गुजरातच्या माजी मुख्यमंत्री सौ आनंदीबेन पटेल यांच्या `ए मने हमेशा याद रहशे’ या गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद (‘हे माझ्या सदैव लक्षात राहील’) केला आहे सौ. वैजयंती गुप्ते यांनी. या आगामी पुस्तकातील त्यांचे अर्पणपत्र आणि मनोगत.
या पुस्तकातील कथा `मराठीसृष्टी’वर क्रमशः स्वरुपात प्रकाशित होणार आहेत.
अर्पणपत्र
एका छोट्याश्या गावामधून राज्याच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याच्या माझ्या प्रवासात मला आलेले अनुभव की ज्या पासून मी काही शिकले, प्रेरणा मिळविली व त्याच प्रमाणे माझे व्यक्तिमत्व घडले, त्यांना पुस्तक स्वरुपामध्ये गोष्टीरूपात मी प्रसिद्ध करीत आहे.
मला विश्वास आहे ह्या गोष्टींमधून आयुष्यात कर्तव्य पार पाडण्यासाठी नवीन शक्ती, कष्ट करण्याची प्रेरणा आणि जीवन मूल्ये मजबूत करण्याचे बळ मिळत असते. ह्या प्रसंगाचे हे गोष्टीरूप पुस्तक माझे आईवडील आणि मोठी बहीण ह्यांना अर्पण करताना मला अभिमान वाटतो. माझे वडील कै. जेठाभाई आणि आई कै. मेनाबेन यांनी आजपासून ७० वर्षांपूर्वी मुलींच्या शिक्षणाची काळजी घेतली नसती तर आज मी कुठे असते? बालविवाह, समाजाच्या चालीरीती आणि पती निधनानंतर कुटुंबाला नष्ट करणाऱ्या वाईट, दुष्ट पद्धती विरुद्ध लढा देण्यास शिकवले नसते तर? पूज्य गांधीजींच्या विचारसरणीचे माझे वडील आणि त्या विचारसरणी आणि मूल्यांना शब्दशः अंगिकारणारी आणि त्यांच्या मागे सावलीसारखी उभी असणारी आई ह्यांनी असे संस्कार केले नसते तर आज मी कुठे असते याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. माझी मोठी बहीण कै. सरिताबेन , जिने आपल्या प्राथमिक शिक्षणानंतर आई आणि वडील ह्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कुटुंबाची आणि आम्हा बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतली होती. स्वतः खूपच लहान वयात विधवा झालेली असताना देखील शिक्षिकेची नोकरी करता-करता स्वतःची आपत्ये आणि आम्हा बहिणींना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी तिने घेतलेले कष्ट आणि केलेला त्याग ह्यामुळे तिची जागा आज मातृस्थानी आहे. जेव्हा कधीपण माझ्या अंतर्गत जीवनात किंवा बाह्य जीवनात विरोधाला समाना करण्याची वेळ आली तेव्हा-तेव्हा माझ्या बहिणीने मला प्रोत्साहन व मार्गदर्शन करून अधिक सामर्थ्यवान बनविले आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यातील यशामध्ये शिक्षण, संस्कार, आत्मविश्वास, मेहनत आणि विरोधाशी सामना करण्याची महान शक्ती अश्या मूल्यांचे रोपण करणाऱ्या माझे आईवडील आणि मोठी बहीण यांना हे पुस्तक अर्पण करताना मी स्वतःला धन्य मानते आहे.
मनोगत
माझे जीवन असंख्य अनुभवांनी घडलेले आहे. मला लिहिण्याची (लिखाणाची) सवय नव्हती. परंतु कित्येक घटना अशा अनुभवल्या की त्यांना शब्दात उतरविण्याची इच्छा झाली. प्रसंग लिहिले, कित्येक मित्रांना दाखवले, त्यांना आवडले. पुन्हा-पुन्हा वाचताना मलासुद्धा आनंद वाटला. आनंद, माझ्यामध्ये एक लेखिका घडते आहे म्हणून होत नव्हता तर ह्या गोष्टींपासून अनेक लोकांना प्रेरणा मिळू शकते ह्याचा होता. ह्या सगळ्या सत्य घटना आहेत, फक्त नांवे बदललेली आहेत. हे शब्द फक्त शब्द नसून माझ्या भावनांचे ते शब्दरूप आहे. माझ्या अनुभवांचे एकत्रीकरण आहे. हि एक सुरुवात आहे. शेवटी त्या असंख्य शिक्षक बंधू-भगिनी, नव्या जीवनाची स्वप्ने बघणाऱ्या लाडक्या बालकांचे मी हृदयापासून आभार मानते.
मी खूप प्रवास करत असते. अनेक लोकांना भेटत असते, कित्येक शिक्षक किंवा कर्मयोगी लोकांच्या डोळ्यांत मी वेगळ्याच प्रकारची चमक पाहिली आहे. त्यांच्या बोलण्याचा मी खोलवर विचार करते तेव्हा मला एक धडकाणारी चेतना (स्फूर्ती) ऐकायला येते. अनेक लोकांच्या दुःखद कहाण्या ऐकून माझे डोळे पाणावतात तर काही शिक्षिका किंवा कार्यकर्त्यांच्या हिमतीने आणि धाडसाने मला माझ्या साथीदारांबद्दल अपार आदर वाटू लागला आहे. खूप संघर्ष करणाऱ्या लोकांनी प्राप्त केलेल्या सफलतेने मला मनापासून आनंद दिला आहे. ह्या अनुभवांमधून पसार होत असतानां मी खूप आत्मनिरीक्षण केले आहे. माझ्या ह्या व्यक्तिमत्वामध्ये ह्या अनुभवांचा मोठा वाटा आहे.
एक गोष्ट सांगावीशी वाटते की सुधा मूर्तींच्या अशा प्रकारच्या प्रसंग वर्णनाची पुस्तके मला फार आवडतात.
मला यापूर्वी पण अनेक अनुभव आलेले आहेत. शिक्षणमंत्री असतांना मला एक एक शिक्षकामध्ये किंवा अनेक बालकांमध्ये जी तळमळ आणि जीवनाविषयी अगम्य समजूत बघायला मिळाली आहे तसेच काही अनुभव व्यक्ती किंवा सामाजिक व्यथा-कथांचा परिचय मला मुख्यमंत्री असताना होत आहे.
अनेक गोष्टी माझ्या अंतर्मनाला भेदून जात असतात. देवी सरस्वतीला प्रार्थना करते की अशा गोष्टींबद्दल लिहिण्याची व एकत्रित करून प्रकाशित करण्यासाठी मला शक्ती आणि वेळ दे.
प्रिय वाचकांनो, तुमचा प्रतिसाद मला आवडेल.
शेवटी, त्या असंख्य शिक्षक बंधू-भगिनी, नव्या जगाचे स्वप्न बघणाऱ्या लाडक्या मुलांचे मी मन:पूर्वक आभार मानते.
— सौ. आनंदीबेन पटेल
माजी मुख्यमंत्री
गुजरात राज्य
— अनुवाद – सौ. वैजयंती गुप्ते , गांधीनगर, गुजरात