नवीन लेखन...

न किसी की आँख का नूर हूँ (१८५७शी निगडित सुप्रसिद्ध गझलबद्दल)

प्रास्ताविक :

२००७ मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाला १५० वर्षें पूर्ण झाली. कांहीं लोकांनी त्याची दखल घेतली न घेतली. २०१२ मध्ये, त्या स्वातंत्र्यसमराचा घोषित नेता, अखेरचा मुघल बादशहा बहादुरशाह ज़फ़र याच्या मृत्यूला १५० वर्षें झाली. त्याकडे फारसें कुणाचेंच लक्ष गेलेलें नाहीं.

२००७च्या शंभर वर्षें आधी, जेव्हां १८५७ च्या ‘गदर’ला ५० वर्षें पूर्ण झाली होती, तेव्हां स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ग्रंथ लिहून, हें प्रथम वेळी दाखवून दिलें की, हें बंड नव्हतें, तर स्वातंत्र्ययुद्ध होतें.

२००७ या वर्षाच्या ५० वर्षें आधी, हिंदी चित्रपटसृष्टीतून १८५७च्या घटनांची एक प्रकारें दखल घेतली गेली, आणि ती घेतली गेली ‘लाल क़िला’ या चित्रपटामुळे. १९६० साली हा सिनेमा प्रदर्शित झाला. म्हणजेच, त्याआधी काहीं काळ त्याची संकल्पना होऊन त्याचें चित्रीकरण झालें होतें. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाला १९५७ सालीं १०० वर्षें पूर्ण झालेली होती. त्यामुळे, त्या वेळी हा सिनेमा समयोचित होता, असें म्हणायला हवें. या सिनेमाचे निर्देशक होते नानाभाई भट, व संगीतकार होते एस्. एन्. त्रिपाठी.

या सिनेमात एक गझल आहे, ‘न किसी की आँख का नूर हूँ’. अतिशय साधे सोपे शब्द असलेली ही गझल काळजाला भिडते. मोहम्मद रफी यांनी ही गझल इतकी दर्दभरी गायली आहे की मन उदास-उदास होऊन जातें, पापण्या ओल्या होतात. मात्र, ही गझल ‘लाल किला’ चित्रपटासाठी म्हणून मुद्दाम अशी लिहिलेली नाहीं, तर ती उर्दू साहित्यातून घेतलेली आहे. इतरत्रही दुसर्‍या अनेक गायकांनी ही गझल गायलेली आहे. गायक व रसिक श्रोते, दोघांनाही ही गझल प्रिय आहे.

आपण या प्रसिद्ध गझलचा अभ्यास करणार आहोत, तिच्या अंतरंगात जाणार आहोत.

किसी की आँख का नूर हूँ’  :

उर्दू साहित्यातील ही गझल कुठल्या शायरनें लिहिलेली आहे? पूर्वीच्या काळी, ग़ज़लगो (गझल रचणारा शायर) गझलच्या मक्त्यामध्ये स्वत:चें नाव गुंफत असे. (गझलचा अंतिम शेर, जर त्यात शायरनें स्वत:चें नाव गोवलेलें असेल, तर त्याला ‘मक़्ता’ म्हणतात ; व तसें नाव गुंफलेलें नसल्यास त्याला केवळ ‘आख़री शेर’ असे म्हणतात). हल्लीच्या काळीं मक्ता लिहायची पद्धत कमी झाली आहे; पण स्वत:चें नांव गुंफणें जुन्या काळी प्रचलित होतें; व उपयोगीही होतें, कारण छपाईचा प्रसार झालेला नव्हता, आणि गझल कुणी रचली हें मक्त्यातून कळत असे.

मक्ता :

आपण मक्त्याची कांहीं उदाहरणें पाहू या, म्हणजे हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.

मिर्झा गालिबच्या ‘नुक्ताचीं है ग़मे दिल’ या गझलचा मक्ता पहा –

इश्क़ पर ज़ोर नहीं, है ये वो आतिश ग़ालिब

जो लगाये न लगे और बुझाये न बने ।

शकील बदायूनीच्या ‘ऐ मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ या गझलचा मक्ता बघा  –

जब हुआ ज़िक्र ज़माने में मुहब्बत का शकील

मुझको अपने दिले नाकाम पे रोना आया ।

या गझला अनुक्रमे गालिब व शकीलच्या आहेत, हें आपोआपच मक्त्यावरून कळून येतें, तेथें संदेहाला जागा रहात नाहीं.

याच शायरांच्या अन्य दोन गझलांचे मक्ते पहा. त्यांनी दाखवलें आहे, स्वत:चा तख़ल्लुस किती सुंदर प्रकारें मक्त्याच्या वाक्याच्या अर्थात गुंफता येतो तें.

गालिबच्या ‘कोई उम्मीद बर नहीं आती’ या गझलचा मक्ता पहा –

काबे किस मुँह से जाओगे ग़ालिब

शर्म तुमको मगर नहीं आती ।

शकीलच्या ‘मेरे हमनफ़स मेरे हमनवा’ या गझलचा मक्ता पहा –

वो उठे हैं लेके ख़ुमो-सुबू, अरे ओ शकील कहाँ है तू

तेरा जाम लेने को बज़्म में कोई और हाथ बढ़ा न दे ।

‘न किसी की आँख का नूर हूँ’ या गझलला मक्ता नाहीं ; त्यामुळे रचयित्याबद्दलचा संभ्रम :

मक्ता असा बहुपयोगी असतो खरा, पण ‘न किसी की आँख का नूर हूँ’ या गझलला मक्ता नाहीं. सर्वत्र असें मानलें जातें की, ही गझल बहादुरशाह ज़फ़र यानें लिहिलेली आहे. ‘लाल क़िला’ सिनेमाच काय, पण अनेक पुस्तकांमध्ये (व इंटरनेटच्या अनेक वेबसाइटवरही) असाच उल्लेख आढळतो. या गझलला मक्ता कां नाहीं, तें सांगणें कठीण आहे, कारण पूर्वी साधारणपणें शायर मक्ता लिहीत असत. जफ़रच्या अनेक गझलांना मक्ता आहे, पण कदाचित या विशिष्ट गझलचा मक्त्याचा शेर लिहायचा राहिला असेल व गझल अपुरीच राहून गेली असेल. (उदा. गालिबच्या ३ किंवा ४ शेरांच्या गझला आपण त्याच्या दीवानमध्ये म्हणजे गझलसंग्रहात पाहतो, अन् अर्थातच त्या गझला अपूर्ण आहेत हें उघड आहे). किंवा, कदाचित मूलत: या गझलला मक्ता असेलही, पण तो लिखित स्वरूपात आला नसेल. पुढे आपण पहाणारच आहोत की, आयुष्याच्या शेवटच्या काळात जफ़र रंगूनला इंग्रजांच्या कैदेत होता. असें म्हणतात की, रंगूनच्या बंदीवासात जफ़रला कागद व लेखणी वापरायची परवानगी नव्हती, व तो भिंतींवर काडीनें लिहीत असे.

(सर्वांना माहीतच आहे की, काळ्या पाण्याची शिक्षा झालेली असतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही अशीच अडचण होती, व त्यांनी आपलें ‘कमला’ हें महाकाव्य खोलीच्या भितींवर बाभळाच्या काट्यानें लिहिलें होतें. पण सावरकर त्या वेळी तरुण असल्यामुळे आपलें काव्य मुखोद्गत करूं शकले. ज़फ़र त्या वेळी होता

८२ हून अधिक वयाचा म्हातारा, तो काय काव्य पाठ करणार ! ). किंवा, कदाचित, गझलला मूळ मक्ता असेलही, पण नंतर हस्तलिखित-प्रती काढतांना तो हरवला असेल, असेही शक्य आहे. १८५७ च्या धामधुमीत ज़ौक या प्रसिद्ध शायरच्या अनेक काव्यरचना नष्ट झाल्या. तर मग, त्यानंतरच्या काळात एखाद्या शायरच्या एका गझलचा मक्ता लुप्त होणें, अन् तेंही दूर रंगून येथून बहादुरशाहचें बंदीवासातील लिखाण दिल्लीला आणतांना होणें, सहज संभव आहे. पण ज़फ़रच्या अन्य कांहीं गझलांनाही मक्ता नाहीं, हेंही खरें. मात्र, मक्ता नसल्यामुळे, ‘न किसी की ..’ ही गझल कुणी रचली याबद्दल संभ्रम आहे.

ज़फ़रची म्हणून ओळखली जाणार्‍या एका अन्य (‘लगता नहीं है जी मेरा’, या) गझलच्या, ‘उम्रे दराज़ माँग के लाए थे चार दिन । दो आरज़ू में कट गए दो इन्तज़ार में ।’  या शेरच्या रचयित्याबद्दलही अशाच प्रकारचा संभ्रम आहे. ‘दि लास्ट मुघल’ हें पुस्तक लिहिणारा विलियम डॅलरॅमपल (William Dalrymple) यानें नोंदवलें आहे की, पाकिस्तानी विद्वान इमरान खान याच्या मतें हा शेर बहुतेक करून सीमाब अकबराबादी याचा आहे.

इंटरनेटवरील एका वेबसाइटवर, या गझलच्या ‘प-ए-फ़ातहा ….’ या शेरमध्ये, ‘ज़फ़र अश्क कोई बहाए क्यों’ असे शब्द दिसतात. (आपण हा शेर नंतर पहाणारच आहोत). अर्थात, ती ओळ खरी असल्यास, ती ओळ असलेला ‘प-ए-फ़ातहा ….’  हा शेर मक्ता ठरेल. पण अन्यत्र विशेष कुठेही, पुस्तकांमध्ये अथवा इंटरनेटवर, ही ओळ दिसत नाहीं. दुसरें म्हणजे, ही ओळ जर ज़फ़रची असती, व पर्यायानें जर या गझलला मक्ता असता, तर मग तिचा रचयिता शायर कोण, असा संभ्रम निर्माण झालाच नसता. त्यामुळे आपल्याला ही ओळ विचारात घेतां येत नाहीं.

अब्दुल हलीम सानी लिहितात की, ‘अब ये साबित हो चुका है कि ये मशहूर ग़ज़ल …. हक़ीक़त में बहादुरशाह ज़फ़र की नहीं बल्कि मुज़्तर ख़ैराबादी की है।’ (इंटरनेटच्या कांहीं वेबसाइट्सवरही असा उल्लेख आहे). त्याअर्थी अन्य कांहीं विद्वान व रसिक तरी नक्कीच असेंच मानत असले पाहिजेत. हल्लीच,

जावेद अख्तर यांनीही असेंच म्हटल्याची बातमी आली आहे. मुज्तर फैजाबादी हे जावेद अख्तर यांचे पूर्वज होत. (जावेद अख्तर हे, आतां मुज्तर फैजाबादी यांच्ये काव्य प्रकाशित करत आहेत).

साजन पेशावरी, त्यांनी संपादित केलेल्या, ‘चर्चित शायर : प्रतिनिधि शायरी’ या पुस्तकात लिहितात की, कांहीं लोकांच्या मतानुसार ‘न किसी की आँख का ..’ ही गझल ‘हश्र’ हसामी (हश्मी?) याची आहे. त्या संदर्भात ते हश्रचें नांव गुंफलेला मक्ताही देतात. जर, मक्त्यात गुंफलेल्या नांवाच्या आधारें, खरोखरच ही गझल हश्रची असती ; तर मग तिचा रचयिता शायर कोण, असा संभ्रम सर्वत्र निर्माण कशाला झाला असता ? त्यामुळे हश्रचें नांव असलेला मक्ता कसा विचारात घ्यायचा ? (तरीही आपण त्या शेरचा नंतर अभ्यास करूं ) .

अयोध्याप्रसाद गोयलीय यांनी आपल्या १९५१च्या ‘शेरो सुख़न’ या सहा खंडांच्या ग्रंथराजातील पहिल्या भागात ज़फ़रचें कांहीं काव्य दिलेले आहे, व त्याच्या गुणवत्तेबद्दल चर्चाही केलेली आहे. मात्र, या विशिष्ट गझल व शेरबद्दल त्यांनी कांहींही लिहिलेले नाहीं. ‘कुल्लियात-ए-ज़फ़र’ हा ज़फ़रच्या संपूर्ण काव्याचा संग्रह उपलब्ध आहे. याचे ४-५ खंड आहेत. भारतात, (बंगालमध्ये), छपाईची कला १९व्या शतकाच्या पहिल्या दशकातच आलेली होती. नंतर, जफ़रच्या काळातील दिल्लीतही ती येऊन पोचली होती. ज़फ़र दिल्लीत असतांनाच ‘कुल्लियात-ए-ज़फ़र’ चे खंड छापले गेले होते. त्यांच्या मदतीनें कदाचित अशा प्रश्नांची उकल होऊं शकेल. पण, अर्थातच, ज़फ़रनें नंतरच्या काळात रंगूनला कैदेत असतांना लिहिलेले काव्य कुल्लियातमध्ये त्याच्या हयातीत आलें असणें शक्य नाहीं. (‘न किसी की ..’ या गझलच्या शब्दांमधे कांहीं पाठभेद आहेत, याचेंही हेंच कारण असूं शकेल).

मात्र, सर्वसाधारणपणें ‘न किसी की आँख का नूर हूँ’ या गझलचा उल्लेख ज़फ़रची गझल असाच होतो; व नक्कीच ही गझल बहादुरशाह ज़फ़रची व्यथा प्रगट करते. आणि, आपण जेव्हां हिच्या अंतरंगात डोकावू, तेव्हां आपल्याला असेंच जाणवेल की, जर ही गझल मुज़्तर ख़ैराबादी यांनी लिहिली असेल, तरीही, त्यांनी, जणूं कांहीं बहादुरशाहचा दर्द, क्लेश, हताश मनस्थिती, यांना शब्दरूप देण्यासाठीच ती लिहिली असावी.

पुढे जाण्यापूर्वी, बहादुरशाह ज़फ़र याच्याबद्दल माहिती करून घेणें जरूरीचें आहे, कारण या गझलचा संबंध त्याच्या जीवनाशी अटळपणें बांधलेला आहे. मग आपण मुज़्तर यांचा, (व या गझलचे रचनाकार म्हटलें गेलेल्या अन्य शायराचाही) थोडासा आढावा घेऊं ; व त्यानंतर या गझलच्या अंतरंगात शिरूं.

बहादुरशाह जफ़र :

बहादुरशाह द्वितीय हा शेवटचा मुघल बादशहा. त्याचें संपूर्ण नाव ‘मिर्झा अबु जफर सिराजुद्दीन मुहम्मद बहादुरशाह जफर’. ज़फ़र हा मूळ अरबी शब्द आहे, व त्याचा अर्थ आहे ‘विजय, सफलता’. २४ ऑक्टोबर १७७५ ला बहादुरशाहचा जन्म झाला. त्याचे वडील होते मिर्झा अकबर शाह (द्वितीय) व आई होती लालबाई नांवाची राजपूत स्त्री. पित्याच्या निधनानंतर बहादुरशाह १९३७ च्या सप्टेंबर मध्ये, ६२व्या वर्षीं, मुझल सम्राट बनला. त्या काळीं मुघल सम्राटाच्या हातीं सत्ता अशी नव्हतीच. आधी मराठे व नंतर इंग्रज यांचा दिल्लीच्या राजकारणावर प्रभाव होता. बहादुरशाहच्या जन्मकाळीं, महादजी शिंदे यांचें दिल्ली दरबारावर वजन होतें ; प्लासी (पलाशी) चें युद्ध होऊन १८ वर्षें गेलेली होतें, व इंग्रजांना बंगालचा सुभा मिळालेला होता, व त्याचबरोबर, त्यांचा प्रभाव मुंबईनजीकच्या व मद्रासच्या आसपासच्या प्रदेशात होता.

पुढे, बहादुरशाहच्या राज्यकालात तर सल्तनतीची खरी सत्ता कंपनी सरकारच्या हातात सामावलेली होती; त्याचा स्वत:चा अधिकार फक्त दिल्लीच्या लाल किल्यातच चालत असे. कंपनी सरकार त्याला तनखा म्हणजे पेन्शन देत असे, आणि ते इतके अल्प होते की बहादुरशाहचें जेमतेम भागत असे-नसे. भल्यामोठ्या गोतावळ्याचा खर्च पेलणें ही सोपी गोष्ट नव्हे.

बहादुरशाह सूफी पंथाचा होता. हिंदू धर्म व इस्लाम या दोहोंची मूलतत्वें एकच आहेत, असें बहादुरशाह नेहमी म्हणत असे. तो हिंदू सणही साजरे करत असे.

बहादुरशाहला शायरीची खूप आवड होती. त्याच्या दरबारात नेहमी मुशायरे भरत असत. सुप्रसिद्ध शायर  ज़ौक, मोमिन व मिर्झा ग़ालिब हे त्याचे समकालीन. बहादुरशाह स्वत:ही शायरी करत असे. ‘जफ़र’ हा बहादुरशाहचा शायरीतील तख़ल्लुस (Pen Name, टोपण नांव). सुरुवातीला शाह नसीर, व नंतर ज़ौक   हा बहादुरशाहचा शायरीतील उस्ताद (गुरू) होता ; आणि त्याच्या मृत्यूनंतर ग़ालिब हा अल्प काळ बहादुरशाहचा उस्ताद होता.

जफ़रच्या म्हणून ओळखल्या जाण्यार्‍या कांहीं गझला-शेर खरोखर अन्य कोणी रचले आहेत काय, याची थोडी चर्चा आपण आधी केलेली आहे. मात्र, बहादुरशाहच्या पार्श्वभूमीवरून एवढें तरी नक्कीच दिसतें की, दुसर्‍या कुणा शायरची रचना जर बहादुरशाहच्या नांवावर गणली गेली असेल, तर त्याचा दोषी स्वत: बहादुरशाह असणें शक्य नाहीं, तें अन्य कांहींतरी कारणानें घडलेलें असावें. अखेरीस, बहादुरशाह हा एक शहन्शाह होता, सिंहासनाधीश होता, उच्च प्रतीचा खानदानी होता. तसें पाहिलें तर, शायरीत तो आपल्या उस्तादाची ‘इस्लाह’ (परिष्करण) घेत असेल, घेत होताच. इस्लाह म्हणजे, स्वत:ची शायरी गुरूला दाखवून त्याच्याकडून सुधारून घेणें. पण इस्लाह घेणें वेगळें, आणि इतर कुणाची शायरी स्वत:च्या नांवावर खपवणें वेगळें. पण, ‘ज़फ़रची शायरी’ वस्तुत: त्याचा उस्ताद ज़ौक यानेंच लिहिलेली आहे, असेंही कांहीं समीक्षक म्हणतात. हा खरोखरच ज़फ़रवर अन्याय आहे. जफ़रला स्वत: एक प्रॉलिफिक शायर होता. त्याला इतर कुणाची शायरी आपल्या नावावर खपविण्याची, किंवा ‘घोस्ट रायटिंग’ करून घेण्याची आवश्यकता नव्हती. ‘घोस्ट-रायटिंग’ची प्रथा हल्ली रूढ झाली आहे, म्हणजे स्वत:च्या नांवानें पण दुसर्‍या कुणाकडून तरी लिहवून घेणें. तशी प्रथा जुन्या काळी रूढ असल्याचें दिसत नाहीं. त्यातून, ‘घोस्ट-रायटिंग’ कोण करवून घेतो, तर ज्याला कार्यबाहुल्यामुळे वेळ कमी पडतो तो, किंवा ज्याला साहित्यनिर्मितीची कला अवगत नसते तो. राज्यकारभार कंपनी सरकार करत असल्यामुळे जफ़रकडे स्वत: शेर रचण्यासाठी भरपूर मोकळा वेळ नक्कीच होता ; आणि अगदी ज़ौक-ग़ाकिब-मोमिन यांच्याइतका श्रेष्ठ नसला तरी, जफ़र एक बर्‍यापैकी शायर होता. म्हणजे, कुठल्याही कारणानें इतर कुणाची तरी शायरी ‘ढापून’ स्वत:च्या नांवावर खपवण्याची ज़फ़रला कांहीं जरूरी नव्हती.

१८५७ सालच्या कांहीं काळच आधी, बहादुरशाहनें लाल किल्ला सोडावा असें इंग्रजांनी त्याला सांगितले होतें. तसेंच, बहादुरशाहच्या पुढल्या पिढ्यांना शहन्शाहसारखे किताब (पदव्या) वापरता येणार नाहींत, असेंही त्याला कळवण्यात आलेलें होतें.

बहादुरशाहचें ‘जफ़र’ हें उपनाम होतें खरें, पण १८५७ नें सूर्यप्रकाशाइतकें स्पष्टपणें दाखवून दिलें की वास्तव जीवनात त्याचें ‘ज़फ़र’ (विजय) हें नांव किती अयोग्य आहे !  १८५७ चें फक्त भारत या देशाच्या इतिहासातच महत्व नाहीं, तर बहादुरशाहच्या जीवनातही त्याला फार महत्व आहे. मे १८५७ मध्ये कंपनीविरुद्ध बंड करणार्‍या क्रांतिकारकांनी, लवकरच दिल्लीला बहादुरशाहची सत्ता प्रस्थापित केली. त्या वेळी बहादुरशाहला ८२ वे वर्ष चालू होते. या वयात त्याला इंग्रजांशी टक्कर घेण्यात कांहींही स्वारस्य नव्हतें, आणि त्याची मूळ प्रवृत्तीही तशी नव्हती. पण क्रांतिकारक शिपायांपुढे त्याचा अगदी नाइलाज झाला, व त्याला नाखुशीनें, नाममात्र कां होईना, त्यांचें नेतृत्व स्वीकारण्याला होकार द्यावा लागला.

१८५७ चें युद्ध हें केवळ ‘शिपायांचें बंड’ नसून, तें इंग्रजांविरुद्धचें स्वातंत्र्यसमरच होतें. १७७५ ची अमेरिकन क्रांती व १७८९ ची फ्रेंच क्रांती यशस्वी झाल्या; पण १८५७ ची भारतीय क्रांती मात्र अयशस्वी झाली. सप्टेंबर १८५७ मध्ये इंग्रजांनी बहादुरशाहला पकडलें, त्याच्या पुत्रपौत्रांना ठार केलें; बहादुरशाहवर खटला भरला, त्याला पदच्युत केलें, व १८५८/५९ पासून हिंदुस्थानाबाहेर, ब्रम्हदेशात (म्यानमारमध्ये) रंगूनला कैदेत ठेवण्यात आलें. बहादुरशाहला ठार मारून हुतात्मा बनवण्यापेक्षा मायभूमीच्याबाहेर दूरदेशीं, in exile, खितपत ठेवणेंच इंग्रजांना अधिक योग्य वाटलें. १८१८ ला, दुसरा-बाजीराव या पेशव्याला पेन्शन देऊन कानपुरजवळ बिठूरला ठेवण्यात आहे होतें ; १८५६ ला, अवधचा नबाब वाज़िदअलीशाह याला पदच्युत केल्यावर, इंग्रजांनी त्याला पेन्शन देऊन कलकत्त्याला ठेवलें होतें. पण, ‘बंडा’च्या पार्श्वभूमीवर, बहादुरशाहला भारतात ठेवणें इंग्रजांना जोखमीचें वाटलें असल्यास नवल नव्हे. रंगूनला बंदीवासातच, ७ नोव्हेंबर १८६२ ला तो मरण पावला. त्यावेळी तो ८७ वर्षांचा होता. तिथेंच रंगूनला श्वेडागॉन पॅगोडाजवळ त्याचें दफन झालें. त्याच्या अस्थी दिल्लीला आणून तिथें त्याची कबर बांधण्याची विनंतीही इंग्रजांनी नाकारली. कदाचित, त्यानिमित्तानें दिल्लीला आपल्या विरुद्ध नवीन कटकारस्थांना अथवा बंडाला सुरुवात होऊ शकेल, अशी भीती त्यांना वाटली असावी. बिचार्‍या बहादुरशाहला मेल्यानंतरही स्वदेशाचें पुन्हा दर्शन झालें नाहीं. त्याची कबरही सदैव दुर्लक्षितच राहिली. आजही ती दुर्लक्षितच आहे.

पुढील शेर बहादुरशाहचा आहे, असे म्हटलें जातें  :

गाज़ियोंमें बू रहेगी जबतलक ईमान की

तख़्त-ए-लंदन तक चलेगी तेग़ हिंदुस्तान की ।

[ पाठभेद : *‘गाज़ियोंमें’ ऐवजी, ‘हिंदियोंमें’.  *‘तख़्त-ए-लंदन तक’ ऐवजी ‘तब तो लंदन तक’ ].

 जोपर्यंत वीराच्या मनांत निष्ठेचा गंध (बू ) राहील, तोपर्यंत हिंदुस्थानचें खड्गाची पोच (reach) लंडनच्या सिहासनापर्यंत राहील. (म्हणजेच, हिंदुस्थानच्या शौर्याचा धाक लंडनच्या सरकारला राहील).

हा शेर बहादुरशाहनें रंगूनच्या कैदेत असतांना लिहिला, असें कांहींजण समजतात. पण तें बरोबर वाटत नाहीं. त्यानें तो नक्कीच मे ते सप्टेंबर १८५७ या कालखंडात लिहिला असला पाहिजे, कारण तो काळ क्रांतिकारकांच्या विजयाचा व बहादुरशाहच्या परमोच्च शिखराचा काळ होता. (क्रांतिकारी शिपाई, विशेषकरून त्यांच्यातील मेरठ व ग्वाल्हेरचे मुस्लिम शिपाई, स्वत:ला गाज़ी, म्हणजे धर्मयोद्धा म्हणवत. ग्वाल्हेरचे शिपाई तर ‘करूं किंवा मरूं’ अशा बाण्यानेंच आलेले होते).

‘न किसी की आँख का नूर हूँ’ ही गझल त्याच्या बंदीवासाच्या काळाशी, म्हणजे १८५८/५९ ते १८६२ या काळाशी, निगडित आहे. तो त्याचा गर्तेतला काळ (nadir) होता. बहादुरशाह जफ़रच्या रंगूनच्या बंदीवासातील मनस्थितीचें अगदी तंतोतंत, यथायोग्य (apt) व हृदयस्पर्शी वर्णन ही गझल करते.

मुज़्तर खैराबादी  :

आपण मुज़्तर खैराबादींचीही थोडीशी माहिती करून घेऊ या. मुज़्तर खैराबादी म्हणजे, प्रसिद्ध शायर व सिनेगीतकार (Lyricist) जाँनिसार अख़्तर (१९१४-१९७६) यांचे व जावेद अख्तर यांचे पूर्वज.  मुज़्तरचा अर्थ आहे, ‘बेचैन, व्याकुळ’. मुज़्तर ख़ैराबादी हे, टोंक व ग्वाल्हेर संस्थानांमध्ये न्यायाधीश होते. ते शायर होतेच, पण ‘करिश्मा ए दिलबर’ या नांवाचें एक साहित्यिक मासिकही प्रसिद्ध करत असत. त्यांना ‘खान बहादुर’, ‘ऐतबार उल् मुल्क’ वगैरे पदव्या होत्या.

मुज़्तर यांचा जीवनकाळ आहे, १८६२ ते १९२७. म्हणजे, बहादुरशाहचें मृत्युवर्ष व मुज़्तरचें जन्मवर्ष एकच. मुज़्तर यांचा काळ बहादुरशाहच्या निधनानंतरचा असल्यामुळे, आपल्या या विधानाला पुष्टीच मिळते की, बहादुरशाहनें, दुसर्‍यानें लिहिलेली गझल स्वत:च आपल्या नांवावर खपवली नाहीं.

मुज़्तर यांचे वडील होते अहमद हसन ‘रुसवा’. ते एक जानेमाने विद्वान होते. त्यांनी ‘तख़ल्लुस’ घेतलेला होता, त्याअर्थी ते शायरीही करत असत. मुज़्तर यांची आत्या सय्यद उन्नीसा ऊर्फ ‘हुमी’ यासुद्धा शाइरा होत्या. त्या सय्यद अहमद यांची पत्नी होत्या.

मुज़्तर यांचे आजोबा होते फ़ज़लहक़/फ़ज़लेहक़ ख़ैराबादी (१७९१-१८६१). ते बहादुरशाहचे समकालीन होते. ते मौलवी होते, अरबी, फारसी व उर्दूचे ज्ञाते विद्वान तर होतेच, शायरही होते. त्यांना ‘इमाम हिक़मत’ व ‘कलाम’ असेंही सन्माननीय ‘किताब’ होते. ते व मिर्झा गालिब यांचा घनिष्ठ परिचय होता. फ़ज़लहक़ ख़ैराबादी हे १८५७ च्या क्रांतियुद्धातील एक महत्वाचे सेनानी होते. क्रांतियुद्ध अयशस्वी झाल्यावर फ़ज़लहक़ यांच्यावर इंग्रजांनी case चालवली व त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली. अहमद हसन यांनी आपले वडील फ़ज़लहक़ यांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न केले, व अखेरीस त्यांच्यासाठी माफी मिळवली. तो हुकूमनामा घेऊन अहमद हसन अंदमानला पोचले, पण त्याआधी  फ़ज़लहक़ यांचा मृत्यू झालेला होता. अंदमान येथें कैदेत असतांना फ़ज़लहक़ यांनी फारसीमध्ये आत्मचरित्र लिहिलें. त्यात त्यांनी १८५७ मधील ‘गदर’समयीच्या दिल्लीचे वर्णन केलेले आहे. त्या आत्मचरित्राचा उर्दूतही अनुवाद झालेला आहे.

स्वत:च्या आजोबांचे आत्मचरित्र मुज़्तर यांनी नक्कीच वाचलेलें असणार. तसेंच पित्याकडूनही मुज़्तर यांना १८५७ च्या घटना कळलेल्या असणार. या सर्व पार्श्वभूमीवरून मुज़्तर ख़ैराबादी यांचा, बहादुरशाह जफ़र व १८५७ च्या क्रांतिपर्वाशी भावनिक संबंध दिसून येतो. मुज़्तर यांचें स्वत:चें जीवन अशा प्रकारचें होतें की, त्यांनी ‘न किसी की आँख का नूर हूँ’ ही गझल स्वत:च्या जीवनावर लिहिली असणें शक्य वाटत नाहीं. याचा अर्थ असा की, जर ‘न किसीकी आँख का नूर हूँ ’ ही गझल मुज़्तर यांनी लिहिली असेल तर, तिच्याद्वारें बंदीवासातील बहादुरशाहची व्यथा वर्णन करण्यांस त्यांना सबळ कारण होतें. म्हणजेच, मुज़्तर यांनी ही गझल लिहिली असली तर, ती ज़फ़रच्या मनोभूमिकेतूनच लिहिली असावी.

वरवर पाहतां ‘न किसी की आँख का..’ ही गझल कुणाही एखाद्या असफल व्यक्तीच्या अतितीव्र उदासीची भावना व्यक्त करते,  पण आंत खोल पाहिल्यावर, ती जफ़रचा दर्द वर्णते ; अशा प्रकारें ती लिहिली गेलेली आहे.  ऊर्दू काव्यात आपल्याला अशी अनेक उदाहरणें दिसतात. ‘दाइम खड़ा हुआ तेरे दरपर नहीं हूँ मैं’  ही गालिबच्या गझलची पहिली ओळ पहा. प्रथमदर्शनीं, ती प्रेयसीला उद्देशून आहे, असें वाटतें; पण विचार केल्यावर असें लक्षात येतें की, ती ईश्वराला उद्देशून लिहिली गेली असावी; आणि, गालिबची एकूण विचारधारा पहातां, तो ईश्वराला उद्देशून असें म्हणणें सहज शक्य आहे. (‘बंदगी में मेरा  भला न हुआ’, असें त्यानें अन्यत्र म्हटलेलेंच आहे).  तसेंच ,  अहमद फ़राझ़ यांची मेहदी हसन यांनी गायलेली ‘रंजिश ही सही’  ही गझल घ्या. ती प्रेयसीला उद्देशून आहे, असेच सुरुवातीला वाटतें. ती पाकिस्तानी सिनेमातही घेतली गेलेली आहे, व तिथेंही नक्कीच त्याच अर्थानें ती गाइली गेली असणार. पण खरें तर, ती लोकशाहीला उद्देशून आहे. त्याचप्रमाणें,  ‘न किसी की आँख का नूर हूँ’  ही गझल मुज़्तर यांनी लिहिली असल्यास, त्यांनी मुद्दामच, वरवर बघतां जीवनात असफल असलेल्या व्यक्तीची भावना दाखवणें, पण आतून जफ़रच्या मनाचा अवसाद वर्णणें,  अशा प्रकारचा दृष्टिकोन,  ( तेव्हां ब्रिटिश राज चा काळ असल्यामुळे), घेतला असावा ; आणि कदाचित म्हणूनच, तिला मक़्ता लिहिला नसावा.

वस्तुस्थिती तशी असो वा नसो, पण, ही गझल बहादुरशहा जफर यांची व्यथा वर्णते आहे, असा अर्थ घ्यायला, कांहींच हरकत नाहीं.

‘हश्र’ हसामी :

या शायरबद्दल मला पुस्तकात किंवा इंटरनेटवर माहिती प्राप्त होऊं शकली नाहीं. आपण जसा मुज़्तर यांच्या व्यक्तिगत जीवनाचा अभ्यास करून, त्यांचा व या गझलचा कांहीं संबंध असूं शकतो कां, असा विचार केला ; तसा विचार ‘हश्र’ यांच्या बाबतीत आपण त्यामुळे करूं शकत नाहीं. विविध गझल-संग्रहांमध्येसुद्धा (anthologies) ‘हश्र’ यांची कुठलीही अन्य गझल सापडली नाहीं (की जीमुळे हश्र यांच्या रचनांची गुणवत्ता समजू शकली असती). त्यामुळे, हश्रनें खरोखरच ही गझल लिहिली आहे काय, असा संशय येतो. तरीही, आपण, ‘न किसी की आँख का नूर हूँ’ या गझलमधील हश्रच्या म्हटल्या गेलेल्या शेरचा अभ्यास करून, त्यातून काय निष्कर्ष काढतां येतो, तें नंतर पाहूं.

किसी की आँख का नूर हूँ’  या गझलचें अंतरंग :

आपण वर म्हटलेंच आहे, त्याप्रमाणें, ही गझल बहादुरशाह जफ़रनें लिहिली आहे, हा जनमानसात रुजलेला समज योग्य मानून आपण या गझलकडे पाहूं या. (किंवा, विकल्प म्हणून, आल्टरनेटिव्हली, ही गझल मुज़्तर यांनी लिहिलेली, पण बहादुशाहची मनोव्यथा दर्शविणारी, असें समजूनही तिच्याकडे बघायला हरकत नाहीं. पण त्यामुळे, आपल्या रसग्रहणात कांहींच फरक पडत नाहीं).

‘न किसी की आँख का नूर हूँ’  ही मुसलसल गझल आहे.  गझल मुख्यत: दोन प्रकारची असते :

‘ग़ज़ले मुसलसल’ (हिला ‘रवानी ग़ज़ल’ असेंही म्हणतात, म्हणजे प्रवाही गझल) व ‘ग़ज़ले ग़ैर-मुसलसल’. मुसलसल गझलमध्ये एकाच विषयावर सर्व शेर असतात, तर गैर-मुसलसलमध्ये प्रत्येक शेर वेगळ्या विषयावर असतो. मात्र, दोन्ही प्रकारच्या गझलमध्ये, प्रत्येक शेर स्वतंत्र असतो, त्यात एक संपूर्ण विचार मांडलेला असतो ; एका शेरचा दुसर्‍या शेरशी रदीफ-काफिया यांच्याव्यतिरिक्त अन्य संबंध नसतो. त्यामुळे, अनेकदा असे दिसून येतें की, वेगवेगळ्या पुस्तकांच्या छापील आवृत्त्यांमध्ये, आणि इंटरनेट वेबसाइट्सवर दिसत असलेल्या आवृत्त्यांमध्ये (व्हर्शनस् मध्ये) सुद्धा, शेरांचा क्रम भिन्नभिन्न असू शकतो, असतोही ; तसेच गझल-गायक सुद्धा गातांना शेरांचा भिन्नभिन्न क्रम वापरतात. पण त्यामुळे गझलचा दर्जा व परिणामकारकता बिघडत नाहीं ; कारण, प्रत्येक शेरचें स्वतंत्र असणें.

‘न किसी की आँख का नूर हूँ’ ही गझल छापील स्वरूपात पुस्तकात, किंवा इंटरनेटवर, वाचली, तर तिच्यात साधारणपणें ५ शेर दिसतात. तें बरोबरच आहे, कारण सर्वसाधारणपणें गझलमध्ये किमान ५ शेर असतात. पण, ’लाल किला’ सिनेमात या गझलचे फक्त चारच शेर वापरले गेले आहेत. याचें कारण, कदाचित हें असूं शकेल की, सुरुवातीच्या काळात तांत्रिक कारणांमुळे तबकड्यावर रेकॉर्ड होणार्‍या गाण्यांच्या वेळेला मर्यादा होती, आणि त्यामुळे सिनेमातील गाण्यांना टाइम-लिमिट होतें. (अर्थात्, तरीही, ‘बरसात की रात’ सिनेमातील ‘ना तो कारवाँ की तलाश है’ अधिक ‘ये इश्क इश्क’ ही जोड-कव्वाली १० मिनिटांची होतीच). किंवा, हें कारण असूं शकेल की, निर्देशकाला अथवा संगीत दिग्दर्शकाला सिनेमॅटिक परिणामाच्या दृष्टीनें कदाचित चार शेर पुरेसे वाटले असतील. किंवा असेंही असूं शकतें की, पाचव्या शेरच्या बाबतीत कांहीं विकल्प आहेत त्यामुळे हा शेर सिनेगीतात घेतला असता तर ‘नसता-विवाद’ (कॉन्ट्रोव्हर्सी) होऊं शकेल असे सिनेमाच्या निर्देशकाला वाटलें असेल.

तसेंच, सिनेमातील या गझलमध्ये घेतलेल्या ४ शेरांचा क्रम छापील स्वरूपातील शेरांच्या क्रमापेक्षा वेगळा आहे. (अर्थात, तो परिणामकारक आहे, हें नक्की. कदाचित म्हणूनच सिनेमात मुद्दाम तसा क्रम घेतला असेल). त्याचप्रमाणें, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, व इंटरनेटवरील भिन्नभिन्न वेबसाइट्सवर, या गझलमधील ५ शेरांचा क्रम भिन्नभिन्न आढळतो. इंटरनेटवर तर, कांहीं वेबसाइटस् वर, पुस्तकांमध्ये असलेले ५ शेरच आहेत, तर कांहींमध्ये या पाचातील एक शेर ड्रॉप केला असून, त्याऐवजी एक अन्य शेर दिलेला आहे. हा वैकल्पित (आल्टरनेट) शेर हिशेबात घेतला तर, या गझलचे एकूण ६ शेर आहेत, असें म्हणता येईल. इंटरनेटच्या महाजालामुळे या सहाव्या शेरची माहिती अगदी सहज उपलब्ध होऊ शकते, हें खरें ; पण त्याचबरोबर हेंही खरें की, बर्‍याच बेबसाइट्स जरी विद्वान, अभ्यासू लोकांच्या किंवा ऑरगनायझेशन्सच्या असल्या, तरी इतर बर्‍याच वेबसाइटस् या एनथ्युझियास्टिक ऍमॅच्युअर्स लोकांच्याही आहेत. त्यामुळे हा   ६ वा शेर कितपत जेन्युइन आहे, तें त्याच्या अभ्यासाशिवाय सांगणें कठीण आहे. तसेच, हश्रचा शेर विचारात घेतला तर, एकूण ७ शेर आहेत. आपण या सर्व शेरांचा एक लॉजिकल क्रम घेऊन, या गझलच्या अंतरंगात उतरणार आहोत.

  • मत्ला : (शेर १ ला) :

या गझलाचा मत्ला, अर्थात् पहिला शेर पाहू या.

(या ‘मत्ला’ शब्दावरूनच मराठीत मथळा हा शब्द आला आहे).

न किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का क़रार हूँ

जो किसी के काम न आ सके, मैं वो एक मुश्ते गुबार हूँ ।

मी कुणाच्याही नेत्रांचा प्रकाश (नूर) नाहीं, मी कुणाच्याही हृदयाला आराम, आनंद देणारा

असा नाहीं. कुणाच्याही कसल्याही प्रकारें उपयोगी पडणार नाहीं अशी मी एक धुळीची मूठ

(मुश्ते गुबार) आहे.   

मूल हें आईला प्रिय असतें, तें आईच्या डोळ्यांचा प्रकाश असतें. त्याला पाहिल्यावर तिचे नेत्र उजळतात. मूल आईला सुख, आनंद देतें. बहादुरशाह जफ़र हा ‘मादरे वतन’ चा म्हणजे मातृभूमीचा पुत्र होता. पण, तो आतां अशा परिस्थितीत येऊन पडला आहे की, तो मातृभूमीच्या नजरेसमोर येणें शक्य नाहीं, त्यामुळे मातृभूमीचे नेत्र त्याला पाहून उजळणें शक्य नाहीं. ‘मारूनमुटकून’ कां होईना, पण बहादुरशाह क्रांतिकारक शिपायांचा, आणि पर्यायानें बंडाचा नेता बनला होता. पण युद्ध हरून कैदेत पडल्यामुळे, आतां त्या क्रांतिकारकांची व त्याची भेट होणें शक्य नाहीं. म्हणून, त्याला पाहून त्यांना आनंद होणें, त्यांचें नेत्र उजळणें शक्य नाहीं. पूर्वी राजाच्या दर्शनानें जनता आनंदानें त्याचा जयजयकार करत असे. बहादुरशाह हा, नाममात्र कां होईना, पण, हिंदुस्तानचा बादशाह होता आणि त्यामुळे, राजा म्हणून सर्व जनतेला हर्ष देणारा, ज्याला पाहून जनतेचे डोळे तृप्त होत, असा तो होता. आतां

‘देश-निकाला’ (in exile) झाल्यामुळे, तो आतां हिंदुस्थानात कोणालाही दिसणार नव्हता, कोणालाही आनंद देणार नव्हता, कोणाच्याही कसल्याही प्रकारें उपयोगी पडणार नव्हता, कुणाचेही डोळे त्याला पाहून उजळणार नव्हते. तो युद्ध हरलेला माणूस आहे, मातृभूमीला परकीय इंग्रजांच्या कचाट्यातून सोडवण्यात असफल झालेला आहे ; आतां हिंदुस्थानाला त्याच्यामुळे सुख मिळणें शक्य नाहीं. देशापासून दूर तो बंदीवासात खितपत पडलेला आहे, तो काय आतां कुणाच्या उपयोगी पडणार? तो इतका हीन-दीन झालेला आहे की, जणूं कांहीं, काडीचीही किंमत नसलेली मूठभर क्षुद्र, तुच्छ, निरुपयोगी धूळच.

या धुळीच्या उल्लेखातून आणखीही अर्थ काढता येतो. तो असा : नाहीं तरी अल्प काळानें मृत्यूनंतर जफ़र धूळ बनणारच आहे, पण आत्तां, मेलेला नसतांनाही, तो मेल्यातच जमा आहे, आत्तांसुद्धा तो धूळ बनलेला आहे. मृत्यूनंतर शरीर दफन होतें, मातीत मिसळते व शरीराची धूळ होते, याचा उल्लेख ११व्या शतकातील फारसी कवि उमर खय्याम याच्या रुबायांमध्ये अनेकदा येतो. उर्दू शायरीवर फारसीचा प्रभाव आहे, त्यामुळे उर्दूतही असा उल्लेख अनेक शायर करतात. तसाच तो ज़फ़रनेंही, ‘मूठभर धूळ’ अशा शब्दांतून केलेला आहे.

आणखी एक गोष्ट. उर्दू शायरीत ‘ज़िंदा लाश’ ही संकल्पनाही अनेकदा वापरली जाते. ‘जिंदा लाश’ म्हणजे, जिवंत असूनही मेल्याप्रमाणें असणारी, अस्तित्व जणूं कांहीं संपलेली, अशी व्यक्ती. तुकाराम महाराजांच्या शब्दांतून हें स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू या. ते म्हणतात, ‘तुका म्हणे उरलो आतां उपचारापुरता’. उपचार म्हणजे फॉरमॅलिटी. ‘जिंदा लाश’ बनलेली व्यक्ती उपचारापुरतीच जगत असते, म्हणजे तिच्यासाठी जगणें ही फक्त एक फॉरमॅलिटीच उरते. (अर्थात, दोहोंमध्ये ‘उपचारापुरतें जगणें’ हें एक साम्य असलें, तरी मुख्य फरक असा की, तुकोबा ‘उपचारापुरते’ उरलेले होते कारण त्यांचें मन पूर्णपणें पांडुरंगात विलीन झाले होतें ; तर ‘जिंदा लाश’ व्यक्ती दु:खातिरेकामुळे किंवा निराशेच्या अतिरेकामुळे ‘उपचारापुरती’ राहिलेली असते). ज़फ़रच्या ‘मी मूठभर धूळ आहे’ या शब्दांमधे आपल्याला ही ‘जिंदा लाश’ची संकल्पनाही दडलेली दिसते. शरीराची धूळ केव्हां होते, तर मेल्यानंतर, दफन केल्यानंतर. पण जफ़र तर आत्ताच धूळ झालेला आहे. त्याला देशापासून दूर बंदीवासात धाडून इंग्रजांनी त्याचें अस्तित्वच जणूं गाडून टाकलेलें आहे. याचाच अर्थ असा की, ज़फ़र ‘जिंदा लाश’ आहे, जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे; त्याची धूळ होण्यासाठी मरणाची वाट बघायची जरूरी नाहीं, आत्ताच तें झालेलें आहे.

  • शेर २ रा :

मेरा रंग रूप बिगड़ गया, मेरा यार मुझसे बिछड़ गया

जो चमन ख़िजाँ से उजड़ गया, मैं उसी की फ़स्ले बहार हूँ ।

माझें रंग-रूप बिघडलें आहे, नष्ट झालें आहे. मी माझ्या दोस्ताच्या संगतीला मुकलो आहे. 

पानगळीमुळे (ख़िजाँ) जी बाग उजाड झाली आहे, उध्वस्त झाली आहे, त्या उध्वस्त बागेचा वैराण वसंत ऋतू (बहार) मी आहे. (फ़स्ल म्हणजे ऋतु किंवा पीक).

जफ़रची रया अगदी पूर्णपणें गेलेली आहे. आधी तो बादशहा होता, त्याचा एक रुबाब होता ; तो महालात रहात असे, जरतारी वस्त्रें परिधान करत असे, जडजवाहीर लेऊन दरबारात सिंहासनावर आसीन होत असे. पण त्याचें आतां सिंहासन गेलें आहे, जडजवाहीर जप्त झालें आहे; या बंदीवासात, या विजनवासात, त्याला साधे कपडे घालावे लागताहेत, साध्या जागेत रहावें लागत आहे. त्याचें रंगरूप विरूप होऊन गेलेलें आहे.

इथें कवि भूषणच्या काव्याची आठवण होते, ज्यात त्यानें राज्य गमावलेल्या राजवंशीय स्त्रियांचें वर्णन केलें आहे. तो म्हणतो,

‘ऊँचे घोर मंदर के अंदर रहनवाली

ऊँचे घोर मंदर के अंदर रहाती हैं । …..

…… भूषन सिथिल अंग भूखन सिथिल अंग । ……

.…. नगन जडाती ते वै नगन जडाती हैं ।’  

अतीव उंच-उंच राजप्रासादांमध्ये रहाणार्‍या त्या स्त्रिया, आतां उंच-उंच निबिड अरण्यांमधील जुनाट पडक्या मंदिरांच्या आडोशाला वस्ती करून रहाताहेत. …….. पूर्वी त्यांचें अंग विविध भूषणांच्या वजनानें दबून जात असे, आतां त्यांचें अंग भुकेनें शिथिल पडलेलें आहे. ….. पूर्वी नगीने (आभूषणें) घालून सजणार्‍या त्या स्त्रियाना आतां जवळजवळ-नग्न, अपुरी वस्त्रें लेऊनच, रहावें लागत आहे.

ज़फ़रची पदच्युत झाल्यानंतरची बंदीवासातली स्थिती याहून कांहीं फारशी भिन्न नव्हती, अन् तें त्याच्या या, वरील शेरमधून उघड झालेलें आहे.

‘रंग-रूप बिगड़ गया’ या शब्दांना वस्त्रप्रावरणांपलिकडील एक ध्वन्यर्थही आहे. आधी ज़फ़रचें रूप होतें ‘क्रांतीचा नेता’. आतां तें बिघडून गेलें आहे, आतां तो एक हरलेला ‘बाग़ी’, एक पराजित विद्रोही झालेला आहे. आधी त्याचा माथा उजळ होता; आतां पराजयामुळे त्याच्या चेहर्‍यावर काळें फासलें गेलें आहे. आधी तो स्वतंत्र होता, आतां तो बंदी आहे. अशा प्रकारें त्याचें रंगरूप बिघडून गेलेलें आहे.

‘मेरा यार मुझसे बिछड़ गया’ यातील ‘यार’ म्हणजे कोण ? आपण आणि आपला देश यांचे नातें अगदी जवळचें असतें, तो आपला हृदयस्थ जिवलग असतो. ज़फ़र म्हणतो की, त्याचा यार, त्याचा प्रिय दोस्त, म्हणजे त्याचा हिंदुस्थान, याच्या सोबतीला तो मुकला आहे, देशाची व त्याची फारकत झालेली आहे. त्याच्या जिवलग हिंदुस्थानचा वियोग जफ़रला सहन करावा लागत आहे, कारण त्याला ‘देश-निकाला’ (तडीपार) केले गेलेलें आहे.

उर्दू शेरांची ही खासियत आहे की, मितभाषी असल्यामुळे व प्रतिमा, प्रतीकांचा उपयोग करत असल्यामुळे, अनेकदा शेरांचे एकापेक्षा अधिक अर्थ निघूं शकतात. वर उल्लेखलेल्या शेरचा आणखी एक अर्थ काढता येतो.

उर्दू काव्यात माशूकचा (प्रेयसीचा) अनेकदा ‘यार’ असा उल्लेख करतात, व तसेंच, तो उल्लेख पुल्लिंगी करतात. त्याचप्रमाणें, अनेकदा गझलमध्ये संकेत, अनेक प्रतीकें वापरली जातात, व आपण वाच्यार्थापेक्षा, ध्वनित होणारा अर्थ पहायचा असतो. म्हणून, ‘मेरा यार’ म्हणजे ‘माझी प्रिय दिल्ली’ असाही अर्थ होऊं शकतो. त्यावरून या शेरचा असाही अर्थ दिसतो की, जफ़र त्याच्या प्रिय दिल्लीपासून दूर गेलेला आहे, व तिचा विरह त्याला सहन होत नाहींये.

यानंतर, ‘चमन’ म्हणजे बागेचा उल्लेख आहे. पानगळीमध्ये बाग सुकून जाते, झाडांची पानें झडतात ; पण वसंत ऋतु येतांच पुन्हां नवी पालवी फुटतें, पुन्हां वृक्ष हिरवेगार होतात, पुन्हां बाग फुलून येते. पण जर पानगळीत संपूर्ण बाग उध्वस्त झाली असेल, तर वसंत आल्यावर ती फुलणार कशी ? उध्वस्त झालेल्या बागेचा वसंत वैराणच असणार ! जफ़र हा, असा वैराण वसंत आहे, ज्याचा जीवनवृक्षच उजाड झाला आहे; मग तिथें आशेचा फुलोरा येणारच कसा ?

उर्दू साहित्यात ‘चमन’ या प्रतिमेचा वेगवेगळ्या प्रकारानें उपयोग केलेला दिसून येतो. चमन म्हणजे ‘बाग’ हें तर आहेच ; पण  चमन म्हणजे आशिकचें (प्रियकराचे) हृदय, चमन म्हणजे जीवन, चमन म्हणजे घर, चमन म्हणजे देश, चमन म्हणजे पृथ्वी, हे व आणखीही काहीं अर्थ संदर्भानें निघूं शकतात. प्रतीकांचा वापर पहाण्यासाठी आपण ज़फ़रचाच एक शेर घेऊ या.  आणि, या शेरमध्ये त्यानें ‘फ़स्ले बहार’ प्रतीकही वापरलें आहे.

पहा त्याचा हा शेर :

बुलबुल को पासबाँ से न सैयाद से गिला

क़िस्मत में क़ैद थी लिखी फ़स्ले बहार में ।

पासबाँ म्हणजे पहारेकरी. सैयाद म्हणजे पारधी, शिकारी. बुलबुल म्हणजे स्वत: जफ़र, सैयाद म्हणजे इंग्रज, असा अर्थ घेतला की, ज़फ़र आपल्या कैदेबद्दल बोलतो आहे, हें उघड होतें.

‘न किसी की आँख का ..’ या गझलच्या शेरमध्ये ‘चमन’ ही प्रतिमा वापरून ज़फ़र हिंदुस्तानचा उल्लेख करतो आहे, किंवा क्रांतीच्या चळवळीचा उल्लेख करतो आहे, अथवा स्वत:च्या जीवनाचा उल्लेख करतो आहे.

* म्हणून, या वाक्यांशाचा पहिला अर्थ हा आहे :  हिंदुस्थान आतां परकीयांच्या हातात गेलेला आहे, आणि म्हणूनच हिंदुस्थानची सुख-शांती संपूर्णपणें लोप पावली आहे ; आत्तापर्यंत नाममात्र कां होईना, हिंदुस्थान स्वतंत्र होता, पण आतां तें स्वातंत्र्य नष्ट झालेलें आहे. त्यामुळे हिंदुस्थानची आशा पूर्णपणें झडून गेलेली आहे, आणि तो संपूर्णपणें उध्वस्त झालेला आहे. हिंदुस्थानची मदार बहादुरशाहवर होती. आतां

exile मधील बहादुरशाह या उध्वस्त बागेचा वैराण वसंत आहे.

* दुसरा अर्थ असा : क्रांतीची चळवळ आतां पूर्णपणें विफल झालेली आहे, क्रांतिकारकांची आशा पूर्णपणें झडून गेलेली आहे. क्रांती सफल झाली असती, तर तिचा नेता बहादुरशाह पुनर्निर्माण करणारा वसंत झाला असता. पण आतां या अपयशी, उध्वस्त क्रांतीचा नेता, बंदी बहादुरशाह हा स्वत: वैराण वसंत आहे, जो या उजाड बागेला पुन्हां कधीही नवचैतन्य देऊं शकणार नाहीं.

* तिसरा अर्थ पहा : बंदीवासातील बहादुरशाह त्या वेळी होता ८२ ते ८७ या वयाचा अतिवृद्ध मनुष्य. आत्ताचें बंदीवासातील त्याचें जीवन एखाद्या पानगळीप्रमाने आहे, आणि त्या तुलनेंत त्याचें आधीचें जीवन एका वसंत ऋतुप्रमाणेंच होतें. या वयात पुन्हा जिद्दीनें पूर्वीचें जीवन परत आणण्याचा कसलाही प्रयत्न करणें त्याला शक्य नव्हतेंच. त्यातून, तो होता हिंदुस्थानपासून दूर ब्रम्हदेशात बंदीवासामध्ये. त्या स्थितीतून  स्वत:ची सुटका करून पुन्हां स्वत:च्या जीवनाला पूर्वीच्या परिस्थितीत आणणें अगदी अशक्यप्राय होतें. म्हणून  ज़फ़र म्हणतो आहे की, ज्याचें स्वत:चें जीवन संपूर्णपणें उध्वस्त झालेलें आहे, ज्याच्या या उजाड जीवनात आशा पुन्हां कधीही फुलणार नाहीं, असा वैराण वसंत मी आहे.

  • शेर ३ रा   :

मैं नहीं हूँ नग़्मा-ए-जाँफ़िज़ा, मुझे सुन के कोई करेगा क्या

मैं बड़े बिरोग की हूँ सदा, किसी दिलजले की पुकार हूँ ।

[टीप : हा शेर ‘लाल क़िला’ सिनेमातील गझलमध्ये घेतलेला नाहीं. पण मूळ गझलमध्ये तो आहे.]

या शेरमध्ये कांहीं पाठभेदही दिसतात.

* ‘बिरोग’ या शब्दाचे जे पाठभेद दिसतात, त्यांच्याबद्दल पुढे आपण बघणारच आहोत.

* तसेंच, ‘किसी दिलजले की पुकार हूँ’ याच्या जागी ‘मैं बड़े दुखों की पुकार हूँ’ अथवा ‘मैं बड़े दुखी की पुकार हूँ’ असे पाठभेद आढळतात.

मी एखादे प्राणवर्धक (जाँफ़िज़ा) गीत नहीं, मला ऐकून कोणी काय करणार? (मला जें म्हणायचें आहे तें कुणी काय म्हणून ऐकावें ?). मी वियोगाची साद आहे ; मी कुणा हृदयभग्न व्यक्तीचा आक्रोश आहे.  

[ किंवा, पाठभेदाप्रमाणें  :  मी तीव्र दु:खांचा आवाज, क्लेशपूर्ण ध्वनी आहे .

अथवा :  मी तीव्र दु:खें असलेल्या व्यक्तीचा क्लेशपूर्ण आवाज आहे ].

‘बड़े दुखी की पुकार हूँ’ हा शब्दप्रयोग अयोग्य वाटतो. कारण, तीव्र दु:खें असलेली व्यक्ती कोण, तर जफर स्वत:च. तसा तो स्वत:च असतांना, तो अन्य व्यक्तीचा उल्लेख करेल हें योग्य वाटत नाहीं. तर मग, तीव्र दु:खें असलेली व्यक्ती म्हणजे जफर, आणि असा व्यक्तीचा आवाजही जफरच. ही तर द्विरुक्ती झाली (जसें, ‘पिवळा पीतांबर’). त्यामुळे ‘दुखी’ हा शब्द अयोग्य, व म्हणून प्रक्षिप्त आहे, असें म्हणायला हरकत नाहीं.

ज़फ़र वियोगाची (बिरोग) आर्त साद आहे, तो हृदयभग्न अशा कुणाचातरी आक्रोश आहे. वियोग कुणापासून, आणि हा हृदयभग्न कोण बरें ? तर हा आहे ‘हिंदुस्थान’ देश.  हें आहे ‘भाग्य’ (कमनशीब). क्रांती हरलेला हिंदुस्थान हृदयभग्न आहे, हताश आहे; त्याला ज़फ़रचा, (आणि ज़फ़रला त्याचा) वियोग झालेला आहे, तो साद घालतो आहे, तो ज़फ़रच्या शब्दांद्वारें आक्रोश करतो आहे. भाग्यही आतां निराश आहे, तें सुधारण्याची सुतराम् शक्यता नाहीं. त्या भाग्याच्या (दुर्भाग्याच्या) तीव्र आकोशाचें मूर्तीमंत रूप म्हणजे जफ़र.

या पार्श्वभूमीवर ज़फ़र आत्ता जें कांहीं बोलतो आहे, ते सर्व निराशापूर्ण शब्द आहेत, तें एखादें हर्षोत्फुल्ल करणारें गीत नाहीं. कुणी काय म्हणून हे बोल ऐकावेत? यामध्ये आत लपलेला अर्थ असाही आहे की, ज़फ़र बंदीवासात असल्यामुळे त्याचे बोल ऐकणारे आहेत फक्त त्याचे पहारेकरी, अन्य कुणीही नाहीं. आणि, त्या अशिक्षित पहारेकरी जवानांना ज़फ़रच्या वचनांमध्ये काय रस असणार ? ते कशाला त्याचे बोल ऐकून घेणार आहेत ?

  • या शेरमधील कांहीं पाठभेद : थोडें अन्वेक्षण व विश्लेषण :

या शेरमधील एका शब्दाच्या पाठभेदावर खास नजर टाकायला हवी. तो शब्द वेगवेगळी रूपें घेऊन वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये व इंटरनेटवर येतो. ती रूपें आहेत : ‘बिरोग’, ‘बरोग’, ‘विरोग’, इत्यादी. एका ठिकाणी ‘विरोध’ हा शब्दही आढळतो.

या विकल्पांचा उगम कां कसा होत असेल, हा एक इंटरेस्टिंग विषय आहे. त्याची थोडीशी चर्चा आपण पुढे करू. पण एक गोष्ट नक्की, ती ही की, हे वेगवेगळे विकल्प त्या ठिकाणी चपखल बसत नसते, तर त्यांचा समावेश झालाच नसता. त्यामुळे, ते शब्द गझलच्या ओळीत वापरले असतां काय अर्थ निघतो, हें पाहणें उपयुक्त ठरेल.

  • ‘बिरोग’ : हा शब्द आपण वर पाहिलाच आहे. हा शब्द हिंदीतील आहे. बृहद् प्रामाणिक हिंदी कोश सांगतो की, हा ‘बिरोग’ शब्द संस्कृत ‘वियोग’ शब्दापासून बनलेला आहे.

अरविंद कुमार-कुसुम कुमार यांचा हिंदी ‘समांतर कोश’ (थिसॉरस) वियोग या शब्दाचें प्रतिशब्द असे देतो – बिहोर, बिहोरा, बिछोह, बिजोग, बिरह.

पण हें वियोगचें बिरोगमध्ये परिवर्तन कसें झालें असावें ? ‘व’ चा ‘ब’ होणें आपण समजू शकतो. उदा. वंशी – बंसी , वर्षा – बरखा / बरसा, विष्णु – बिशनु,

विक्रय – बिक्री, वैर – बैर, इत्यादी.  ‘य’ चा ‘ज’ झालेलाही दिसून येतो, उदा.

यमुना – जमुना / जमना, योगी – जोगी, इ.  मात्र, ‘वियोग’ चें ‘बिरोग’ मध्ये कसें परिवर्तन हें असें सहज झालेलें दिसत नाहीं. त्या बदलाविषयीचा कयास असा :

वियोग / बिजोग, व विरह / बिरह, या दोहोंचा संयोग होऊन ‘बिरोग’ शब्द बनला असावा.

उर्दूचे जाणकार, व रसिक, डॉ. विनय वाईकरही त्यांच्या पुस्तकात ‘बिरोग’ याचा अर्थ वियोग असाच घेतात. उर्दूचा रशियन अभ्यासक फिलिप निकोलायेव्ह (Philip Nikolayev) हासुद्धा ‘बिरोग’ या शब्दाचा अर्थ ‘separation’ म्हणजे वियोग असाच देतो. या दोघांनीही, आधी अन्य जाणकारांकडून याची खातरजमा करून घेतली असेलच.

पण आतां प्रश्न असा आहे की, उर्दू-फारसीचा जाणकार ज़फ़र याच्या साहित्यात हा संस्कृतोद्भव हिंदी शब्द कसा आला? याचें उत्तर शोधण्यापूर्वी आपण हें ध्यानात घ्यायला हवें की, याच गझलमध्ये हिंदीमधील ‘रूप’, फूल, ( व, पाठभेदानुसार,  ‘दुख’, पुकार ), असे संस्कृतोद्भव शब्द आहेतच की.

असे शब्द वापरले जाण्यामागचें कारण असें आहे की, उर्दू भाषा हिंदीचेंच व्याकरण वापरते ; फक्त कांही नामें-सर्वनामें, उपसर्ग-प्रत्यय, व कांहीं कल्पना तिनें फारसीतून घेतलेल्या आहेत. आणि, अनेक उर्दू शायरांच्या शायरीत हिंदीतील शब्दही, जसेच्या तसे किंवा अपभ्रष्ट रूपानें, अधूनमधून येतात, जसें ‘मन’, ‘रुत’ (ऋतु), ‘जीवन’, ‘रात’, ‘शिवाला’ (शिवालय) म्हणजे मंदिर, इत्यादी. आपण याची दोनतीन उदाहरणें पाहू.

* मीर तक़ी ‘मीर’चा उल्लेख आपण आधी केलेला आहे. १७६१च्या पानिपत युद्धाच्या काळात मीर मध्यमवयीन होता व दिल्लीत रहात होता. यावरून तो किती जुना कवी आहे हें कळेल. उर्दूच्या सर्वकालीन श्रेष्ठ शायरांपैकी मीर एक समजला जातो. त्याच्या ‘पत्ता पत्ता’ या गझलमधील पत्ता व बूटा हे दोन्ही हिंदीमधील संस्कृतोद्भव शब्द आहेत.

* मौलाना हसरत मोहानी यांनी २०व्या शतकाच्या पूर्वार्धातील भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. यावरून त्यांचा काळ कळावा. त्यांच्या

‘चुपके चुपके रात दिन ..’ या प्रसिद्ध गझलमधील ‘रात’ हा हिंदीतील शब्द आहेच; आणि पुढील एका शेरच्या ‘वो तेरा कोठे पे नंगे-पाँव आना याद है’ या भावस्पर्शी ओळीतील कोठा व पाँव हे हिंदीतील शब्द आहेत.

* गेल्या वीसएक वर्षांमधील, गुलाम अली यांनी गायलेली, तसेंच आशा भोसले यांनीही गुलाम अलींच्या संगीत दग्दर्शनाखाली गायलेली, ‘रात जो तुमने दीप बुझाए ..’ ही, सलीम गिलानी यानें लिहिलेली गझल पहा. पहिल्याच ओळीत रात व दीप हे हिंदीमधले शब्द वापले गेलेले आहेत.

त्यामुळे, जफ़रच्या शायरीत हिंदीतील शब्द आले तर नवल नव्हे. त्यातून, जफ़रची आई हिंदू होती व तिच्या बोलण्यांत हिंदीतील शब्द येतच असणार. ज़फ़र स्वत: हिंदू सण साजरे करत असे, त्याच्या आजूबाजूला हिंदी बोलणारे हिंदू दरबारीही असणार; व या सगळ्यामुळे हिंदू चालीरीतींबरोबरच त्याला हिंदी शब्दांचा परिचयही असणार.

  • ‘बिरोग’ या शब्दामधून आणखी कांहीं अर्थ ध्वनित होतो काय, हें आपण बघूं या.

‘व’ चा ‘ब’ होतो हें आपण वर पाहिलेंच आहे. त्यामुळे, ‘बिरोग’ या शब्दाचें मूळ

‘विरोग’ हा शब्दही होऊ शकतो. विरोग याची फोड अशी होऊं शकते : वि + रोग.

‘वि’ या उपसर्गाचा अर्थ ‘विशेष’ असा होतो. त्यामुळें, ‘विरोग’ म्हणजे, ‘विशेष रोग’.

असा अर्थ घेतला तर ‘बिरोग की हूँ सदा’ याचा अर्थ होईल : ‘विशेष रोगाची साद/पुकार’. हा ‘विशेष रोग’ कोणता? तर तो म्हणजे इंग्रजी शासन व त्यामुळे आलेलें पारतंत्र्य. हा इंग्रजी शासनरूपी व पारतंत्र्यरूपी मोठा व दुर्धर रोग हिंदुस्थानला जडलेला आहे, व या रोगाबद्दल ‘चीख चीख कर दुनिया को आगाह करनेवाली आवाज़’ म्हणजे     जफ़र, कारण जफ़र होता फसलेल्या स्वातंत्र्ययुद्धाचा नेता.

  • बरोग : पाठभेदाचा परिणाम म्हणून, हाही शब्द या शेरमध्ये वापरला गेलेला दिसतो.

याचा अर्थ शोधतांना दोन शक्यतांचा विचार करावा लागतो.

# (१)  उर्दूची लिपी अरबी-फारसीपासून घेतलेली आहे. फ़ारसीत इकार-उकार असे साधारणपणें लिहिले जात नाहींत. (उर्दूमध्ये, इ-ई, उ-ऊ, ए यांचे, व्यंजनाच्या रूपांमध्ये येणारे उच्चार लिखित स्वरूपात मांडण्यासाठी खुणा उपलब्ध आहेत, पण त्या नेहमी वापरल्या जातातच असें नाहीं). त्यामुळे, फारसीत, व पर्यायानें उर्दूमध्येही, एकाच शब्दाची

भिन्नभिन्न रूपें दिसून येतात. उदाहरणार्थ : महब्बत – मुहब्बत , मक़्सद – मक़्सूद,

ख़जाँ – ख़िजाँ (पानगळ), फ़जा – फ़िजा (वातावरण), वगैरे.

त्या दृष्टीनें पाहिलें तर,  ‘बरोग’ व ‘बिरोग’ हे दोन्ही एकच. ‘बिरोग’ शब्दातून अभिप्रेत अर्थाकडे आपण पाहिलेंच आहे. ‘बरोग’चेंही तेंच.

# (२) दुसरी शक्यता अशी : बरोग = ब + रोग.

पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, अन् ती ही की, ‘ब’ हा

फारसी उपसर्ग  आहे, तर ‘रोग’ हा संस्कृतोद्भव हिंदी शब्द आहे. म्हणजे, बरोग हा दोन भाषांचा मिश्र शब्द आहे. पण हिंदी-उर्दूतच नव्हे, तर इतर भारतीय भाषांमध्येही असे शब्द आहेत, जे फारसी व भारतीय भाषेतील शब्दांचा संयोग होऊन बनलेले आहेत.

दोनएक उदाहरणांनी हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.

*मराठी मुलुखातील सरदेशमुख ( सर + देशमुख ), सरदेशपांडे ( सर + देशपांडे ), सरदेसाई ( सर + देसाई), ही आडनांवें पहा.

*उर्दूमधील ‘बरसात’ शब्द घ्या. ‘बरसा’ हा शब्द वर्षा या संस्कृत शब्दापासून बनला आहे. ‘आत’ हा फारसी प्रत्यय अनेकवचन दाखवतो, जसें

कागज़ – कागज़ात, हालत – हालात ; सदमा – सदमात, मुश्किल – मुश्किलात. तसेंच, ‘बरसा’ या संस्कृतोद्भव शब्दाला फारसी प्रत्यय लागून बहुवचन झालें ‘बरसात’.

*उर्दूमध्ये, शब्दांचे बहुवचन फारसीप्रमाणें केलें तरी चालतें, किंवा हिंदीप्रमाणें केलें तरीही चालतें. उदा. , ‘कागदांना’ यासाठी, म्हणजे कागज़ या शब्दाच्या बहुवचनाला विभक्ती-प्रत्यय लावतांना, फ़ारसीप्रमाणें बहुवचन वापरून

‘कागज़ात को’ असेंही म्हणता येतें, किंवा ‘कागज़ों को’ असेंही म्हणतां येतें. ‘कागज़ों’ मध्ये बहुवचनीय उपयोगासाठी, ‘कागज़’ या फ़ारसी शब्दाला ‘ओं’ हा हिंदीचा प्रत्यय लागला आहे.

‘ब’ या फारसी उपसर्गातून ध्वनित होतो, साथ, संग, togetherness. उदा., ‘दिन-ब-दिन’, म्हणजे दिवसामागून दिवस. तसेच, ‘कू-ब-कू’, ‘शब-बख़ैर’ ; त्याचप्रमाणें, ‘बदौलत’

(ब + दौलत), व ‘बनिस्बत’ (ब + निस्बत) हे शब्द. यातील निस्बत म्हणजे संबंध.

त्यानुसार ‘बरोग’ दर्शवतो रोगाचें सानिध्य. ‘बरोग की हूँ सदा’ याचा अर्थ असा घेता येईल: जिला रोग जडलेला आहे, अशा ‘शै’(entity) चा आवाज. असें, दुर्धर रोग जडलेलें कोण आहे, तर पारतंत्र्यातील हिंदुस्थान. अशा हिंदुस्थानचा आवाज आहे ज़फ़र.

  • विरोग : ‘व’ आणि ‘ब’ ची interchangability आपण आधी पाहिलीच आहे. त्यामुळे, हें स्पष्ट आहे की, विरोग व बिरोग हे दोन्ही एकच.
  • विरोध : हा शब्द एकदाच दिसून आला, व तोही इंटरनेटवर. त्यामुळे, तो किती विश्वसनीय आहे, हें पहावें लागेल. मात्र, ‘विरोध’ शब्द वापरला गेला तरी, सुसंगत अर्थ लागतो.

इंग्रजांना विरोध कुणी केला, तर, शिपायांनी आणि नानासाहेब-तात्या टोपे-झाशीची राणी लक्ष्मीबाई व अनेक हिंदू-मुस्लिम सेनानींनी. त्या सर्वांच्या स्वातंत्र्यलढ्याचा नेता म्हणून कुणाचें नांव घोषित (डिक्लेअर) केलें गेलेलें होतें, तर ज़फ़रचें. त्याला हिंदुस्थानचा सम्राट म्हणून घोषित केलें गेलें होतें. म्हणजेच, या इंग्रजविरोधी युद्धाचा ‘चेहरा’ कोण होता, तर ज़फ़र. म्हणूनच, जफ़र म्हणजेच ‘विरोध की सदा’.

  • वैराग्य :  उर्दू साहित्याचे ज्ञाते, विद्वान, डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या पुस्तकात, शेरची ही ओळ ‘बड़े बिरोग की हूँ सदा’ अशीच दिलेली आहे. परंतु ते ‘बिरोग’ याचा अर्थ ‘वैराग्य’ असा घेतात. पण, वैराग्य हा शब्द ‘विराग’पासून बनलेला आहे. त्यामुळे, ‘वैराग्य’ असा अर्थ घ्यायचा असेल तर, शेरमधील शब्द ‘विराग / बिराग’ असा असायला हवा,

‘विरोग / बिरोग’ नव्हे.

मात्र, ‘वैराग्य’ हा अर्थसुद्धा शेरच्या अर्थाच्या दृष्टीकोनातून सुसंगत आहे. युद्ध हरलेल्या, मायदेशापासून दूर कैदेत पडलेल्या, अतिवृद्ध माणसाला उदासीनता, वैराग्य तर येणारच, त्याचा सर्व गोष्टींमधील रस संपलेला असणारच. असा वैराग्याचा आवाज म्हणजे जफ़र.

  • शेर ४ था :

न तो मैं किसी का हबीब हूँ, न तो मैं किसी का रक़ीब हूँ

जो बिगड़ गया वो नसीब हूं, जो उजड़ गया वो दयार हूँ ।

मी कुणाचाही मित्र (हबीब) नाहीं, मी कुणाचाही प्रतिस्पर्धी (रक़ीब) नाहीं.

जें बिघडलें आहे तें नशीब मी आहे, जें उजाड झालें आहे असें घर (किंवा स्थळ) मी आहे.

 आतां विजनवासात, बंदीवासात असलेल्या ज़फ़रचे कुणाहीबरोबर संबंध राहिलेले नाहींत. त्यामुळे तो

आतां कुणाचाही दोस्तही नाहीं, प्रतिस्पर्धीही नाहीं. तो मित्र कुणाचा होता, तर क्रांतिकारकांचा. पण

आतां बंदीवासामुळे, ती मैत्री उपयोगी राहिलेली नाहीं ; तिचा अंत झालेला आहे. ‘रक़ीब’ म्हणजे,

प्रेमातील प्रतिस्पर्धी. एकाच प्रेयसीवर दोन आशिक (प्रेमी) प्रेम करत असले, तर त्यापैकी प्रत्येकजण दुसर्‍या आशिकचा रक़ीब असतो. दिल्ली व पर्यायानें सत्ता, हिचे, दोन प्रेमी म्हणता येतील. एक म्हणजे जफ़र व दुसरा म्हणजे इंग्रज. पण आतां तर जफ़र त्या समीकरणातून बाहेरच फेकला गेलेला आहे. त्यामुळे तो काय आतां कुणाचा रक़ीब होणार !

मग, आतां ज़फ़र कोण आहे, काय आहे ? क्रांतीचें सर्व गणितच  दुर्दैवानें बिघडलें. तें दुर्दैव, तें कमनशीब म्हणजेच ज़फ़र. आधीच्या एका शेरचा अर्थ पहातांना, आपण तिथें दुर्दैवाचा अध्याहृत संबंध दाखवलेला आहे. पण इथें तर ज़फ़रनें उघडउघडच म्हटलें आहे की तो स्वत:च कमनशीब आहे. ‘दयार’ म्हणजे घर किंवा स्थळ.  उजाड, उध्वस्त झालेलें घर म्हणजे ‘परकीयांपासून स्वातंत्र्याची आशा पूर्णपणें मावळलेला असा हिंदुस्थान’. आधीच्या एका शेरचा अर्थ पाहतांना हिंदुस्थानचा उल्लेख आपण केला आहे. इथें तर ज़फ़र म्हणतो आहे की तो स्वत:च तें उध्वस्त झालेलें घर (म्हणजे उध्वस्त हिंदुस्तान) आहे. ज़फ़रच्या ‘लगता नहीं हैं दिल मेरा उजड़े दयार में’  या गझलमध्ये, त्यानें ‘ आपण उजाड झलेल्या स्थळी रहात आहोत’ असा उल्लेख केला आहे. पण इथें तर. ‘मी स्वत:च उध्वस्त झालेलें स्थान आहे’ असे अधिक उदास शब्द वापरलेले आहेत. आपल्याला असें म्हणता येईल की, या शेरमध्ये ज़फ़रनें, कमनशीब itself, तसेंच दुर्दैवी हिंदुस्थान, या दोहोंचें स्वत:शी एकरूप दाखवलें आहे. त्यामुळे, हा शेर अधिक गहिरा असा म्हणता येईल.

  • शेर ५ वा  :

प-ए-फ़ातहा कोई आये क्यों, कोई चार फूल चढ़ाये क्यों

कोई आके शम्मा जलाये क्यों, मैं वो बेकसी का मज़ार हूँ ।

आपण आधी पाहिलेंच आहे की, हा या गझलचा ‘आखरी शेर’ आहे. (कांहीं ठिकाणी हा अंतिम शेर म्हणून देत नाहींत. मात्र, ‘आखरी शेर’ म्हणून तो अधिक योग्य वाटतो).

पाठभेद :

* ‘प-ए’ याचे कांहीं पाठभेद आहेत. ते फारसे वेगळे नसले तरी, त्यानिमित्तानें कांहीं महत्वाचे मुद्दे पुढे येतात. त्याची वेगळी चर्चा नंतर केलेली आहे.

* ‘कोई आके शम्मा जलाये क्यों’ याचा पाठभेद, ‘कोई शम्मा लाके जलाये क्यों’ असा आहे. दोन्ही versions मध्ये फारसा फरक नाहीं.

* ‘मैं वो बेकसी का मज़ार हूँ’ याचा पाठभेद आहे, ‘कि मैं बेकसी का मज़ार हूँ’ असा आहे. दोन्हीत फारसें अंतर नाहीं.

* एका महत्वाच्या पाठभेद पुढील आहे : ‘कोई आके शम्मा जलाये क्यों’ या ओळीच्या ऐवजी पाठभेद आहे, ‘ज़फ़र अश्क कोई बहाए क्यों’. हा विकल्प कां योग्य नाहीं, यावर आपण आधी चर्चा केलेलीच आहे.

या शेरच्या दुसर्‍या ओळीचा अखेरचा भाग पाहिल्यावर या शेरचा अर्थ सुस्पष्ट होतो. तो भाग आहे :

मैं बेकसी का मज़ार हूँ. मज़ार म्हणजे कुणा पीर-फकिराची, कुणा खास व्यक्तीची समाधी (कबर). मी जिवंत व्यक्ती नाहीं, तर एक मज़ार आहे. की कुणाची समाधी (मज़ार) आहे , तर, असहायतेची, दु:खाची समाधी आहे मी. फातहा/फातिहा/फातेहा म्हणजे, ‘मृतासाठी / मृतात्म्यासाठी केली गेलेली प्रार्थना’. अशा या मज़ारजवळ फातहा म्हणायला कुणी येईलच कशाला, या  मज़ारवर कुणी चार फुलें चढवेलच कशाला, या  मज़ारपुढे कुणी दिवा लावेलच कशाला ?

आपण आधी ‘जिंदा लाश’ ही उर्दू साहित्यातील संकल्पना पाहिली आहे, व याआधीच्या एका शेरच्या संदर्भात तिची चर्चाही केलेली आहे. आतां इथें, या शेरमध्येही ती संकल्पना पुढे नेत एक अतिशय उदास विचार मांडलेला आहे. जिवंत असूनही, ज़फ़र ‘मी असहायतेची समाधी आहे’ असे म्हणतो. म्हणजे, ही असहायता साधीसुधी नाहीं, तर विशेष आहे, खास आहे. कारण ती एका क्रांतियुद्धानंतर आलेली असहायता आहे. तिचें प्रतीक म्हणजे ज़फ़र. म्हणून, तो स्वत:च एक मज़ार आहे. पण कशी समाधी, तर, जिथे कोणी प्रार्थना (फातहा) म्हणायला येणार नाहीं, फुलें वहायला येणार नाहीं, ज्योत (शम्मा) पेटवायला, दीपक पालवायला सुद्धा येणार नाहीं, कोणीही कशाहीसाठी येणार नाहीं. एक तर, ज़फ़रला हिंदुस्थानपासून इतकें दूर कोंडलेलें आहे की, कोणा हिंदुस्थान्याचें तिथें येणेंच कठीण ; आणि दुसरें म्हणजे, क्रांती असफल झाल्यामुळे सगळेच लोक इतके असहाय्य आहेत, की कोणी कसें रंगूनला येऊं शकणार ?  या सर्वाचा अर्थ असा की, ज़फ़र हा जिवंतपणीच एक ‘forgotten tomb’ झालेला आहे.

  • ‘पएफ़ातहा’ : थोडा अर्थशोध :  

* पाएफ़ातहा हा शब्द उर्दूदाँ मंडळींना कळेल, पण तुमच्यामाझ्यासारख्या लोकांना चटकन त्याचा अर्थ लक्षात येणार नाहीं. हा शब्द ‘मद्दाह’ यांच्या ऊर्दू-हिंदी शब्दकोशातही नाहीं,  श्रीपाद जोशी-गोरेकर यांच्या उर्दू-मराठी शब्दकोशातही नाहीं, आणि, ज़रीना सानी-विनय वाईकर यांच्या

‘आईना-ए-ग़ज़ल’ या शब्दकोशातही नाहीं. तेव्हां आपल्याला जरा खोलात जाऊन तो शोधून काढावा लागेल. (कबीरानें म्हटलेंच आहे, ‘जिन खोजा तिन पाइयाँ गहरे पानी पैठ’).

* फ़ातहा याचा अर्थ आपण आधी पाहिलाच आहे.

* ‘ए’ हा एक उपसर्ग आहे, व त्याचा अर्थ आहे ‘चा’. जसें ‘सुबहे चमन’ म्हणजे चमन की सुबह, बागेची सकाळ. कांहीं अन्य उदाहरणें : दिले नादान, ‘मता-ए-कूचा-ओ-बाज़ार’, ‘पसे आईना’,

‘कू-ए-यार’.

* ‘प’ याचें मूळ रूप आहे ‘पा’. ‘पा’ म्हणजे पाय.

‘पा’ याचा ‘प’ कसा झाला ? या क्रियेला ‘ज़रूरते शेरी’ म्हणतात. गझल हें लयबद्ध काव्य आहे. गझल एखाद्या ‘बहर’मध्ये (वृत्त) लिहिली जाते. तिथें  शब्दाचें वजन व लय यासाठी कधीकधी शब्दाचे लघु रूप वापरात आणले जाते. उदा. ‘राह’ चें ’रह’, ‘माह’ चें ‘मह’, ‘शाह’ चें ‘शह’. त्याचप्रमाणे, इथें ‘पा’ चें ‘प’ झालेलें आहे. याचा अर्थ असा की, ‘प’चें मूळ रूप ‘पा’ आहे.

* ‘प-ए-फ़ातहा’ म्हणजे ‘पा-ए-फ़ातहा’.

पा-ए-फ़ातहा याचा अर्थ समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूं.

* ‘पा’ हें वस्तुत: नाम आहे, पण त्याचा उपसर्गासारखाही उपयोग केला जातो. एखाद्या शब्दाला ‘पा’ जोडला तर त्या जोड-शब्दाचा अर्थ कांहीं वेगळा होतो. आपण कांहीं उदाहरणें पाहूं या.

# बंद – पाश.       पाबंद – वचनबद्ध ;  पाबंदी – बंधन.

# बोसा – चुंबन.     पाबोस – बूटचाट्या.

# ज़ेब – शोभा.      पाज़ेब – पैंजण.

# जामा – वस्त्र.     पाजामा किंवा पाएजामा – पायजमा.

# काश्त – कृषि.     पाएकाश्त – दुसर्‍या गांवात शेती करणारा शेतकरी.

# तख़्त – बसायचा चौरंग, पलंग, राष्ट्र.      पाएतख़्त – राजधानी.

* त्याचप्रमाणे, ‘पएफ़ातहा’ म्हणजे, ‘फ़ातहा पढ़ने के हेतु आनेवाला व्यक्ति’, असा अर्थ घेता येतो. विविध गझलसंग्रह, ‘पएफ़ातहा’ चा अर्थ, ‘फ़ातहा पढ़ने के हेतु’ असा देतात. तो अर्थ आपल्या विश्लेषणाशी सुसंगत आहे.

  • ‘पएफ़ातहा’ च्या निमित्तानें : पाठभेद, विकल्प, प्रक्षेप : कांहीं विचार :

* इंटरनेटवर ‘पए’ ऐवजी कांहीं वेबसाइटवर अन्य वेगवेगळे शब्द दिसतात : पे, ये, पढ़े, पढ़ने.

* या विकल्पांमुळे, त्या ओळीतही कांहीं बदल झालेले आहेत. उदा. – ‘पढ़े’ हा विकल्प वापरलेला असतांना, ‘पढ़े फ़ातहा कोई आके क्यों’ अशी ओळ आढळते ; म्हणजे ‘आए’ च्या ऐवजी ‘आके’ वापरलेला आहे. पण असे विकल्प फारसे महत्वाचे नाहींत. आणि, अशा लहान बदलांमुळे अर्थबदलही झालेला नाहीं.

* एक उद्बोधक चर्चाही इंटरनेटवर आढळली. एकानें व्यक्तीनें लिहिलें आहे की, ‘‘हा शब्द ‘पढ़े’ असा आहे’’ ; तर दुसर्‍यानें उत्तर दिलें की, ‘‘नाहीं, मी गझल पुन्हा ऐकली, तो शब्द ‘पए’च आहे’’.

* या चर्चेवरून पाठभेद, विकल्प व प्रक्षिप्त शब्द याबद्दल थोडी कल्पना येते. पाठभेद होण्याचा संभव कमी कुठे आहे, तर जेव्हां आपण शब्द वाचतो तेव्हां. पण केवळ ऐकूनच जर शब्द जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला, तर वैकल्पित शब्द निर्माण होऊ शकतो.

एका उदाहरणानें हा मुद्दा स्पष्ट होईल. मोमिन याची ‘वो जो हममें तुममें क़रार था’ ही गझल बेगम अख्तर यांनी गाइलेली आहे. अतिशय सुस्पष्ट, सुंदर व भावपूर्ण अशा प्रकारें त्यांनी ही गाइलेली आहे. या गझलची एक ओळ पहा. ‘वो नये गिले वो शिकायतें …’ . या  शब्दांच्या पुढला ओळीचा भाग जर नुसता वरवर ऐकला, तर तो असा वाटूं शकतो : ‘वो मज़े मज़े की हिदायतें’. ‘हिदायत’ म्हणजे, आदेश, हुकूम. (अर्थातच, या चुकीची जबाबदारी, ऐकणाराची आहे, गाइकेची नाहींच, कारण काळजीपूर्वक ऐकलें तर गायलेला शब्द नक्कीच कळतो). पण, आपण जर पुस्तकात वाचलें, तर ही ओळ खरी कशी आहे, तें कळतें : ‘वो मज़े मज़े की हिकायतें’. ‘हिकायत’ म्हणजे, कथा, वृत्तांत.  बघा, काव्यात कसा वैकल्पित शब्द आला तें.

* पूर्वीच्या काळीं छपाईची कला विकसित झालेली नव्हती, फैलावलेली नव्हती. त्यामुळे, मुशायर्‍यात किंवा इतरत्र, ऐकूनच काव्य कळत असे. त्यामुळे जुन्या काळच्या काव्यात विकल्प/पाठभेद असण्याची शक्यता जास्त.

* प्रसिद्ध काव्यासारखी आपणही रचना करावी, किंवा आपण त्या काव्यात भर टाकावी असें कांहींना वाटत असे. असें लिहिलेलें ‘जास्तीचें’ (additioanal) काव्य कधी कधी मूळ काव्यात मिसळत असे. महाभारतात असे कितीतरी प्रक्षेप आहेत, हें आपल्याला माहीतच आहे. अगदी हल्लीचें उदाहरण घ्या. ‘रंजिश ही सही’ ही आधी उल्लेखलेली गझल अहमद फ़राज़ यांनी लिहिलेली आहे. तेच (same) रदीफ-काफिया असलेले कांहीं शेर महेंद्रसिंह बेदी यांनी लिहिले आहेत, व असे दोन शेर गायक मेहदी हसन हे गातात. ही गझल गातांना, ते कधी कधी तसें सांगतातही. पण त्याचें तें कथन, तें स्पष्टीकरण सगळ्यांना माहीत असतेंच असें नाहीं. त्यामुळे, कांहीं गझलसंग्रहात ते  ऍडिशनल दोन शेरसुद्धा अहमद फ़राज़ यांचे म्हणूनच दिलेले दिसतात.

* असाच एक जास्तीचा (व, प्रक्षिप्त) शेर ‘न किसी की आँख..’ या गझलमध्येही आलेला आहे. तो आपण पुढे पहाणारच आहोत.

* जर २० व्या शतकातही असे प्रक्षेप घडले असतील ; किंवा २१व्या शतकातही, इंटरनेट व सोशल नेटवर्किंगच्या काळात, ‘पए’ च्या जागी, किंवा काहीँ ओळीच्या स्थानीं, विकल्प तयार होत असतील; तर मग ‘न किसी की आँख का नूर हूँ’ या जुन्या गझलच्या कर्त्याबद्दल संभ्रम असल्यास नवल वाटायला नको.

  • शेर ६ वा :  

जरी कांहीं वेबसाइटस् पुढील शेरचा या गझलमध्ये समावेश करतात, तरी हा शेर प्रक्षिप्त वाटतो. पाहूं या तो शेर.

मैं कहाँ रहूँ मैं कहाँ बसूँ, न ये मुझसे ख़ुश न वो मुझसे ख़ुश

मैं ज़मीं की पीठ का बोझ हूँ, मैं फ़लक के दिल का गुबार हूँ ।

मी कुठे राहूं ? मी कुठे निवास करूं ? हा आणि तो, कोणीच माझ्यावर खुश नाहीं.

      मी धरतीच्या पाठीवरील ओझें आहे, मी आकाशाचें (फ़लक) मनोमालिन्य आहे.

या शेरचें ‘वजन’ तसेंच रदीफ-काफिया, या गझलच्या इतर शेरांप्रमाणेंच आहे. वरवर पाहतां, हा शेर या गझलचा भाग असूं शकेल, असें वाटणें शक्य आहे. मात्र, जरासा खोलवर विचार केल्यावर लगेच हें जाणवते की, जरी या शेरमध्ये या गझलच्या इतर शेरांच्या शैलीचें अनुकरण करण्याचा प्रयत्न आहे, तरीही हा शेर ज़फ़रनें (किंवा मुज़्तरनें) लिहिलेला नसणार. आपण या शेरचा थोडासा अभ्यास करूं या.

* या शेरचा काफिया आहे ‘गुबार’. हाच काफिया मत्ल्यामध्येही वापरला गेलेला आहे. पण, हा कांहीं निगेटिव्ह पॉइंट म्हणता येणार नाहीं. प्रत्येक शेरमध्ये भिन्न काफिया आला तर चांगलेंच, पण, काफियाची पुनरावृत्ती करायची नाहीं असें काहीं बंधन गझलमध्ये नसतें. काफिया एकच आलेला असला तर, शब्द एकच असला तरी त्याचा अर्थ वेगळा आहे कां, अथवा दोन्ही शेरमध्ये वेगळी कल्पना, वेगळी मांडणी आहे ना, तें पाहणें महत्वाचें. अनेक विख्यात शायरांच्या कांहीं गझलांमध्ये कांहीं काफिये रिपीट झालेले आहेत. आपण दोनएक उदाहरणें बघूं या.

दाग़च्या एका गझलचे दोन शेर पहा.

(एक मत्ला आहे, व एक अन्य शेर आहे) :

ख़ातिर से या लिहाज़ से, मैं मान तो गया

झूठी क़सम से आपका ईमान तो गया ।

……

देखा है बुतकदे में जो ऐ शैख़ कुछ न पूछ

ईमान की तो ये है कि ईमान तो गया ।

साहिर लुधियानवीच्या ‘तंग आ चुके हैं या गझलचे दोन शेर पहा. (मत्ला व एक अन्य शेर) :

तंग आ चुके हैं कशमकशे ज़िंदगी से हम

ठुकरा न दें जहाँ को कहीं बेदिली से हम ।

…..

उभरेंगे एक बार अभी दिल के वल्वले

गो दब गए हैं बारे-ग़मे-ज़िंदगी से हम ।

काफिये व रदीफच काय, उर्दू काव्यात प्रतीकेंसुद्धा तीच ती वापरली जातात.  पण एखाद्या शायरनें साहित्यातील जुनी व लोकप्रिय प्रतीकें किंवा रदीफ, काफिये वापरले; तर केवळ त्यावरून कोणी त्याच्या शायरीचा दर्जा ठरवत नाहीं. त्या शायरनें ती प्रतीकें किंवा काफिये कसे, किती कल्पकतेनें, किती effectively, वापरले आहेत, त्यावरून त्या शायरीचा दर्जा ठरत असतो.

तेव्हां, नुसत्या पुनरुक्तीच्या कारणावरून तरी,  ‘न किसी की आँख का ..’  या गझलच्या

‘मैं कहाँ रहूँ ..’ या शेरला कमी दर्जाचा म्हणतां येणार नाहीं.

* मात्र, हा शेर गझलच्या इतर शेरांपेक्षा कमी दर्जाचा, इनफीरियर, वाटतो, कारण आधीच्या शेरांमध्ये जी आर्तता आहे, ती यात दिसत नाहीं. त्या शेरांमधील उदासी नैसर्गिक, आंतून आलेली, वाटतें ; इथें ती ओढून-ताणून आणल्यासारखी वाटते. यात शब्दाचें चयनसुद्धा इतर शेरांसारखे apt वाटत नाहीं.

* ‘कुठे निवास करूं’ (कहाँ बसूँ) म्हणजेच ‘कुठे राहूं’.  हें तर डुप्लिकेशन झालें, पुनरुक्ती झाली.

* पुढे, ‘कोणीच माझ्यावर खुश नाहीं’, हें सांगतांना,  ‘न ये मुझसे ख़ुश’ व ‘न वो मुझसे ख़ुश’ असे शब्द वापरलेले आहेत. यातील ‘ये’ व ‘वो’ या शब्दानी सिग्निफाय होणार्‍या जनांमध्ये कांहींतरी वेगळेंपण दिसायला हवें, किमान अध्याहृत तरी असायला हवें, तरच  ‘ख़ुश नसलेल्या’ लोकांमध्ये diversity दिसेल. ‘ये’ म्हणजे जर ‘हिंदुस्थानी लोक’ असें म्हटलें तर मग ‘वो’ म्हणजे कोण? ‘ये’ म्हणजे जर ‘क्रांतिकारी’ असें समजलें तर मग ‘वो’ कोण ? ‘ये’ म्हणजे जर ‘नातेवाईक’ असा विचार केला, तर मग ‘वो’ कोण? एका बाजूला हे कोणीही लोक असले, तर, खरें म्हणजे, दुसर्‍या बाजूचे लोक म्हणजे इंग्रज.  ज़फ़र तर त्यांच्या विरुद्धच होता. त्यामुळे, ते तर ज़फ़रवर खुश नसणारच. तेव्हां त्याचा उल्लेख इथें असणारच नाहीं. याचाच दुसरा अर्थ असा की, ‘ये’ व ‘वो’ हे शब्द वापरले आहेत खरे, पण हा वाक्यांश effective नाहीं. आणि म्हणून,  शेरचा हा भाग, जेवढा-असायला-हवा-तेवढा परिणामकारक नाहीं.

* ‘सर्व सृष्टी’, हें दर्शवायला पृथ्वी व आकाश हे शब्द वापरले आहेत., व तें योग्य आहे, असें समजतां येईल. ‘मैं ज़मीं की पीठ का बोझ हूँ’, मी पृथ्वीवरील ओझें आहे, हा भाग ठीक आहे. पण, ओळीचा द्वितीय अर्धांश आहे, ‘मी आकाशाच्या मनातील मालिन्य (गुबार) आहे’. म्हणजे नक्की काय ?

* बरें, ‘गुबार’ चा दुसरा अर्थ ‘धूळ’ आहे, तो इथें हा घेतला तर ? तर मग, ‘फ़लक के दिल का गुबार’ म्हणजे ‘आकाशाच्या हृदयातील धूळ’ असा अर्थ होईल. पण मग , ‘मैं कहाँ रहूँ मैं कहाँ बसूँ’ या भागाशी तें सुसंगत नाहीं, कारण, धूळ तर सर्वत्रच असते.

* म्हणजेच, शेरची दुसरी ओळही इच्छित परिणाम साधायला कमी पडते.

* आणखी एक गोष्ट. ‘मैं कहाँ रहूँ मैं कहाँ बसूँ, न ये मुझसे ख़ुश न वो मुझसे ख़ुश’ हा एक भाग समजला, व ‘मैं धरा की पीठ का बोझ हूँ’ हा दुसरा भाग समजला, तर असें दिसतें की, यातील एक भाग लिहिल्यावर दुसरा भाग लिहायची आवश्यकता नव्हती; म्हणजे, पहिला घेतला तर दुसरा अनावश्यक ठरतो, अन् दुसरा घेतला तर पहिला अनावश्यक वाटतो.

* आणखी एक मुद्दा. गझलच्या मत्ल्याची (पहिल्या शेरची) दुसरी ओळ पहा. ती आहे, ‘जो किसी के काम न आ सके, वो मैं एक मुश्ते गुबार हूँ’. या ओळीत जो विचार सांगितला गेला आहे, तोच ‘मैं धरा की पीठ का बोझ हूँ’ या शब्दांमध्ये रिपीट झालेला आहे. चांगल्या गझलमध्ये अशी पुनरुक्ती संभवत नाहीँ. आपण आधी चर्चा केलेलीच आहे की काफिया अथवा प्रतीकांची पुनरावृत्ती चालूं शकते ; पण कल्पनांमध्ये मात्र नाविन्य हवें. पण इथें तर कल्पनेचीच पुनरावृत्ती आहे.

* त्यामुळे, हा (सहावा) शेर प्रक्षिप्त आहे, तो या गझलमध्ये नंतर कधीतरी जोडला गेलेला आहे, असें म्हणतां येतें.

एकूण निष्कर्ष काय, तर असा की, हा सहावा शेर कमअस्सल आहे, या गझलमधील इतर शेरांच्या तुलनेनें इनफीरियर आहे, प्रक्षिप्त आहे.

हा शेर लिहिणार्‍या शायरच्या मनात ज़फ़रबद्दल प्रेम, सहानुभूती आहे, हें उघड आहे. म्हणूनच त्यानें हा शेर, ‘न किसी की आँख का नूर हूँ’ या गझलच्या शेरांसारखा लिहिला असावा. आणि, कधीतरी, कांहींतरी कारणानें हा प्रक्षेप गझलमध्ये सामील झाला. मात्र वाचकांनी-श्रोत्यांनी नीरक्षीरविवेक वापरून ‘दूध का दूध ओर पानी का पानी’ करायला हवें.

  • शेर सातवा :

हा शेर साजन पेशावरी यांनी संपादित केलेल्या ‘चर्चित शायर : प्रतिनिधि शायरी’ या संग्रहात समाविष्ट केलेला आहे, याचा उल्लेख आधी केलेलाच आहे. (अन्यत्र त्याचा उल्लेख मी पाहिलेला नाहीं). साजन पेशावरी सांगतात की, कांहीं लोकांच्या मतें ही गझल ‘हश्र’ हसामी (हश्मी?) यांनी लिहिलेली आहे, व ते, हश्र यांचा तख़ल्लुस (pen name, टोपण नांव) गोवलेला मक्ताही देतात. तो मक्ता असा आहे :

वो हँसी के दिन वो ख़ुशी के दिन गये ‘हश्र’ याद सी रह गई

कभी बादा-जामा-ए-नाब था, मगर अब मैं उसका उतार हूँ ।

(बादा-जामा-ए-नाब : उच्चप्रतीच्या मदिरेनें भरलेला पेला)

या शेरचा अर्थ सरळ आहे :

ते आनंद व हास्याचे दिवस निघून गेले, आतां त्यांची फक्त आठवणच राहिलेली आहे.  मी पूर्वी, शुद्ध मदिरेनें काठोकाठ भरलेला पेला होतो ; पण आतां मी, ज्यातील मदिरेची पातळी खालीखाली जात चाललेली आहे, असा पेला आहे.

यात शायरचें नांव आलेलें आहे, म्हणून आपण याला कदाचित ‘प्रक्षिप्त’ म्हणूं शकणार नाहीं. गझलच्या इतर शेरांशी ताडून पाहिलें तर, हें स्पष्ट आहे की, हा ‘हमरदीफ-हमकाफिया’ (म्हणजे, तोच रदीफ व तोच काफिया असणारा) शेर आहे. पण गझलच्या सुरुवातीच्या पांच शेरांशी तुलना केल्यावर हा शेर कांहींसा कमी दर्जाचा वाटतो. विशेषकरून त्या शेरांमध्ये जी आर्तता दिसते, ती इथें कमी वाटते.

* ‘वो हँसी के दिन वो ख़ुशी के दिन’ हा भाग ठीक आहे ; हँसी व खुशी दोन्हीही आल्यामुळे, कांहीसी द्विरुक्ती झालेली असली तरी, त्या (जुन्या) काळातल्या वातावरणाची उत्फुल्लता दिसते. ( खरें तर, त्या काळात जफरची नाममात्रच सत्ता होती, आणि तीही फक्त लाल किल्ल्याच्या अंतर्गतच चालत होती ; आणि त्याला इंग्रज देत असलेलें पेन्शनसुद्धा त्याला अपुरें पडत असे. तरीही, त्या काळात तो ‘स्वतंत्र’ होता. त्यामुळे, ‘गदर’नंतरच्या, कैदेतील काळाच्या तुलनेनें, त्या, आधीच्या, काळाला शायरनें ‘उत्फुल्लतेचा काळ’ म्हटलें, तर तें समजण्यासारखें आहे ) .

* त्या दिवसांची ‘याद सी रह गई’, हा भाग तसा ठीक आहे, पण ‘याद सी’ यातील ‘सी’ कशाला? तसेंच, इथें, कैदेच्या काळातील क्लेशपूर्ण वातावरणाचा उल्लेख आला असता, तर काँट्रास्ट नक्कीच वाढला असता, आर्तता नक्कीच जास्त वाटली असती. ‘मी मदिरेने भरलेला पेला होतो’, हा उल्लेखही योग्य आहे ; पण त्यानंतरचा,  ‘मगर अब मैं उतार हूँ’ हा भाग तुलनेनें गुणवत्तेत कमी पडतो , ‘उतार’ हा शब्द काफिया जोडण्यासाठी योजला आहे, हें उघड आहे. या सर्व गोष्टींमुळे हा शेर कमजोर वाटतो.

अर्थात, हें खरें आहे की, एका गझलमध्ये शायरनें लिहिलेले सर्वच शेर एकाच गुणवत्तेचे असतील असें नाहीं. हें ध्यानात घेऊनही असें म्हणावें लागतें की, ही संपूर्ण गझल ‘हश्र’नें लिहिलेली दिसत नाहीं ; त्यानें फक्त हा एक हमरदीफ-हमकाफिया शेर गझलला जोडलेला आहे. किंवा, हश्रनें एक अन्य संपूर्ण हमरदीफ-हमकाफिया गझल लिहिली असेल, जिच्यामधील फक्त मक्ता ‘न किसी की आँख का..’ या गझलला जोडला गेला.

अशा प्रकारें दुसर्‍या शायरनें लिहिलेल्या हमरदीफ-हमकाफिया गझलमधील शेर मूळ गझलला जोडले गेल्याची उदाहरणें आहेत. उदाहरणार्थ, मत्ल्याचा ‘मिसरा ए ऊला’ (पहिली ओळ) ‘उसकी हसरत है जिसे दिल से मिटा भी न सकूँ’ असलेली गझल पहा. या गझलमधील ३ शेर गालिबचे आहेत, व ३ शेर अमीर मीनाई याचे. अमीर मीनाई हा हालीचा समकालीन, म्हणजेच गालिबपेक्षा वयानें बराच लहान. नक्कीच गालिबच्या शेरांना अमीरनें मीनाईनें नंतरच्या काळात आपले शेर जोडून हमरदीफ-हमकाफिया गझल बनवली असणार. अशी अन्य उदाहरणेही आहेत. फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांनी लिहिलेल्या ‘गुलों में रंग भरे’ हिची हमरदीफ-हमकाफिया गझल महेंद्रसिंह बेदी यांनी लिहिलेली आहे; व मेहदी हसन ‘गुलों में रंग भरे’ ही गझल मैफलीत गातांना बेदी यांचे दोन शेरही गातात. अहमद फ़राज यांच्या ‘रंजिश ही सही’ हिच्या हमरदीफ-हमकाफिया गझलमधील दोन शेरही मूळ गझल गातांना मेहदी हसन पेश करतात. हसरत मोहानी यांच्या ‘चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है’ ही गझल गातांना गुलाम अली कधी कधी दोन जास्तीचे (additional) शेर पेश करतात, जे मोहानी यांनी लिहिलेले नाहींत, तर एका अन्य हमरदीफ-हमकाफिया गझलमधील आहेत, हें उघड आहे.

म्हणून, आपण आपल्या मुद्द्याची पुरनावृत्ती करूं की, ‘न किसी की आँख का..’ ही संपूर्ण गझल हश्रनें लिहिलेली दिसत नाहीं, तर त्यानें केवळ एक हमरदीफ-हमकाफिया मक्ता जोडलेला आहे. मात्र एक गोष्ट उघड आहे की, जो शायर अशी हमरदीफ-हमकाफिया गझल किंवा त्याप्रकारचे शेर लिहितो, त्याला मूळ गझलच्या शायरबद्दल नक्कीच आदर वाटत असला पाहिजे. तसेच ‘हश्र’चेंसुद्धा असणार. म्हणून, हश्रचा शेर कमजोर वाटूनही, आपण त्याच्या जफ़रवरील आदराला सलाम करायला हवा.

  • समारोप :

 वरील चर्चेतला सहावा व सातवा शेर नजरेआड केला, तर ; बाकीचे पाच शेर मात्र अतिशय परिणामकारक आहेत, व ते जफ़रची निराशा, त्याची उदासी, उत्तम प्रकारें दाखवतात. ही ‘मुसलसल गझल’ असल्यामुळे, तिच्या शेरांच्या मागे एक समान सूत्र आहे, तें म्हणजे युद्ध हरलेल्या ज़फ़रचा बंदीवास, अन् त्या स्थितीतील त्याची हताशा. पण, या काव्यप्रकारच्या मूळ सूत्राप्रमाणें, या गझलचा प्रत्येक शेर स्वतंत्र आहे, तो वेगवेगळ्या प्रतिमा वापरत आहे, प्रत्येक शेर स्वत:ची अशी एक उंची गाठतो आहे. त्यामुळे ही सर्व गझलच एक आगळ्या उंचीवर जाऊन पोचते. ही गझल, युद्ध हरलेल्या, बंदीवासातील वृद्ध ज़फ़र याच्या मनाचा उद्वेग (anguish), त्याची हताशा, त्याचा गहिरा व खोल (deep) अवसाद हें सर्व अशा प्रकारें दाखवते की नजरेपुढे त्या स्थितीतील जफ़रचें चित्र उभें रहातें, व मन जड-जड होऊन जातें.

  • आठवतात अन्य कांहीं गझला :

विविध उत्कृष्ट गझलांची तुलना इथें अजिबात अभिप्रेत नाहीं, पण, ‘न किसी की आँख का नूर हूँ’ ही गझल वाचल्यावर मला जफ़रची ‘लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में’  ही गझल , तसेंच मोमिनची ‘वो जो हममें तुममें क़रार था’  ही गझल आठवते.

‘लगता नहीं है जी मेरा..’ ही गझल तर स्पष्टपणें, जफ़रच्या तुरुंगवासात लिहिली गेलेली आहे. तीही तितकीच हृदयाला भिडणारी आहे. तिचा रसास्वाद आपण तूर्तास घेत नाहीं आहोत, पण तिच्यातील व्याकुळता जाणून घेण्यासाठी तिच्यातील दोनतीन शेर वानगी म्हणून पाहूं या.

कह दो इन हसरतों से कहीं और जा बसें

इतनी जगह कहाँ है दिले-दाग़दार में ।

(दिले-दाग़दार : कलंकित हृदय)

उम्रे-दराज़ (दीर्घायू) माँग के लाये थे चार दिन

दो आरज़ू (आशा) में कट गए, दो इन्तज़ार में ।

(या शेरचा उल्लेख आपण आधी केलेला आहे).

है कितना बदनसीब ‘जफ़र’ दफ़्न के लिये

दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में ।

(कू-ए-यार : मित्राच्या गल्लीत : हिंदुस्तानात/ दिल्लीत)

या गझलवरूनही आपल्याला ज़फ़रच्या विकलतेचा स्पष्ट अंदाज येतो. हिची गुणवत्ताही        ‘न किसीकी आँख का नूर हूँ’ सारखीच आहे, असें म्हणायला हरकत नाहीं.

मोमिन हा ज़फ़रचा समकालीन, पण त्याचा मृत्यू १८५७ च्या आधीच झालेला होता. ‘वो जो हममें तुममें क़रार था’ ही गझल अर्थातच १८५७ च्या आधीची आहे, तर ‘न किसी की आँख का नूर हूँ’ ही स्पष्टपणें १८५७ नंतरची आहे. ‘वो जो हममें तुममें..’ या गझलेत प्रेमाचें युद्ध हरलेला एक दुर्दैवी विकल प्रेमी आपल्या भूतपूर्व प्रेयसीला जुन्या घटनांची आठवण करून देतो. ‘न किसी की आँख का नूर हूँ..’ या गझलमध्ये सत्तेचे, स्वातंत्र्याचें युद्ध हरलेला कमनशिबी विफल बादशहा आपली व्यथा स्वत:लाच सांगतो. मात्र दोन्ही गझला अगदी सोपे शब्द वापरून आपली आर्त भावना, विकलता, व कारुण्य तुमच्यामाझ्यापर्यंत अतिशय प्रभावीपणें पोचवतात. दोन्हीही आपल्याला भारून टाकतात. ओव्हरऑल पाहिलें तर जफ़र हा शायर म्हणून मोमिनएवढा श्रेष्ठ समजला जात नाहीं ; मात्र ‘न किसी की आँख का..’ या गझलमध्ये हा शायर मोमिनइतकाच परिणामकारक वाटतो.

  • ज़फ़रच्या बंदीवासाच्या काळातील ‘न किसी की आँख का नूर हूँ’ ही उदासीन गझल वाचल्यावर : *ही गझल वाचल्यावर मला आठवतें स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘सन्यस्त खड्ग’ या नाटकातील वीर वामनराव जोशी यांनी लिहिलेलें व मास्टर दीनानाथ यांनी गाइलेलें गीत : ‘असुनि खास मालक घरचा म्हणति चोर त्याला । परवशता-पाश दैवें ज्याच्या गळा लागला ।’. आणि माझ्या डोळ्यांसमोर राजबंद्यांची एक प्रदीर्घ मालिकाच उभी राहते.

* मला आठवतो नेपोलियन. युद्ध हरलेला जफ़र देशापासून दूर रंगूनला जसा बंदीवासात होता, त्याच प्रकारें, त्याच्या ४३ वर्षें आधी, इंग्रजांनी नेपोलियन नांवाच्या नरकेसरीला त्याच्या देशापासून दूर, सेंट हेलेना बेटावर, बंदी बनवून ठेवलें होतें. आधीच्या, एल्बा बेटावरील त्याच्या कैदेत त्यानें आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण त्या निराशेवर मात करून तो निसटला होता, व पुन्हा युद्धाला उभा ठाकला होता. मात्र, वॉटर्लूची लढाई हरल्यानंतर व अतिदूरच्या सेंट हेलेनावरील बंदीवासात त्याच्या सर्व आशा पूर्णपणें मावळल्या असणार. ज़फ़रला बंदीवासात टाकलें तेव्हां तो ८२ वर्षांचा होता, तर नेपोलियनचें वय होतें फक्त ४३ वर्षें. रंगून येथील कैदेत ३-४ वर्षांनी ज़फ़रचा मृत्यू झाला, तर सेंट हेलानच्या बंदीवासात ६ वर्षांनी नेपोलियनचा मृत्यू झाला.  ज़फरची ही गझल वाचून-ऐकून, आपल्याला, नेपोलियनची बंदीवासात काय मनस्थिती असेल, याची कांहीं कल्पना येऊं शकते.

* जफ़रची ही गझल वाचून मला काळ्या पाण्यातील कैदी, स्वातंत्र्यवीर सावरकर दिसतात. अंदमानात गेले तेव्हां ते केवळ २८ वर्षांचे होते. मला काळ्यापाण्यावरील इतर तरुण स्वातंत्र्यसैनिकही दिसतात. सावरकरांनी लिहून ठेवलें आहे की अंदमानात असतांना त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता; पण त्यांनी त्या विचारावर मात केली.  मात्र कांहीं क्रांतिकारी युवकांनी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगत असतांना आत्महत्या केली. ज़फ़रच्या या गझलमुळे आपल्याला त्या सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्या बंदीवासातील dark मनस्थितीची जराशी कल्पना येते.

* ही गझल वाचून मला महंमद घोरीच्या कैदेत पडलेला पृथ्वीराज चौहान आठवतो. ज्या पृथ्वीराजानें घोरीला जीवदान दिलें, त्याच घोरीनें पुढे पृथ्वीराजाला अफगाणिस्तानात नेऊन कैदेत ठेवलें, त्याचे डोळे काढले. काय मनस्थिती असेल पृथ्वीराजची ! पण त्याही स्थितीत तो कसा वागला ? कैदेत पृथ्वीराजबरोबर त्याचा मित्र व राजकवी चंदबरदाई हा देखील होता. अशी आख्यायिका आहे की, घोरीच्या दरबारात अस्त्रविद्येच्या प्रदर्शनासाठी पृथ्वीराजला आणलें तेव्हां चंद एक पद्य म्हणाला–

चार बाँस चालीस गज़, अंगुल अष्ट प्रमान

ता ऊपर सुलतान है, मत चूकै चौहान ।

तें ऐकून शब्दवेधी अंध पृथ्वीराजानें बाण सोडला व सुलतानाच्या कंठाचा वेध घेतला. असफलतेतूनही सफलता ती हीच !

* ही गझल वाचून मला, केवळ फितुरीमुळे औरंबजेबाच्या कैदेत पडलेला ३२ वर्षांचा संभाजी आठवतो. त्याचेही डोळे काढले होते. आंत अंधार आणि बाहेरही अंधार ! अशा आशाविहीन परिस्थितीला तो धैर्यानें सामोरा गेला ! शत्रूनें कैदेत केलेले अनन्वित हाल आणि अखेरीस, दिलेला मृत्यू त्या वीरानें धीरगंभीरपणें ताठ कण्यानें स्वीकारला, पण विपरीत परिस्थितीपुढे तो झुकला नाहीं !

* मला आठवतात आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत पडलेले पस्तिशीचे शिवाजी महाराज. औरंगजेबाच्या दरबारात त्यांनी आपल्या भावनांचा आवेग प्रगट केला होताच. कैदेत पडल्यावर ते किती हताश झाले असतील, कल्पनाच करवत नाहीं. अखेरीस औरंगजेबाच्या अजगरी विळख्यातून ते चतुराईनें बाहेर पडले, कैदेतून निसटले व महाराष्ट्रात परत आले खरे ; मात्र कैदेत असतांना किती निराशेनें, किती उदासीनें त्याच्या मनाचा, तात्पुरता कां होईना, कब्जा घेतला असेल, याची कांहींशी कल्पना आपल्याला येऊं शकते !

* मला आठवते ताराबाई, राजारामाच्या निधनानंतरही निधड्या छातीनें मराठ्यांचें राज्य सांभाळणारी २५ वर्षें वयाची खंबीर राणी. औरंगजेबालाही तिनें व तिच्या मराठ्यांनी दमविलें. पण त्यानंतर कांहीं वर्षांनीच, तिला स्वकीयांच्याच तुरुंगात खितपत पडावें लागलें. पुढे, अतिवृद्ध होऊन तिचें निधन होईपर्यंत, म्हणजे जवळजवळ ५०-५५ वर्षांच्या कालखंडातील बराच काळ ती कैदेतच होती. बंदीवास, अन् तोही शत्रूच्या कैदेत नाहीं, तर स्वकीयांच्याच कैदेत ! किती निराशा तिच्या मनात साठली असेल !

* मला आठवतो ‘सागराचा राजा’ तुळाजी आंग्रे, इंग्रज व पोर्तुगीझ यांना धाकात ठेवणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांचा वंशज. केवळ नानासाहेब पेशव्याच्या महत्वाकांक्षेपोटी, तुळाजीला पुढलें आयुष्य पेशव्याच्या कैदेत काढावें लागलें. मनातील निराशेवर मात करून त्यानें कैदेतून पळून जाण्याचा असफल प्रयत्नही केला. पण अखेर कैदेतच त्याचें निधन झाले. किती अंधकारमय जीवन त्याच्या वाट्याला आलें असेल !

* मला आठवतात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. ज्या इंग्रजी सत्तेवर सूर्य मावळत नसे तिला  १९व्या शतकाच्या अखेरच्या कांहीं दशकांमध्ये त्यांनी निर्भयपणें आव्हान दिलें. अखेर, भारतापासून दूर, एडनचा तुरुंगवास त्यांच्या नशिबी आला. कैदेतून सुटण्याचा प्रयत्न असफल झाला. अंतीं, बंदीवासातच त्याचें निधन झाले. एका ध्येयनिष्ठ निर्भय वीराच्या जीवनात किती काळोख हा ! ज़फ़रसारख्याच उदासीत त्यांचेंही बंदी जीवन गेलें असेल.

  • युद्ध हें अनेक प्रकारचें असू शकतें व बंदीवासही.

* ही गझल वाचून माझ्या नेत्रांपुढे येतात जीवनाच्या युद्धात असफल झालेले, निराशेच्या कैदेत सापडलेले, खचलेले, दुर्दैवी लोक. कोणी अशाही परिस्थितीतून बाहेर येतात, तर कोणी succumb करतात !

* मला दिसतात शारीरिक व्यंग असलेले, अपंगत्व असलेले, अपूर्णत्व असलेले, ‘फिजिकली चॅलेंज्ड’ लोक. ते आपल्या अपंग-शरीराचे कैदी असतात, उदासीचे बळी असतात.

* मला दिसतात व्याधिग्रस्त लोक. ते आपल्या रोगाचे व त्यामुळे आलेल्या हतबलतेचे कैदी असतात, खिन्न असतात.

* मला दिसतात वृद्ध लोक, जे वयामुळे दुर्बळ जालेल्या शरीराचे कैदी असतात, त्यामुळे दु:खी असतात.

* कसलीही कैद असो, प्रकार कुठलाही असो, उदासी तीच, हतबलता तीच, हताशा तीच, जी ज़फ़रच्या या गझलमध्ये दिसून येते.

  • मला असें वाटत रहातें की, ज़फ़रच्या स्वत:च्या गहिर्‍या खोल (deep) उदासीबरोबरच, वीरांच्या, निधड्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, व त्याचप्रमाणें, जीवनाच्या लढाईत असफलता प्राप्त झालेल्या हताश हतभाग्यांच्या, ‘फिजिकली चॅलेंज्ड’ व्यक्तींच्या, व्यधिग्रस्त जनांच्या, वृद्धत्वामुळे हतबल झालेल्या लोकांच्या,  भावनाच  तुमच्यामाझ्या मनापर्यंत ‘न किसी की आँख का नूर हूँ’ या गझलमधून पोचताहेत.
  • त्यामुळेच, मनाला भिडणारे हें आर्त काव्य , ‘न किसी की आँख का नूर हूँ’ ही गझल, तुमच्यामाझ्या हृदयात, आणि इतर हजारो वाचकांच्या-श्रोत्यांच्या हृदयात कायमचें स्थान मिळवून बसली आहे.

— सुभाष स. नाईक

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..