नवीन लेखन...

हुतात्मा भाई कोतवाल

विठ्ठल लक्ष्मण तथा हुतात्मा भाई कोतवाल यांचा जन्म १ डिसेंबर १९१२ रोजी माथेरान येथे झाला.

अफाट बुध्दीमत्ता,अचाट कर्तुत्व,पराकोटीचे मातृप्रेम,कमालीचे संघटन कौशल्य लाभलेल्या भाई कोतवालांचा जन्म निसर्गरम्य माथेरानमध्ये एका गरीब कुटुंबात झाला. जेमतेम ३१ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या हुतात्मा कोतवाल यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण राष्ट्राला समर्पित केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण माथेरान येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते आपल्या आत्या गौरीताई हळदे यांच्याकडे पुणे येथे गेले. पुण्यात शिक्षण घेताना शि.म.परांजपे यांच्या काळमधील लेखांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला. वि.दा.सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर, तसेच जोसेफ मॅझिनी, गॅरी बोल्डी यांच्या पुस्तकांनी त्यांच्या मनातील स्वातंत्र्याच्या उर्मी जागृत केल्या. आपले पदवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पुण्यातील वाडिया महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथे शिक्षण घेऊन सन १९४१ साली ते वकील झाले.

भाई कोतवालांचा विवाह १९३५ मध्ये पुण्यातील इंदू तिरलापूरकर यांच्याशी झाला. त्यांना भरत आणि जागृती अशी दोन मुले होती. आपल्या वडिलांचा परंपरागत व्यवसाय न करता त्यांनी वडिलांच्या इच्छे विरुद्ध माथेरान येथे समाजकार्य सुरु केले.त्यांनी मुंबई किनारपट्टीवरील वादळाचा तडाखा बसलेल्या कोळी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला.त्यानंतर राजाराम उर्फ भाऊसाहेब राऊत यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उडी घेतली.त्यांनी माथेरान परिसरातील सामान्य जनतेला मतदानाचा हक्क मिळवून दिला. तसेच मतदार यादीत त्यांची नावे टाकण्यास मदत केली.त्यांनी भूमीहिनांच्या मुलांसाठी 42 voluntary school सुरु केल्या. दुष्काळाच्या वेळी जमीनदारांनी गरीब शेतकऱ्यांना धान्य देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी भाऊसाहेब राऊत यांच्या आर्थिक साहाय्याने गरिबांसाठी धान्य बँक सुरु केली. त्यांच्या अशा या सामाजिक कार्यामुळे ते सन १९४१ साली माथेरान सिटी कौन्सिल मध्ये Vice Chairman म्हणून निवडून आले.

आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. ९ ऑगस्ट १९४२ च्या महात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या चले जाव चळवळीत ही ते सहभागी होते. ब्रिटिशांनी सदर चळवळीत सामील झालेल्या मोठ्या नेत्यांना अटक केली होती. त्यात भाई कोतवाल हि होते.त्यानंतर ते भूमिगत झाले. भूमिगत होऊन त्यांनी “कोतवाल दस्ता”नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेत ५० जणांचा सहभाग होता. त्यात शेतकरी आणि शिक्षकांचा सहभाग होता.यात त्यांचे चुलत बंधू आणि आते भाऊ दत्तोबा हळदे हि सामील होते. १९४२ च्या चळवळीत भाई कोतवाल, हिराजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज सरकारला अक्षऱशः सळो की पळो करून सोडलं होतें. ते व त्यांचे सहकारी रेल्वेचे रूळ उखडून टाकायचे, विजेच्या तारा तोडायचे, अन्य घातपाती कारवाई करून जंगलात पसार व्हायचे. या गनिमीकाव्यामुळं सरकार त्रस्त झालं होतं मात्र जंग जंग पछाडल्यानंतरही भाई आणि त्यांच्या साथीदारांना पक़डण्यात सरकारला यश येत नव्हतं.

त्यांनी मुंबई शहराला वीज पुरवठा करणारी प्रमुख वीज वाहिनी कापण्याचे काम सप्टेंबर १९४२ ते नोव्हेंबर १९४२ या कालावधीत त्यांनी ११ वेळा केले. त्यांच्या या कृत्यामुळे ब्रिटिश पोलिसांनी भाई कोतवाल यांना पकडण्यासाठी ५०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आणि त्यांना पकडण्यासाठी हॉल आणि स्टॅफोर्ड या अधिकाऱ्यांची नेमणूक केली. ज्यावेळी ” कोतवाल दस्ता” मुरबाड तालुक्यातील सिद्धगड च्या घनदाट जंगलात लपलेले असताना त्यांनी मदतीसाठी एक पत्र आपल्या सहकाऱ्यांना पाठवले. परंतु ते पत्र एका जमीनदाराच्या हाती लागले. त्या जमीनदाराने ते पत्र ब्रिटिश अधिकारी हॉल याला दिले. २ जानेवारी १९४३ च्या दिवशी भल्या पहाटे आझाद दस्ता दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या दृष्टीने मदतीची वाट पाहत असताना ब्रिटिश अधिकारी हॉल आणि स्टॅफोर्ड यांच्या पथकाने समूहावर हल्ला चढविला. या हल्ल्यात आझाद दस्त्याच्या गोमाजी पाटील यांचा तरुण मुलगा हिराजी पाटील शहीद झाला.सदर हल्ल्यात भाई कोतवालांच्या मांडीला गोळी लागल्यामुळे त्यांना जागचे हालताही येत नव्हते. अशातच क्रूर हॉल ची नजर भाईंवर पडली .त्याने क्षणाचाही विलंब न करता भाईंवर गोळी झाडली, आणि २ जानेवारी १९४३ रोजी अखेर सिध्दगडच्या पावनभूमीत रायगडचा हा सुपूत्र हुतात्मा झाला.

भाई कोतवाल यांच्या जीवनावर आधारीत ‘शहीद भाई कोतवाल’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अनेक दिग्ग्ग्ज कलाकारांनी काम केले असून त्यात अरुण नलावडे, कमलेश सावंत, श्रीरंग देशमुख, गणेश यादव, मिलिंद दास्ताने, पंकज विष्णपूरकर, परवेझ खान, वकार, जॉन, अभय राणे, सिद्धेश्वर झाडबुके, एकनाथ देसले, परेश हिंदुराव, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर, प्राजक्ता दिघे आणि पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत मोसमी तोंडवळकर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..