आमची मैत्री उणीपूरी सत्तर वर्षांची. वयात फक्त काही महिन्यांचाच फरक. मी जेमतेम वर्षाचा असताना आमचे बिऱ्हाड श्रीवर्धनहून अलिबागला स्थायिक होण्यासाठी आले . त्यावेळच्या अलिबागचे स्वरूप म्हणजे नारळा पोफळीच्या बागांमधे बांधलेल्या टुमदार कौलारू घरांचे गाव असे होते . आम्ही ब्राह्मण आळीमधे गुप्त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून स्थिरावलो. बाजूला काकासाहेब कर्णिक यांचा वाडा. त्यामधे तुळपुळे कुटुंबिय भाड्याने रहात असत. त्यावेळेपासून जी आमची मैत्रीची नाळ बांधली गेली ती आजतागायत तितकीच घट्ट आहे. त्याकाळी किलबिलत्या वयांच्या शिशुंसाठी एक ” माँटेसरी बाईंची शाळा ” असे . मी आणि गिरीश त्या बालवर्गात जोडीने जाऊ लागलो. घरून बरोबर दिलेले खाऊचे डबे कधीतरी वाटेतच फस्त केल्याचे आणि घरच्यांनी तो किस्सा हसत हसत पुढे बराच काळ सांगितल्याचे मला अंधुक आठवते.
त्या नंतर जिल्हा परिषदेची शाळा. पहिली ते चौथी, मग इंडस्ट्रिअल हायस्कूल या इंग्रजी शाळेत पाचवी ते अकरावी आणि त्यानंतर जे एस एम कॉलेज मधे महाविद्यालयीन शिक्षण. या सर्व शैक्षणिक प्रवासात आम्ही कायम एकाच वर्गात होतो.
कालांतराने आम्ही जागा बदलून दुसरीकडे रहायला गेलो. आणि आमच्या त्या घरात तुळपुळे कुटुंबीय स्थलांतरित झाले.
त्याचे वडील आमच्याच शाळेत माध्यमिक शिक्षक आणि आई अलीबागच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका. गिरीशची आई अगदी लहानपणी त्याला लाडाने गजा अशी हाक मारत असे . त्यामुळे असेल , खाजगीत त्याच्याशी बोलताना माझ्याही तोंडात आजही गजा असेच येते आणि त्याला तशी हाक मारणारी मी एकमेव व्यक्ती असेन . लहान असतानाच आमच्या जोडगोळीला शेखर कुवळेकर येऊन जोडला गेला आणि आमचे हे घट्ट त्रिकूट २०१८ साली शेखर हे जग सोडून जाईपर्यंत अभंग राहीले. अलिबागमधील असा एकही दिवस मला आठवत नाही की त्या दिवशी आम्ही तिघे एकत्र भेटलो नाही. कॉलेजच्या वयात जे जे काही उंडारणे असते ते सारे काही आम्ही एकमेकांच्या साक्षीने केले. जत्रेत फिरणे असो , खेळणे असो , समुद्रावर चंद्रप्रकाशात रात्र रात्र घालवणे असो , शाळेच्या सहली असोत , भाड्याच्या सायकलींवरून अगदी पोयनाड पेझारी पर्यंत रपेट मारणे असो की सिद्धेश्वरच्या जंगलातील देवळात रात्री राहणे असो , किंवा स्मशाना जवळील पोखरणीमधे पोहणे असो . आम्ही कायम एकत्रच असायचो. त्या काळची राम मंदिरा समोरची ब्राह्मण आळीची होळी गिरीशच गाजवत आणि जागवत असे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने , सरकारी कामांसाठी तालुक्यातील इतर गावांकडून बरीच लोकं अलिबागला येत असत. अशांपैकी कोणी ना कोणी गिरिशच्या घरी रोज आलेलं असे. ती व्यक्ती कुणीही असे. एखादे शिक्षक , एखादे निवृत्त तलाठी , एखादे पोलिस हवालदार , कुणी दुसऱ्या तालुक्यातील एखादी राजकारणी व्यक्ती , कुणी शेतकरी असं कोणीही. ती व्यक्ती कोणत्याही सामाजिक थरातील असे. जेवायची वेळ असली तर जेवण किंवा इतर वेळी चहा घेतल्याशिवाय ती व्यक्ती निघालेली मी कधी पाहिली नाही. माणसांचा त्या घरात पाहिलेला राबता मी कधीही कुणाकडे पाहीला नाही. कधी फुलपँट तर कधी आखूड धोतर नेसलेले गिरीशचे वडील (अण्णा ) पडवीमधे बसून कुणा आल्यागेल्याशी बोलत असल्याचे चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. आमच्या शाळेतील खेळांच्या स्पर्धांचे संपूर्ण नियोजन अण्णा करत असत.
गिरीशची आईसुध्दा सदैव हसतमुख अशी.आल्या गेल्या प्रत्येकाची आस्थेने चौकशी करणारी माऊली. नेमके हेच संस्कार गिरीशमधे पुरेपूर उतरले आहेत. त्याच्याइतका दांडगा जनसंपर्क क्वचित कोणाचा असेल. कॉलेज मधे असताना गिरीश व्हॉलीबॉल , टेबल टेनिस आणि कॅरम हे खेळ उत्तम खेळत असे. शेखर सेंट्रल एक्साईजमधे अधिकारी झाला आणि मी पोलिस अधिकारी. गिरीशने मात्र आपले कार्यक्षेत्र अलिबाग हेच ठेवले. गिरीश हा उपजत नेता आहे . गवगवा न करता चांगल्यासाठी स्वतःहून पुढे होणारा आणि समविचारी गटात सबबी न सांगता, न कंटाळता अग्रभागी राहिल्याने ज्याच्याकडे नेतेपद अपोआप चालत येतं असा नेता . अगदी पहिल्यापासून. आक्रस्ताळेपण अजिबात नसलेला आणि आपला रास्त मुद्दा कधीही न सोडणारा. आयत्या प्रसंगी स्टेज वरून कितीही गर्दीपुढे हातात कागद न घेता मुद्देसूद बोलणारा . वयाच्या 22 व्या वर्षी आणीबाणी विरोधात केलेल्या आंदोलनामध्ये गिरीश दोन वर्ष तुरुंगात होता. त्यावेळी त्याच्याबरोबर तुरुंगवास भोगलेली अलीबागचीच सुलभा म्हात्रे त्याची सहधर्मचारीणी झाली. गिरीशने कधीही नोकरी केली नाही . तो त्याचा पिंडच नव्हता. त्याने सुरुवातीला शैक्षणिक वस्तू , उपकरणे शाळा कॉलेजेसना पुरविण्याचा व्यवसाय केला, त्यानंतर प्रिंटिंग प्रेस साठी लागणारा छपाईचा कागद पुरविण्याचा. त्याने प्रिंटिंग प्रेस काढून छपाईचा आणि त्याबरोबर प्रकाशन व्यवसायही केला. मात्र गिरीशच्या अंगभूत व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्याला खरी झळाळी मिळाली ती त्याने साथीदार घेऊन अलिबाग येथे “कमळ नागरी पतसंस्था ( मर्यादित ) ” स्थापन केली त्यानंतर . चोख व्यवहार आणि सुनियोजनाद्वारे या पतसंस्थेची सातत्याने भरभराट होऊन आजमितीस तिच्या तेरा शाखा झाल्या आहेत . सहाशे करोड च्या वर ठेवी असलेली कोकणातील ती एक अग्रगण्य आर्थिक संस्था म्हणून आज नावारूपास आली आहे.
पतसंस्थांच्या राज्य आणि प्रांत पातळीवरील अनेक संघटनांचा ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून बैठकांच्या निमित्ताने गिरीशने अवघा महाराष्ट्र पालथा घातला आहे आणि आता सत्तरी उलटली तरी त्याचा प्रवासाचा उत्साह यत्किंचितही कमी झालेला नाही. फटकळ जीभेच्या आणि कोणी अविवेकी आगाऊपणा केला तर ती व्यक्ती कोणीही असली तरी तिची पत्रास न ठेवणाऱ्या गिरीशचे मन मात्र बरका गऱ्यासारखे मऊ. गरजूंनी न मागता मदत करण्याचा अत्यंत दुर्मिळ गुण हे गिरीशचे जन्मजात स्वभाव वैशिष्ट्य. आमच्या वर्गात पहिलीपासून एक मंदबुद्धी मुलगा होता. कसाबसा सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर कमी बौद्धिक क्षमतेमुळे त्याला शाळा सोडणे क्रमप्राप्त झाले. घरात आई आणि तो दोघेच . माधुकरीवर गुजराण करणाऱ्या त्यांना कुणाचाही आधार नव्हता. जे काही मोजके श्लोक पाठ होते , त्या आधारे तो मुलगा चार घरच्या पूजा करत असे. वय वाढत होते पण बुध्दी तिथेच स्थिर थांबलेली . अशा परिस्थितीत त्याला नोकरी मिळणे शक्यच नव्हते. आबाळ पाचवीला पुजलेली. आपल्याच आळीत राहणाऱ्या त्या मुलावर गिरीशचे लक्ष असायचे. गिरीशने त्याला वेळ प्रसंगी आर्थिक मदत केलीच परंतु आपल्या प्रेसमधे बारीकसारीक शुल्लक कामासाठी तितकीशी गरज नसतानाही कामाला ठेऊन घेतले आणि त्याला , त्याच्या वृद्ध आईला अक्षरशः जगवले. हे एक उदाहरण झाले. कितीतरी इतर गरजूंना त्याने अजिबात वाच्यता न करता स्वतःहून हात दिल्याचे मला ठाऊक आहे. कोणी आजारी आप्तस्वकीय इस्पितळात दाखल झालाय इतके कळल्याबरोबर पैसे घेऊन लगेच तिथे पोचणारा गिरीश असतो. आमच्या त्रिकुटातील शेखर आम्हाला कायमचा सोडून गेला. त्याच्या मागे त्याची पत्नी वर्षा अलिबाग जवळील गरुडपाडा या गावातच स्थायिक आहे . गिरीशची सुलभा आणि वर्षा पहिलीपासून एका वर्गात शिकलेल्या आणि जिवाभावाच्या मैत्रिणी . वर्षाने हक्काने कोणत्याही वेळी मारलेल्या हाकेला गिरीश आणि सुलभा यांचा तात्काळ प्रतिसाद असतोच असतो. गिरीशच्या भरभराटीचा आलेख वरवर जातच राहीला आहे . २०१८ साली गिरीशला ” रायगड भूषण ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . त्यावेळी त्याच्यापेक्षा त्याच्या मित्रपरिवारलाच जास्त धन्य वाटले. सुलभा म्हात्रे लग्नानंतर सौ. नीला तुळपुळे झाली . तिने जिद्दीने वकिलीचे शिक्षण पूर्ण करून एक नामवंत वकील म्हणून स्वतःला घडविले. मुलगा सत्यजित अलिबागच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सून पल्लवीने सासूकडून वकिलीचा वसा घेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नात साना आजीच्या शिस्तीत अभ्यासा बरोबर खेळातही प्रावीण्य सिद्ध करत आहे. लाठी चालविण्याच्या खेळाच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी सहभागी होऊन जिथे जाईल तिथून ती सुवर्णपदक जिंकून येते. अलिबाग मधील ब्राह्मण आळी मधून काही वर्षापूर्वी गिरीशचे कुटुंब विद्यानगर येथे , त्याच्या निसर्गप्रेमी पत्नीने स्वतः वाढविलेल्या सुबक बागेतील आलिशान बंगल्यात स्थलांतरीत झाले आहे. कमळ नागरी पतसंस्थेच्या विद्यमाने अलिबाग पासून आठ दहा कि.मी. अंतरावर देऊळ भेरसे गावात गिरीशने पुढाकार घेऊन काही वर्षांपूर्वी फक्त गीर गायींसाठी गोशाळा सुरू केली . अगदी आवर्जून पाहण्यासारखी. गिरीश अलिबागेत असतो तेव्हा जवळ जवळ दररोज त्याची आत्मीयतेने तिथे फेरी असते. गो शाळेचे कामकाज तो फार कळकळीने करतो . दरवर्षी दिवाळीत वसुबारसच्या मुहूर्तावर तर सवत्स गायींची पूजा आणि पोटात वासरू असलेल्या गायींची ओटी भरण्याचा यथासांग आणि विधिवत् कार्यक्रम तो आणि सुलभा पार पाडतात .
पहिल्यापासूनच अलिबागला निघण्याआधी गिरीश तिथे आहे का हे पाहूनच माझा बेत ठरतो. कारण त्याला शेकडो व्यवधानं. ” रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन ” चा अध्यक्ष असल्याने मध्यंतरी तो त्या स्पर्धा आयोजनात व्यस्त होता.
अलिबागला माझा मुक्काम असला तर त्याच्याकडेच हेही ठरलेले असते. दुसरीकडे कुठे राहण्याचा विषय काढलेलाही त्याला आवडत नाही. त्याच्या घरात पाऊल टाकले की वेळ कसा गेला ते कळत नाही . दशकानुदशकांच्या मैत्रीमुळे असंख्य विषयांचे , व्यक्तींचे संदर्भ गर्दी करून समोर उभे असतात. गप्पांना मुबलक विषय पुरवतात . वेळ कमी पडतो. अन्नपूर्णा सुलभा गप्पा मारता मारता आवडीने आवडीचे पदार्थ करत असतेच. २००५ साली मला राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यावर गिरीशला झालेला आनंद माझ्या मनावर कायमचा कोरलेला आहे. त्या सन्मानाबद्दल अलिबागच्या ज्या ब्राह्मण आळीमधे आमचे लहानपण गेले तिथे गिरीशने माझा सत्कार ज्या पद्धतीने घडवून आणला त्याला तोड नाहीं . मला लहानपणापासून ओळखणाऱ्या साऱ्यांना, इतकेच नव्हे तर पहिलीपासूनच्या आमच्या अलिबागस्थित वर्गमित्रांनाही त्यांनी आमंत्रित केले आणि तेव्हाच्या आठवणींना उजाळा आणून तो समारंभ खरोखर हृद्य आणि अविस्मरणीय केला.
मध्यंतरी एका कार्यक्रमाला अलिबागला आदल्या दिवशीच गेलो होतो . बरोबर माझ्यामुळे गिरीशलाही ओळखत असलेला मुंबईचा मित्र होता. आमचा मुक्काम अर्थातच गिरिशकडे होता. दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात मित्र उत्स्फूर्तपणे मला म्हणाला ” किती लकी आहेस अजित तू ! तुमची मैत्री पाहून कुणालाही हेवा वाटावा ! “. म्हटलं , खरंच भाग्यवान आहे मी ! आज ११ नोव्हेंबर. गिरीशचा वाढदिवस.
जगन्मित्र गिरीशला दीर्घायुरोग्य लाभो या सदिच्छे बरोबरच तो आहे असाच राहून त्याचे सद्गुण असेच तळपत राहोत ही मन:पूर्वक प्रार्थना.
अजित देशमुख (नि)
अप्पर पोलीस उपायुक्त,
9892944007
ajitdeshmukh70@yahoo.in
Leave a Reply