नवीन लेखन...

माणुसकी

माझी बदली औरंगाबादच्या ग्रामीण शाखेत झाल्यापासून ही पारव्याची जोडी दर महिन्याला एक तारखेला पेन्शन काढण्यासाठी येईल. आजोबा  70 च्या पुढे. बऱ्यापैकी थकलेले आणि आजी 60 च्या आतल्या. अगदी तरतरीत. आजी-आजोबांचा हात धरून त्यांना बँकेत आणत. त्यांना एका  बाकड्यावर टेकवून लगबगीने पैसे काढण्याचा फॉर्म भरून रांगेत उभ्या राहात आणि कॅशिअरकडे त्यांचा नंबर आल्यावर ‘आवो’ असं जोराने ओरडून आजोबांना हात वर करायला लावत. आजोबा बसल्या जागेवरूनच हात हलवत. कॅशिअर पेन्शनचे पुडके आजींच्या पुढे ठेवी. हसत-हसत दोघेही बाहेर पडत. कधी मध्ये 15 तारखेच्या पुढेही त्यांची एखादी चक्कर होई. नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला देण्यासाठीही त्या लगबग करत.

शाखेत प्रवेश केल्या केल्या वॉचमनपासून गप्पांना सुरुवात करीत. प्रत्येक कर्मचाऱ्याची तेवढ्यातल्या तेवढ्यात आपुलकीने विचारपूस करीत. इतकेच नव्हे, तर उन्हाळ्यात आजोबांना घरी उकडते म्हणून बँकेसारख्या थंड हवेच्या ठिकाणीही घेऊन येत.

हळूहळू मीही नव्या शाखेत रूळले. नेमकेच पेन्शनर असल्याने सर्वजण नावासकट लक्षात राहू लागले. आजोबांची जरा जास्तच काळजी घेण्याच्या त्यांच्या सवयीने त्या चांगल्याच मनात ठसल्या. आपण देत असलेल्या या पेन्शन सेवेचा मला अभिमान वाटे.

त्या  दिवशी 1 तारखेला बाई एकट्याच आल्या. लख्ख गोऱ्या देखण्या आजी. पण आज एकदम रया गेलेली. ते उघडं कपाळ, खोल गेलेले डोळे, गळ्यातली गायब झालेली काळी पोत काही वेगळंच सांगत होती. आज बाईंनी संथगतीने पैसे काढण्याचा फॉर्म भरला अन् नेहमीप्रमाणे रांगेत उभ्या राहिल्या. नंबर आला तशी वर न बघताच पैसे काढण्याचा फॉर्म बघून कॅशिअर म्हणाला, ङ्गअहो आजी आजोबांना आवाज द्या. अंगठा  घ्यायचा राहिलाय या वेळेस.फ

‘अहो ते वारलेनं 25 तारखेला. दोन दिवसांनी दहावा आहे. पैसे लागत होते बघा.’

‘अरे बापरे. असं अचानक काय झालं? तुम्ही असं करा  पेन्शन पेमेंट ऑर्डर घेऊन या. आपण फॅमिली पेन्शन क्लेम  करू. आता तुम्हाला हे पैसे देता येणार नाही.’

बाई मटकन् खाली बसल्या. ‘अरे देवा. आता कसं हुईल रे,’ असं पुटपुटत थोड्यावेळाने त्या डोळे पुसत बाहेर पडल्या.

जेवणाच्या सुट्टीत कॅशिअरने सांगितले, ‘त्या सोनावणे आजी आल्या होत्या. ते आजोबा वारले म्हणत होत्या. त्यांचे पेन्शन लोनही आहे आपल्याकडे. आजोबांच्या आजारपणात  त्यांनी घेतले होते. तुम्ही यायच्या आधी.’

‘अहो लवकरात लवकर पेन्शन पेमेंट ऑर्डर पाहून आपण फॅमिली पेन्शनसाठी प्रयत्न करून मंजूर करून घेऊ. त्या गरजू आहेत. दुःखात आहेत. पण आपल्याला कायद्याबाहेर जाता येणार नाही.’ माझ्या आवाजातला करडेपणा मलाच खटकला.

तरीही मी व माझे सहकारी एक उपचार म्हणून आजींच्या घरी  गेलो. थोडीशी वर्गणी आम्ही सोबत नेली होती. तेवढाच आमच्याकडून खारीचा वाटा. आम्हाला  पाहून आजी धाय मोकळून रडू लागल्या. इतकी काळजी घेऊनही मला एकटीला का सोडून गेलात? म्हणून हमसून हमसून रडू लागल्या. आजारपणात सुखदुःखात आम्ही एकमेकांचे सोबती होतो. बाई अगदी केविलवाण्या झाल्या होत्या. आजोबांच्या आयुष्य प्रवासाच्या साक्षीदार होत्या. पुढील एकटेपणाने त्या भोवंडून गेल्या होत्या. घरात एक भकासपणा व्यापून उरला होता.

सुमारे दीडएक महिन्याने एक तरुण व एक वृद्धा माझ्या केबिनमध्ये आले. 35-36 वर्षाचा तरुण पुढे येऊन मला म्हणाला, ‘तुमच्याकडे सोनवणे नावाचे जे पेन्शन खाते आहे. त्या पेन्शनरचा मी मुलगा. गेल्या महिन्यात 25 तारखेला ते वारल्याचे समजले. त्यांच्या  पश्चात ती पेन्शन माझ्या आईलाच मिळायला हवी. ही माझी  आई. त्यांची कायदेशीर पत्नी आहे. मी त्यांचा कायदेशीर वारस आहे.’ त्याने पेन्शन पेमेंट ऑर्डर व केवायसी कागदपत्रे माझ्या पुढ्यात सरकवली.

मी तातडीने पेन्शन लोनचं बाड मागवलं. त्यातली पीपीओ ऑर्डरची झेरॉक्स अस्पष्ट झाली होती. त्या तरुण आजींनी फॅमिली पेन्शनरच्या सह्या केल्या होत्या. ’नंतर आणून देते मूळ प्रत. आम्ही कुठं पळून जातोय?’ असं माझ्या आधीच्या सहकाऱ्यांना अधिकारवाणीने वदवून आजोबांच्या आजारपणात पैशाची नड भागवली होती. प्रेमापायी वेळेला आजारपणात पैसा गोळा केला होता.

‘मी व माझी आई मुंबईला रहातो. शिक्षणाने मी इंजिनियर आहे. तिथेच नोकरी करतो. माझ्या वडिलांच्या सारख्या बदल्या होत. शिक्षण अधिकारी होते ते. त्यांना नादही खूप होते. जिथं जातील तिथं घरोबा करण्याच्या त्यांच्या सवयीला आई कंटाळली. ते एकदम देखणे. परिणामी माझ्या आईसारख्या साधारण दिसणाऱ्या आईशी त्यांचे कधीच पटलं नाही. आईने ट्यूशन करून माझे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आमच्याकडे कायमचीच पाठ फिरवली. तुम्ही पाठवलेल्या पेन्शनच्या पेपर्समुळे मला इथला त्यांचा पत्ता लागला. आता मी कशाला त्यांचे कर्ज फेडू? कोणावर उधळायला माझा पैसा का वर आलाय?’ त्याच्या डोळ्यात नुसता अंगार फुलला होता.

‘म्हटलं तर एकरकमी कर्ज फेडण्याएवढी रक्कम माझ्या खात्यावर जमा आहे. पण मला तसं करायचं नाहीये. ते माझे कोणीही नाहीत, पण तरीही पेन्शन माझ्या आईलाच मिळायला हवी.’

माझ्या मनात पेन्शन लोन रिकव्हरीचा कायदेशीर गुंता अधिकच घट्ट होत गेला. त्या वृद्धा मध्ये पडत शांतपणे आपल्या मुलाला म्हणाल्या, ‘अरे देवमाणसं आहेत रे ही बँकेतली. कागदपत्रांची फारशी चौकशी न करता वेळेला पैसे दिले म्हणून तर उपचार होऊ शकले तुझ्या बाबांवर. माणसातला देव जागा आहे रे. यांच्याच मदतीने बारावंही पार पडल्याचे कळले. रम्या त्यांनी आपल्याला बघितलं नाही म्हणून काय झालं? तिने नक्कीच बघितलं. माझ्याच नशिबात सुख नव्हतं रे. अरे आतातरी या देवमाणसांसाठी पैसे भरून टाक. त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल.’

तिची ही प्रतिक्रिया मला अनपेक्षित होती. मस्तक गोठवणारी होती.

रम्याने लिहिलेल्या चेककडे मी बराच वेळ पहात राहिले. एका मोठ्या होऊ घातलेल्या प्रकरणावर कायमचा पडदा पडला  आणि माझ्या मनात माणुसकीचा रंग अधिक गहिरा झाला.

-अमिता परब

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..