एक प्रसंग आठवतो. पंडित जसराज यांची मैफल ऐकण्याकरिता नामवंत रसिक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमलेले. पंडितजींची मैफल रंगली. भैरवीला त्यांनी विठ्ठलाचे भजन गाऊन ‘विठ्ठला विठ्ठला’ असा आर्त स्वर लावला. डोळे मिटून गात होते. एकरूप झाले होते. बघता-बघता अवघा रंग एक झाला. भैरवी संपली, त्याक्षणी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला आभार मानण्यास सांगितले. मी उभा राहिलो. मैफल स्तब्ध होती. साक्षात पंढरीचा राणा सर्वांच्या नजरेत दिसत होता. मी म्हणालो, ‘पंडितजींच्या स्वरांच्या उंचीचा अनुभवानंद आपणे घेतला; परंतु त्यांच्या मनाच्या उंचीचा मी घेतलेला एक अनुभव आपणासमोर मांडत आहे. पुण्यात बऱ्याच वर्षांपूर्वी पंडितजींचे गाणे होते. प्रचंड गर्दी झाली होती. त्या गर्दीत कार्यक्रमाचा पास नसलेली आणि पायात चप्पल नसलेली एक छोटी मुलगी पोलिसांना व आयोजकांना विनवणी करीत होती. ‘पंडितजींचे मला फक्त दर्शन घ्यायचे आहे,’ एवढेच म्हणत होती. तिची कोणीही दखल घेत नव्हते. मी तिला पाहिले आणि विचारले, ‘कुठून आलात?’ तिच्याबरोबर असलेल्या मामांनी मला सांगितले, की ते नांदेडहून आले आहेत. ‘ही माझी भाची असून, तिला गाण्याची आवड आहे. तिला फक्त पंडितजींचे दर्शन घ्यायचे आहे.’ मी पोलिसांना सांगून तिला आत घेऊन गेलो. पंडितजी साथीदारांसह जेथे पूर्वतयारी करण्यासाठी बसले होते, तेथेच तिला नेले. ही नांदेडहून अनवाणी आलेली मुलगी गांण्याच्या आवडीपोटी ‘आपल्या दर्शनासाठी आली आहे. पंडितजी म्हणाले. “बाळ, बैस” मुलीने नमस्कार केला. पंडितजींनी विचारले, “काय हवे तुला?” ती म्हणाली, “मला गण्याची आवड आहे. आपले दर्शन हवे होते.’ ‘काय गशील?” असे विचारता ती झटकन म्हणाली, ‘यमन गाते. तिने पंडितजीनाच सांगितले, ‘स्वर लावा.’ पंडितजींनी हसत हसत हार्मोनियमवर स्वर लावला. ती गाऊ लागली. ३-४ मिनिटांनंतर पंडितजी एकदम खूष झाले. तिच्या मामांना म्हणाले, ‘आजपासून ही मुलगी माझी. तुमची तयारी असेल, तर मी हिला मुंबईला घरी घेऊन जातो. माझ्या मुलीबरोबरच राहील.’ मामा अवाक् झाले. ‘घरी विचारतो’ एवढेच ते म्हणाले.’ आभार मानण्याच्या भाषणात मी असे म्हणालो, ‘त्या मुलीचे पुढे काय झाले हे मला माहीत नाही.’ यावर मला मध्येच थांबवून पंडितजी म्हणाले, ‘माझ्या मागे तानपुऱ्यावर बसलेली तीच मुलगी आहे. तीच नांदेडची.’ मधुरा जसराज आणि त्या मुलीची आई, दोघींच्या डोळ्यांत अश्रू आले. इच्छाशक्तीचे हे विराट दर्शन होते. पंडितजी म्हणाले, ‘उल्हासराव, माझ्या मुलीचा व हिचा एकत्र अल्बम लवकरच प्रकाशित होत आहे.’ स्तब्ध मैफल नीरव शांततेत स्थिरावली.
-उल्हास पवार
संकलन : शेखर आगासकर
Leave a Reply