नवीन लेखन...

हुरहुरणारा किरवाणी

झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर”.
मराठीतील काही अजरामर कवितांमधील ही एक कविता!! आज जवळपास शतक उलटून गेले तरी देखील या ओळीचा मोह, वाचकांना अनेकवेळा होतो आणि त्यानिमित्ताने अर्थाचे अनेक पदर विशद केले जातात. उत्तम कवितेचे हे एक लक्षण मानावेच लागेल. राग “किरवाणी” ऐकताना, मला बरेचवेळा या ओळी आठवतात. रागाचा समय, प्राचीन ग्रंथांनुसार मध्यरात्र दिलेला आहे. या रागात, “गंधार” आणि “धैवत” स्वर कोमल लागतात आणि त्या कोमल स्वरांचे प्राबल्य अधिक जाणवते. त्यातून, रागाचे सादरीकरण “पिलू” रागाच्या अंगाने जात असल्याने, रागाच्या ठेवणीतच लालित्य अमुर्तपणे सापडते.एकूण स्वररचना आणि त्याची मांडणी बघितली तर मध्यरात्रीच्या घनगर्द अंधारात, तळ्याकाठाची आत्ममग्न शांतता आणि त्याची अनुभूती घेताना, कवितेतील “गोड काळिमा” आणि तळ्यातील झाकोळलेले कृष्ण वर्णीय जल, याचे कुठेतरी आंतरिक नाते जाणवते आणि आपण, रागाचे स्वर ऐकताना, त्या अजरामर वृक्षाच्या संगतीत वावरत असतो.
काहीकाही वाद्ये ही त्या कलाकाराच्या नावाशी इतकी निगडीत असतात की ती वाद्येच जणू, त्या व्यक्तित्वाचा अभेद्य अंश बनून जातात. उस्ताद अली अकबर खान साहेब आणि सरोद, यांचे नाते असेच मांडता येईल. वडिलांकडून खडतर तालीम घेऊन, या वाद्यावर जे अभूतपूर्व प्रभुत्व मिळवले आहे, त्याला तोड नाही. साधारणपणे, तंतू वाद्य म्हटले की त्यातून स्वरांची “सलगता” निर्माण करणे, नेहमीच अवघड बाब असते कारण, स्वर नेहमीच तुटक स्वरूपात सादर होतात. असे असून देखील, वाद्यातून “गायकी” अंग अति तलमपणे मांडून दाखवणे, याला वेगळेच कौशल्य लागते.
प्रस्तुत रचनेत, सुरवातीची जी आलापी आहे, त्यातून रागाची जी “मूर्ती” उभी केली आहे, ती खास ऐकण्यासारखी आहे. प्रत्येक स्वर नितळ, स्वच्छ आणि सुरेल लावलेला आहे. एका स्वराहून दुसऱ्या स्वरावर जो “प्रवास” घडतो, तो देखील जीवघेणा आहे. खरेतर श्रुती तत्वानुसार याचे समग्र विवरण करता येणे शक्य आहे पण तरीही स्वरांचा म्हणून एक स्वभाव आणि त्या स्वभावानुसार निर्माण केलेले भावविश्व केवळ अपूर्व असे आहे. रचना, द्रुत लयीत जाताना देखील, स्वर कुठेही विस्कळीत होत नाही, किंबहुना द्रुत लयीत निर्माण केलेली “मिंड” ऐकणे, हा तर रागाच्या सौंदर्याचा विलोभनीय भाग आहे.
हिंदी चित्रपट गीतांना जर कुणी आधुनिक पेहराव दिला असेल तर तो राहुल देव बर्मन, या संगीतकाराने!! तालाच्या बाबतीत तर या संगीतकाराने इतके प्रयोग केले आहेत की ते प्रयोग ऐकताना, केवळ चकित होणे, इतकेच आपल्या हाती राहते. “अनामिका” चित्रपटातील “मेरी भिगी भिगी सी” हे किशोर कुमारने गायलेले गाणे, आपल्याला किरवाणी रागाची सुंदर झलक दाखवते.
“मेरी भिगी भिगी सी पलको में रह गये,
जैसे मेरे सपने बिखर के;
जले मन तेरा भी, किसी के मिलन को,
अनामिका तू भी तरसे”.
गाण्यात केरवा ताल आहे पण इथे संगीतकाराने मजा केली आहे. ८ मात्रांचा हा ताल आहे आणि याची पहिली मात्रा “धा” या बोलाने सुरु होते आणि इथे संगीतकाराने, ही मात्रा गिटारवर घेतली आहे!! सर्वसाधारण प्रघात असा, मात्रा या आघाती वाद्यांवर घेतल्या जातात पण, इथे पारंपारिक पद्धतीला बगल देऊन, गिटार वाद्याचा सूर, हीच समेची मात्रा ठेवली आहे आणि पुढील मात्रा Actopad वाद्यावर घेतल्या आहेत. परिणाम, गाण्याला संपूर्ण आधुनिक पेहराव!! याचा अर्थ, तालाचे नियम पाळले आहेत पण सादरीकरणात वैविध्य आणले आहे. सुगम संगीतात प्रयोग कसे करता येतात, याचे हे उत्तम उदाहरण मानता येईल. तालासाठी या संगीतकाराने अनेक वैश्विक वाद्यांचा उपयोग केला आहे, जसे “मादल”,”क्लेव्ज”,’ब्लासको” किंवा प्रसंगी ज्याला “न-स्वरी” वाद्ये म्हणता येतील, उदाहरणार्थ झांजेसारखी घन वाद्ये, झायालोफोन, केस्टानेट, खुळखुळे सारख्या वाद्यांचा परिणामकारक उपयोग, हे प्रयोगात्वाचे निर्देशक म्हणता येईल.मुळात, परिणाम साधणे, हे प्राथमिक उद्दिष्ट.
स्वरसंहतीतत्वावर आधारलेल्या भारतीय संगीतासारख्या पद्धतीत एका वेळेस एक स्वर आणि पुढे दुसरा, असे पायाभूत वळण असते. या लक्षणालाच बाजूला सारण्याची धमक दाखवली. आवाजांचे लगाव, तुटक गायन फेक, घसीट किंवा खालच्या स्वरावरून वरच्या स्वरावर जाताना दबाव निर्माण करणे, छोटेखानी ध्वनी विलक्षण चमकदारपणे योजणे, यामुळे संबंधित सांगीत घटना गुंतागुंतीची होते. यातून आपण ठामपणे एक निष्कर्ष सहज काढू शकतो. याचे संगीत, रचनाकाराच्या संभवनीय सर्जनशीलतेच्या दर्जाविषयी खात्री पटविणारे संगीत आहे. त्याने संगीत आकारले ते चित्रपटीय सादरीकरणासाठी. परस्परविरोध, विरोधाभास आणि विसर्जित न केलेले सांगीत तणाव यांचे आकर्षण म्हणजे आधुनिक सांगीत संवेदनशीलता. या संगीतकाराकडे, विशिष्ट रागापासून दूर सरकून देखील रागाचे एकसंधपण आपल्या चाळीस देण्याची प्रशंसनीय क्षमता होती. हे गाणे वास्राविक काहीसे अंतर्मुख करणारे गीत आहे पण ती अंतर्मुखता मांडताना, संयमित भावनावेग आविष्कृत शास्त्रोक्त बाज, किंचित पातळ करून, अतिशय चांगल्या कामी लावला आहे, असे आपल्याला सहज म्हणता येईल. वाद्यांच्या वापरातून आणि रूढ सुरावटीच्या सूचनेतून, ही रचना आपले स्वतंत्र स्वरूपच व्यक्त करीत आहे.तसे बघितले सुरावट सरळ जात आहे पण लयबंध तिरकस जातो आणि आपल्याला ही रचना काहीशी अस्वस्थ करते. गाण्यातील कवितेच्या भावाशयाशी नाते राखून केलेली ही रचना, आपण सहज गुणगुणू शकतो.
आधुनिक गझल गायनात आमुलाग्र बदल करून आणि त्याचा प्रभाव पुढील पिढ्यांवर अव्याहतपणे रुजवण्याचे अलौकिक काम, उस्ताद मेहदी हसन यांच्या गायनाने केले आहे. “शोला था जल बुझाने” ही रचना ऐकताना या वाक्याचे पुरेपूर प्रत्यंतर आपल्याला येते. “किरवाणी” रागावर ही रचना निश्चित आधारलेली आहे. सुगम संगीतात, अत्यंत विपुलपणे जे ताल वापरले जातात, त्यातील “दादरा” तालात ही रचना बांधलेली आहे. शक्यतो अति ठाय लय, खर्जातील स्वरांनी सुरवात करायची आणि मंद्र सप्तक ते शुद्ध स्वरी सप्तक, इतपतच गायनाचा बराचसा आवाका ठेवायचा, अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतील.   अर्थ असा नव्हे, तार सप्तकात गायचेच नाही पण, गाताना, आपण ज्या शायरची रचना गात आहोत, त्याच्या शब्दांवर आणि पर्यायाने आशयाच्या अभिव्यक्तीवर परिणाम होऊ द्यायचा नाही, अशी जणू प्रतिज्ञा केल्याप्रमाणे, गायन केले असल्याने, तार सप्तकात फार काळ गायन होत नाही.
“शोला था जल बुझा हुं, हवाये मुझे ना दो;
मैं कब का जा चुका हुं, सदाये मुझे ना दो”.
या रचनेत, मेहदी हसन नेहमीप्रमाणे, रागाच्या शुद्धतेचे नियम पाळतात पण, तसे करताना, राग संगीतातील अलंकाराचे तंतोतंतपणे सादरीकरण करत नाहीत. वेगळ्या शब्दात, ताना घेताना, शक्यतो पूर्ण सप्तकाचा धांडोळा न घेता, ३,४ स्वरांच्या हरकती घेणे आणि घेताना, हातात असलेल्या शायरीचे सौंदर्य वाढविणे, हा उद्देश अगदी स्पष्ट दिसतो. बरेचवेळा, काही शब्द लयीच्या “मीटर” मध्ये बसणे अवघड जाते, तेंव्हा चालीला मुरड घालायला, त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही आणि हे वैशिष्ट्य जाणीवपूर्वक, त्यांनी आयुष्यभर जपल्याचे दिसून येते.
हिंदी चित्रपट गीतांत “रवींद्र” संगीताचा वापर, ही पूर्वापार चालत आलेली घटना आहे. एकूणच, हिंदी चित्रपट गीतांत, ज्या बंगाली संगीतकारांनी बहुमोल भर टाकली, त्यात संगीतकार हेमंत कुमार, यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मुळातले गायक पण पुढे अनेक रचना करून, व्यामिश्र रचनाकार म्हणून मान्यताप्राप्त झाले. वास्तविक पहाता, त्यांनी शास्त्रीय संगीताचे पायाभूत शिक्षण घेतले नव्हते तरीदेखील, अतिशय मधुर, स्वरेल आणि मन:स्पर्शी गायन, ते सहज करीत असत. त्यांचे तर नेहमी असेच म्हणणे असायचे, कुठलाही रचनाकार, “रवींद्र” संगीत टाळून, रचना करणे शक्य नाही. यातील थोडा अहंकारी भाव सोडला तरी तथ्य काही प्रमाणात आहे आणि ते त्यांनी, आपल्या कारकिर्दीत दाखवून दिले. “नागीन” चित्रपटातील गाण्यांनी, त्यांची, रचनाकार म्हणून ओळख मुंबईला आणि पर्यायाने देशाला झाली. याच चित्रपटातील, “मेरा दिल ये पुकारे आजा” हे गाणे, किरवाणी रागाची दाट छाया दाखवते. केरवा तालात बांधलेल्या या रचनेत, एक अश्रूत गोडवा आहे. चाल तशी साधी, सरळ आहे पण सहज गुणगुणता येत असल्याने, ही रचना कमालीची लोकप्रिय झाली.
“मेरा दिल ये पुकारे आ जा,
मरे गम के सहारे आ जा;
भीगा भीगा हैं समा,
ऐसे में है तू कहां”.
एकूणच त्यांच्या कारकिर्दीकडे जरा बारकाईने बघितले तर काही वैशिष्ट्ये लगेच आपल्या ध्यानात येतील. हेमंतकुमारांना पाश्चात्य संगीत किंवा आगळे वेगळे स्वनरंग, यांचे फार आकर्षण दिसत नाही. त्याचप्रमाणे, अतिद्रुत आणि हिसकेबाज हालचालीस पूरक असे नृत्यासंगीत देखील फारसे आवडत नव्हते. नागीन मधील नृत्यगीते, याला प्रमाण म्हणून दाखवता येतील. तरी देखील, गाण्यात “हुंकार” इत्यादी ध्वनीद्रव्यांचा वापर करण्याची आवड, अनेक रचनांमधून आपल्याला दिसून येईल. “नागीन” चित्रपटाचे संगीत इतके गाजले की ती लोकप्रियता, त्यांना चक्क अडचणीची वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झाली.  एक प्रकारचा हळवेपणा आणि अ-दृश्याची ओढ, हे भाव, त्यांच्यातील रचनाकाराला नेहमी आव्हानात्मक वाटावेत, इतक्या मुबलक प्रमाणावर त्यांनी रचना केल्या आहेत. अर्थात, अशा रचनांवर देखील कुठेतरी “रवींद्र” संगीताची पडछाया दिसून येते. ‘रवींद्र” संगीत(च) नव्हे तर बंगाली लोकसंगीतातील “बाउल””कीर्तन” या शैलींचा देखील अतिशय परिणामकारक वापर केलेला आढळतो. मघाशी मी ज्या “अ-दृश्य” गीतांचा उल्लेख केला, त्यात परत, लयहीन अंतलक्षी कुजबुज, मग्न पठण, यांचा मुख्य हेतू म्हणून हळूहळू गायनापर्यंत पोहोचणारी संगीतस्पंदने, यातून गीत उभे करण्याचे त्यांचे कौशल्य खास वाखाणण्यासारखेच होते. अशी गाणी जणू, आपल्याला ते संगीतमय धुक्यात गुरफटून टाकण्याची अलौकिक किमया करतात. जरी पाश्चात्य संगीताकडे ओढा नसला तरी देखील, काही रचनेतून, त्याचा अंधुकसा प्रत्यय नक्कीच येतो.
“संगीत विद्याहरण” नाटकातील “सूर सुखखनी तू विमला” हे पद किरवाणी रागाची स्पष्ट ओळख दाखवते. पंडित वसंतराव देशपांड्यांनी प्रसिद्ध केलेले हे पद, या रागाचे “चलन” ओळखण्यासाठी सुरेख. काव्य म्हणून बघायला गेल्यास, रचनेतील संस्कृतप्रचुर शब्द आपल्या आस्वादात विघ्न आणतात. अर्थात त्यावेळची बहुतेक सगळी गाणी वाचायला म्हणून घेतली तर आपल्याला हाच अनुभव येईल आणि याचे मुख्य कारण, बहुतेक सगळे संगीतकार हे मुळातले रागदारी संगीतातील गाजलेले कलाकार असल्याने, जसे रागदारी संगीतात शब्दांना महत्व अजिबात नसते आणि तोच “आकार” नाटकातील गाण्यांसाठी घ्यायचा म्हटल्यावर मग, त्या रागातील एखादी चीज घ्यायची आणि त्या चीजेचा “मीटर” मध्ये सुसंगत बसेल अशी काव्यरचना करायची, असा बराचसा सरधोपट मार्ग होता. प्रस्तुत गाणे या विचाराला चुकूनही अपवाद नाही परंतु वसंतरावांचे गाणेच इतके जबरदस्त असायचे की, गाताना कवितेचा आस्वाद घ्यायचा, ही जाणीवच आपल्या मनात येत नाही आणि इथे संगीत या कलेच्या महत्तेची कसोटी आपल्याला मिळते.
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..