चित्रकार असो , लेखक असो . कवी असो ज्याचे त्याचे स्वतःचे असे विश्व् असते. तो त्यात रमतो तर काहीजण अत्यंत चातुर्याने आपला कार्यभागही साधू शकतात. अशी अनेक प्रकारची व्यक्तिमत्वे आजूबाजूला बघावयास मिळतात. चित्रकार किंवा चित्र काढणे आणि त्याचा अभ्यास करणे या गोष्टीना आपल्या मध्यमवर्गात कधीच सहजपणे थारा मिळत नाही. आज आय. टी . च्या दिवसात , पँकेजच्या दिवसात तर कमीच. गुणवत्ता असली तरी घरची किंवा दारची परिस्थिती त्याला पॅकेज स्विकारण्यास मजबूर करते आणि तो स्वतः असे ‘ पँकेज ‘ होतो आणि त्याची नियती त्याला खेळवत रहाते आणि त्याचे रूपांतर काही वर्षाने फ्रस्ट्रेशन मध्ये होते. परंतु काहीजण बंड करून उठतात आणि मनोमन निर्धार करतात मी ‘ चित्रकारच ‘ होणार.
आज आपण अशा तीन चित्रकारांच्या स्वाक्षऱ्या बघणार आहोत . त्यातील दोघे आहेत सेल्व्हाडोर दाली , एम.एफ. हुसेन आणि एस . एच . रझा. हुसेनना तर मी शो मन चित्रकार मानतो कारण त्यांच्याकडे जे टायमिंग आहे ते कुणाकडे नव्हते. सुप्रसिद्ध होण्याचे आणि वादग्रस्त होण्याचे टायमिंग त्याच्याकडे जबरदस्त होते. त्यांची सुरवातीपासूनची चित्रे बघीतली तर सतत ते बदलत आले आहेत ‘ मे बी पब्लिक डिमांड ‘ किंवा ‘ स्वतःची डिमांड ‘ . त्यांच्या विविध प्रकारच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यांना मनाला वाटेल तसे ते चित्र काढत, गिमिक करत आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वाक्षऱ्या देखील वेगेवगेळ्या असत. त्यांच्या स्वाक्षरीमधील पाहिले अक्षर ‘ एच ‘ असे आहे ते अक्षर बरेच काही सांगून जाते. कारण हे पहिले अक्षर त्यांची सौदर्यासक्तता दाखवून जाते , कारण ‘ एच ‘ ची मोठी गाठ आहे ती वादग्रस्त आहे. त्यांनी अनेकवेळा काय बहुतेकवेळा घोड्यांची चित्रे काढली , कदाचित इडिपस चा प्रभाव जास्त असेल कारण ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या ‘ अनवाणी ‘ पुस्तकात वाचताना बरेच काही जाणवते. त्यांच्या एका कवितेत ‘ मा-अधुरी ‘ असे शब्द आलेले आहेत या कवितेत खूप काही जाणवते. हुसेन आम्हाला पचला नाही तर दाली आम्हाला कसा पचेल त्याबद्दल पुढे बघणारच आहोत . हुसेनची स्वाक्षरी इतकी भन्नाट आहे . कधी लांबलचक आहे तर कधी लहान . त्यांच्या मनात नवनवीन कल्पना येत असत आणि ते त्या कल्पना साकार करत असत. माधुरी दीक्षित यांच्यावर काढलेली बहुतेक चित्रे मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत ती चित्रे पहाताना ह्या माणसाची सौदर्यदृष्टी अजब होती , त्यानंतर त्यांनी ‘ गजकामिनी ‘ हा चित्रपट काढला. अर्थात तो त्यांचा स्वतःच्या विचारातून निर्माण केलेला चित्रपट होता. त्यांची स्वाक्षरी लांब आणि खाली आलेली असे , त्याच्या स्वाक्षरीचे खाली येणे हे देखील त्यांच्या कीर्तीला मारक होते हे पुढे सिद्ध झाले आहे. अत्यंत चंचल अशा वृतीचा हा माणूस होता. लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची प्रचंड आवड आणि ते काही अशा गोष्टी करत त्या त्यांच्या अंगाशी येत असत अर्थात त्यामुळे तर सेल्व्हाडोर दाली याच्या स्वाक्षऱ्या इतक्या भन्नाट आहेत की आपण चक्रावून जातो . त्याचा पेहेराव विशेषतः त्याच्या मिशा आणि त्यांनी जे काही कला क्षेत्रात उद्योग केले ते भन्नाट आहेत. त्याने पेंटिंग , चित्रकला , फोटोग्राफी , शिल्पकला लेखन , चित्रपट , राजकारण काय काय नाही त्याने केले. त्यांच्या पैंटिंग्स वर रेनेसेन्स चा प्रभाव होता.
दालीच्या अनेक प्रकारच्या स्वाक्षऱ्या बघण्यात येतात त्यातील काही काही फ्रॉड होत्या असे म्हटले जाते .परंतु वेगवेगळे बदल त्यात दिसत आहेत. आणखी एक तो कुठे गेला की बहुतेक चेकने पेमेंट करत असे कारण त्याचा असा समज होता की अनेकजण चेकवर त्याची स्वाक्षरी असल्यामुळे कॅश करणार नाही आणि असेच अनेकवेळा घडले आहे , अनेकांनी ते चेक जपून ठेवले आहेत आणि पुढे विकले आहेत. आपण जी दालीची स्वाक्षरी बघत आहोत ती पाहिली की तो काय जबरदस्त माणूस होता हे लक्षात येते. त्याचे ‘ घड्याळाचे चित्र ‘ बघीतले तरी कल्पना येते , त्याने त्यात वेगवेगळ्या स्वरूपात ‘ मल्टीपल घड्याळे ‘ काढली आहेत , त्या घड्याळाच्या जागा बघितल्या तर कल्पना येते , काय भन्नाट कल्पनाशक्ती आहे . ते चित्र न्यू यॉर्क येथील संग्रहालयात आहे. सगळे काही अचाट होते तो पूर्ण शोमन होता. त्याची स्वाक्षरी त्याचा शोध घेण्यास मजबूर करते तरी हातात ठोस काही लागत नाही कारण मनाची प्रचंड कार्यक्षम चंचलता आहेच आणि विचारांची प्रचंड अनिरबन्ध आदोलने आहेत. त्याची डॉक्युमेंटरी बघीतली तर कळतेच हा दाली कुणाच्या आवाक्यातला नाही. बरे झाले तो स्पेनमध्ये जन्माला आला कारण आपल्या इथे कितीतरी कचकड्यांच्या भावनांना त्याच्या चित्रांमुळे तडे गेले असते. तो लहानपणी जिथे राहिला त्या जागेचा , खडकाळ जागेचा प्रभाव त्याच्या अनेक चित्रांवर दिसतो. तो ज्या वातावरणात वावरला त्या वातावरणाने त्याच्या चित्रातही त्याचा पिच्छा सोडला नव्हता. त्याची स्वाक्षरी भन्नाट तर आहेच तितकीच अनाकलनीय कारण तो कोणत्या क्षणी काय करेल याचा नेम नाही.
तर ह्या दोघांच्या विरुद्ध होते एस. एच रझा . अत्यंत मृदू व्यक्तिमत्व आणि विलक्षण रंगसंगती . रझा साहेबांची चित्रे बघीतली तर विलक्षण वेगळी आणि अध्यात्माची डूब असलेली अर्थात हे अध्यात्म कुठल्याही जपमाळेमधील नव्हते तर वैश्र्विक होते. त्यांनी पुढे ‘ बिंदू ‘ हा त्यांच्या चित्रांचा पाया ठरला. क्युबिझम देखील जाणवते तर बिंदू आणि त्यातून निघालेली वर्तुळे असोत. सर्व काही वेगळे होते , मनाला आनंद देणारे आहे , भडकपणा कुठेही नव्हता. त्यांची स्वाक्षरी अत्यंत छोटी परंतु उंच अशी आहे आणि अत्यंत ‘ सॉफ्ट ‘ हाताने ते स्वाक्षरी करत असत. त्यांच्या स्वाक्षरीमध्ये दुर्बोधता कुठेही नहती परंतु त्यांची स्वाक्षरी दुर्बोधतेकडे झुकणारी आहे. स्वाक्षरी करतं त्यांना अत्यंत शार्प टोकाचे पेन लगे. मी त्यांना अनेकवेळा भेटलो , बोललो देखील आहे . त्यांनी राजस्थान नावाचे चित्र काढले ते कसे काढले आणि ते काढण्यामागील त्यांची भूमिका काय होती हे मला गप्पा मारताना समजावून संगितले होते. एकदा त्यांना स्वाक्षरीकरता मोठे स्केच पेन दिले कारण त्यांची स्वाक्षरी बॅटवर घायची होती. त्यांनी जो बिंदू काढला तो मोठा काढला गेला ते थोडे खट्टू झाले परंतु स्वाक्षरी मात्र केली. त्यांच्या चित्रांमध्ये एक वगेळेपण होते ते म्हणजे अत्यंत सॉफ्ट मनाने काढलेली चित्रे असत हुसेन सारखे दणादण फराटे नसत कारण त्यांची तशी प्रवृत्तीही नव्हती . हुसेन रझा या दोघांनाही भेटण्याचा प्रमाणे अनेक वेळा आला.
खरे तर तिघेही चित्रकलेमधील वेगळे ‘ शो मन ‘ होते. परंतु रझा साहेब दोघांच्यापेक्षा अत्यंत भिन्न. त्यांचीही चित्रे दुर्बोध असत परंतु ती दुर्बोधता अत्यंत सॉफ्ट असे . त्यांची चित्रावर स्वाक्षरी असेल तर अत्यंत छोटी असे , काही चित्रांवर स्वाक्षरी नसे .
चित्र आणि त्यावरील चित्रकाराची स्वाक्षरी हा अत्यंत वेगळा अभ्यासाचा विषय आहे असे मला अनेकवेळा वाटते. हुसेनने अनेक वेळा चित्रे खरडले आहेत , कधी तो सही करत असे तर कधी सही म्ह्णून फराटा असे. डालीच्या चित्राखाली स्वाक्षरी वेगेवेगळी असेअस. १९८३ मध्ये त्याने पर्फुम तयार केला होता त्याच्या बाटलीवरील स्वाक्षरी अत्यंत वेगळी आहे . हा परफ्युम त्याने त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ तयार केलेला होता. त्यानंतर त्याने दोन आणखी परफ्युम केले होते.
अशी ही तीन व्यक्तीमत्वे आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या पाहिल्या तर भिन्न आहेत . त्यांच्या वृत्ती , त्यांची चित्रे , त्यांचे कर्तृत्व सर्वकाही भिन्न आहे तिघेही आपापल्यापरीने शो मन होते. अर्थात ह्या चित्रकारांच्या चित्राखाली स्वाक्षरी असणे महत्वाचे होते कारण त्यांची अनेक खोटी चित्रे बाजरात फोर्जरी करून आलेली आहेत.
तेव्हा चित्रावरील किंवा चित्राखालील स्वाक्षरीला खूपच किंमत आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
अशा अनेक चित्रकारांच्या चित्राखाली केलेली स्वाक्षरी चित्राला तारक आहे , का बाधक .
-सतीश चाफेकर
Leave a Reply