आपल्यासारखे जे चाळीस ते पंचेचाळीस वय असलेले वडील असतात न त्यांची अवस्था एकदम वाईट असते. ना ते तरुण असतात ना नववृध्द. मुलांची बाजू घ्यावी का जेष्ठांची यात ते सतत पिसलेले असतात. आजकाल मुल जरा वेगळे कपडे, हेयर स्टाइल करतात. एकेकाळी आपल्याला हे सगळे करायचे असते पण राहूनच गेलेले. म्हणूनच कदाचित आपण आपल्या पोरांना ते करू देतो. आपली पोर यो यो ऐकत असतात किंवा हैरी पॉटर वाचत असतात आणि मग टीका होते कि तुमच्या मुलांना ना काही अभिरुची ना जवाबदारीची जाण. यात आमच्या वयाचे बाप भरडत जातात. त्याला न जेष्ठांना दुखावता येत ना नवीन पिढीला. बर त्याला हे पक्के माहीत असते कि आपल्याला आपल्या पालकांनी जे दिले ते आपण पुढच्या पिढीला द्यायला हवे पण त्याला ते मुलांवर थोपवायचे नसते.
लहानपणी घरात काही (कडक नाही म्हणता येणार) कायदे होते.संध्याकाळी शुभं करोती, बाहेर जावून खेळणे,दिले ते जेवणे असे.
यात वाईट काहीच नव्हते उलट घडलो ते याच मुळे. पण सकाळे ८ ते दुपारी ५ अशी शाळा पण नसायची. सकाळी ७ ला शाळेत गेलो कि १२ पर्यंत आपण घरी आलेलो असायचो. वेळ हि कमोडीटी महाग नव्हती. भरपूर मोठी मैदाने होती, चिमुटभर अभ्यास असायचा.
माझ्या सातवीतल्या कन्येला जे इंग्लिश ग्रामर तेवढे मला बारावीत हि नव्हते. गुल्लेर सारख दप्तर फिरवत मी शाळेतून परत येत असे आणि आताच्या दप्तरांच्या वजनाचे ओझे माझ्या मनावर पडते. पण हे आता टाळणे शक्य नाही.
बदललेल्या टेकनॉलॉजी या पोरांनी शिकायलाच पाहिजेत आणि तरच त्यांचा निभाव लागेल. जवळपास ऑफिसला जाणाऱ्या माणसा एवढा मुलांना शाळेला द्यावा लागतो. वरतून होमवर्क आणि कंपल्सरी अक्टीविटी आहेतच. मध्यंतरी आमची जेष्ठ कन्या हैरी पॉटर वाचत बसली होती. हैरी पॉटरची किती पारायणे झाली असतील याची गिनती नाही. पुस्तक छानच आहे पण हे काही जगातले शेवटचे पुस्तक नाही अस माझ मत. तिला मी काही पु.ल. ची पुस्तके सजेस्ट केली पण हवा तसा रिस्पोन्स आला नाही. बर आमची जेष्ठ कन्या म्हणजे पुस्तकांची पाने खाणारी रीडर आहे. दोनशे पाने प्रतिदिन वैगरे वाचणारी पोरीनी मराठीतल अफाट लेखन वाचायलाच हवे अस माझ पक्क मत झालेल.
यावर मी एक प्रयोग करायचे ठरवले, एक सहा महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. मी आणि दोन्ही कन्या यवतमाळ ते औरंगाबाद असा प्रवास करत होतो. जनरली माझ्या गाडीत पुल आणि वपुंची कथाकथने आणि गझल असतात. यवतमाळ पासून काही किलोमीटर्स वर एफम रेडियो बंद पडला आणि दोघींची चुळबुळ सुरु झाली. बर चालत्या गाडीत काही वाचता येईना. दोघी एकमेकींशी किती वेळ बडबड करणार न ? शेवटी दोन मुलींचे एकमेकांशी किती वेळ पटेल याला काही लिमिट आहे कि नाही. मग ग्लोव बॉक्स मध्ये सीडी शोधणे सुरु झाले. गझलची सीडी लावली गेली पण हे लय भारी आहे अस थोड्याच वेळात लक्षात आले.
मग मी सजेस्ट केले कि कथाकथन ऐकणार का. कथाकथन काय असते आणि पुल/वपु किती मोठी माणसे आहेत हे समजावून सांगितल्यावर दोघींनी होकार दिला. आता सीन बघा, आपला बाप आपल्याला काहीतरी कंपल्सरी ऐकायला लावतो आहे असा फील घेवून दोघीही मागच्या सीटवर बसलेल्या. यो यो ची सीडी मी मुद्दामून घेतली नाही असा भाव चेहऱ्यावर पण वेळ तर घालवायचा आहे असा फील.
मी सीडी लावली आणि पुलंची ” म्हैस ” कथा सुरु झाली. “मेली ठेचेवर ठेच” यावरच उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला आणि मला अर्धी बाजी जिंकल्याचा आनंद झाला. रस्त्यावर थुंकणाऱ्या ऑर्डलीच वर्णन ऐकून ” ई ” असे आवाज आले. मी अधून मधून रियर व्हूव मिरर मधून बघत होतो दोघींकडे. हळूहळू ब्रम्हानंदी टाळी लागत होती. ” म्हैस ” कथा संपली आणि ” बाबुड्या, अजून आहेत का ” असा सवाल आला. मी आता सामना जवळपास जिंकला होता. ” अंतू बरवा ” सुरु झाले. गाडी हास्यकल्लोळात बुडाली.
” मागा चांगली फोर्ड गाडी ” यावर सल्ला आला ” बाबुड्या, तू नको मागुस हा “. कथा पुढे सरकत होती. कधी हास्य तर कधी सिरियस भाव निर्माण होत होते. आता आपण काहीतरी अप्रतिम आणि अफाट ऐकतो आहोत हे पोरींच्या लक्षात आले. ” रावसाहेब” सुरु झाले आणि संपले. ” कश्याला आलाता रे ” अस पुल बोलले आणि मला पण गाडीत दोन हुंदके ऐकू आले. ” चितळे मास्तर ” ऐकल्यावर अतिशय सिरियस होवून जेष्ठ कन्या म्हणाली ” बाबुड्या, नो वंडर यु मिस युवर फडणीस सर “. प्रवास सुरु होता आणि मी पण आता वेगाला ८० वर लिमिट केले. मनात म्हंटले आज भक्त पांडूरंगाच्या दर्शनाला आले आहेत, भक्तिरसात मनसोप्त डुंबू देत. ” हरीतात्या ” त्यांना त्यांच्या आबुंची आठवण करून देत होता तर ” नारायण ” आमच्या एका मित्राची. अर्धा प्रवास संपला आणि आम्ही जेवायला थांबलो.
आज थोडाही चिवचीवाट नव्हता आणि मी येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार होतो. पण विशेष फैरी झडल्या नाहीत. एकच प्रश्न आला, ” बाबुड्या, आपल्या घरच्या लायब्ररी मध्ये आहेत का पुलंची पुस्तके “. आता मला आनंदाने जवळपास उडी मारायची इच्छा झाली होती पण मी मनाला आवर घालून सांगितले ” सगळी आहेत “.
गाडीत बसलो आणि पुढचा प्रवास सुरु झाला. जेष्ठ कन्या म्हणाली ” वपु पण एवढेच ग्रेट होते का “. करकचून ब्रेक लावत मी बोललो ” व्हाट डू यु मीन, अग देव आहे माझा “. शांतपणे उत्तर आले, ” ऐकव मग “. आता माझी आणि वपुंची प्रतिष्ठा पणास लागली होती. वपु म्हणजे थोडे हेवी हे मलाही माहेत होते. पण वपु पोरींवर भारुड घालणार यावर मला शंभर टक्के विश्वास होता. बराच विचार करून मी पहिली कथा लावली ” बदली “. परत हास्यांचे कारंजे सुरु झाले. मग ” जे के मालवणकर “, आपल्या कथेत जे के आश्रमाच्या शिस्तीबद्दल सांगत असतांना दोन्ही हात गालावर ठेवून सिरियस झालेली कन्या मलाच सिरियस करून गेली. ” पेन सलामत तो ” च्या वेळेस तर गाडी हास्याने पलटी होईल कि काय इतपत मला शंका यायला लागली होती. ” हसरे दुखः ” ऐकल्यावर अशीही माणसे असतात का असा सवाल आला ज्याचे माझ्याकडे उत्तर नव्हते. ” मीच तुझी वहिदा ” ऐकून झाल्यावर ” बाबुड्या तूच आईचा शारुख ” अस ऐकायला आले आणि कधी नव्हे ते मला शारुकचा राग आला नाही.
” अमिताभ ” ऐकली आणि आम्ही सगळे अफाट हसलो. ” बाबुड्या तुझ्या बच्चनचे सिनेमे असे असायचे का रे ” यावर मी हेतूपुरत्सर दुर्लक्ष केले हा भाग वेगळा. ” वन फॉर द रोड ” जरा जास्तच अडल्ट आहे अस ऐकून बरे वाटले मला. आता घर जेमतेम तासाभराच्या अंतरावर होते. आता मला अशी कथा हवी होती जी या दोघींवर मोठा इमपैक्ट करेल. वपु होतेच न सोबतीला, शेवटी देवच तो. मग मी कथा लावली ” पप्पा “, एक अनोखी शांतता पसरली गाडीत. कथेचा शेवट आणि घर जवळ आले होते. कथेत ” पप्पा, पप्पा ” अस ऐकल्यावर कन्येच्या मोठ्या रीअक्शनची अपेक्षा होती मला. मला गाडी थांबण्याचा आदेश मिळाला आणि गाडी थांबल्या थांबल्या कन्येनी घट्ट मिठी मारली. आज परत वपु पुल नेहमीप्रमाणे जिंकले होते.
या थोर साहित्यिकांनी आपल्या आजी आजोबांवर, आपल्या आई वडलांवर भुरळ घातली होती. माझ्यावरही भुरळ घातली कारण आजी, आई या मंडळींनी मला इंट्रोड्यूस केले वपु पुलंशी. आपण पण आपल्या पोरांना या सगळ्या थोर लोकांशी इंट्रोड्यूस करायलाच हवे. भीमसेन, लता, किशोर, आशा, वपु, पुल आणि अनेक अशी हि माणसे अफाट होती हे त्यांना आपण नाही सांगितले तर कोण सांगणार. आता प्रत्येक प्रवासात कोणी तरी नवा आयडॉल आमच्या पोरींच्या आयुष्यात प्रवेश करत असतो !!!
प्रयोग करून बघा, ट्रस्ट मी, इट वर्क्स…
फेसबुकवरुन आलेले हे पोस्ट. आवडले म्हणून शेअर केले
Leave a Reply