मी बस -स्टॉपवर ए .सी. बसच्या रांगेत उभा होतो. मला गारेगार हवा खायला आवडते असा त्याचा अजिबात अर्थ निघत नाही. मला ए.सी सहन होत नाही म्हणून मी आशा गारेगार ठिकाणी जाणे टाळतो. पण येथे माझा नाईलाज होता. काही ए. सी. बसमध्ये हल्ली कंडक्टर नसतो म्हणजे बसमध्ये चढताना किंवा उतरल्यावर कंडक्टर तिकीट काढतो.रांगेत उभ्या असणाऱ्या आमची कंडक्टर तिकीट काढत असताना रांगेच्या मागून एक बाई तिकीट काढायला पुढे आली असता कंडक्टर किंचित रागात त्या बाईला म्हणाला,” रांगेत उभ्या रहा मी येतो तिकीट काढत. त्यावर त्या बाई म्हणाल्या ,” मला जायचं नाही ! मी आता आले बसने पण उतरल्यावर तेथे कंडक्टर नव्हता म्हणून तिकीट घ्यायला आले. त्यावर कंडक्टरने त्या बाईला तिकीट दिली आणि तो म्हणाला,” हल्ली इतकी इमानदार माणसे भेटतात कोठे ?” मलाही त्या बाईच व्यक्तिशः कौतुक वाटलं. ती बाई उच्चशिक्षित नव्हती. साधी घरकाम करणारी बाई होती. मग तिच्यात हा इमानदारपणा आला कोठून ? आपल्या देशात मानाच्या जागेवर बसलेले सर्वच उच्चशिक्षित इमानदार आहेत का ? तर नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
माझे एक गुजराथी मित्र मला म्हणाले होते. मुंबईतील गुजराथी व्यापारी आपल्या दुकानाची चावी विश्वासाने मराठी माणसाकडे देतात कारण मराठी माणूस इमानदार असतो.पण इमानदारीत काम करणाऱ्या मराठी माणसाला खरंच त्याच्या इमानदारीच फळ इमानदारीत मिळत का ? तर नाही ! हे कलियुग आहे या युगात इमानदार लोकांना बावळट आणि मूर्ख समजलं जातं. आणि त्यांच्या इमानदारीचा आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेतला जातो. आज या जगात चांगुलपणावरचा विश्वास कायम आहे तो या मूठभर इमानदार लोकांमुळेच ! ती बाई बसमधून उतरल्यावर कंडक्टर नसल्यामुळे सरळ आपल्या घरी जाऊ शकली असती पण ती सरळ न जाता रस्ता ओलांडून तिकीट काढण्याकरिता पलीकडे आली. तिच्यासोबत आणखी बरीच लोक उतरली असतील पण इमानदारी फक्त आणि फक्त तिच्यात होती. ती इमानदारी तिच्यात संस्काराने आणि परंपरेने आलेली असावी ! शिक्षणाने नाही. शिक्षणाने हल्ली माणूस फक्त हुशार होतो. सुसंस्कृत आणि संस्कारी होत नाही. त्या स्त्रीला आपले पाच दहा रुपये वाचवल्यातुन मिळणाऱ्या आनंदापेक्षा आपण खरे वागलो यातून मिळणारा आनंद अधिक मोलाचा वाटला. आपल्या देशात दुर्दैवाने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्याला जराही लाज वाटत नसते.
इतकी इमानदार माणसे हल्ली भेटतात कोठे ? या त्या कंडक्टरच्या वाक्याने ती बाई नक्कीच सुखावली असेल. आपण खास आहोत. इतरांपेक्षा वेगळे आहोत याचा तिला नक्कीच आनंद झाला असेल. मी कित्येक उच्चशिक्षित लोकांना बिनातिकीट प्रवास करताना पाहिले आहे. आपण तिकीट न काढून आपल्या देशाचं नुकसान करत आहोत याबद्दलची यकिंचितही लाज त्यांच्या डोळ्यात नसते. उलट आपले काही रुपये वाचले याचा असुरी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. अशी बेमानी करून पैसे बचत करणाऱ्यांना ही बचत वाया जाणारी वीज, पाणी आणि अन्न पाहून का सुचत नाही ? इमानदारीत काम करणाऱ्या कामगाराला त्याच्या मालकाने त्याच्या कामाचा इमानदारीतच मोबदला द्यायला हवा ! पण तसे न होता या इमानदार लोकांचीच आज समजात दुर्दैवाने जास्त पिळवणूक होताना दिसते. मग नकळत मनात विचार येतो…इमानदारीचा ठेका काय फक्त गरिबांनीच घेतलेला आहे का ?…
लेखक – निलेश दत्ताराम बामणे
Leave a Reply