मसाले बनवण्यात त्यांचा हातखंड होता. शाकाहारासोबत मांसाहारी जेवणासाठी लागणारे प्रत्येक मसाले प्रवीण मसालेवाले यांच्याकडे उत्पादित केले जातात.
हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply