दर्द में डूबे हुए नग़मे हज़ारों हैं मगर
साज़-ए-दिल टूट गया हो तो सुनाए कैसे
लतादीदी आणि त्यांच्या मदनभैय्याने अजरामर केलेले हे गाणे ११ जानेवारीला लता मंगेशकरांना आय सी यूत दाखल केल्यापासून ते ६ फेब्रुवारीच्या सकाळी “ ते” वृत्त कानी येईपर्यंत सतत माझ्या आसपास घुमत होते. त्या दिवसभर बत्थड डोक्याने हिंडत असताना मी मुंबईला सिएट ला असताना स्वतःशी केलेला वादाही विसरलो- लताच्या अंत्ययात्रेत सामील होण्याचा ! सायंकाळी तिच्या पार्थिवाला आगीनडाग देण्याचे दृश्य मी पडद्यावर पाहू शकलो नाही. मग माझ्याशी जोडल्या गेलेल्या ज्ञात-अज्ञात माध्यमांवर श्रद्धांजली बरसू लागली. एकाचवेळी इतक्या अस्सल जीवात्म्यांशी जोडला गेलेला हा दैवी स्वर कानोकानी, पानोपानी व्यक्त झाला. २४ जानेवारीलाच चेहेरे -पुस्तिकेवर मी लिहिले होते- ” काही घडणार असेलच तर मी त्यांवर व्यक्त होणार नाही.” दरम्यान फक्त महेश एलकुंचवारांचे लेखन मला अपील झाले. तू-नळीवरील असंख्य कार्यक्रम, जून्या आठवणी ऐकत राहिलो-वारंवार ! कौशिकी, राहुल देशपांडे, राधिका चोप्रा, आणि आणि आणि —— पण तरीही ” दर्द में डूबे हुए नग़मे हज़ारों हैं मगर ——- ! ”
मध्यंतरी आशाताई,सरसंघचालक भागवत यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने आयोजित केलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमातील विचार ऐकले. खुद्द लताने केलेला “श्रद्धांजली ” कार्यक्रम (हरीश भिमानी बरोबरचा) सतत ऐकला. पण ते आर्त जाता जात नव्हते.
अचानक वृत्तपत्रात बाळासाहेब मंगेशकर पुण्यातील सरपोतदारांकडे येणार असल्याचा आणि त्यांच्या गीतांवर आधारीत ” मानसीचा चित्रकार तू ” हा कार्यक्रम असल्याचं दिसलं.
मला तो “हुंदक्यांचा ओटीपी (One Time Password) ” हातून गमवायचा नव्हता.
आयुष्याची पूर्ण ८० वर्षे आई झालेल्या मोठ्या दीदींच्या निधनानंतर भावगंधर्व पहिल्यांदाच बोलणार होते. ओटीपी काही विशिष्ट वेळेसाठी असतो- त्यादिवशी तो दुपारी ४ ते सायंकाळी ८ पर्यंत व्हॅलिड होता.
कार्यक्रमाचे आकुंचलेले स्थळ, झालेली (अपेक्षित)गर्दी संयोजकांच्या संयमाची परीक्षा घेणारी ठरली. वारंवार निवेदिकेने केलेल्या विनंतीकडे सहज दुर्लक्ष करून गर्दीचे मोबाईल, व्हिडीओ सुरु होते. सुरुवातीला भावगंधर्वांनी संगीत दिलेल्या आणि बहुतांशी दीदींनी गायलेल्या गाण्यांची मैफिल साधारण दीडतास चालली.
फारशी पूर्वतयारी नसलेल्या, आयत्यावेळी गाण्याची संधी मिळाली तर ती घ्यावी अशा बेताने आलेल्या गायिका(?), मोबाईलवर गाणे वाचून गात होत्या. एक-दोघी रिऍलिटी शो वाल्या, एक-दोघी नथ वगैरे घालून आलेल्या- कार्यक्रमाचे गांभीर्य न समजणाऱ्या, नकळत औचित्यभंग करणाऱ्या ! मग प्रत्येकीच्या गाण्याचे फोटो,व्हिडिओ ! सन्माननीय अपवाद एका गायिकेची दोन जिव्हारी गाणी !
साधारण पावणे सहाला पत्नी भारतीताई आणि कन्या राधा बरोबर पंडितजी आले. ” सावरलेले ” दिसत होते पण सुरुवातच त्यांनी दीदींच्या आठवणींनी केली आणि उपस्थितांना विनवलं –
” गेले ३१ दिवस मी दिवसातून केव्हाही कोलमडून पडतोय, डोळे न विचारता भरून येताहेत. बाबा गेले तेव्हा मी साडेचार वर्षांचा होतो, त्यानंतर माई गेली तरी दीदी होती. आता तीही नाही. मी अनाथ झालोय. आयुष्यात वडील कधी कळत नाहीत. मलाही कळले नाही. ”
समोर बसलेल्या वीणाताई देवांची त्यांनी साक्ष काढली – ” वीणाला विचारा, तीही कबूल करेल – आप्पा (गोनीदा) तिलाही कळले नसतील.”
नंतर ते म्हणाले- ” मला ज्ञानेश्वरी कळली नाही आणि दीदीही कळली नाही.”
“ बोझ होता जो ग़मों का तो उठा भी लेते !”
दीड तासभर ते दुःखमग्न झाड,किमान सहावेळा गदगदले, हुंदके आवरत राहिले.
संपूर्ण आठवणींच्या प्रदेशात त्यांनी तीनच गोष्टी कथन केल्या- ” दीनानाथजींचा पुण्यातील मृत्युप्रसंग आणि त्यातून ठामपणे पुण्यात वडिलांच्या नांवानें रुग्णालय काढायचे दीदींनी कसे ठरविले आणि करून दाखविले हा पहिला प्रसंग !
दुसरी आठवण – जिवलगा, राहिले रे दूर घर माझे —– !
वसंतराव देशपांडे आणि काही शिष्यांना पुण्यात शिकविताना “श्रीगौरी ” रागातील एक बंदिश दीनानाथजींनी आळविली आणि आईच्या मांडीवर असताना रुग्ण (हाडरोग) असलेल्या बाळासाहेबांनी ती थोडीफार लक्षात ठेवली. बऱ्याच कालावधीनंतर शांताबाई शेळकेंना ती दिली गीतरचनेसाठी ! ते गीत गायला लतादीदींनी नकार दिला आणि आशाताईंना दिल्यावर वडिलांची रचना आठवल्याने आशाताई गदगद रडल्या. आठ दिवस तयारी करून आशाताईंनी HMV च्या स्टुडियोत हे गीत रेकॉर्ड केले. एका रात्रीत सुधीर फडके, भीमसेनजी आणि अनेक दिग्गजानी बाळासाहेबांचे अभिनंदन केले आणि पुढे इतिहास रचला गेला. त्या रेकॉर्डचा रेकॉर्ड खप कसा झाला, हे त्यांनी कथन केले.
तिसरा प्रसंग- पुण्यात येण्याआधी ते शिवाजी पार्कवर गेले होते आणि एकेकाळी समोर असलेल्या मा.विनायकांच्या बंगल्याच्या आठवणीने मा. विनायक आणि बाणेदारपणे त्यांच्या समोर ठाकलेल्या स्वाभिमानी दीदींची नोकझोक त्यांच्या नजरेसमोर आली.
एवढाच “साज़-ए-दिल ” ऐकवल्यावर ते थकले आणि म्हणाले ” आता थांबतो.”
तरीही ग्रेस,आरतीप्रभू, भटांवरच्या संदर्भहीन प्रश्नाला त्यांनी कसेबसे उत्तर दिले आणि मैफिल थांबली.
माझ्या “ओटीपी ” ची मुदत संपली.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply