‘भारतीय संस्कृती आणि स्त्रिया’ असा विषय चर्चेला आला की स्वाभाविकपणे सतीप्रथा, विधवा पुनर्विवाह बंदी इथपासून ते शिक्षणाचा अभाव आणि ‘चूल आणि मूल’ इतकेच बंदिस्त आयुष्य अशा गोष्टी हमखास वाचायला, ऐकायला मिळतात. मात्र प्रत्यक्षात तसेच आहे का? याचा पूर्वग्रहरहित विचार तथाकथित बुद्धिवादी लोक मुळीच करत नाहीत. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी ते अगदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माँसाहेब, महाराणी सईबाईसाहेब अशा कित्येक कर्तृत्ववान स्त्रियांची नावे आपल्या नजरेसमोर आहेत. भारतीय समाज खरंच स्त्रियांबाबत अनुदार दृष्टिकोन ठेऊन वागत असता तर ही नावे खचितच दिसली नसती हे साधेसोपे निरीक्षण आहे. मात्र मेकॉले आणि मॅक्सम्युल्लर आदिंनी पेरलेल्या विषारी बीजांचे आज वृक्ष झालेले असल्यानेच अशा गोष्टी आमच्या माथी मारल्या जातात. अशाच प्रकारचा कांगावा केला जातो तो स्त्रियांच्या आरोग्याबाबतदेखील भारतीय संस्कृती उदासीन आहे म्हणून!! याबाबतची सत्यपरिस्थिती वाचकांसमोर यावी यासाठी हा लेखप्रपंच.
आयुर्वेद हे प्राचीनतम वैद्यकशास्त्र असून आयुर्वेदाने स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वंकष विचार सर्वप्रथम जगासमोर मांडला. कायचिकित्सा आणि कौमारभृत्यतंत्र या शाखांच्या अंतर्गत आयुर्वेदाने स्त्रियांच्या आरोग्याचा विचार मांडला आहे. मासिक पाळी, सगर्भावस्था, प्रसूती झाल्यावर अशा तीन टप्प्यांत हा विचार करता येईल.
मासिक पाळी:
मासिक पाळी हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण शारीरिक आणि मानसिक घटनाचक्र आहे. स्त्रीला खऱ्या अर्थाने ‘स्त्रीत्व’ प्रदान करणारी बाब म्हणजे मासिक पाळी होय. केवळ प्रजननक्षमताच नव्हे तर स्त्रियांचे एकंदरीत आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची गोष्ट. मात्र सध्याच्या काळात सुमारे ८० ते ९० टक्के मुलींना अनियमित मासिक पाळीची समस्या असल्याचे दिसून येते. आम्हा वैद्यांकडे येणाऱ्या स्त्रीरूग्णांत पीसीओडी सारखे निदान घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. पुढे जाऊन स्त्रियांमध्ये गर्भधारणा न होणे म्हणजेच वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण म्हणजे पीसीओडीसारख्या समस्या आहेत हेदेखील आपण लक्षात घेतले पाहिजे. आयुर्वेदीय उपचारांनी या समस्येत उत्तम लाभ होतो हे सत्य असले तरी त्याचे मूळ कारण हे प्रामुख्याने बदलत्या जीवनशैलीत आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
झोपण्या-उठण्याचा अनियमित वेळा, सतत बाहेरचे अनारोग्यकर पदार्थ खात राहणे, चॉकलेट्सचा अतिरेक (लहान मुलं खात नसतील इतकी चॉकलेट्स पौगंडावस्थेतील मुली फस्त करतात असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.) आणि व्यायामाचा अभाव ही मासिक पाळीच्या समस्या निर्माण करणाऱ्या कारणांपैकी प्रमुख कारणं. ब्राह्ममुहूर्तावर उठणे आणि रात्री उशिरापर्यंत जागून चॅटिंग न करता वेळच्या वेळी झोपणे इथपासून ते प्रकृतीनुसार कोणी कुठला आहार घ्यावा इथपर्यंत आयुर्वेद बारकाईने विचार करतो. पूर्वीच्या काळी मासिक पाळीशी संबंधित समस्या असल्यावर पिंपळ वा वडाला प्रदक्षिणा मारणे हा ‘तोडगा’ सुचवला जाई. यात अन्य काही नसून केवळ शारीरिक व्यायाम अपेक्षित आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आयुर्वेदात केवळ पीसीओडी सारखीच समस्या नव्हे तर मासिक पाळीशी संबंधित किमान २० समस्यांचा विचार केला असून त्यांना ‘योनिव्यापद’ असे म्हणतात. आज आयुर्वेदात स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्र या विषयात पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम असून स्वतंत्रपणे कार्यरत असणारे ‘आयुर्वेदीय स्त्रीरोगतज्ज्ञ’ आहेत हे अनेकदा आपल्याला ठाऊक नसते म्हणून मुद्दाम नमूद करत आहे.
मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना त्यांची नाजूक स्थिती लक्षात घेता संपूर्ण विश्रांती मिळावी याबाबत आयुर्वेद आग्रही आहे. या काळात स्त्रियांनी पचायला हलका आहार घ्यावा, व्यायामादि शारीरिक श्रम करू नयेत याचे सविस्तर वर्णन चरकसंहितेत वाचायला मिळते. आजही तसे करणेच श्रेयस्कर आहे. दुर्दैवाने ‘स्त्री-पुरुष समानता’ या शीर्षकाखाली काही विचित्र संकल्पना आपल्या मनात रुजवलेल्या असल्याने त्यांचा गैरफायदा घेत काहीजण सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिरातींत मासिक पाळीच्या काळात गिर्यारोहण वा अन्य खेळ वगैरे आता सहजशक्य आहेत असे चित्र रंगवत असतात. मात्र या दिवसांत केलेल्या अशा दगदगीचे किती गंभीर दुष्परिणाम त्या स्त्रीच्या आरोग्यावर होतात याकडे मात्र आम्ही उत्पादन खपवण्याच्या नादात सोयीस्कर दुर्लक्ष करतो. ‘इष्टं धर्मेण योजयेत।’ असे शास्त्र सांगते. अर्थात, योग्य गोष्ट समाजात रुजवण्यासाठी धर्माचा आधार घ्यावा. स्त्रियांना या काळात आराम मिळावा ही भावना घराघरांत पोहचावी या हेतूनेच त्याला धार्मिक विचारांची जोड दिली गेली. काही काळाने त्याचा विपर्यास झाला हेदेखील मान्य. मात्र तसा विपर्यास होणे ही तत्कालीन समाजाची मर्यादा आहे; शास्त्राची नव्हे. अर्थात हाच एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. त्यामुळे तूर्त आपण पुढील मुद्द्याकडे वळूया.
सगर्भावस्था:
सगर्भावस्था म्हणजे बाळंतपण हा स्त्रियांच्या आयुष्यातील अतिशय नाजूक आणि सुखदायी असलेला काळ. माता आणि तिच्या गर्भात वाढणारे बालक यांच्या एकंदर आरोग्याचा सर्वांगीण विचार आयुर्वेदाने केलेला आहे. आजकाल बाळंतपण आणि आयुर्वेद हे शब्द एकत्र ऐकले की स्वाभाविकपणे जो शब्द आपल्या मनात येतो तो म्हणजे ‘गर्भसंस्कार’. लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे आयुर्वेद बाळंतपणातील एकंदर आहार-विहार आणि औषधी यांबद्दल सविस्तर वर्णन करताना गर्भसंस्कार हा शब्द कुठेही वापरत नाही!! आयुर्वेदात वापरलेली संज्ञा आहे ‘सुप्रजाजनन’. मग ‘गर्भसंस्कार’ हा शब्द इतका प्रसिद्ध कसा? ‘मार्केटिंग’ हे त्याचे एकमेव उत्तर आहे! गरोदरपणात काय खावे, टाळावे याचे मार्गदर्शन कोणत्याही पुस्तक, सीडी यांतून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष वैद्यांना भेटूनच घ्यावे. आजकाल तर गरोदरपणात करायची आसने फारच फोफावत आहेत. मात्र त्याकरतादेखील तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा. स्वतःच्या बुद्धीने केलेल्या प्रयोगांचे गंभीर परिणाम होतात; आणि काहीही दोष नसताना खापर मात्र आयुर्वेदावर फुटते हे प्रत्यक्ष रुग्णानुभवांवरून नमूद करू इच्छितो.
आयुर्वेदानुसार ‘चांद्रमास’ गणना धरून २८ दिवसांचा एक महिना याप्रमाणे १० महिन्यांची सगर्भावस्था मानली जाते. (आधुनिक विज्ञानाने मानलेला ९ महिने ९ दिवस हा काळदेखील तितकाच म्हणजे सरासरी २८० दिवसांचा असतो. हा केवळ मोजणीच्या पद्धतीतील फरक आहे.) या प्रत्येक महिन्यात गर्भाची वाढ कशी होते आणि त्यानुसार मातेने कोणता आहार आणि औषधी घ्यावीत याचे सखोल वर्णन चरक-सुश्रुतादि आयुर्वेदीय ग्रंथांत आलेले आहे. आजही कित्येक माता-भगिनी आधुनिक उपचारांसह बाळंतपणासाठी आयुर्वेदीय वैद्यांचा नियमित सल्ला घेऊन स्वतःचे आणि बालकाचे उत्तम आरोग्य राखून आहेत.
प्रसुतीपश्चात:
नवजात अर्भक आणि त्याची माता या दोघांच्याही आरोग्याची काळजी आयुर्वेदाला आहे. आई आणि बाळ या दोघांनाही तेलाने मालिश करणे, मातेला दुध-तूपयुक्त उत्तम आहार देऊन तिच्या शरीराची या काळात झालेली झीज भरून काढणे याबाबत आयुर्वेद आग्रही आहे. बालकासाठी त्याच्या आईचे दुध हा सर्वोत्तम आहार आहे हे जगाला सर्वप्रथम सांगितले ते आयुर्वेदाने. केवळ इतकेच नव्हे तर स्तन्यपान (स्तनपान नव्हे!) करवण्याची योग्य पद्धत, अंगावरील दूध जास्त/ कमी करण्यासाठीचे उपचार आणि मातेच्या दुधातील दोष व त्यांवर करण्याचे उपचार अशा प्रकारे अद्यापि आधुनिक वैद्यकानेही विचारात न घेतलेले पैलू आयुर्वेदात सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहेत. आयुर्वेदानुसार केवळ आहार म्हणून स्तन्यपान देण्याची सीमारेषा ही सहा महिने आहे. आज आपण पाश्चात्य संशोधने आणि काही खिसेभरू एनजीओ यांच्या नादी लागून २-३ वर्षे वयापर्यंत बालकांना स्तन्यपान देण्याची भलामण करत आहोत. मात्र तसे करणे मातेच्या आरोग्यास घातक आहे याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. इतक्या उशिरापर्यंत स्तन्यपान करवल्यावर मुले ते सोडण्यास तयार न होणे, मातेच्या हाडांची झीज, केस गळती, कंबरदुखी यांसारख्या समस्या आ वासून उभ्या राहतात. आम्हाला जणू या साऱ्याची जाणीवच नाही. दुसरीकडे मात्र बाळाला तेल लावू नका, बाळगुटी देऊ नका असे ‘अशास्त्रीय’ सल्ले देण्यात याच लोकांची चढाओढ लागल्याचे दुर्दैवी दृष्य पाहायला मिळते आहे. अर्थात; सत्य परेशान हो सकता है; पराजित नहीं| या न्यायाने लवकरच आयुर्वेदाचा शाश्वत उपदेश सर्वप्रथम पाश्चात्य देशांतील लोक पाळू लागतील; त्यानंतर कदाचित आपल्याकडच्या लोकांना नेहमीप्रमाणेच जाग येईल!!
बाळंतपणानंतर योग्य काळानंतरही कित्येक स्त्रियांना शरीरसंबंध पूर्ववत् ठेवण्यास अडचणींना सामोरे जावे लागते. यावरही आयुर्वेद आणि कामशास्त्र यांच्या समन्वयातून उत्तम उपचार करता येतात हा प्रत्यक्ष चिकित्सानुभव आहे.
एकंदरीत विचार करता; आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असल्याने आपल्या संस्कृतीने स्त्रियांबद्दल कोणताही संकुचित दृष्टीकोन न ठेवता उलट त्यांच्या आरोग्याबद्दल अतिशय काळजीपूर्वक विचार केला आहे हे स्पष्ट होते. आचार्य चरक तर म्हणतात; जगात उत्तम असे जे जे काही आहे ते सर्व स्त्रिच्याच ठायी आहे. नवरात्रीसारखा उत्सव म्हणजे या स्त्रीत्वाचा मूर्तिमंत सन्मान आहे. मात्र ‘या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता’ असे म्हणत गौरव करण्याची प्रथा ज्या देशात आहे; त्याच देशात ‘बेटी बचाव देश बचाव’ सारखे अभियान हातात घ्यावे लागणे हे निश्चितच सुखावह नाही. ही स्थिती बदलायची असल्यास केवळ सण साजरा करून भागणार नाही. चला तर; नवरात्रीच्या निमित्ताने स्त्री-आरोग्याचा जागर करण्यास कटिबद्ध होऊया आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून या दुर्गेची आरोग्यपूजा बांधूया.
© वैद्य परीक्षित स. शेवडे; MD (Ayu.)
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply